‘रतनच्या मदतीने तिला चित्रपटात एक रोल देखील मिळाला. मात्र लवकरच रतनला तिचे खरे रूप कळले आणि त्याने संबंधितांना तिला चित्रपटातून काढायला लावले. संतापलेल्या अनघाने मग रतनवर सूड उगवला, ते देखील त्याचा खून करून. हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी मी माझ्या पहिल्या साक्षीदाराला, जस्मिन रॉयला इथे बोलवू इच्छितो.’ साक्षीदाराच्या पिंजर्यात उभी असलेली ती तरुणी सौंदर्यात अनघाच्या दसपट असली, तरी तिच्या सौंदर्यात एक प्रकाराचा उग्रपणा होता. चेहर्यावरचे माजोरी भाव तिचा चेहरा अजूनच उग्र बनवत होते.
– – –
’द स्टेट वर्सेस अनघा कुमावत’ कोर्टात जोरदार पुकारा झाला आणि कोर्टातली गर्दी, विशेषतः ही केस कव्हर करायला आलेले मीडियावाले चटकन सावरून बसले. पोलिसांच्या गराड्यात कोर्टात आलेल्या त्या तरुणीला पाहून अनेकांची हळहळ उघडपणे बाहेर पडली तर काही पुरुषांची नजर तिच्या सौंदर्यात पूर्णपणे गुंतली. अवघी बावीस तेवीस वर्षाची असावी ती. सौंदर्यवती असे म्हणता येणार नाही, पण तिच्या चेहर्यामध्ये एक प्रकारचा भोळेपणा आणि त्याचवेळी आव्हान देणारे असे काही ह्यांचे अफलातून मिश्रण होते. आपले सौंदर्य अजून कसे खुलवावे ह्याचे तिला चांगलेच ज्ञान असावे हे तिच्या कापलेल्या केसांवरून आणि भुवयांना दिलेल्या आकारावरून जाणवत होते. गेल्या काही दिवसांच्या पोलीस कोठडीचे कष्ट आणि गुन्हेगार म्हणून बसलेला शिक्का हे तिच्या चेहर्यावर उमटलेले नसते, तर ती आहे त्याहून जास्त सुंदर दिसली असती हे नक्की.
सरकारी वकील केसवानी गाऊन सावरत उभे राहिले आणि कोर्टाच्या नजरा पुन्हा कोर्टाच्या मध्यभागी स्थिरावल्या. न्यायमूर्ती मिरचंदानींनी मान डोलवली आणि केसवानी पुढे सरसावले.
‘युवर ऑनर, अत्यंत निरागस आणि भोळे भाव चेहर्यावर आणून गुन्हेगाराच्या पिंजर्यात उभी असलेली तरुणी ही प्रत्यक्षात किती खतरनाक आणि पाताळयंत्री स्त्री आहे, हे आज ह्या कोर्टापुढे मला आणायचे आहे. खुनासारखा गंभीर गुन्हा केल्यानंतर, त्याचे जराही वैषम्य न बाळगता, आपण केलेल्या कृत्याचे सेलिब्रेशन करताना पकडली गेलेली ही तरुणी म्हणजे समाजाला लागलेला एक कलंक आहे. स्त्रीची समाजात असलेली वात्सल्याची, मायेची प्रतिमा पायदळी तुडवणारी ही तरुणी अर्थात अनघा कुमावत सुशिक्षित आणि संपन्न परिवारातील आहे, हे विशेष. ज्या देवमाणसाने अडचणीच्या काळात साथ दिली, त्याचाच आपल्या स्वार्थासाठी खून करण्याचा कारनामा ह्या मुलीने करून दाखवला आहे. आपला बॉस रतन मखीजा ह्याचा खून केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी तिला पुराव्यानिशी अटक केलेली आहे. मर्डर वेपन अनघाच्या घरात सापडले आहे, त्याच्यावर तिच्या बोटांचे ठसे देखील मिळालेले आहेत. मुख्य म्हणजे अनघाने आपला गुन्हा कबूल देखील केला आहे. इट्स ओपन अँड शट केस माय लॉर्ड! अशा खुनशी आणि समाजाला भीतीच्या छायेखाली ढकलणार्या प्रवृत्तीला, मग ती स्त्री असो वा पुरुष, वयस्क असो वा तरुण… कुठलाही विचार न करता सरळ सरळ मृत्युदंडाची शिक्षाच मिळायला हवी. तरच अशा गुन्ह्यांना आणि विचारांना आळा घालता येईल!’
