चोरीच्या घटनेनंतर काढलेले फोटो सहज बघत असताना वाघमारेंची नजर एका फोटोपाशी थबकली. दुकानाचं बाहेरचं मुख्य शटर चोरांनी कटावणीच्या किंवा धारदार शस्त्राच्या साह्याने उचकटलेलं दिसत होतं. दुकानात आल्यानंतर आतल्या बाजूला एक छोटं दार होतं, ते उघडून मगच `शो केस`कडे जाता येणं शक्य होतं. ते दार उचकटल्याच्या खुणा कुठेही दिसत नव्हत्या. चोरांनी `शो केस`मधले काही दागिने पळवले होते, मात्र ते दार एवढ्या सहज कसं काय उघडलं गेलं, असा प्रश्न वाघमारेंना पडला. त्यांनी तातडीने पुन्हा सगळी फाईल चाळायला सुरुवात केली.
– – –
लालचंद शेठच्या दुकानात चोरी होणं ही जगातली अशक्य अशी गोष्ट मानली जात होती. मात्र, आज चोरट्यांनी तीही शक्य करून दाखवली होती. कितीही प्रयत्न केले तरी उचकटता येणार नाहीत, अशा पद्धतीची दारं लालचंद शेठने करून घेतली होती. सीसीटीव्हीचं जाळं भक्कम होतं. दार कुणी उचकटण्याचा प्रयत्न केलाच, तर आपोआप अलार्म वाजेल, अशी व्यवस्था होती. शिवाय, हे सगळे अडथळे पार करून जर चोर आत घुसलेच तर शिवा हा रात्रीच्या वेळी दुकानातच झोपणारा होतकरू कामगार त्यांना पिटाळून लावेल किंवा आरडाओरडा करून इतरांना खबर देईल, याची खात्री होती.
एवढं असूनही दुकानात चोरी झाली आणि लालचंद शेठचं धाबं दणाणलं. थोडाथोडका नव्हे, ५० लाखांचा माल चोरीला गेला होता. काही कपाटं चोरांना उचटकता आली नाहीत किंवा घाई झाली असावी म्हणून थोडाफार माल वाचला होता. मात्र हे नुकसानही मोठं होतं.
इन्स्पेक्टर वाघमारेंनी दुकानात तपासणी सुरू केली तेव्हाच लक्षात आलं, की चोरांनी भरपूर आधीपासून या चोरीची तयारी केली असणार. सीसीटीव्ही कुठे कुठे आहेत याची त्यांना कल्पना होती. दुकानात प्रवेश करायच्या आधीच त्यांनी ही यंत्रणा बंद पाडण्याची व्यवस्था केली होती. सगळ्यांच्या चेहर्यावर काळी फडकी होती, त्यामुळे चेहरा अजिबात दिसून येत नव्हता. लालचंद शेठचं दुकान रात्री नऊच्या दरम्यान बंद होत असलं तरी आसपास काही बार आणि दारूविक्रीची दुकानं होती, ती साडेबारा-एकपर्यंत सुरू असायची. शिवाय या भागात रात्री दोनपर्यंत रहदारी असायची. त्यामुळे रात्री दोन ते चार या वेळेतच दुकान फोडता येऊ शकतं, याचीही चोरांनी माहिती घेऊन ठेवली होती.
दुकानात झोपणारा कामगार शिवा नेमका त्याच दिवशी आजारी पडल्याने दुकानातच आला नव्हता, हे ऐकून मात्र वाघमारेंचे कान टवकारले. शिवाची शहरातच एक खोली होती आणि अधूनमधून तो तिथे जात असे.
“त्या खोलीवर तो आहे का, हे बघा आणि त्याला आधी पोलिस स्टेशनला बोलवून घ्या!“ वाघमारेंनी त्यांच्या सहकार्याला आदेश दिला.
“साहेब, आमचा गेलेला माल लवकरात लवकर शोधून काढा. आमच्या दादांना हा धक्का सहन होणार नाही!“ चाळिशीचा दिसणारा एक माणूस पोलिसांपाशी गयावया करत होता. हा चंदनशेठ, म्हणजे लालचंद शेठचा छोटा भाऊ असल्याचं वाघमारेंना समजलं. मोठ्या भावाबद्दल तो जरा जास्तच काळजीनं बोलत होता.
“ठराविक पद्धतीनं शटर उचकटून चोरी झालेय. ही मोडस वापरणार्या काही गँग आमच्या रेकॉर्डवर आहेत. त्यांची चौकशी होईलच. दागिने लवकरात लवकर मिळावेत, यासाठी आम्ही प्रयत्न करू,“ वाघमारेंनी त्यांना आश्वासन दिलं.
