यावेळचा डाव फारच वेगळा आहे… तो मराठी माणसाने नीट समजावून घेतला पाहिजे. इतिहासात अपुर्या राहुन गेलेल्या आपल्या पाशवी इच्छा सत्ता अन् पैसा याच्या बळावर पूर्ण करून घेण्यासाठी सर्व महाराष्ट्रद्वेष्ट्या ताकदी यावेळी एकत्र आलेल्या आहेत. गुज्जू भांडवलदार, दिल्लीचे सुलतान आणि फसव्या हिंदुत्वाचे ठेकेदार यांनी मराठी माणसातच फूट पाडून त्याला आपसात झुंजवून मराठी शक्ती लोळागोळा करण्याचे कारस्थान आखले आहे. पूर्वी औरंग्यापण हाच हेतू धरून इथे आला होता, त्यानेही मराठेच आपसात झुंजवले, पण शिवशक्तीने त्याला इथेच कायमचे झोपवले! जे चुकले ते चुकले… जे चुकले ते हुकले… आणि जे हुकले ते नाव, यश, कीर्ती यांना कायमचे मुकले हा सिद्धांत खरा करण्यासाठी मराठी माणसा तुला तेवढे बळ निश्चितच लाभणार आहे!
– – –
‘धर्मवीर : मु. पो. ठाणे’ हा चित्रपट येणार म्हणून दोन महिन्यांपासून त्याची हवा बनवण्याची मोहीम खूप जोरात सुरू होती. समाजमाध्यमांवर तर किस्से, वदंता, आठवणी यांचा पाऊस पडत होता. आनंद दिघे यांना पाहिलेली माणसे भरभरून बोलत होती. चित्रपटात काम केलेले कलावंत, दिग्दर्शक व इतर मंडळी देखील अगदी भारावून आपले अनुभव सांगत होती. मग त्यातली वेगवेगळी दृष्ये येऊ लागली. ती पाहून सर्वसामान्य माणसे जणू काही विद्युतभारितच होऊन गेली. जाहीर केलेल्या दिवशी चित्रपट पडद्यावर झळकला. त्याचे मोठे सोहळे रंगले. गर्दी करून, रांगा लावून शिवसैनिकांनी, शिवसेनाप्रेमींनी चित्रपट पाहिलाच, पण कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध असलेल्या इतर कार्यकर्त्यांनी व अजिबातच संबंध नसलेल्या सर्वसामान्य प्रेक्षकांनी पण खिशातले पैसे मोजून धर्मवीराचे दर्शन घेतले. यातली अनेक मंडळी मला भेटली. काहींनी फोन केले. सर्वांना उत्सुकता होती ती मी हा चित्रपट पाहिला की नाही याची. त्या सर्वांना मी एकच उत्तर देत होतो- ‘मी चित्रपट पाहिला नाही! पाहणारही नाही!’ विस्मयाने अनेक मित्र मला विचारत होते, ‘का रे बाबा? आता काय हे नवीनच?’ त्यावर माझे सर्वांना एकच सांगणे होते- ‘मला आजपर्यंत जे काही पाहायला मिळाले, त्यातून माझे असे मत झाले आहे की हा सगळा चित्रापेक्षा चौकट मोठी करण्याचा प्रकार आहे.’ हे ऐकल्यावर बहुतेकांनी याचे हे भलतेच असते काहीतरी असे चेहरे केल्याचे मला दिसले.
या गोष्टीला उणापुरा महिनाच झाला आहे जेमतेम, ज्यांना ज्यांना मी ते उत्तर दिले होते ते केवळ थक्कच नव्हे तर अवाक झाल्याचे मला जाणवले आहे. कारण एकही जण माझ्याशी या विषयावर अद्याप बोलू शकलेला नाही.