आपले लांबलचक ओपनिंग स्पीच संपवत केसवानी खाली बसले आणि त्यांनी एकवार कोर्टात नजर फिरवली. त्यांच्या भाषणाचा चांगलाच परिणाम जनतेच्या चेहर्यावर झालेला दिसत होता. कोर्टावर अभिमानाने नजर फिरवत असतानाच त्यांची आणि धवलची नजरानजर झाली आणि त्यांच्या आनंदाला ग्रहण लागले. धवल त्यांच्याकडे बघत कुत्सित हसत होता. ‘काय कच्चा दुवा हेरला आता ह्या माकडाने?’ केसवानी उगाचच विचारात अडकले. त्यांना उगाचच सतावत बॅरिस्टर धवल राजहंस उभा राहिला आणि केसवानींच्या ओपनिंग स्पीचचा असर एका क्षणात तडकून गेला.
‘युवर ऑनर, माझे वकील मित्र श्री. केसवानी ह्यांनी भाषण तर जबरदस्त दिले. एक क्षण मला देखील अनघा गुन्हेगार आहे असे वाटून गेले. पण कायद्यात कोणाला काय वाटते हे महत्त्वाचे नसते, तर पुरावे काय सांगतात हे जास्ती महत्त्वाचे असते. माझे वकील मित्र केसवानी ह्यांचे आरोप कसे खोटे आहेत, हे मी सविस्तर सिद्ध करेनच; पण त्याआधी मी त्यांना सांगू इच्छितो की पोलिस चौकशीत आरोपीने दिलेला कबुलीजबाब न्यायालयात मान्य होत नाही! मर्डर वेपनवर मिळालेले अनघाचे ठसे फार तर तिने ते वेपन कधीतरी हाताळले होते एवढेच सिद्ध करतात. जेव्हा त्या वेपनने खून झाला, तेव्हा ते वेपन अनघाच्या हातात होते, ती ते चालवत होती हे सिद्ध झालेले नाही.’
‘ते देखील मी लवकरच ह्या कोर्टात सिद्ध करेन माय लॉर्ड!’ केसवानी गुरकावत उठले आणि धवलने डोळे मिचकावत त्यांना अजून डिचवले. धवल हे मुद्दाम आपल्याला अस्वस्थ करायला करतो आहे हे त्यांना चांगले माहिती होते, पण दरवेळी ते त्याच्या जाळ्यात अडकत हे देखील खरे होते. स्वत:वर नियंत्रण ठेवत ते उठले आणि कोर्टाकडे वळले.
‘माय लॉर्ड, अनघा कुमावत ही शिमल्याच्या एका संपन्न कुटुंबातील सुशिक्षित हुशार मुलगी. पण आपली हुशारी तिने नको त्या ठिकाणी वापरली आणि आज इथे येऊन पोहोचली. अल्लड वय, देवाने दिलेले सौंदर्य आणि मिस शिमलासारखा मोठा पुरस्कार ह्याचे मिश्रण तिच्या डोक्यात असे काही शिरले की थेट घरच्यांशी भांडून, घर सोडून ती मुंबईला अभिनेत्री बनण्यासाठी दाखल झाली. मात्र फक्त सौंदर्य आणि इच्छाशक्ती असून चालत नाही, तर टॅलेंट, ओळख देखील किती गरजेची आहे, ते लवकरच तिच्या लक्षात आले. स्वाभिमान आणि हट्ट पुन्हा शिमल्याला जाण्यापासून रोखत होता. शेवटी चित्रपटात काम शोधता शोधता तिने पार्ट टाइम नोकरी देखील करायला सुरुवात केली. इथेच तिची ओळख झाली कंपनीच्या मालकांचा जावई असलेल्या रतन मखीजाशी. रतनकडे पैसा तर होताच, पण चित्रपट व्यवसायातील चार मोठ्या लोकांत ऊठबस देखील होती. अनघाने पद्धतशीरपणे रतनवर जाळे टाकायला सुरुवात केली. तिला यश देखील मिळाले. रतनच्या मदतीने तिला चित्रपटात एक रोल देखील मिळाला. मात्र लवकरच रतनला तिचे खरे रूप कळले आणि त्याने संबंधितांना तिला चित्रपटातून काढायला लावले. संतापलेल्या अनघाने मग रतनवर सूड उगवला, ते देखील त्याचा खून करून. हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी मी माझ्या पहिल्या साक्षीदाराला, जस्मिन रॉयला इथे बोलवू इच्छितो.’