“नुसते प्रयत्न करू नका साहेब, चोरांना पकडून समोर हजर करा. दागिने आम्हाला परत मिळवून द्या. तुम्हाला हात जोडून विनंती करतो,“ असं तो परत परत सांगायला लागला, तेव्हा मात्र वाघमारे जरासे वैतागले.
“शिंदे, ह्या चंदनशेठची भावाबद्दलची काळजी जरा जास्तच वाटत नाहीये का? म्हणजे चोरी झालेय, त्याचा मोठ्या भावाला धक्का बसला असेल, हे सगळं मान्य. पण कसलाच पुरावा नसताना त्यांना शोधून काढणं एवढं सोपं वाटतं का ह्याला? एवढ्या वेळा का सांगतोय हा?“ वाघमारेंनी त्यांची नाराजी आणि शंकाही सहकार्यापाशी बोलून दाखवली.
रीतसर पंचनामा झाला. काय काय चोरीला गेलं, याची नोंद घेतली गेली आणि जुजबी चौकशी करून पोलिस पुढच्या तपासाला लागले. शिवाला शोधायला त्याच्या घरी पाठवलेला पोलीस शिपाई सांगत आला, की तो काल रात्रीपासूनच घरी आलेला नाही. रोज रात्री दुकानात झोपणारा शिवा त्याच रात्री तिथे नव्हता, हेच मुळात संशयास्पद वाटत होतं. तो आजारी असेल, काही काम असेल, ही शक्यता असू शकत होती, पण आता तो गायबच आहे, याचा अर्थ वेगळाच होता.
याच गल्लीत आणखीही काही सराफी दुकानं होती. काही ठिकाणी तर सीसीटीव्हीही नव्हते. ती दुकाने फोडण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत, अशी परिस्थिती होती. असं असताना चोरांनी नेमकं लालचंद शेठचं दुकानच कसं हेरलं, हाही प्रश्न वाघमारेंसमोर उभा राहिला होता. अर्थात, लालचंद शेठच्याच दुकानातून जास्त माल मिळेल, असा अंदाज चोरांना आला असणार, त्यानुसार त्यांनी नियोजन केलं असणार, हीसुद्धा एक शक्यता होतीच.
शिवा सापडला तर बर्याच गोष्टी उलगडणार होत्या. पोलिसांच्या पथकाच्या शोधाला दोनच दिवसांत यश आलं. शिवा गावाला गेल्याचं त्यांनी शोधून काढलं आणि एक पथक त्याच्या गावालाही पोहोचलं. शिवाच्या मुसक्या आवळण्यात आल्या. दरम्यानच्या काळात त्याचे आणि मालकांचे संबंध कसे होते, याबद्दलही जमेल तेवढी माहिती पोलिसांनी काढली होती.
“शिवा जरा आगाऊच पोरगा आहे साहेब. भैयांनी त्याला जास्तच डोक्यावर बसवला होता. एकदा तर तो त्यांना उलटसुलट बोलला, तरी त्यांनी त्याला माफ केलं होतं,“ चंदन शेठ पोलिसांना सांगत होता. यावरून शिवाने चोरांना साथ केली असावी किंवा तो चोरांचाच एक साथीदार असावा, अशीही शक्यता होती.
“चोरी झाली त्या रात्री तू कुठे होतास?“ वाघमारेंनी त्याला दरडावून विचारलं. शिवा आधी काही बोलायलाच तयार नव्हता. वाघमारेंनी पुन्हा विचारलं, तरीही तो गप्प राहिला, तेव्हा मात्र त्यांनी खण्णकन दोन थोबाडीत ठेवून दिल्या आणि शिवा खालीच कोसळला.
“भावाकडे गेलो होतो साहेब… खाजगी काम होतं…!“ गयावया करत तो सांगायला लागला.
“कसलं खाजगी काम? चोरांना चोरी करायला मिळावी म्हणूनच गायब झाला होतास की नाही, सांग. दुकानातली सगळी माहिती तूच दिलीस ना?“ वाघमारेंनी एकामागोमाग एक प्रश्नांची सरबत्ती केली. आणखी दोनचार थपडा खाल्ल्यानंतर शिवा पोपटासारखा बोलायला लागला. त्या दिवशी त्याच्या एका लांबच्या भावानं त्याला बोलावून घेतलं होतं. त्या भावाचं एका मुलीवर प्रेम होतं आणि तो तिला घरातून पळवून घेऊन आला होता. तिच्याशी लग्न करण्यासाठी त्याची खटपट सुरू होती, त्यासाठी त्यानं शिवाची मदत मागितली होती. शिवा तिकडेच गेला होता. वाघमारेंना ही कहाणी लगेच पटणं शक्यच नव्हतं, कारण असे बेमालूम खोटं बोलणारे अनेक अट्टल गुन्हेगार त्यांनी बघितले होते आणि त्यांना सरळही केलं होतं. मात्र, दोन पोलिसांना पाठवून त्यांनी शिवाच्या कहाणीचे धागेदोरे शोधले, तेव्हा तो सांगतोय ती गोष्ट खरीच असल्याचं त्यांना समजलं. शिवाचा या चोरांशी काही संबंध नाही, असं आत्ता तरी दिसत होतं. तो त्या दिवशी दुकानात नसणं हा फक्त एक योगायोग होता.
