पावसाळा आणि काही गोष्टी अतूट नाते आहे. पाऊस आला रे आला की गडकिल्ले भटकणार्या जमातीला ट्रेकचे वेध लागतात. हळवे, तरल भावनाप्रधान लोक, फुकटच्या सोशल मीडियावर पावसाळी कवितांची पेरणी सुरू करतात. पालक पोरांच्या बूट रेनकोट खरेदीत व्यस्त, नोकरदार ट्रेन लेट होणार का? पाणी बहुतेक तुंबणार, या चिंतेत जातात. प्रत्येकाची भावना खरी असते. अहाहा, मस्त पाऊस आला, इथपासून ते वीट आणलाय या दरिद्री, — पावसाने, इथपर्यंत सर्वसामान्य लोकांचा प्रवास असतो. श्रीमंत, हाय फाय लोकांना फार फरक पडत नाही. फार तर गार बियरच्या जागी सिंगल माल्ट किंवा व्होडका येते.
आणि या सर्व भावनांमध्ये एक गोष्ट मात्र चिरंतन असते, पाऊस आणि भजी. येस! पाऊस आला आणि भजी आठवली नाहीत, अशा माणसाची मानसिक तपासणी करायला हवी; एक तर तो पूर्ण जितेंद्रिय योगी असणार अथवा निव्वळ श्वास घेत जगणारा मर्त्य मानव. पाऊस आला की भजी आठवलीच पाहिजेत असे माणुसकीचे शास्त्र आहे. स्थळ, ठिकाण कोणतेही असो, गड, किल्ले, रानवाटा, धाबे, बार, घर, कॅन्टीन, टपरी अथवा पॉश क्लब रेस्तुरांत. भजी असायलाच हवी.
वास्तविक भजी पदार्थ म्हटला तर घरगुती, कुटुंबवत्सल आणि म्हटलं तर उनाड टोणगा. कारण कुटुंब, नातेवाईक यांच्यात सुद्धा छान रमतो. इथे अधिक करून भजी असतात. बटाटा, ओवा, मूग डाळ अशी सात्विक सोपी. कांदा भजी थोडी टपोरी. ठेला, टपरी इथे अधिक खपणारी… आणि यांच्यातील नरम झालेली प्रौढ भजी, पावाशी उशिरा सोयरीक करून बाहेर पडतात. मुंबईमधील रस्त्यावरील खाण्यात पाव हा सर्व ठायी दिसेल. एखादा माणूस कसा सगळ्यांशी छान जमवून घेणारा असतो तसा. आपले व्हॉटसअपवर गुड मॉर्निंगचे पॉझिटिव म्यासेज रतीब घालणारे काका मामा असतात तसा. मिसळ, उसळ, वडा, भाजी कोणाबरोबरही जातो. कांदा भजी आणि पाव हे अगदी थेट मुंबई खाणे. इथे वाद घालायचा नाही म्हणजे नाही. जोडीला मीठ लावून तळलेली तिखट मिरची. अंगुर की बेटीसोबत हे झक्कास जमते.
तर भजी प्रकार ज्या कोणी व्यक्तीने शोधला असेल, त्याला त्रिवार वंदन. एकच पदार्थ पण लग्न, पूजा असे समारंभी, सोज्वळ जेवण, टपरीवरील टपोरी खाणे, धाब्यावर, क्लबमधे स्कॉच आणि गप्पा यासोबत, घरी, सर्व ठिकाणी भजी चपखल बसतात. आता कुठे बटाटा तर कुठे कांदा, तर कुठे अन्य, हे त्या त्या ठिकाणी काय आहे त्यानुसार ठरते.
बटाटा भजी तशी दिसायला सोपी. पण ट्रिक जमली नाही तर पिठात तळलेला बेचव बटाटा होतात. कांदा भजी किंवा मुंबईच्या भाषेत खेकडा भजी हे निव्वळ मुंबई ट्रेडमार्क… नाव आणि प्रकार!! जमल्यास अतिशय कुरकुरीत नाहीतर पीठ गोळे. या कांदा भज्यावरून आठवले, अनेक क्लबमध्ये ओनियन रिंग्ज म्हणून प्रकार मिळतो. कांदा भजीचा एक भाऊ लहानपणी फिरंग्यांना दत्तक गेला आणि पार पालटला. कांद्याचा तिखटपणा आणि भज्याचा कुरकुरीत स्वाद यापैकी कशाचाही मागमूस नसणारा हा पदार्थ. कांद्याच्या चकत्या मैद्याच्या पिठात बुडवून त्याला तळून अव्वाच्या सव्वा किमतीला देतात आणि त्यावर घालायला मग पेरीपेरी पावडर, सॉस असे (भजी आणि सॉस खाणार्या माणसांना गद्दार ठरवायला हवे). अशा रिंगबरोबर शेयर मार्केटच्या गप्पा अधिक जमतात हे बघितले आहे. मालवणी भाषेत अशा पदार्थाला एक विशेषण आहे. थुकीची चव नाही. ओनियन रिंग्स त्यात परफेक्ट बसतात. भज्यांचा इतका हिणकस अपमान कुठेही बघितला नाही. तळलेला थर्माकोल पण चवदार लागेल. असो.
