बाळासाहेब ठाकरे
जात-पात-धर्म भेद
नाही कधी विचार केला
हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व
हिंदुत्वाला `अर्थ’ दिला
आज त्याची विटंबना
स्वर्गातूनही पाहवत नाही
हिंदुत्वाच्या नावाखाली
पोळी भाजण्याची घाई
एक तमाशा अच्छा खासा
बघतानाही गंमत वाटते
दगडांना का देव केले
उगाच मनात शंका दाटते
नरेंद्र मोदी
अमित मेरा भारी हुशार
कायम गळ टाकून बसतो
पूर आला तर मोठा मासा
पटकन त्यांच्या गळात बसतो
किती राज्यात मोठे मासे
गळ टाकून त्यांनी धरले
साम-दाम-दंड-भेद
जे हवे ते देऊन तरले
माझ्यापेक्षा कपटनीती
त्यांच्यापाशी अधिक चांगली
अनेक राज्ये धरून बांधून
पक्षाच्या खुंटीला टांगली
अमित शहा
वरूनच ऑर्डर आहेत
त्यांना जे लागेल ते पुरवा
नामानिराळे राहून आपण
वापर करून त्यांची जिरवा
काढा त्यांच्या देशात सहली
नवी पर्यटन स्थळे दाखवा
खुष झाले पाहिजेत बेटे
बिले सगळी त्यांची चुकवा
द्या त्यांना जे हवे ते
माणूस-विक्रीचा हा धंदा
लाजलज्जा सगळी सोडून
सत्तेसाठी रुपया बंदा
राज्यपाल कोश्यारी
`कोरोना’च्या नावावर मी
हवे तितके झोपून घेतो
कधी उठवतील मध्यरात्री
जागरणाला फारच भितो
मागे असाच शो मी केला
दोन दिवसात पडदा पडला
तीन पक्षांनी कमाल केली
राज्यात नवा इतिहास घडला
आता काय करणार आहेत
त्याचीच वाटते मला भीती
करायचे ते दिवसा करा
पहाटे मला येते सुस्ती
देवेंद्र फडणवीस
स्वप्न माझे वाटते जवळ
तरी मनात शंकेची पाल
तोंडघशी पडलो जर मी
फुगरे गाल होतील लाल
एवढे मोठे प्लॅनिंग करून
जर यश मिळत नसेल
काय अर्थ आहे याला
प्रत्येक वेळी मीच का फसेन?
पवारांची वाटते भीती
कसा कधी करतील गेम
मागचा अनुभव नको पुन्हा
माझ्यावर बाणाचा नेम