साक्षीदाराच्या पिंजर्यात उभी असलेली ती तरुणी सौंदर्यात अनघाच्या दसपट असली, तरी तिच्या सौंदर्यात एक प्रकाराचा उग्रपणा होता. चेहर्यावरचे माजोरी भाव तिचा चेहरा अजूनच उग्र बनवत होते.
‘मिस जस्मिन तुमच्याविषयी कोर्टाला माहिती द्या..’
‘मी जस्मिन रॉय. मी सिग्मा कॉस्मेटिक्सचे मालक आणि रतन मखीजा ह्यांचे सासरे श्री. हरीश ओबेरॉय यांची पर्सनल सेक्रेटरी आहे.’
‘पिंजर्यात उभ्या असलेल्या मुलीला तुम्ही ओळखता?’
‘फार छान ओळखते मी तिला. खाली मुंडी आणि पाताळ धुंडी! साहेबांच्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे हिने.’
‘मला रतनविषयी जरा माहिती द्या.’
‘रतन साहेब म्हणजे देवमाणूस. पण ही ऑफिसात आली आणि त्यांचे ग्रह फिरले. सतत काही ना काही काम काढून त्यांच्या केबिनमध्ये जाणे, त्यांच्या मागेपुढे रुंजी घालणे यातच तिचा सगळा दिवस जायचा. त्यात तिची अभिनेत्री होण्याची आवड बघून, हरीश साहेबांनी रतन साहेबांना तिच्यासाठी काही होते का बघायला सांगितले अन् तिला जणू पंखच लागले. ती रतन साहेबांना ब्लॅकमेल देखील करायला लागली होती. त्यांचे एक दोनदा वाद देखील झाले होते.’
‘दॅट्स ऑल मिलॉर्ड..’
जस्मिनकडे एक कटाक्ष टाकत धवल उठला आणि शांतपणे तिच्यासमोर उभा राहिला.
‘तर मिस जस्मिन, तुम्ही रतन मखीजांच्या सेक्रेटरी..’
‘हरीश ओबेरॉय सांगितले मी!’ थोड्याशा रागात जस्मिन गुरगुरली.
‘सॉरी, सॉरी! तुम्ही मिस्टर रतन यांची इतकी तपशीलवार माहिती दिलीत की माझा थोडा गोंधळ झाला,’ विनयाने धवल म्हणाला आणि जज मिरचंदानी गालातल्या गालात हसले. धवल काय सिद्ध करू पाहतोय हे त्यांच्या बरोबर लक्षात आले.
‘तर मिस जस्मिन तुम्ही आता म्हणालात की अनघा मयत रतनला ब्लॅकमेल करत होती. हे सर्व तुम्हाला कसे माहीत?’
‘एकदोनदा त्यांच्या भांडणात फोटोंचा उल्लेख आला होता. त्यावरून..’
‘त्यावरून तुम्ही थेट अंदाज लावून मोकळ्या झालात? उद्या माझ्या बोलण्यात बंदुकीचा उल्लेख आला, तर मला खुनी समजणार का?’
‘अनघा स्पष्टपणे ‘तुम्ही जर माझी मागणी मान्य केली नाही, तर मला हे फोटो हरीश साहेबांना दाखवायला लागतील’ असे बोलताना मी ऐकले आहे.’
‘हे भांडण कुठे झाले?’
‘एकदा रतन साहेबांच्या केबिनमध्ये आणि एकदा त्यांच्या फार्महाऊसला.’
‘तुम्ही फार्महाऊसला काय करत होतात?’
‘सरांनी जवळच्या लोकांकरता पार्टी ठेवली होती, त्यात मला देखील आमंत्रण होते.’
‘तुम्ही जाऊ शकता..’
– – –
गेले दोन दिवस एक जस्मिनची साक्ष सोडली तर फारसे महत्त्वाचे असे कोणी साक्षीदार समोर आले नव्हते. पण आज केसवानींचा एकूण नूर पाहता धमाल येणार होती हे नक्की.
‘इन्स्पेक्टर जमादार..’ केसवानींनी कॉल दिला आणि धवल देखील सावरून बसला.
‘इन्स्पेक्टर जमादार, तुम्ही मिस अनघा ह्यांना कधी आणि कोणत्या गुन्ह्याखाली अटक केलीत?’