तर महाराष्ट्रातील भजी बाकी भारतात पकोडे म्हणून येतात. अर्थात कांदा भजीचा पूर्ण अधिकार मराठी माणसाचा असावा असे मला वाटते. कारण इथे जशी कांदा भजी मिळतात तशी अन्य कुठे नाहीत. पालक, मेथी, पनीर, बटाटा यांची भजी अखंड भारतात दिसतील. नॉनव्हेज खाणार्यांनी मग आपले स्वतंत्र म्हणून चिकन, कोळंबी भजी आणली आहेत. कोळी, आगरी, पाठारे प्रभू, सीकेपी समाजात पावसाच्या सुरुवातीला मिळणार्या ओल्या जवळ्याची भजी एकमेव अशी. परत हे पण फक्त मराठी मातीत… माइंड यू…
हॉटेल्समधे मच्छी /फिश पकोडा प्रकार मिळतो. उतरलेला शिळा मासा पिठात तळून देतात, चुकूनही खायचा नाही. इरसाल खाणारे त्याला टाळतात.
भजी परदेशात प्रिâटर म्हणून ओळखली जातात. भोपळ्याच्या फुलांची चीझ घालून केलेली भजी म्हणजे अफलातून प्रकार. कोकणात पण भोपळा फुलांची भजी केली जातात. अर्ध्या कच्च्या केळ्यांची, वांगी, सुरण, मायाळू, ओवा, विविध भजी. चलाख गृहिणी मग उरलेला भात, भाजी यांची भजी काढून ते संपवते. पण या सर्व प्रकारात मुकुट दोघांना… कांदा आणि बटाटा. भजी साम्राज्याचे हे दोन्ही अनभिषिक्त सम्राट आणि करायला तसे थोडे कठीण. येस. सोपे दिसणारे पदार्थ जमले नाहीत तर पचका होतो. कांदा खेकडा भजी दिसायला तिरपागडी आणि शेवटच्या घासापर्यंत कुरकुरीत असायला हवीत. बटाटा भज्यांचे वरचे आवरण टम्म फुगलेले हवे आणि मीठ आतील पातळ बटाट्याला पूर्ण लागायला हवे. चावा घेतला की आतील वाफेने चटका बसला म्हणजे भजी जमली.
घरात केलेल्या भज्यांना बाहेरची चव येत नाही हा अनुभव आहे विशेष करून कांदा भजी टपरीसारखी जमतच नाहीत. तर आज बघू टपरी स्टाईल खेकडा भजी आणि तिचे काही नातेवाईक.
खेकडा भजी
भजी खाणार्या माणसांचा फुल्ल कोरम जमला की नंतरच भजी करायला घ्यावीत.
साहित्य : कांदे, लाल तिखट, आले, मिरची आणि धने भरड कुटून, मीठ, बेसन, थोडा जाड रवा, तेल.
कृती : तेल तापवायला ठेवून मग कांदा चिरायला घ्यावा. कांदा आधी चिरून ठेवायचा नाही. तो नरम होतो.
कांदा अगदी पातळ, उभा चिरून, मग त्यात बेसन, आले वाटण, हिंग, मीठ, तिखट घालून सुके सुकेच एकत्र करावे.
तोपर्यंत तेल कडकडीत तापले असेल की रवा पेरून हातानेच भजी सोडावीत.
गॅस कमी ठेवून किंचित गडद रंगावर काढून घ्यावीत.
कांदा पातळ असल्याने चटकन जळतो. ओवा हवा तर टाकू शकता.
जवळा भजी
पावसाळ्याच्या सुरुवातीला ओला जवळा मिळतो तो नक्की खाऊन घ्यावा.
साहित्य : ओला जवळा एक वाटी, चणा डाळ ४/५ तास भिजवून खरबरीत वाटून, वाटताना त्यात लसूण, मिरची कोथिंबीर आले घालावे. लाल तिखट/कोळी/मालवणी मसाला, हळद, चिंच/लिंबू रस, मीठ.
टीप : ओला जवळा पाण्यात भिजवत ठेवून वर आलेला कचरा काढून परत चाळणीत खळबळून घ्यावा. दगड असण्याची शक्यता असते ते पाहावे. स्वच्छ पिळून, हळद, थोडे मीठ, लावून ठेवावे.
कृती : तेल तापवावे.
परातीत जवळा आणि बाकी सर्व साहित्य एकत्र करून छोटी भजी काढावीत.
तळण नको तर आप्पेपात्रात पण करता येतात.
मीठ बेताने घालावे.
चणा डाळ घातल्याने अधिक कुरकुरीत होतात.
जमले नाही तर बेसन घेवून त्यात रवा घालून भजी काढावीत.
बटाटा/पनीर/शिमला/भोपळा भजी
या भज्यात मुख्य असते पीठ. ते जमले की मग भजी उत्तम होणार.
साहित्य : बटाटा अथवा अन्य भाज्या पातळ कापून मीठ पाण्यात बुडवून. पनीर असल्यास त्याला मीठ, चाट मसाला लावून
बेसन, हळद, मीठ, ओवा, हिंग.
कृती : बेसन, हळद, ओवा, हिंग सर्व एकत्र करून त्यात कडकडीत तेल घालून नीट एकत्र करावे.
तेल तापत ठेवावे.
आता बेसनात पाणी घालून साधारण पातळ मिश्रण करावे.
दह्यापेक्षा पातळ हवे.
बेसन, बटाट्याला नीट लपेटून हवे.
आणि मग मध्यम आगीवर भजी काढावीत.
समजा बटाट्याची गोल भजी नको तर बटाटा जाड्या किसणीने किसून त्याला बेसन फासून भजी काढू शकता.
छान वेगळी लागतात.
बेसन पीठ करताना त्यात थोडी शिजलेली तूरडाळ घातली तर आवरण खुसखुशीत होते.