माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या त्या दिवशी मला जे साग्रसंगीत सांगत होता त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. तो म्हणत होता, महाराष्ट्रातील सत्तापालटाचा भाजप आणि बंडखोरांचा गेम जेव्हा दिल्लीवरून रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने खेळला जात होता, त्यावेळी तीन दिवसांत चार वेळा गुजरात दौरा आणि दोन दिवसांत तीन वेळा दिल्ली दौरा करून फडणवीस अगदी थकून गेले होते. घरी जाऊन कधी एकदा पडतो, असं त्यांना झालं होतं. दिल्लीवरून लक्ष ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याने मी ती एखाद्या डिटेक्टिव्हसारखी पार पाडत होतो. या कानाची खबर त्या कानाला न देता… दिल्लीतल्या त्यांच्या हालचाली आणि भेटीगाठी त्याचा तपशील जसा मला मिळत होता, तसाच त्यापूर्वी त्यांच्या गुजरात भेटीचाही मिळाला होता. टीव्ही चॅनेलवर ज्या बातम्या नंतर झळकत होत्या, त्यांचा संपूर्ण तपशील मला त्यापूर्वी अर्धा तास कळत होता. बंड यशस्वी करण्याची सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आल्यामुळे आपण पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ लवकरच घेणार या खुशीत गाजरे खात आधी चार-पाच दिवस झालेला गुजरात-दिल्ली वार्यांचा आणि फेर्यांचा त्रास ते हसत-खेळत सोसत होते.
त्या दिवशी सायंकाळी सातच्या सुमारास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होईल, ही बातमी मला दिल्लीकडून समजली, तशी ती फडणवीस यांनाही समजली. मी त्यांच्या निवासस्थानाच्या आसपासच घुटमळत होतो. म्हटलं आत जाऊन त्यांचं अभिनंदन करु या. मी बेल दाबली. अमृता वहिनींनी दार उघडलं. मला ओळखलं. `आत या’ असं म्हणून दोन पेढे माझ्या हातावर ठेवले आणि गाण्याची लकेर मारतच त्या मी आल्याची वर्दी देण्यासाठी आत गेल्या. बाहेर येऊन मला म्हणाल्या, तुम्ही पाच मिनिटं बसा, साहेब कपडे बदलताहेत. शपथविधीला जायचंय ना राजभवनवर. मी कोचावर बसलो त्यांनी आंब्याचा ज्यूस दिला. मी घटाघटा तो घशाखाली रिचवला. एवढ्यात फडणवीसांची हाक आली, अहो, आत या. माझं झालंय. मी तडक् त्यांच्या दालनात गेलो. ते अंगातील कपड्यांवर सुगंधी स्प्रे मारत होते. मला म्हणाले, बसा, ही मिठाई घ्या, सात वाजता मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी आहे. तुम्हाला माहीत आहे, मला अशा शपथविधींचा किती अफाट अनुभव आहे ते. मी फक्त हसलो. एवढ्यात त्यांचा मोबाईल वाजला. मी म्हटलं, मी बाहेर थांबतो. ते म्हणाले नको, नड्डांचाच आहे. वाटल्यास स्पीकरवर ठेवतो. माझं मोठं स्वप्न थोड्याच वेळात साकार होणार आहे. मी उगाच वल्गना करत नसतो. त्यांनी मोबाईल कानाला लावला. नड्डांचं बोलणं स्पष्ट ऐकू येत होतं. वो रिबेल सीएम की ओथ लेगा और आप डेप्युटी सीएम की. ये पार्टी की ऑर्डर और डिसीजन है! उसे फॉलो करो…