सत्य हे कल्पिताहून अद्भुत असते असे म्हटले जाते आणि त्याचा रोकडा प्रत्यय राजकारणात वेळोवेळी येत असतो. राजकीय क्षेत्र हे फक्त आणि फक्त ऐहिक बाबींशीच निगडीत असल्याने स्वार्थ ही तिथली सर्वात प्रबळ अशी प्रेरणा ठरते. माणसे स्वार्थाने व महत्त्वाकांक्षेने झपाटून जातात अन् मग श्रद्धा, निष्ठा, भक्ती, आदर्श, ध्येयासक्ती, बांधिलकी अशा सगळ्याच मूल्यांचा चोळामोळा झालेला पाहायला मिळतो. गुरुपौर्णिमेला आनंद दिघे बाळासाहेबांची पाद्यपूजा करतात, या चित्रपटातल्या प्रसंगाने सद्गतित झालेल्या भोळ्याभाबड्या मंडळींना, शिष्याच्या शिष्यानेच विवेकाची अमावस्या कशी असते ते दाखवले आहे. ही कलाटणी, ही मांडणी, ही नवी पटकथा कुठल्याही लेखकाला झीट आणील अशीच आहे. एखाद्या आनंदी, मंगल प्रसंगाने सुरू झालेला चित्रपट अकल्पित घटनांनी अचानक रहस्यमय भयकथा बनून जावा असाच सध्याचा घटनाप्रवाह अजब वळणे घेताना दिसतो आहे. मात्र हा चित्रपट पडद्यावर दिसतो तसा एकेरी, एकस्तरीय नाही. त्यामागे खूप सारे सामाजिक, सांस्कृतिक, नैतिक, आर्थिक पदर, उपपदर आहेत. ते नीट जाणून घेतले तर आणि तरच कथानकाची व्याप्ती आणि गांभीर्य आपल्याला समजून येईल!
मुळात सत्तेच्या राजकारणात कोणीतरी फुटणे, त्याला काहीजणांनी साथ देणे, त्यांनी कुठेतरी जाऊन आश्रय घेणे हे सतत सुरूच असते. जेथे आहोत तेथे समाधानी नसणे हाही मानवी स्वभावाचा एक पैलूच आहे. आणखी वर गेले पाहिजे हीसुद्धा एक तीव्र भावना मानवीयच म्हणता येईल. लोकशाहीच्या बहुपक्षीय राजकारणातच नव्हे तर प्राचीन, मध्ययुगीन इतिहासातही अशा घडामोडी नित्यश: घडतच होत्या… मात्र एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतून फुटून निघणे ही केवळ त्यांनी स्वत:च ठरवलेली खेळी नाही. शिवसेनेची सत्ता जाऊन अन्य कुणाची तरी येणे इतकाच या उलथापालथीचाही अर्थ नाही. समग्र व्यापक पार्श्वभूमीचे आकलन झाल्यानंतरच अजस्त्र अशा अजगरी विळख्याचे भान अबोध मराठी मनाला होऊ शकेल. त्यासाठी आपल्याला इतिहासाचा धांडोळा घेणे अपरिहार्यपणे भागच आहे…
सगळ्या भारतावर एकछत्री प्रभुत्व असावे ही दिल्लीच्या म्हणजेच उत्तरेच्या सत्ताधीशांची इच्छा असते- मग ते मौर्य, गुप्त, वर्धन असोत की लोदी, खिलजी, सुरी असोत. मोगलांनी पण अकबरापासूनच हे प्रयत्न जारीने केले. नर्मदेच्या दक्षिणेकडील मुलुखात त्यांना नडले अन् भिडले ते मराठेच. नगरची निजामशाही राखण्यासाठी का होईना, शहाजी राजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी थेट शहाजहानला आपले पाणी दाखवले. ताकद कमी पडल्यामुळे निजामशाही बुडाली पण मराठ्यांचा धाक मोगलांना बसला. औरंग्या दख्खनचा सुभेदार म्हणून आदिलशाही मुलुख बळकावण्यासाठी मराठवाडा व बालेघाट प्रदेशी धुमाकूळ घालत असतानाच तरुण शिवरायांनी नगर व जुन्नर लुटून त्यालाही इंगा दाखवला होताच. मग औरंग्याने पाठवलेले शास्ताखानादी अनेक सरदार महाराजांनी बडवले, रडवले अन् हाकलले. मिर्झाराजे जयसिंग यांच्या व्यूहरचनेपुढे त्यांनी तात्पुरती माघार घेतली, पण तलवारींची तिखट धार दाखवूनच… मग पुढे महाराजांना आग्रा दौरा करावा लागला. कैदेत पडावे लागले. पण मंत्रयुद्धात त्यांनी औरंग्याला अशी मात दिली की तो तहानभूक झोप चैन विसरला. परक्यांच्या तख्तापुढे मराठ्यांचेच सिंहासन उभे राहिले. महाराज पूर्ण दक्षिणेच्या वतीने, सगळ्या हिंदूंच्या वतीने मोगलांना आव्हान देत होते. म्हणूनच त्यांच्या असमय निधनानंतर ९ लाखांची फौज घेऊन औरंग्या दक्षिणेत उतरला. पहिल्या फेरीत शंभूराजांनी त्याला हिसका दाखवल्यानेच तो आदिलशाही, कुतुबशाही डुबवण्यासाठी पळाला. नंतर आपल्याच गद्दारांमुळे शंभूराजे पकडले गेले व अनन्वित छळानंतर हुतात्मा झाले. राजा नाही, सिंहासन नाही, राजधानी नाही अशी दुर्दैवी स्थिती ओढवली. पण मराठे नमले नाहीतच. त्यांनी चिडून चवताळून औरंग्याशी संघर्ष मांडला तो सगळ्या दक्षिण भारतभर! १६८१ ते १७०७ अशी २७ वर्षे, मराठ्यांनी त्याला इकडेच अडकवून ठेवला अन् शेवटी इथेच धुळीला मिळवला!
नंतर मराठा साम्राज्य भारतभर पसरले. गुजराथ ते बंगाल अन् हरयाणा ते तमीळनाडू सर्वत्र मराठ्यांनीच हिंदुत्वाचा झेंडा फडकावून संस्कृतीला नवचैतन्य दिले. पानिपतचा पराभव पचवूनही मराठे पुन्हा असे उभे राहिले की खुद्द दिल्लीच्या लाल किल्ल्यावरही १८ वर्षे भगवाच लहरत होता! पुढे इंग्रजांच्या नवविद्या, नवतंत्रे, नवशस्त्रे यांच्यापुढे भारतीयांचा टिकाव लागला नाही, तरी त्यांच्याशी शेवटपर्यंत टक्कर महाराष्ट्रानेच दिली. मग इंग्रजी राजवट सुरू झाली. तिची बलस्थाने आत्मसात करून उभी राहिली ती बंगाली, मराठी, तमीळ माणसे. मात्र इंग्रज बंगाली व तमीळी लोकांना कधीच घाबरत नव्हते. त्यांनी धास्ती घेतली होती मराठी माणसांचीच. त्यांनी आणलेल्या सुधारणा, विद्या, कला, शास्त्रे, यंत्रे, तंत्रे शिकून प्रबोधनयुग सुरू झाले तेही मुंबईतच. जगन्नाथ शंकरशेठ, म. ज्योतिबा फुले, रानडे, गोखले, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड असे धुरेचे वीर उदयाला आले ते महाराष्ट्रातच. क्रांतिकारकांची मालिका उदयाला आली तीही इथेच. टिळकांना व गांधींनाही पहिले समर्पित अनुयायी मिळाले तेही याच भूमीत. अर्थ असा की महाराष्ट्राने देशाच्या सन्मानासाठी, पुनरुत्थानासाठी सतत योगदान दिले. त्याचे व्यक्तिमत्त्वच स्वयंभू, स्वयंसिद्ध अन् स्वयंपूर्ण आहे…
नेमक्या याच वैशिष्ट्यामुळे दिल्लीत जे सत्ताधीश असतात, ते महाराष्ट्राला सतत पाण्यात पाहतात. नेहरूंचाही महाराष्ट्राला असाच अनुभव आला आणि आता मोदींचाही आणखी कडवट अनुभव आपण घेतच आहोत. मराठी भाषिकांच्या सर्व प्रदेशांचे एकत्रीकरण करून, महाराष्ट्र राज्य करावे आणि मुंबई ही त्याची राजधानी असावी इतकी साधी व न्याय्य मागणी मान्य व्हावी यासाठी नेहरूंनी किती अंत पाहिला! त्यांना त्या वळणापर्यंत घेऊन गेले होते मोरारजी आणि गुजराथी पुंजीपती! प्रचंड आंदोलन करून मराठी माणसाने दिल्लीपतींना पुन्हा एकदा झुकण्यास भाग पाडले खरे, पण मोरारजी व त्यांचे पाठिराखे यांच्या मनात पराभवाचे शल्य कायमचे राहिले ते राहिलेच.
महाराष्ट्र राज्य झाले, मुंबई पण मिळाली. मात्र मराठी तरुणांना स्वप्नभंगाचे दारूण दु:ख वाट्याला आले. त्यांच्या वेदनांना वाचा फोडली ती व्यंगचित्रकार बाळ ठाकरे यांनी! त्यांना आणखी पुढे जाण्याची प्रेरणा दिली ती त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी! हे तेच विचारवंत, इतिहासकार, लेखक, वक्ते होते ज्यांनी महात्मा फुले यांची विचाररेखा जिवंत ठेवली, राजर्षी शाहू छत्रपतींना त्यांच्या संघर्षात पुराव्यांचे पक्के पाठबळ पुरवले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्व मध्यमवर्गीयांना समजावून सांगितले. शिवचरित्र हा त्यांच्या अभिमानाचा अन् पेशवाई हा त्यांच्या कठोर टीकेचा विषय होता. जातपात, सोवळेओवळे, बुवाबाजी, अंधश्रद्धा, कर्मकांड याविषयी प्रबोधनकारांना अतिशय चीड होती. त्यापायी त्यांनी सनातन्यांच्या रोषालाही हिमतीने तोंड दिले होते. त्यांनीच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे रणशिंग सर्वप्रथम फुंकले होते व नंतर त्यात सर्व नेते आणि विविध पक्ष सामील झाले होते. महाराष्ट्राबद्दल त्यांची काही स्वप्ने होती. तो सशक्त व समर्थ असावा, सगळा समाज एकजीव असावा, तरुणांच्या कर्तृत्त्वाला वाव मिळावा, मायबहिणी निर्भय वावराव्यात, शेतकरी कामगार सुखी असावेत, मराठी भाषेला व संस्कृतीला सन्मान मिळावा… आणि याच स्वप्नांसाठी प्रबोधनकारांच्या सुपुत्राने संघटना स्थापन केली. तिचे नाव ‘शिवसेना’, तिचे दैवत ‘शिवराय’, तिचा झेंडा ‘भगवा’ अन् उद्घोष होता ‘जय महाराष्ट्र’!
मुंबई महानगरात एकच जादू झाली. बाळ ठाकरे यांच्याभोवती लाखो युवक गोळा झाले. चैतन्याने सळसळणार्या मराठी शिवशक्तीचा उदय झाला. याची धास्ती धुमाकूळ घालणार्या नोकरदार परप्रांतीयांना जशी बसली तशीच शोषणकर्त्या परप्रांतीय भांडवलदार शेठजींना पण बसली. कारण, त्यांना जाब विचारणारी वङ्कामूठ उभी ठाकली होती. तिकडे सगळे पक्षही अस्वस्थ झाले होते. दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, दोन्ही समाजवादी पक्ष, जनसंघ, हिंदू महासभा, रिपब्लिकन गट तट असे सारेच! यांची काही ठरावीक पॉकेट्स होती. पण शिवसेनेने तर सगळा मराठी समाजच जिंकून घेतला होता. गिरगाव, दादर, पार्ले असो की भायखळा, परळ, कुर्ला असो… जातपात, धर्म, पंथ, स्तर, वर्ग विसरून सारे सारे शिवसेनेच्या भगव्या रंगात न्हाऊन निघाले होते. कामगार कर्मचार्यांसाठी भांडणारी शिवसेना प्रसंग येताच हिंदुत्वाच्या प्रश्नावरही लढत होती. ज्यांच्या साजूक हिंदुत्वाला गोरगरीब मराठी जनांनी कधीच प्रतिसाद दिला नाही ते संघी, जनसंघी तर मनातल्या मनात रोज जळफळत होते! कारण, ज्या बाता ते ४०-५० वर्षे, स्वयंपाकघरात आवेशाने मारत होते, पण एक टक्कासुद्धा करून दाखवण्याची हिंमत नव्हती; तोच पराक्रम इतिहासाशी पूर्ण सुसंगत पण कालोचित पद्धतीने शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्या २-३ वर्षांतच करून दाखवला होता. स्वा. सावरकरांना अभिप्रेत असलेली क्षात्रधर्मी हिंदुत्वाची आचारसंहिता आणि आचार्य अत्र्यांनाही न साधलेली मराठी अस्मितेची विचारसंचिता सेनापतींनी तरुण पिढीला सोबत घेऊन सुमूर्त साकार केली होती! मागील पिढीत प्रबोधनकार ठाकरे यांनी या कावेबाजांची झाज उतरवली होती, आता याही पिढीत त्यांच्याच सुपुत्रांनी तर आपले नाणे खणखणीतपणे चालवून पुरेपूर मातच केली होती! पण मनगटे चावण्यावाचून अधिक काही करणे संघीय पिलावळीला शक्य झालेच नाही! ते फक्त एकच गोष्ट करू जाणत होते; द्वेष… दीर्घद्वेष! अन्य त्याबाबतीत या सभ्य, साजूक, सुसंस्कृत, सृजनशील असे स्वत:च स्वत:ला म्हणवून घेणार्यांचा हात कोणीही धरूच शकत नाही…
दरम्यान राज्यात व देशातही राजकारणाचे प्रवाह-उपप्रवाह वरखाली होतच होते. जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनात संघाची घुसखोरी आणीबाणी पुकारुन इंदिराजींनी बेबंदशाहीला लावलेला चाप, नोकरशाहीच्या चुकांनी जनतेचा प्रकटलेला क्षोभ, १९७७च्या निवडणुकीतला बाईंचा पराभव, मोरारजींसह वाजपेयी, अडवाणी सत्तेत, बाईंच्या समर्थनाचा शिवसेनेला बसलेला फटका, समाजवाद्यांना पुढे करून जनसंघीयांनी सेनाभवनावर केलेला हल्ला, निवडणुकांमध्ये झालेली पीछेहाट हे सारे शिवसेनाप्रमुखांनी मर्दपणे झेलले. त्या कालखंडात संघीय पिलावळीने ठाकरे घराण्याबद्दलचा सगळा विखार सतत ओकला होता हे जाणत्या मंडळींना माहीत आहेच. पुढे सत्ता मिळूनही संघीयांच्याच काळ्या कारवायांमुळे जनता पक्ष फुटला, बाईंचे पुनरागमन झाले, संघीय अधांतरी झाल्याने नवे सोंग घेणे भाग पडले भारतीय जनता पक्ष विथ गांधीवादी समाजवाद! याच काळात स्मगलिंग, अंमली पदार्थ, खंडणीखोरी, काळे धंदे, जमिनी बळकावणे यामुळे मुसलमानी गँगस्टरिझमचा विळखा मुंबई ते भिवंडी पट्ट्याला पडला. या मवालीगिरीला शह देण्यासाठी बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा रणखांब रोवला. मुसलमान गुंडांनी दंगली केल्याच, पण शिवसेना त्यांना पुरुन उरली. हिंदू समाजात चैतन्य खेळू लागले. पार्ले पोटनिवडणूक शिवसेनेने हिंदुत्वाचाच गजर करीत लढवली अन् जिंकली! हे पाहून संघाला धक्काच बसला आणि गावोगावच्या त्यांच्या कुजट कुबट कुजबुज गँगचा जळफळाट आणखीनच वाढला. मात्र, ठाकरे यांच्याबद्दल कुत्सित बोलणे टवाळी करणे आता त्यांना शक्यही नव्हते अन् परवडणारेही नव्हते. त्यांच्यावरच्या फळीने व्यूहरचना बदलली. विवेक, तरुण भारत यातून ठाकरे, शिवसेना, त्याचे उपक्रम याविषयी बरे छापून यायला लागले. युतीची गरज ठसवली जाऊ लागली. राममंदिर आंदोलनाला उकळी फोडली गेली. बाळासाहेबांभोवती भाजप नेत्यांचा, विश्व हिंदू परिषदवाल्यांचा संघीय पत्रकारांचा पिंगा सुरू झाला.
हे गूळ लावणे अन् ही साखरपेरणी कशासाठी हे शिवसेनाप्रमुखांना चांगल्या रीतीने ठाऊक होते. त्यांनी संघीय पिलावळीला वेळोवेळी त्यांची जागा दाखवूनही दिली; कारण मागील ६०-७० वर्षांचे त्यांचे घातकी अनुभव पितापुत्रांच्या पोतडीत जमा होतेच. त्यानंतरचा १९८८ ते २०१४चा इतिहास सर्वांना माहीत आहेच. महाराष्ट्रातील खेडोपाडी पोचलेल्या शिवसेनेचा लाभ भाजपने करून घेतला स्वत:चे खासदार आमदार वाढवले. दरवेळी जागा वाटप झाले की शिवसेना नेते, पदाधिकारी, गावोगावचे शाखाप्रमुख, सैनिक बेभानपणे प्रचाराला लागायचे. मात्र संघीय पिलावळ शिवसेना उमेदवारांना कुठे व कसा दगाफटका करायचा याच्या तजविजीत मग्न असायची. परिणामी निकालात आकडे उलटेच दिसायचे जसा उद्योगपती, भांडवलदार यांचा पूर्ण पाठिंबा भाजपला मिळाला, तसा त्यांच्या वर्तनात फरक पडला. शिवसेनेची गरज संपली असे वाटून त्यांनी युती मोडून टाकली. पण उद्धवजी मागे हटले नाहीत. त्यांनी स्वबळावर ६३ आमदार निवडून आणले. त्यावेळी `खलनायक’ ठरवलेल्या शरद पवारांची साथ घ्यायलाही फडणवीस कंपूला लाज वाटली नाही. पण त्यांच्याच संघ परिवारातल्या प्रचंड शिव्या असह्य झाल्याने फडणवीसांना शेवटी शिवसेनेच्या पायाशी यावे लागले.
या सार्या घटनांनाही आता आठ वर्षे होऊन गेलीत. नागपुरी संघीय दुढ्ढाचार्य व दिल्लीकर मोदीशहा अस्वस्थ आहेत. कारण महाराष्ट्रातील शिवसेना अजूनही उखडणे शक्य झालेले नाही. जोवर शिवसेनेचा काटा आपण काढत नाही तोवर देशातले पहिल्या क्रमांकाचे हे राज्य हाती येणे असंभव हे त्यांना ठाऊक आहे. अन् महाराष्ट्र हाती आल्याशिवाय त्याचे ४ ते ५ तुकडे करणे, वेगळे विदर्भ राज्य आणि स्वतंत्र मुंबई होणे दुरापास्त्ा हेही त्यांना माहीत आहे. आजवरची त्यांची सगळी कटकारस्थाने आधी प्रबोधनकारांनी नंतर शिवसेनाप्रमुखांनी उधळून टाकली. नंतर आले उद्धवजी… हा सभ्य, शालीन, सुसंस्कृत, संवेदनशील पण अननुभवी नेता आपण सहज गुंडाळू व आपले मनसुबे तडीला नेऊ असे संघीय पिलावळीला वाटत होते. मात्र, आजोबा अन् वडील यांच्याच बाण्याने पण नव्याने शैलीने सगळे डाव उलटवून उद्धवजी `सवाई’ असल्याचे सिद्ध झाले! कालचा नवखा तरुण नेता आपल्याला अस्मान दाखवतो, कोविडचे संकट परतावून लावत देशातील उत्कृष्ट मुख्यमंत्री ठरतो, त्या यादीत आपला एकही नाही, उलट अर्थ, आरोग्य, कृषी, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात केंद्र सरकारचीच इज्जत निघालेली… हे पाहून भाजपवाले पुरते पिसाळले आणि त्यांनी हा नवा अतिदुष्ट असा डाव टाकला. यावेळी शिवसेनाच हायजॅक करायची, ठाकरे यांचा बेदखल करून टाकायचे म्हणजे न रहेगा बाँस… न बजेगी बासुरी!
उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यापासून फडणवीस चवताळल्यागत झालेले आहेत. या माणसामुळेच आपण पाच वर्षे निर्वेध सत्ता भोगू शकलो एवढी किमान कृतज्ञतेची भावनाही त्यांनी कधी दाखवली नव्हती. इकडे उद्धवजी तर इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्येही लोकप्रिय ठरू लागले हे दिसताच दिल्ली व नागपूर तर दचकलेच, पण इथले भाजपेयी पण हादरले. अतिशय हीन दर्जाचे, गलिच्छ राजकारण ते रोज करू लागले, त्याला उद्धवजींनी कृतीने उत्तर दिले अन् गरज असेल तेव्हाच शब्दातून करारा जबाब! त्यांनी दोन वेळा दोघांच्या मर्मावर प्रहार केला. अहमदाबाद बुलेट ट्रेनला विरोध करून मोदींवर अन् काळ्या टोपीचा उल्लेख करून संघावर टीका करून. या लोकांनी स्वत:ची मानसिकता अशी केली आहे की हे म्हणजे जणू काय परब्रह्मच… आपण इतरांवर कशीही टीका करू अन् कितीही निंदा करू; मात्र आपल्या मखराला कुणी हातही लावता कामा नये! उद्धवजी काय डरतात? शेवटी ठाकरे आहेत ते! चित्रे स्वत:च रंगवतात अन् मग त्यावर चौकटी बसतात!! पण काही चौकटींना भान राहात नाही, त्या चित्रापेक्षा खूप मोठ्या भलत्याच जड होऊ लागतात अन् मग निखळून पडतात!!!
धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर चित्रपट करणे, त्यांच्यावरील प्रकाशझोतात आपली प्रतिमा मिरवणे, राज्यसभेचा उमेदवार पाडणे, विधान परिषद निवडणुकीतही मते कमी देणे, सुरतेला आमदार पळवणे, ते गुवाहाटीला हलवल्यावर काहींनी तेथे जाऊन मिळणे, शेवटी शिवसेना हे नाव तो पक्ष बळकवण्याचा इरादा जाहीर करणे ही पटकथा कोणी रचली असेल असे वाटते तुम्हाला? त्यांनीच… ज्यांना स्वतंत्र कर्तृत्वाची स्वयंभू माणसे कधीच सहन झाली नाहीत! मग ते गांधी, नेहरु, पटेल, सुभाष असोत…. की सावरकर, आंबेडकर असतो! फुले, शाहू, प्रबोधनकार, साने गुरुजी, गाडगेबाबा, भाऊराव पाटील, रामानंद तीर्थ, सयाजी महाराज, विनोबा ही महाराष्ट्राची मुख्य धारा आहे. यातला किंवा देश पातळीवरचा एकही नायक, महानायक जे देऊ शकले नाहीत, ते दांभिक, नाटकी, घातकी लोक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे अखिल भारताचे `हिंदुहृदयसम्राट’ म्हणून चिरस्मरणीय ठरलेत हे कसे सहन करतील? त्यांनी जे लखलखीत `ब्रह्यास्त्र’ शिवसेनेच्या रुपाने तयार करून ठेवले, तेच ताब्यात घ्यायचे आणि आपल्या नेहमीच्या तंत्राने निकामी करून टाकायचे असा हा कुटील डाव आहे. शिवसेनेतून आजवर बंडू शिंगरेपासून नारायण राणेपर्यंत खूपजण फुटले. जे गेले ते मराठी मनातूनच कटले!
मात्र, यावेळचा डाव फारच वेगळा आहे… तो मराठी माणसाने नीट समजावून घेतला पाहिजे. इतिहासात अपुर्या राहुन गेलेल्या आपल्या पाशवी इच्छा सत्ता अन् पैसा याच्या बळावर पूर्ण करून घेण्यासाठी सर्व महाराष्ट्रद्वेष्ट्या ताकदी यावेळी एकत्र आलेल्या आहेत. गुज्जू भांडवलदार, दिल्लीचे सुलतान आणि फसव्या हिंदुत्वाचे ठेकेदार यांनी मराठी माणसातच फूट पाडून त्याला आपसात झुंजवून मराठी शक्ती लोळागोळा करण्याचे कारस्थान आखले आहे. पूर्वी औरंग्यापण हाच हेतू धरून इथे आला होता, त्यानेही मराठेच आपसात झुंजवले, पण शिवशक्तीने त्याला इथेच कायमचे झोपवले! जे चुकले ते चुकले… जे चुकले ते हुकले… आणि जे हुकले ते नाव, यश, कीर्ती यांना कायमचे मुकले हा सिद्धांत खरा करण्यासाठी मराठी माणसा, तुला तेवढे बळ निश्चितच लाभणार आहे! चित्र जपून ठेव, रंग विस्कटू देऊ नकोस, रेषा फिक्या होऊ देऊ नकोस… आपण पाहिजे तितक्या नव्या चौकटी पुन्हा तयार करूच करू…