दि. २८ मे २०२२च्या ‘मार्मिक’मध्ये ‘राजकारणातील माणसे’ या सदराखाली सुरेंद्र हसमनीस यांचा ‘टोपी हळूहळू नामशेष होतेय का?’ हा लेख अनेक वाचकांनी वाचलाच असेल. टोपीसंबंधीचे ते लिखाण मीदेखील उत्सुकतेने वाचले. कारण मी स्वत: अजूनही गांधी टोपीधारी व टोपीप्रिय आहे. गांधीयुगाचा अंतिम काळ (सन १९४० ते ४८) मी अनुभवला आहे. (सध्या वय जवळजवळ ८७ वर्षे).
टोपी हा पेहराव आपल्या देशात मुख्यत: मुस्लीम राजवटीत रूढ झाला. तत्पूर्वी भारतात फेटा, पटका, पगडी अशी शिरोवस्त्रे रूढ होती. मुस्लिमांच्या टोप्या विविध प्रकारच्या होत्या. त्यांमधूनच भारतीय लोकांनी साधेसोपे शिरोवस्त्र कापडी टोपी हा प्रकार रूढ केला. ‘गांधी टोपी’ रूढ होण्यापूर्वीही लोक साध्या कापडी टोप्या वापरीत होते. सुमारे १९५०-६०पर्यंत टोपी न घालणे हे असभ्यपणाचे मानीत. ज्येष्ठ, श्रेष्ठ व माननीय व्यक्तींसमोर ‘बोडखे’ जाणे जनसंमत नव्हते. फार काय अशावेळी टोपी नसल्यास अंगातला सदरा किंवा बंडी काढून डोक्यास गुंडाळूनच कोणत्याही ‘मोठ्या’समोर लोक जात. ‘कमरेचे सोडून डोईस गुंडाळणे’ हा वाक्प्रचार म्हणजे त्या प्रथेचा अतिरेक होय (असा प्रकार कधीतरी लहान मुलांबाबत घडला असेल); परंतु त्याद्वारे तत्कालीन जनरूढी व जनमानस कळून येते.
गांधी टोपीची जन्मकथा अशी सांगतात… महात्मा गांधीजी (तत्कालीन बॅ. एम. के. गांधी) दक्षिण आप्रिâकेतून १९१५ साली कायमचे हिंदुस्थानात आले. आल्यावर त्यांनी भारतीय जनमानस जाणून घेण्यासाठी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सल्ल्यावरून संपूर्ण देशाचा प्रवास केला. आम जनतेचे जीवन जाणण्यासाठी तसेच अनुभवण्यासाठी ते मुद्दाम रेल्वेत तृतीय श्रेणीने प्रवास करीत होते. त्यावेळी ते गुजराती पारंपरिक वेषात (गुजराती फेटा, लांब अंगरखा आणि धोतर) प्रवास करीत होते. गाडीमध्ये सर्वत्र अल्पवस्त्रात असलेले, उघड्या अंगाचे स्त्री-पुरुष त्यांना दिसत होते. त्यांच्या डोक्यावरचा गुजराती फेटा पाहून कुणीतरी त्यांना छेडले. ‘आपल्या देशात असंख्य लोक अर्धनग्न असताना तुम्ही एवढा मोठा फेटा डोक्यास बांधता? या फेट्यात पंधरा जणांच्या टोप्या होऊ शकतात.’ गांधीजींना हे म्हणणे पटले व त्यांनी फेट्याचा त्याग करून साधी टोपी घालणे सुरू केले. गांधीजींनी त्या टोपीचा वापरही फार काळ केला नाही. ते खादीचा पुरस्कार करीत. त्यामुळे खादीच्या टोपीस गांधी टोपी म्हणून लागलेत. पुढे गांधी टोपीला खूप प्रतिष्ठा व जनमान्यता मिळाली. गांधी टोपी घातलेली महात्माजींची चित्रे त्याकाळी क्वचित पाहावयास मिळत होती. रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित जगप्रसिद्ध ‘गांधी’ चित्रपटातही गांधी टोपी घातलेले गांधीजी अल्पकाळ दिसतात. गांधीजींच्या काळात गांधी टोपीला खूप महत्त्व आले. काँग्रेसच्या सदस्यांसाठी तो अत्यावश्यक नियमच होता. दैनंदिन जीवनातही गांधी टोपीला महत्त्वाचे स्थान मिळाले.