तपास पुन्हा एकदा जागच्या जागी येऊन थांबला होता. कुठलेच पुरावे मागे न सोडता बेमालूमपणे चोरी करण्यासाठी किती दिवसांचं नियोजन असावं, याचाच वाघमारे विचार करत होते. फक्त काही दिवस पाळत ठेवून हा गुन्हा करणं शक्यच नव्हतं.
वाघमारेंनी आता वेगळ्याच गोष्टींकडे बारकाईनं लक्ष द्यायला सुरुवात केली होती. त्यांनी आपल्या पथकातल्या काही जणांना विशिष्ट कामं दिली होती. काही जणांवर पाळत ठेवायची होती, काही व्यवहार बारकाईनं पाहायचे होते. काही ठिकाणी घडणार्या घडामोडी नीट टिपून त्यांची खबर द्यायची होती. यातून काही साध्य होईल का, याबद्दलही खात्री नव्हती. गवताच्या गंजीतून सुई शोधण्याचाच प्रकार होता, मात्र तो करणं आवश्यक होतं.
लालचंद शेठने हे दुकान स्वतःच्या हिंमतीवर उभं केलं, वाढवलं होतं. खरंतर त्यांच्या वडिलांनी सराफाचा व्यवसाय अगदी छोट्या पेढीपासून सुरू केला. लालचंद त्यांच्याच पठडीत घडले, वाढले. वडिलांकडून त्यांनी निष्ठा, सचोटी हे गुण घेतले. मेहनत करणं आणि गिर्हाइकाला उत्तम सेवा देणं, हे त्यांच्या धंद्याचं तत्त्व होतं. आपल्याला चार पैसे कमी मिळाले तरी चालेल, पण गिर्हाईक नाखूश होता कामा नये, याकडे त्यांचा कटाक्ष असे. त्यामुळेच अनेक लोकांना त्यांनी जोडलं होतं. बघता बघता त्यांच्या व्यवसायाची भरभराट झाली होती. लालचंद शेठच्या हाताखाली आता छोटा भाऊ चंदन त्याच पद्धतीने तयार होत होता. ही चोरी झाल्यापासून मात्र लालचंद शेठचं व्यवसायातलं लक्ष पूर्णपणे उडालं होतं. दुकान रोजच्या वेळेला उघडत होतं, व्यवहारही सुरू होते, लोक हळूहळू ती घटना विसरत होते, पण लालचंद शेठचं मन काही थार्यावर आलं नव्हतं. दुकानातून किती माल गेला, यापेक्षाही आपल्या दुकानात चोरी झाली, हा धक्काच लालचंद शेठसाठी मोठा होता. हे दुःख त्यांना जास्त त्रास देत होतं.
आता दुकानात चंदनचं बरंचसं काम बघायला लागला होता. चोरीची घटना घडून दोन आठवडे उलटून गेले, तरी चोरांचा तपास लागलेला नव्हता. इतर चोरींप्रमाणेच एक, अशी नोंद करून पोलीस ही फाईल बंद करतील, अशीच शक्यता बोलली जात होती.
चोरीच्या घटनेनंतर काढलेले फोटो सहज बघत असताना वाघमारेंची नजर एका फोटोपाशी थबकली. दुकानाचं बाहेरचं मुख्य शटर चोरांनी कटावणीच्या किंवा धारदार शस्त्राच्या साह्याने उचकटलेलं दिसत होतं. दुकानात आल्यानंतर आतल्या बाजूला एक छोटं दार होतं, ते उघडून मगच `शो केस`कडे जाता येणं शक्य होतं. ते दार उचकटल्याच्या, त्याचं नुकसान केल्याच्या खुणा कुठेही दिसत नव्हत्या. चोरांनी शोकेसमधले काही दागिने पळवले होते, मात्र ते दार एवढ्या सहज कसं काय उघडलं गेलं, असा प्रश्न वाघमारेंना पडला. हा मुद्दा आपल्या आधी का लक्षात आला नाही, असा विचारही त्यांच्या मनात आला. त्यांनी तातडीने पुन्हा सगळी फाईल चाळायला सुरुवात केली.
गेले काही दिवस काही ठराविक लोकांच्या मागावर पाठवलेल्या पथकानेही महत्त्वाची माहिती गोळा केलीच होती. त्यातून काही लिंक्स लागत होत्या, काही अंदाज बांधून या चोरीचं गूढ उकलणार, अशी शक्यता वाघमारेंना वाटू लागली होती.
