विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला। तुळशी माळ घालूनी गळा कधी नाही कुटले टाळ। पंढरीला नाही गेले चुकुनिया एक वेळ। देव्हार्यात माझे देव, त्यांनी केला प्रतिपाळ, चरणांची त्यांच्या धूळ, रोज लावी कपाळाला’. आज ना उद्या विठ्ठल आपल्याला भेटायला येईल या आशेवर हजारो भाविक जगत आलेत. अशा या महामाऊलीने आम्हाला एकांती पायाशी बसवून मन अतृप्तसे राहील इतकी भेट दिली हे पुण्य कुठले?
– – –
ज्या विठोबाच्या दर्शनाला लाखोंची गर्दी उसळते, ज्या पंढरपुरी जाऊन त्याचे दर्शनही मिळत नाही, त्या देवाच्या समीप मी व पत्नी अनुराधा चक्क तासभर होतो, जवळपास कुणीही नव्हते. असे घडणे केवळ स्वप्नवत. मात्र हे खरे आहे. मूर्ती पाहता पाहता डोळे भरून येत होते. पटकन् डोळे पुसून ते रूप डोळ्यांत सामावून घेत होतो. त्यांच्या पायाला स्पर्श केला तर ते सजीव असल्याचा प्रत्ययही आला. हे घडले कसे ऐकण्यासारखे आहे.
‘तिरक्या रेषा हसरे बाण’ हा माझा व्यंगचित्र प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम खूप लोकप्रिय होता. महाराष्ट्रभर साडेतीन हजार कार्यक्रम मी केले. हजारो लोकांना मनसोक्त हसविले. असाच एक कार्यक्रम सोलापूरला एका नामांकित बँकेतर्फे होणार होता. गणपतीत तेथे दहा दिवस व्याख्याने होत. सहाच्या ठोक्याला पाचशे लोक प्रशस्त हॉलमध्ये हजर असत, नंतर प्रवेश नसे. बँकेतर्फे जाणे, येणे, राहणे व सोलापुरी चादर भेट म्हणून मिळे. मानधन नाही. बँकेत कार्यक्रम करायला मिळणे प्रतिष्ठेचे मानले जाई. मी दोन वर्षे मानधनासाठी हटून बसलो. शेवटी बँकेने मानधन कबूल केले. मी सपत्नीक सोलापूरला गेलो. सरकारी अतिथीगृहात उत्तम सोय झाली. बँकेचे एक कार्यवाह म्हणाले, ‘पाचसहाशे श्रोते पाहून येथे भल्या भल्या वक्त्यांची तारांबळ उडते. बघा बुवा…!’ माझे मानधन त्यांना स्पष्ट खुपलले दिसत होते.
सहा वाजता गच्च भरलेल्या हॉलमध्ये कार्यक्रम सुरु झाला. माझे नाव खूप झालेले असल्याने खालच्या हॉलमध्ये सुद्धा गर्दी झाली होती. १९९८ साल असावे. क्लोज सर्किट टीव्ही जन्माला आलेला नव्हता. म्हणून स्पीकर्स लावलेले होते. स्टेजशेजारी गणपती मूर्ती होती. माझ्या शोच्या प्रथेप्रमाणे मी एक मिनिटांत गणपती रेखाटला. ती पहिली फोर होती. त्यानंतर व्यंगचित्रे, विनोद याच्या सिक्सर, फोर पडत होत्या. खालच्या हॉलमधील लोकांना दीड तास टाळ्या व हास्यस्फोट ऐकू येत होते. बँकेच्या प्रथेप्रमाणे एक तासात कार्यक्रम संपायला पाहिजे होता, तो दीड तास चालला.
दुसर्या दिवशी तेच कार्यवाह सर्किट हाऊसमध्ये आले व म्हणाले, ‘तुम्ही मानधन घेता हे अत्यंत उचित आहे. बँकेने प्रथमच असे हास्यस्फोट अनुभवले.’ पुढे ते म्हणाले, ‘तासभर अंतरावर पंढरपूर आहे. जीप देतो उभयतां जाऊन या.’
मनातून मी अनुत्सुक होतो. पंढरपुरातील प्रचंड गर्दी, रांगाच रांगा, ताटकळणे नको वाटे. बायको म्हणाली, जाऊ या ना, देवाचे दर्शन तरी होईल. जराशाने जीप घेऊन ड्रायव्हर हजर झाला. मजल दरमजल करीत जीप पंढरपुरात पोहोचली. बाजारपेठेतून पुढे गेलो. गर्दी तुरळक होती. लाखो वारकर्यांनी गजबजलेले हेच का ते पंढरपूर… प्रश्न पडला. चालत चालत मंदिरात पोचलो. अजिबात गर्दी नव्हती. इतरवेळी गर्दीत रमलेले विठुराय एकटेच कमरेवर हात ठेवून जणू आमची वाट पाहत उभे होते. युगे अठ्ठावीस… कर कटेवरी घेऊन विटेवरी उभा… फक्त ऐकले होते. मूर्तीजवळ गेलो. जे मुखमंडळ पाहण्यासाठी भाविक प्राण कंठाशी आणतात, ते एकटक पाहत पायांना स्पर्श केला. खळ्कन डोळ्यांत पाणी आले. ‘भेटीलागे जीवा’ असं आर्तपणे आळवणार्या तुकोबाचा, विटेवर उभा करणार्या नामदेवाचा, संत एकनाथांचा, दळण दळता दळता उस्फूर्तपणे ओव्या रचणार्या जनाबाईचा, सोपान, मुक्ता, निवृत्ती ज्ञानदेवांचा प्रियसखा मी पाहात होतो. सात जन्म घेतले तरी दर्शन दुर्लभ असा विठुराया अगदी एकटा मला दिसत होता. ही लाखो वारकर्यांची मालमत्ता उचलून पळवून न्यावी, असे मनातही आले.