‘शनिवारी रात्री मला मिस्टर रतन ह्यांच्या केअरटेकरचा फोन आला. रतन साहेबांचा खून झाल्याची बातमी त्याने मला दिली. मी तातडीने माझी टीम घेऊन घटनास्थळी पोहोचलो. हॉलच्या सोफ्यावर रतनचे प्रेत पडले होते. छातीतून रक्त वाहिलेले होते. तपासणी केल्यावर लक्षात आले की त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.’
‘अनघावर संशय येण्याचे काही खास कारण?’
‘केअरटेकर रतनसाठी सोडा आणायला समोरच्या दुकानात गेला होता. तो बंगल्यावर परत येत असतानाच बंगल्यातून बाहेर पळत येत असलेली अनघा त्याला धडकली. ती बरीच घाबरलेली दिसत होती. त्याला धक्का मारून ती पळाली. बंगल्यावर तो परत आला तर समोर हा प्रकार…’
मग तुम्ही काय केलेत?’
‘मी तातडीने अनघाचा पत्ता त्याच्याकडून घेतला आणि तिच्या घरावर धाड घातली. ती कपडे पॅक करून पळण्याच्या तयारीत होती. तिच्या पर्समध्ये मला एक गन सापडली. फोरेन्सिकने केलेल्या तपासणीत ते मर्डर वेपन निघाले.’
केसवानींनी खूण केली आणि धवल उठला.
‘मिस्टर जमादार, तुम्ही जेव्हा घटनास्थळी पोहोचलात, तेव्हा तिथली परिस्थिती काय होती?’
‘रतनचे प्रेत असे अर्धवट कलंडलेल्या अवस्थेत सोफ्यावर पडलेले होते. बाजूलाच त्याचा मोबाईल पडलेला होता. खाली रक्ताचे छोटे थारोळे साचलेले होते.’
‘तिथे बाजूला एखादा अर्धवट भरलेला दारूचा ग्लास?’
‘नाही असे काहीच मिळाले नाही..’
‘आश्चर्य आहे! मग सोडा संपला आहे हे रतनला समजले कसे? दारू ओतून घेतल्यावर स्ामजले असेल ना? बरं निदान त्या केअरटेकरने येताना आणलेला सोडा तरी तिथे आढळला का?’
‘अं…’
‘मी काय विचारतोय?’
‘नाही. म्हणजे आम्हाला तसे काही मिळाले नाही.’
‘अनघाच्या घराच्या झडतीत तुम्हाला काय मिळाले?’
‘मर्डर वेपन आणि राज अॅड एजन्सीचा एका पंचवीस लाखाचा चेक, जो अनघाच्या नावाने होता.’
‘इंटरेस्टिंग..’ बोलता बोलता धवलने त्याच्या असिस्टंट साबूकडे पाहिले आणि साबू इशारा ओळखून हळूच कोर्टातून बाहेर पडला.
‘बरं, जमादार साहेब, ह्या खुनामागे जे ब्लॅकमेलचे कारण सरकारी वकील सांगत आहेत, त्याचा पुरावा असलेले ते फोटो तरी तिच्याकडे किंवा तिच्या मोबाइलमध्ये सापडले का?’
‘अं… नाही.’
‘मग तपासात तुम्हाला मिळाले तरी काय? हवाबाण?’ वैतागून धवलने विचारले आणि पूर्ण कोर्ट हास्यात बुडाले. खालच्या मानेने जमादारने पिंजरा सोडला आणि सुटका झाल्याच्या निःश्वास सोडत केसवानींनी पुढला कॉल दिला… ‘डॉ. पाल’
‘डॉक्टर पाल, तुम्ही जमादारांच्या टीममध्ये असता?’
‘हो! मी फोरेन्सिकमध्ये आहे.’
‘गुड… कोर्टाला खुनाबद्दल डिटेल्स द्या.’
‘वेल, मिस्टर रतन ह्यांचा मृत्यू दोन गोळ्या लागल्याने झाला होता. दोन्ही गोळ्या एकाच बंदुकीतून काही क्षणाच्या अंतराने सुटलेल्या होत्या.’
‘अनघाकडे जप्त झालेली बंदूक तीच होती?’
‘त्याची मला कल्पना नाही. पण मला तपासासाठी जी बंदूक देण्यात आली होती ते निश्चित मर्डर वेपन होते.’
‘दॅटस ऑल माय लॉर्ड!’ विजयी स्वरात केसवानी म्हणाले आणि त्यांनी धवलला इशारा केला.
