महाराष्ट्राचे माजी मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेनेच्या काही आमदारांसह सुरतला २० जून रोजी पोबारा केला. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना, मंत्रीपद भूषवित असतांना ईडीची भीती, अधिक लालसा, राक्षसी महत्त्वाकांक्षा आणि पैसा यांच्या आहारी जावून शिवसेना पक्षाशी गद्दारी केली. निष्ठावान शिवसैनिकांनी, महाराष्ट्रातील जनतेने ‘गद्दार’ संबोधलेले या अलिबाबा आणि ४० चोरांना आवडले नाही. आम्ही गद्दार नाही तर, आम्ही उठाव केला, असे ते म्हणू लागले. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार आम्हाला पुढे न्यायचे आहेत. आम्ही गद्दारी केली नाही तर राष्ट्रवादीच्या कचाट्यातून शिवसेना वाचविण्यासाठी केलेला हा उठाव आहे, असे सांगू लागले.
यांना शिवसैनिकात संभ्रम निर्माण करायचा आहे आणि गद्दारी केल्यामुळे जनतेत जो रोष निर्माण झाला आहे तो कमी करायचा आहे. बाळासाहेबांचे कवच घेऊनच त्यांना जनतेत जावे लागत आहे. नाहीतर जनता त्यांची गय करणार नाही. गद्दारी आणि उठाव यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ब्रिटिश साम्राज्याविरूद्ध ज्यांनी क्रांतिकारी लढा दिला त्याला उठाव म्हणतात. हा उठाव नसून गद्दारी आहे.
१० मे १८५७ रोजी दिल्लीपासून ४० मैलाच्या अंतरावर असलेल्या मेरठ छावणीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय सैनिकांनी बंड पुकारले होते, उठाव केला होता. तो दडपण्यासाठी इंग्रजांना अनेक वर्षे लष्करी मोहिमा कराव्या लागल्या होत्या. उमाजी नाईकांनी रामोश्यांना संघटित करून इंग्रजांविरूद्ध लढण्याचे आवाहन केले होते. उमाजीचे बंड हे ब्रिटिश सत्तेविरूद्ध होते. ते स्वकीयांविरूद्ध मुळीच नव्हते. उमाजीचे वैर त्यांना गुन्हेगार ठरवणार्या वृत्तीशी होते. ब्रिटिशांना घालवून स्वराज्य स्थापण्याचा त्यांचा संकल्प होता. ब्रिटिश सत्ता समूळ नष्ट करण्याचा चंग बांधणारा उमाजी नाईक याला ३ फेब्रुवारी १९३४ रोजी ब्रिटिशांनी त्यांच्या विरूद्ध उठाव केल्यामुळे फाशी दिली.
कोल्हापूर लष्करातील हिंदी शिपायांनीही अधिकार्यांविरूद्ध वेळोवेळी उठाव केला होता. १८०६ सालच्या वेल्लोर येथील तसेच, १८२४ साली बराकपूर येथेही उठाव झाले होते. परंतु ते स्थानिक स्वरुपाचे असल्यामुळे इंग्रजांनी मोडून काढले. हिंदुस्थानातील छोटा नागपूर भागातील कोलरी आदिवासींनी १८२७मध्ये तर, आदिवासी बंडखोर नेता बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरूद्ध १८३१मध्ये उठाव केला. त्याच दरम्यान ओरिसातील लोंडा आदिवासी तसेच बिहारमधील संथाळाचा उठाव हा इंग्रजांना हादरा देणारा ठरला. या उठावात इंग्रजी सत्तेविरूद्ध असंतोष होता. या उठावात हिंदुस्थानी समाजाच्या आशा, आकांक्षा, निराशा आणि असंतोष दिसत होता.
१८४० साली सातारचे छत्रपती प्रताप सिंह यांनी तर १८४१ साली कोल्हापूर भागातील जनतेने ब्रिटिश सत्तेला विरोध केला. सातारच्या गादीवर ईस्ट इंडिया कंपनीने जो अन्याय केला त्याविरूद्ध रंगो बापूजी (गुप्ते) यांनी बंड केले, १८५७ साली ब्रिटिशांविरूद्ध बंड करण्यासाठी रंगो बापूजी यांनी सातारा भागातील कोळी, रामोशी, मांग आदी जातीजमातीतील लोकांची एकजूट बांधली. स्वामीनिष्ठ रंगो बापूजींच्या उठावाचा सुगावा ब्रिटिशांना लागला होता. परंतु रंगो बापूजीने इंग्लंडमध्ये १४ वर्षे लढा दिला. कंपनीच्या हिंदुस्थानातील कारवायांच्या चिंध्या उडवल्या. १८५७मध्ये दक्षिण भागात बंडाचा वणवा पेटवला आणि शेवटपर्यंत लढा दिला. पण ब्रिटिशांच्या हाती रंगो बापूजी लागले नाहीत. सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळविण्यासाठी रंगो बापूजीने प्रयत्न केले.
क्रांतिवीर नाना पाटील यांनी उभारलेला ‘पत्री’ सरकारचा लढा हा ब्रिटिशांविरुद्धचा उठाव होता. ‘आता काय वाटेल ते होवो! प्रसंगी प्राण गमवावे लागले तरी बेहत्तर, पण कोणत्याही परिस्थितीत इंग्रज सरकारला शरण म्हणून जायचे नाही. यापुढे आपण सर्वांनी भूमिगत राहूनच या जुलमी सरकारशी प्राणपणाने संघर्ष करण्याचा निर्धार नाना पाटील यांनी केला. त्यांनी सातारा जिल्ह्यात ‘ग्रामराज्य’ निर्माण केले. याच ऐतिहासिक लढ्याला ‘पत्री’ सरकार संबोधले गेले. ब्रिटिशांविरुद्ध एकजूट करून १९४६ पर्यंत नाना पाटील यांनी लढा सुरूच ठेवला. हा अन्यायाविरुद्धचा लढा, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध केलेला उठाव होता.
तात्या टोपे, भगतसिंह, मंगल पांडे, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांच्या जुलमी अत्याचाराविरुद्ध आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. काहींनी छातीवर गोळ्या झेलल्या तर, काही फाशीच्या तख्तावर हसत-हसत गेले. याला ‘उठाव’ म्हणतात.
गेल्या १५०-२०० वर्षांत महाराष्ट्रात व देशात सर्वाधिक राजकीय लढे लढले गेले. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी बंड केले, उठाव केला. त्यांच्या उठावाने काही जीवनादर्शक निर्माण केले. ही कर्तृत्ववान माणसे प्रखर तेजाने तळपत असतात. ही उठाव करणारी सर्व मंडळी झुंझारवीर, क्रांतिवीर होती. कुठलीही लालसा, पदाची अपेक्षा वा पैसा याच्यासाठी त्यांनी उठाव केला नाही तर, त्यांच्यासाठी देशनिष्ठा, स्वामीनिष्ठा हेच जीवनाचे ध्येय्य होते. एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, दादा भुसे आदींनी अडीच वर्ष मंत्रीपदाचा ‘सर्वार्थाने’ लाभ घेतल्यानंतर निधी मिळत नसल्याचा, अन्यायाचा, नेतृत्वाकडून अपमानास्पद वागणूक मिळण्याचा साक्षात्कार झाला आहे. अधिक लाभ मिळविण्यासाठी निर्माण झालेली राक्षसी राजकीय महत्वाकांक्षा कालांतराने राजकारणात घात करू शकते आणि हद्दपारही करू शकते. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या शिवसेनेच्या ३९ आमदारांचा हा उठाव नसून गद्दारी आहे.