सर्व स्तरातले लोकनेते, पुढारी आणि प्रतिष्ठित व्यक्ती गांधी टोपी वापरू लागले. सर्व लोकांसोबत मोठमोठे व्यापारी, उद्योगपतीही गांधी टोपी घालू लागले. गांधी टोपीच्या अतिरेकाचे दुष्परिणाम पुढे दिसू लागले. काही नफेखोर व लुबाडू लबाड व्यापारी व दुकानदार पांढर्या गांधी टोपीखाली आपले काळे धंदे झाकू लागले.त्यामुळे पुढे पुढे गांधी टोपी हा कुचेष्टेचा विषय होऊ लागला. खादी टोपीधारी काळाबाजारवाल्यांचे व्यंग दाखवण्यास्तव
खादी की टोपी बनी पहननेवाले हजार।
टोपी बिचारी क्या करे अंदर है कालाबाजार।।
त्या काळी काँग्रेस पक्षाचे कनिष्ठस्तरीय सदस्य होण्यासाठी केवळ चार आणे (नंतरच्या काळातील पंचवीस पैसे) सदस्यशुल्क होते. त्यामुळे कुणीही चार आणे शुल्क भरून व गांधी टोपी घालून काँग्रेसचे सदस्य होई आणि देशभक्त म्हणून मिरवू लागे.
आचार्य अत्रे यांच्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेला फार सांगावे लागत नाही. आचार्य अत्रे पत्रकार होते. नाटककार होते. चित्रपट निर्माते होते. विनोदी वक्ते होते. प्रख्यात साहित्यिक होते. तसेच व्यंगकवीही होते. अनेक व्यंगकाव्यांसोबत त्यांनी गांधी टोपीवर एक व्यंग्य कविता लिहिली. त्यामधील काही ओळी अशा…
मना सज्जना। चार आण्यात फक्त।
जरी व्हावयाचे तुला देशभक्त।।
तरी सांगतो मी तुला युक्ती सोपी।
खिशामाजी ठेवी सदा गांधी टोपी।।
गांधी टोपीची अशी कुचेष्टाही भरपूर झाली. अर्थात ती सर्व ‘राजकीय’ होती. सामान्य लोकांच्या दृष्टीने ती स्वीकार्य आणि आदरणीयच होती. आता गांधी टोपी जवळजवळ नामशेषच झाली.
पं. जवाहरलाल नेहरूजींच्या काळात आणि त्यानंतरही गांधी टोपीला विशेष सन्मान होता. त्या काळात खादीचा वेष हा राष्ट्रीय वेळ गणला जाई. पं. नेहरूजींच्या काळातील बहुतेक सर्व मंत्री, आमदार, खासदार सर्व स्तरांतील लोकनेत्यांचा पेहराव खादीची टोपी, सदरा, कोट, धोतर किंवा चुस्त पैजामा असाच होता. किंबहुना असा पेहराव करणार्या सामान्य माणसास लोक ‘पुढारी’च समजत होते. स्वातंत्र्योत्तर काळात केंद्रात व राज्यात सर्वत्र गांधी टोपीधारीच मंत्री व नेते होते. डॉ. राजेंद्रप्रसाद, लाल बहादूर शास्त्रीजी, जगजीवन राम इ. नेते खादीधारी व टोपीधारीच होते. फार थोडे लोक उदा. राजाजी, सरदार पटेल असे काही नेते टोपीविरहित होते. हळूहळू पुढील पिढीचे नेते टोपीविरहित होऊ लागले. ही टोपीविरहितता केंद्रात इंदिराजींच्या काळापासून तर महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्यापासून सुरू झाली, असे दिसून येते.
केंद्र व राज्य स्तरावरून सुरू झालेले लोण शेवटी जिल्हा, तालुका व ग्रामीण स्तरावरही आले. ग्रामीण स्तरावर हे लोण बरेच उशिरा आले. महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे अखेरपावेतो टोपीधारीच होते. त्यांच्यासारखी अनेक उदाहरणे असतील.
एकेकाळी टोपी हे सभ्यतेचे चिन्ह होते. आता ते बहुधा मागास व जुनाट विचारसरणीचे व खेडवळपणाचे (बहुधा) मानले जाते. सध्या शासकीय, प्रशासकीय, राजकीय, शैक्षणिक, व्यापार, उद्योग कोणत्याही क्षेत्रात टोपीला स्थान नाही. आता केवळ मिरवणुकांमध्ये ‘आपली ओळख’ दाखवण्याकरिता टोप्या घालून लोक केवळ ‘मिरवतात’. अन्य वेळी ते टोपीविरहितच असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ‘काळी टोपी’ आणि ड्रेस केवळ कार्यक्रमांपुरता, उत्सवापुरता आणि मिरवणुकीपुरताच असतो. अन्य संस्थांचीही तीच स्थिती आहे. आपले शीख बांधव मात्र सदैव ‘पगडीधारी’ आहेच. त्यांनी आपली ‘पगडी’ मुळीच सोडली नाही.