‘मिस्टर पाल, मला सांगा. दोन्ही गोळ्या एकाच अंतरावरून झाडल्या होत्या?’ धवलच्या प्रश्नाने पाल एकदम खूश झाला. ह्या तरुण उमद्या लॉयरला फेस करायला त्याला कायमच आवडायचे.
‘नो सर! एक गोळी दहा फुटांवरून अन् एक अगदी छातीला बंदूक टेकवून मारण्यात आली होती,’ पालच्या उत्तराने अमर एकदम चमकला.
‘बंदुकीवर अनघा सोडून इतर कोणाचे फिंगरप्रिंट्स?’
‘नाही!’
‘अनघाने खून करण्याच्या उद्देश्याने एक सोडून दोन दोन गोळ्या झाडल्या असतील, तर मग तिला असे घाबरून पळत सुटण्याचे कारण काय होते?’ धवल न्यायमूर्तींकडे बघत म्हणाला आणि आता कोर्टातील प्रत्येक जण विचारात पडला.
– – –
काल शेवटाच्या सेशनमध्ये धवलने कोर्टात चांगलीच खळबळ उडवून दिली होती. आज तो काय कमाल करणार ते बघायला कोर्ट तुडुंब भरले होते.
‘युवर ऑनर, माझा पुढचा साक्षीदार..’
‘माय लॉर्ड. कोर्टाने मला फक्त दोन साक्षीदार तपासायची परवानगी दिली, तर मी खरा खुनी आजच कोर्टासमोर हजर करेन,’ धवल ताडकन केसवानींचे वाक्य तोडत म्हणाला आणि न्यायालयात एकच खळबळ उडाली. खरा खुनी? म्हणजे ही अनघा खुनी नाही?
`हा काय प्रकार आहे माय लॉर्ड? आरोपीचे वकील असे मध्येच कशी कुठलीही मागणी करू शकतात?
‘त्यांचे रेप्युटेशन बघता त्यांना एक संधी द्यावी असे कोर्टाला वाटते आहे केसवानी,’ जज साहेब शांत स्वरात म्हणाले आणि केसवानी चडफडत खाली बसले.
‘मिस जस्मिन…’ धवलने आवाज दिला आणि जस्मिनने स्टँड घेतला.
‘तुम्ही सांगत होता की खून झाला त्या दिवशी रतनकडे पार्टी होती. कोण कोण होते त्या पार्टीत?’
‘मी सांगितले ना की आम्ही जवळचे लोक होतो फक्त!’
‘अनघा होती?’
‘नव्हती.’
‘मग तिचे आणि रतनचे भांडण तुम्ही कधी ऐकले?’
‘ती पार्टी चालू असताना तिथे अचानक आली.’
‘पण तिने तर तुम्हाला तिथे पाहिले नाही.’
‘ती रतनच्या नावाने हाका मारतच आली. मग रतनने मला आणि इतरांना आतमध्येच थांबवले आणि तो एकटाच बाहेर गेला.’
‘इतर गेस्ट म्हणजे तुम्ही आणि तुमचे वडील… बरोबर ना?’
‘दॅट्स नन ऑफ युवर बिझनेस!’ जस्मिन एकदम संतापाने फिस्कारली.
‘मिस जस्मिन, तुमचे वडील काम काय करतात?’
‘ऑब्जेक्शन युवर ऑनर… ह्या केसशी ह्या प्रश्नाचा…’
‘संबंध आहे केसवानी सर… लेट मी फिनिश…’
‘बोला मिस जस्मिन…’
‘ते खाजगी कंपनीत अकाउंटंट आहेत.’
‘कोणती कंपनी?’
‘सिग्मा कॉस्मेटिक्स…’ ओठ आवळत जस्मिन पुटपुटली आणि कोर्टात पुन्हा एकदा खळबळ उडाली.
‘तुम्ही रघुला ओळखता? रतनचा केअर टेकर?’
‘फारशी ओळख नाही.’
‘तो तुमच्या गावचा, पेणचाच आहे.’
‘असेल…’
‘असेल नाही.. आहेच! दोन वर्षं तुमच्या शेतात सालगडी देखील होता.’
‘मला कल्पना नाही.’
‘मला कोण कोणत्या गोष्टींची कल्पना आहे, ह्याची तुम्हाला कल्पना नाहीये मिस जस्मिन. तेव्हा आता हा तोरा सोडा आणि माझ्या प्रश्नांची नीट उत्तरे द्या!’
‘तुमचे आणि रतनचे संबंध कसे होते?’
‘एका नोकर आणि मालकाचे असतात तसे.’