एवढं ऐकल्यावर पुढचं न ऐकताच ते मटकन् सोफ्यावर बसले. क्षणापूर्वी आनंदी असलेला त्यांचा चेहरा साफ कोमेजला. डोळ्यांत अश्रू उभे राहिले. त्यांनी तोंडावर रुमाल धरला. तरीही मला अस्पष्टसा हुंदका ऐकू आला. त्यांचा गळा दाटून आला होता. मला म्हणाले, पोक्या अरे गेल्या चार-पाच दिवसांत कशासाठी एवढी तंगडतोड केली मी. मला या लोकांनी मुद्दाम अपमानित केलंय. हा माझा नाही तर महाराष्ट्र भाजपचा अपमान आहे. मी त्या दाढीवाल्याच्या हाताखाली काम करू? या सत्तापालटाच्या खेळीत माझा बळी देण्याचा डाव कुणीतरी खेळतंय, असं म्हणून दिलीपकुमारसारखे दोन्ही हात तोंडावर घेऊन ते राजेश खन्नासारखे पुटपुटू लागले. सगळा मूड खराब झाला…
ये क्या हुआ, कैसे हुआ,
कब हुआ, क्यों हुआ
जब हुआ, तब हुआ, छोडो
ये ना पुछोऽऽऽ
मेरा सुंदर सपना टूट गया
हे गाणं ते गाऊ लागल्यावर आतल्या खोलीतूनही अमृता वहिनींच्या मुसमुसण्याचा आवाज येऊ लागला. त्यांनीही तो फोन ऐकला असावा. म्हणाल्या, पोक्या भावजी किती सुंदर स्वप्ने रंगवली होती आम्ही दोघांनी. गेली अडीच वर्षे आम्ही दोघांनी कशी तळमळून काढली असतील याची कल्पना नाही यायची कुणाला. हे तर झोपेतसुद्धा मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन हे गाणं त्रितालात बरळायचे. रोज भाषण करून यांच्या घशाचं खोबरं झालंय. याचं हेच फळ मिळालं का यांना? जगात सत्याचा वाली कुणी नाहीच का हो?… त्यांच्या डोळ्यातून अश्रुच्या धारा वाहू लागल्या.
मी म्हणालो, नको वहिनी, मेकअप खराब होईल. तर त्या म्हणाल्या, आता मी कुठे जाणार आहे शपथविधीला. यांना दुसर्याच्या हाताखाली काम करणारा माणूस म्हणून पाहूच शकत नाही. यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार हे मनाशी पक्कं असल्यामुळे मी उद्या-परवाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या तारखाही निर्मात्यांना धडाधड कळवूनही टाकल्या होत्या. आता मी तिथे जाऊन काय सॅड साँग गाऊ? मध्यरात्रीच्या शपथविधीसह यांचे तीन शपथविधी झाले. तेही मुख्यमंत्रीपदाचे. असं असताना त्यांना उपमुख्यमंत्री करणं म्हणजे यांचं डिमोशन मानते मी. म्हणजे एखाद्या हिरोला दुय्यम नटाचाच किंवा घरगड्याचा रोल देण्यासारखं आहे हे. त्यापेक्षा कोणतंच पद दिलं नसतं तरी चाललं असतं. आमच्या पक्षात जो यांच्या विरोधी गट आहे त्याला मात्र आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील. त्यांचं काही खरं नसतं म्हणून तर यांनी त्यांना आजपर्यंत खड्यासारखं बाजूला ठेवलंय. आज त्यांचा गुपचूप आनंदोत्सव साजरा होत असेल. तरी मी यांना सांगत होते, त्या दिल्लीच्या नेत्यांच्या फार आहारी जाऊ नका. कधी केसाने गळा कापतील ते सांगता यायचं नाही. एखाद्याला फार वरचढ होऊ द्यायचं नसलं ना की त्याचा पतंग कापतात. यांच्या बाबतीत हेच घडलंय. आता फार काही अपेक्षा बाळता येणार नाहीत… आणि त्या गाऊ लागल्या.
ना कोई उमंग है ना तरंग है
मेरी जिंदगी है क्या
एक कटी पतंग हैऽऽऽ
फडणवीस मात्र शांत होते. चेहरा रागाने लालबुंद झाला होता. तरीही राग पोटात घालून मला म्हणाले, शेवटी आम्ही संघाची माणसं. संघशिस्त महत्वाची. हुकूम शिरसावंद्य. संघ दक्ष, आता कोश्यारींकडे लक्ष. चला, निघू या राजभवनावर. `अमृता येतो गं’ अशी साद देऊन ते घराबाहेर पडले. मागोमाग मी सुद्धा.