एव्हाना अनुराधा फळाफुलांची ओटी घेऊन आली. देवाला हार फुले, हळदीकुंकू वाहिले. डोळ्यातलं पाणी मला दिसू नये, मी हसेन, म्हणून तिने ओंजळीत चेहरा घेऊन देवांना नमस्कार केला. तिला माहितीच नव्हते की मी आधीच देवांच्या पायी अश्रू वाहिले होते. दोघंही शांतपणे खाली बसलो. देवांना दंडवत घातला. मात्र नजर हटत नव्हती. दुपारचा दीड वाजला होता. म्हणजे जवळपास तासभर आम्ही कोट्यवधी भक्तांच्या प्रिय सख्यासमोर अबोल बसलो होतो. मन श्रांत होते. जगण्यातला अत्युच्च क्षण अनुभवीत होतो.
क्षणभर मनात विचार आला जीवनमुक्तीचा हाच क्षण तर नव्हे.. तुकोबांनी म्हटलंय ना ‘लई न्हाई मागणं देवा, शेवटचा दिस गोड व्हावा’ असाच क्षण तर आम्ही अनुभवत नव्हतो?
आता या भेटीची उकल सांगतो, महालक्ष्मी गौरीचा तो दुसरा दिवस होता. ज्येष्ठा लक्ष्मी कनिष्ठा लक्ष्मी या बहिणीकडे पुरणपोळीचे जेवण करायला येते. ती महालक्ष्मीच्या जेवणाची वेळ होती, म्हणूनच सर्व बडवे मंडळी, पूजाधिकारी जेवणासाठी घरी गेलेले होते, असे आजुबाजूच्या माहीतगारांनी सांगितले. देवांचे सोळा खांबी मंदिर, एकनाथांच्या पणजोबांची भानुदासांची समाधी पाहिली. विजयनगरच्या कृष्णदेवरायांनी विठोबारायांच्या प्रेमात पडून मूर्ती विजयनगरला नेली होती. भानुदासांनी त्यांच्याकडून पुन्हा पंढरपूरला आणली होती.
देवांच्या मागच्या बाजूस रुक्मिणीमाईंचे मंदिर आहे. त्यांचे दर्शन घेतले. त्यांचा चेहरा अत्यंत सुंदर, लोभसवाणा आहे. गोकुळची राधा द्वारकेस प्रथमच आली होती. कृष्णदर्शन होताच आवेगाने ती पुढे झाली व झोपाळ्यावर बसलेल्या कृष्णाच्या डाव्या मांडीवर जाऊन बसली. दोघे अखंड बडबड करू लागले, गावाकडच्या गप्पांमध्ये रंगून गेले. हे रुक्मिणीला काही आवडले नाही; कारण ती पट्टराणी होती. मग काय रात्रभर दणक्यात भांडण. कृष्णाने डोक्यात राख घातली व थेट पंढरपूर गाठले. शोधत शोधत रुक्मिणीदेवी तेथे पोहोचल्या, पण अद्याप अबोला मिटलेला नाही. अशा अनेक छोट्या मोठ्या कथा कथाकार सांगतात. देवींना हात जोडून म्हटले, ‘माई आता सोडून द्या ना रुसवा’!
‘आधी त्यांना सांग..’ असं कुणीतरी बोलल्याचा भास मला झाला. पुन्हा एकदा देवरायांचे दर्शन घेतले कृतार्थ मनाने..! अशी ‘भूतो न भविष्यती’ गळाभेट देवांशी झाली. आता आषाढीसुद्धा देवांना भेटण्यासाठी आतुर झाली आहे. विठुरायाच्या सावळ्या रंगाचे ढग आकाशी आणि हजारो वारकर्यांच्या दिंडी पताकांनी भरगच्च उधाणलेला महासागर घेऊन. आमच्या लहानपणी लताबाईंचे एक भावगीत होते पी. सावळाराम यांनी लिहिलेले
विठ्ठल तो आला आला
मला भेटण्याला।
तुळशी माळ घालूनी
गळा कधी नाही
कुटले टाळ।
पंढरीला नाही गेले
चुकुनिया एक वेळ।
देव्हार्यात माझे देव, त्यांनी केला प्रतिपाळ, चरणांची त्यांच्या धूळ, रोज लावी कपाळाला, विठ्ठल तो आला आला, मला भेटण्याला’.
आज कित्येक शतके सर्वसामान्य भाविकांची हीच भावना. पूर्वी रस्ते नव्हते, अन्न, निवारा नसायचे, वाहने नव्हती त्यामुळे अनेकांना कधी जाताच आले नाही. म्हणून आज ना उद्या विठ्ठल आपल्याला भेटायला येईल या आशेवर हजारो भाविक जगत आलेत. अशा या महामाऊलीने आम्हाला एकांती पायाशी बसवून मन अतृप्तसे राहील इतकी भेट दिली हे पुण्य कुठले?