हाती आलेली माहिती मालकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने त्यांनी थेट दुकानालाच भेट दिली. लालचंद शेठचं दुकानात येणं हल्ली कमीच झालं होतं, त्यामुळे चंदनशेठचीच भेट झाली.
“दुकानात चोर ज्या सहजपणे शिरले, त्यावरून घरातल्याच कुणाचातही या चोरीशी संबंध असावा, अशी शंका आम्हाला होती. आम्ही काढलेल्या माहितीवरून तशी खात्रीच झाली आहे,“ वाघमारे म्हणाले.
“म्हणजे कोण, साहेब?“ चंदनशेठ जरा गोंधळला.
“तुमचे मालक, स्वतः लालचंद शेठ,“ वाघमारेंनी हा बॉम्ब फोडल्यावर चंदनशेठ सटपटला. त्यानं पटकन दार लावून घेतलं आणि एकदम त्याचा आवाज नरमला.
“साहेब, अहो भैयांबद्दल असं कसं काय बोलू शकता तुम्ही?“ तो गोंधळून म्हणाला. पोलिसांकडे पुरावे आहेत, असं वाघमारेंनी ठासून सांगितलं, तेव्हा मात्र चंदनचीही खात्री पटल्यासारखी वाटली.
“तसं असेल, तरी साहेब भैयांवर काही कारवाई करू नका. हवं तर मी माफी मागतो त्यांच्या वतीनं. तुम्ही म्हणाल तसं करू, हे प्रकरण इथेच मिटवा,“ अशी विनवणी त्याने केली. वाघमारेंनी कुठलंच वचन त्याला दिलं नाही. ते निघून गेल्यावर मात्र चंदनशेठनं दोनचार फोन फिरवले. दुकानातून काम असल्याचं सांगून तो कुठेतरी निघूनही गेला.
संध्याकाळी शहराबाहेरच्या सुनसान जागेतल्या एका बंगल्यावर पोलिसांनी अचानक छापा घातला. बंगल्यात दडून बसलेल्या काही माणसांना ताब्यात घेतलं. अचानक आरडाओरडा, गोंधळ ऐकू आल्यानं दार उघडून कुणीतरी बाहेर आलं आणि त्या माणसाचा चेहरा बघून इन्स्पेक्टर वाघमारेंच्या चेहर्यावर ओळखीचं हसू पसरलं. तो चंदनशेठ होता.
“या चंदनशेठ, तुमच्यासाठी पालखीची तयारी केलेय!“ वाघमारे म्हणाले आणि चंदनशेठचा चेहरा पांढराफटक पडला. त्यांना बोलण्यासारखं आता फार काही उरलंच नव्हतं. उत्तम सुरक्षाव्यवस्था असलेल्या दुकानात एवढ्या सहज एखादी मोठी चोरी होते, त्यात घरातल्याचाच कुणाचा तरी हात असणार, हे तर पोलिसांना कळलंच होतं. आता हा सूत्रधार कोण, एवढंच शोधणं बाकी होतं. पोलिसांच्या तपासात चंदनशेठची गेल्या काही दिवसांत बदललेली देहबोली, त्याचं संशयास्पद वागणं बोलणं, यावरून त्याच्याबद्दलचा संशय वाढत गेला. त्याचे कॉल रेकॉर्डस तपासल्यावर
तो ठराविक लोकांच्या संपर्कात आहे हे लक्षात आलं आणि त्यांचा या चोरीशी संबंध आहे, हेही समजलं. वाघमारेंनी पद्धतशीरपणे लालचंद शेठवर संशय व्यक्त करून चंदनशेठची दिशाभूल केली. चंदन थोडा गाफील राहिला आणि त्याच रात्री त्याच्या शहराबाहेरच्या बंगल्यावर गेला. त्याच ठिकाणी त्यानं दुकानात चोरी करणार्या टोळीतल्या लोकांनाही बोलावलेलं होतं. त्यांना ठरलेली रक्कम देऊन हे प्रकरण त्याला कायमचं मिटवायचं होतं.
“मोठ्या भावानं तुला वाढवलं, मोठं केलं, पण त्याचं दुकान ताब्यात घ्यायचं, त्याची सगळी सत्ता हडप करायची, म्हणून मुद्दाम ही चोरी घडवून आणलीस. भैया खचून गेला, की सगळं आपल्याच ताब्यात येईल, असं तुला वाटलं होतं. खरं की नाही?“ वाघमारेंनी दरडावल्यावर चंदनशेठची बोलतीच बंद झाली. तपासात प्रगती होत नसतानाही चिकाटीनं आणि मेहनतीनं पोलिसांनी एका मोठ्या प्रकरणाचा तपास मार्गी लावला होता.