संस्कृत वाड़मयात ‘प्रहेलिका’ (कूटप्रश्न) हा एक काव्यप्रकार आहे. (हिंदीमध्ये त्यास पहेली म्हणतात) एक प्रहेलिका अशी-
या कुन्देन्दुतुषार हार धवला या शुभ्र वस्त्रै: कृता।
या पूर्व जनताहृता ही बहुधा संशोभिता मस्तके।।
नाम्ना राष्ट्रपितु: सदा तु कलिता या धारिता शासकै:।
कार्याणांच सुसाधिकाद्य वद मे का सा जनानां प्रिया।।
(यामधील पहिली ओळ वाचून आपल्यास सुप्रसिद्ध सरस्वतीस्तवन आठवले असेल)
या श्लोकाचा अर्थ असा-
जी कुन्दपुष्प, चंद्र, बर्फ, शुभ्र पुष्पहाराप्रमाणे धवल (पांढरी) आहे. जी शुभ्रवस्त्रांपासून बनवली आहे. जिचा लोक पूर्वी खूप आदर करीत होते. जी मस्तकावर अतिशय शोभायमान असते. जी राष्ट्रपित्याच्या नावाने ओळखली जाते. शासनकर्ते आणि लोकनेते जिला आपल्या डोक्यावर कललेली (तिरपी) धारण करतात, जी आपली कामे सहज शक्य करते, लोकांना प्रिय असलेली अशी ती कोण? हे मला सांग. अर्थात या पहेलीचे उत्तर ‘गांधी टोपी’ हे कुणालाही समजेल.
शेवटी, गांधी टोपी आणि ती घालणार्याविषयी लोकांचा काय विश्वास आणि आदर होता याची एक सत्यकथा ऐका. ही गोष्ट सांगितली आहे वैâ. अण्णासाहेब माडगूळकर (गदिमा) यांनी. ऑक्टोबर १९७३मध्ये यवतमाळ येथे अ. भा. मराठी साहित्य संमेलन झाले होते. गदिमा त्याचे अध्यक्ष होते. संमेलनात एका सत्रात त्यांनी ही आठवण सांगितली.
अण्णासाहेब म्हणाले, आज मी टोपी घालत नाही. पण एकेकाळी मी गांधी टोपी घालत होतो. महात्मा गांधीजींच्या एका मिरवणुकीत मी स्वयंसेवक होतो. त्यामुळे मी गांधी टोपी घातलेली होती. मिरवणुकीत अनेक स्वयंसेवकांप्रमाणे माझ्याही हाती निधी संकलनासाठी एक डबा होता. लोक आपापल्या शक्तीअनुसार डब्यामध्ये पैसे, नाणे, नोट टाकत होते. एका चौकात माझ्या हाती एका महिलेने सोन्याचांदीचे दागिने असलेला डबा दिला. मला तो दागिन्यांचा डबा पाहून आश्चर्य तर वाटलेच, परंतु त्या महिलेने माझ्यासारख्या सर्वस्वी अनोळखी तरुणाजवळ तो मौल्यवान दागिन्यांचा डबा दिला याचे खूप आश्चर्य वाटले. मी न राहवून त्या भगिनीस विचारले, ताईसाहेब! एवढा मोठा अमोल दागिन्यांचा डबा तुम्ही माझ्यासारख्या अनोळखी व्यक्तीजवळ कसा दिला? तुम्हाला माझ्याबद्दल एवढा विश्वास कसा वाटला? त्या मातेने उत्तर दिले, ‘अहो, तुम्ही गांधी टोपी घातलेली आहे. म्हणजेच तुम्ही गांधीजींचे माणूस आहात. गांधीजींच्या माणसांबद्दल आमच्या मनात तीळमात्र शंका असू शकत नाही. म्हणून मी नि:शंकपणे तुमच्या हाती हा माझ्या दागिन्यांचा डबा देत आहे. माझे दान योग्य ठिकाणी नक्की पोचणार याची मला खात्री आहे.’
महात्मा गांधीजींविषयी आणि गांधी टोपीविषयीचा असा जनविश्वास मी जीवनात अनुभवला. असा जनविश्वास आणि लोकादर आता उरला नाही. कालाय तस्मै नम: