ईडी कार्यालयातून जेव्हा माझा मानलेला परममित्र पोक्या याला खबर मिळाली की महाराष्ट्र भाजपा निवडणूक प्रचारासाठी पक्षाचे ‘आधुनिक रामायण’ हे नाटक बसवणार आहे, तेव्हा त्याने त्याचे आणखी डिटेल्स मिळवले. पात्रांच्या निवडीसाठी अमित शहा आणि स्मृती इराणी दिल्लीहून येणार आहेत, हेही समजले. निवडचाचणीची तारीख आणि वेळ कळल्यामुळे मी आणि पोक्या नरीमन पॉइंटच्या भाजप कार्यालयात वेळेवर पोहोचले. महाराष्ट्रातले भाजपचे सर्व प्रमुख नेते व खास आकर्षण म्हणून नवनीत राणा, अमृता फडणवीस, चित्रा वाघ इत्यादी महिला कलाकारही पोहोचल्या होत्या.
पक्षाचे अतिउत्साही ईडीफेम अभिनेते किरीट सोमय्या पल्लेदार आवाजात स्पर्धकांची नावे पुकारण्यासाठी सज्ज झाले होते. त्यांनी पहिले नाव, पक्षपालटवीर नारायणराव राणे यांचे पुकारले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
नारायणराव : लढावं की पडावं? या पक्षाच्या उकिरड्यावर फेकलेल्या उष्ट्या पत्रावळ्या चाटत जगावं बेशरम लाचारासारखं की फेकून द्यावं हे अर्थशून्य खात्याचे मंत्रिपद, त्यात गुंडाळलेल्या बेगडीपणाच्या मुखवट्यासह सुकलेल्या कमळाच्या डोहात आणि करून टाकावं एकेकाचं वस्त्रहरण मला कळलेल्या यांच्या एकेक भानगडीनंतर…
अमित शहा : नारायणराव, बस हुआ. किरीटजी, दुसरा अॅक्टर भेजो. हमारे देवेंद्रजी को भेजो.
फडणवीस : (उडी मारतच गात प्रवेश करतात) याऽहूऽऽ याऽहूऽऽ चाहे कोई मुझे कुछ भी कहे… कहने दो जी कहता रहे, हम सीएम के सपनों में डुबे तो हम क्या करे… याऽहूऽऽ मैं जानता हूं मोदीजी आपको इलेक्शन फंड चाहिए. बोलो कितना चाहिए? पचास रुपये, सौ रुपये, दो सौ रुपये या पाच सौ रुपये? मैं देता हूं आपको फंड, लेकिन
ऑपोझिट कुर्सी में बुरा ही क्या है? एक ना एक दिन मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन.
अमित शहा : रो मत बेटा, रो मत. अगले स्पर्धक को भेज दो किरीटजी.
चंद्रकांत पाटील : मला कुणी ढकललं? तुमच्या… मी अध्यक्ष हाय. माझा मान हाय. पळपुट्या अभिनेत्यांना कोणी पुढे धाडलं? कोल्हापूरचा नखरा माझा चाल ना रे पुणेरी, वळखतात ना सगळे मला मी लावतो माकडछाप मशेरी नारी गंऽऽ अचकट विचकट बोललो की झणझणीत तांबड्या रश्श्यासारखं झोंबतं. तरी बी आमच्याच पार्टीतले मला पाण्यात बघत्यात. त्यानला पानी पाजून बाजी मारीन मी. तुमी बगतच र्हावा.
अमित शहा : आवाज चांगला आहे तुमचा फडणवीसांपेक्षा. पुढेमागे विचार करू. नेक्स्ट? (किरीट सोमय्या गरबा खेळतच येतात) तुमको किसने बुलाया?
किरीट : एप्रिल फूल बनाया, तो तुमको गुस्सा आया… मेरा क्या कसूर, मेरे ईडी का क्या कसूर, गाल पे थप्पड खाया… सॉरी… नेक्स्ट.
मुनगंटीवार : माजं आकड्याचं गनित चुकून का र्हायलं जी. तरी मी सांगत हुतो मोठे आकडे हायत म्हणून फुकट घालवू नका. मले तेवडी अक्कल हाये. पन आमाले इचारतो कोन. तो चारसोबीस आमाले फाट्यावर मारतो. आमी न्याव कुनाकडे मागावा? एकेक सॅम्पल हायत. भॉऽऽऽ
अमित शहा : ये शोकनाट्य नहीं है. तुम ट्रॅजिडी कर रहे हो. जरा दानवे साबसे सिखो. इतना पढा लिखा है, लेकिन गालियां याने सरल आयटम का टमटम है.
रावसाहेब दानवे : च्या मायला! ह्यांच्या एकेकाच्या —- लाथ मारून हाकलून देईन त्यानला. समजतात कोन सोताला. आमच्या ग्रामीण शिव्यांना सरकारकडून राजमान्यता मिळाली पायजे हे विधेयक मी संसदेत सादर करणार आहे. सर्वांना मुक्त शिवीगाळ करता आली तरच लोकशाहीचा खांब मजबूत होयल. मी खंबा नाय बोललो.
अमित शहा : शेलारमामा, दरेकर, महाजन ये लीडर ऐतिहासिक टच का ड्रामा डॉयलॉग बोलेंगे.
शेलारमामा : खामोश, हैवान… बुलडोझरच्या पायाखाली देईन तुला. घरादारावरून ट्रॅक्टर फिरवीन तुझ्या. शिर्क्याचं जसं शिरकाण केलं तसं तुमचं शिरकाण करीन मी. कडेलोट करीन तुझा.
दरेकर : बा अदब, होशियार, आस्ते कदम आईये हुजूर. बम्बई बँक आपका स्वागत करती है. आप कितना फिक्स डिपॉझिट रख सकते हैं? जितना चाहे इतना रखो. आपको कुछ कम नहीं पडेगा. ये हेराफेरी नहीं है. मैं हूं ना… आप सबके चरणों का दास हूं. मूर्ती लहान पण छत्री मोठी आहे. आमेन.
महाजन : हल्ली बरेच दिवसांत पक्षांतर्गत प्रचाराच्या व्यासपीठावर कुस्तीचा फड मारला नाही. त्यामुळे हात शिवशिवत आहेत. काहीतरी करा आणि माझ्या पिळदार शरीराच्या रट्ट्यांचा प्रसाद कुणाला तरी मिळेल याचा बंदोबस्त करा.
अमित शहा : अब, महिला नेताओं, आप पधारिये और करिश्मा दिखाईये.
अमृता : मी गाणं म्हणून दाखवू की अॅक्टिंग करून दाखवू? मला वाटतं मी देखणं नृत्य सादर करते.
अमित शहा : नृत्य मत किजीये मॅडम. यहां कोई तमाशा नहीं है. आप गाना बोलिये.
अमृता : येरे येरे पावसा, तुला देते पैसा, पैसा झाला खोटा, हाती आला लोटा, येगं येगं सरी, त्यांचे मडके भरी, सीएम आले धावून, हसबंड गेले वाहून… कसं वाटलं? थोडा मेकप कमी पडला. म्युझिक अॅरेंजमेंटही नव्हती ना. तरी पण मला रामायणात सीतेची भूमिका दिली तर मी ती मनापासून करीन. चौदा वर्षं वनवासात राहायची तयारी आहे माझी.
अमित शहा : ते होणारच आहे… नेक्स्ट नवनीत राणा.
नवनीत राणा : मी काही तुमच्या पक्षाची नाही. तरीही तुमच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केलं नसेल इतकं काम मी तुमच्या पक्षासाठी केलं आहे. त्यामुळे तुमच्या रामायणात सीतेचं काम मलाच मिळालं पाहिजे आणि माझ्या पतिराजांना हनुमानाचं. ‘हनुमान चालीसा’ आम्ही दोघांनी इतक्या वेळा वाचली आहे की, आज राम प्रगट झाले तर ते चालीच्या प्रकाशनाचे सगळे हक्क मलाच देतील.
अमित शहा : त्या भूमिकांचं नंतर बघू. सध्या आपल्या नाटकात अशोकवनात सीतेचं रक्षण करणार्या शूर्पणखा आणि तिच्या इतर मैत्रिणींची गरज आहे. उरलेल्यांनी त्याची तयारी करावी. मी निकाल नंतर कळवतो. मी जाऊन येतो अयोध्येला. कौल लावून येतो भूमिकांचा. जय श्रीराम. चलो स्मृती इराणीजी!