‘कोण मालक नोकराला हजार आणि लाखाचे दागिने देत असतो मिस जस्मिन?’
‘मला समजत नाहीये तुम्ही काय बोलताय..’
‘शेठ भीमजी त्रिभुवन झवेरी… बोलवू त्यांना साक्षीला?’
‘त्याची गरज नाही! आमचे एकमेकांवर प्रेम होते..’
‘तुमचे प्रेम होते का तुम्ही त्याला खेळवत होतात?’
‘शट अप!!’
‘मिस जस्मिन, तुमच्या वडिलांवर हरीश साहेबांचा फार विश्वास होता. त्यांच्या एका शब्दावर त्यांनी तुम्हाला कंपनीत घेतले. तुम्ही बाप बेटीने मिळून कंपनीला गंडा घालायला सुरुवात केली आणि नेमके त्याच वेळेला रतनने सासर्याची कंपनी जॉईन केली. रतन पुढे मागे धोकादायक ठरणार हे लक्षात आल्यावर तुम्ही त्याची संपूर्ण कुंडली काढलीत आणि त्याच्या कलाने वागत, वेळेला हरीश साहेबांना त्याच्यासाठी फसवतोय असे दाखवत त्याच्या अय्याशीसाठी कंपनीचा पैसा पुरवत राहिलात..’
‘हे सगळे खोटे आहे..’
‘रतन तुमच्या जाळ्यात अडकायला लागला आणि नेमक्या त्याचवेळी अनघाचा कंपनीत प्रवेश झाला. रतन राक्षस असेल देखील, पण अनघाचे नशीब काय होते माहिती नाही; तो चक्क तिला एखाद्या लहान बहिणीसारखे वागवत होता. ती देखील त्याला तशीच माया लावत होती. तिच्या संगतीत रतन बदलायला लागला आणि तुमचा जीव वर खाली होऊ लागला. जुळवून आणलेला डाव उधळायची वेळ आली होती. त्याचवेळी नेमका राज अॅड एजन्सीचा एक बेअरर चेक कंपनीसाठी आला आणि तुमच्या डोक्यात एक भयानक खेळ जन्माला आला. त्या दिवशी तुम्ही रघुला फोन केलात आणि सरळ फार्म हाऊसवर गेलात. एकही शब्द न बोलता तुम्ही रघुने हळूच पळवलेले रतनचे पिस्टल ताब्यात घेतलेत आणि आत शिरत आपले काम फत्ते केलेत. तुम्ही जवळ येऊन बसेपर्यंत बिचार्या रतनला कल्पना देखील नव्हती की तुमच्या मनात काय घातकी विचार सुरू आहेत. तुम्ही यायच्या थोड्या वेळ आधी रघुने अनघाला फोन करून रतनने बोलावले आहे असा खोटा निरोप पोहोचवलाच होता. तुम्ही काम करून बाहेर पडलात आणि पिस्टल ठसे पुसून पुन्हा लॉकरमध्ये ठेवायचे काम रघुकडे होते. त्याच्या सुदैवाने त्याचवेळी अनघा आली आणि तो बागेत लपला. काही क्षणात घाबरलेली अनघा बाहेर पळत आली आणि तिला घाबरवायला रघु मुद्दाम तिला सामोरा गेला. ती घाबरली, अडखळली आणि खाली पडली. बेरकी रघुने संधीचा फायदा घेतला आणि गमछ्यात लपवलेले पिस्टल हळूच तिच्या हँडबॅगमध्ये सोडून दिले. घाबरलेल्या अनघाने टॅक्सीत बसता बसता बॅगेत हात घालत पर्स शोधायचा प्रयत्न केला आणि तिच्या हाताला ते पिस्टल लागले. घरी पोहोचल्यावर त्याचे काय करायचे बघू असा विचार करत अनघा घरी पोहोचली, पण दुर्दैवाने काही वेळातच तिला अटक झाली.’
‘युवर ऑनर ह्या सलीम-जावेद कथेला काही पुरावा आहे का बॅ. धवलकडे?’ केसवानी पडक्या स्वरात म्हणाले.
धवलने एक क्षण जस्मिनकडे पाहिले आणि रघुला साक्षीसाठी खुणावले.
‘नो नीड.. आय कन्फेस…’ शांतपणे जस्मिन म्हणाली आणि धवल ‘आता गर्दीतून स्वत:ची कौतुकाने धपाटे बसणारी पाठ वाचवत बाहेर कसे पडायचे?’ ह्या विचारात गढला…