वैद्यकीय व्यवसाय हा पण एक पैसे मिळवण्याचा धंदा झाला आहे आणि त्यात पॅथॉलॉजी लॅबचा नंबर दुसरा लागतो. (पहिला रेडिओलॉजी). त्यामुळे बरेच क्लिनिकल डॉक्टर आपल्या क्लिनिकला जोडून लॅब काढतात. ती टेक्निशियनला चालवायला देतात. त्याने दिलेले रिपोर्ट ग्राह्य मानतात. किंवा काही टेक्निशियन स्वतः लॅब काढतात. रिपोर्टवर एमडी पॅथॉलॉजी केलेल्या डॉक्टरची सही आवश्यक असते म्हणून थोडे पैसे देऊन त्या डॉक्टरचे नाव रिपोर्टवर छापतात.
– – –
फॅमिली डॉक्टर ही पद्धत नाहीशी होऊनही आता बरीच वर्षे झाली. आता फक्त स्पेशालिस्ट डॉक्टरच नाहीत तर अगदी बोगस डॉक्टरसुद्धा (नाईलाजाने लिहावे लागतंय) पेशंट आल्यावर आधी वेगवेगळ्या पॅथॉलॉजी टेस्ट लिहून देतो. म्हणजे ठराविक लॅबच्या छापील पॅडवर नुसत्या टेस्टवर टिक करतो. त्याच लॅबमधून रिपोर्ट करून घ्या म्हणून सांगतो. सामान्य माणूस त्या त्या लॅबमधून टेस्ट करून घेतो. काही लॅब रुटीन टेस्टची पॅकेज स्वस्तात देतात. निरोगी (!) लोकसुद्धा स्वस्तात मिळतायत म्हणून टेस्टस करून घेतात; मॉलमध्ये गेल्यावर स्वस्तात आहेत म्हणून गरज नसलेल्या वस्तू खरेदी करतात तसेच!
पण पॅथॉलॉजी रिपोर्ट म्हणजे नक्की काय हे खूप जणांना माहीत नसते. एमबीबीएस किंवा तत्सम डिग्री घेताना पॅथॉलॉजी म्हणजेच विकृतीशास्त्र हा विषय अभ्यासाला असतो. त्यात प्रत्येक रोगाचे निदान करण्यासाठी कोणत्या टेस्ट कराव्यात हे शिकवले जाते. त्यामुळे एकच लक्षण जर ४/५ रोगांचे असेल तर त्या प्रत्येक रोगासाठी असलेल्या टेस्ट केल्यास अचूक निदान करता येते. म्हणजेच एमबीबीएस किंवा तशीच डिग्री असणारे डॉक्टर ह्या टेस्ट लिहून देऊ शकतात.
आता या टेस्टस कोण करू शकतो?
या टेस्टस करण्यासाठी वेगवेगळी मशिन्स लागतात. ती हँडल करण्यासाठी टेक्निशियन लागतात. त्यासाठी सीएमएलटी, डीएमएलटी हे कोर्स आहेत. हे १०वी, १२वी किंवा अगदी बीएससीनंतर असतात. म्हणजेच हे कोर्स केलेले टेक्निशियन हे डॉक्टर नसतात. हे रिपोर्ट तयार करतात. मात्र ह्या रिपोर्टवर सही करण्याचा अधिकार फक्त पॅथॉलॉजी विषयात एमडी केलेल्या डॉक्टरचाच आहे. ही सही जेव्हा तो करतो तेव्हा त्याने रक्ताचे किंवा कोणतंही सॅम्पल नीट घेतलंय ना, इथपासून मशीन नीट आहे ना, रिअॅजंट योग्य आहेत ना, टायपिंग मिस्टेक तर नाही हे सगळे बघून ते नीट असल्याची खात्री करून घेतली आहे असा अर्थ होतो.
जसे डिलिव्हरीसाठी तुम्ही एमडी डिग्री असलेल्या पण स्त्रीरोगतज्ज्ञ नसलेल्या डॉक्टरकडे जाऊ शकत नाही तसंच पॅथॉलॉजी टेस्टसाठी तुम्ही डॉक्टरसुद्धा नसलेल्या टेक्निशियनकडे जाऊ शकत नाही. पण सध्या परिस्थिती काय आहे? वैद्यकीय व्यवसाय हा पण एक पैसे मिळवण्याचा धंदा झाला आहे आणि त्यात पॅथॉलॉजी लॅबचा नंबर दुसरा लागतो. (पहिला रेडिओलॉजी). त्यामुळे बरेच क्लिनिकल डॉक्टर आपल्या क्लिनिकला जोडून लॅब काढतात. ती टेक्निशियनला चालवायला देतात. त्याने दिलेले रिपोर्ट ग्राह्य मानतात. किंवा काही टेक्निशियन स्वतः लॅब काढतात. रिपोर्टवर एमडी पॅथॉलॉजी केलेल्या डॉक्टरची सही आवश्यक असते म्हणून थोडे पैसे देऊन त्या डॉक्टरचे नाव रिपोर्टवर छापतात. काही एमडी डॉक्टर ५/६ लॅबनासुद्धा आपली सही वापरायला देतात. सगळे नीट झाले तर ठीक आहे पण जर काही चूक झाली तर संपूर्ण जबाबदारी त्या पॅथॉलॉजिस्टची असते. त्याचे लायसन्स रद्द होऊ शकते.
अशा बोगस लॅब आणि अश्या पॅथॉलॉजिस्टवर कारवाई होण्यासाठी काही पॅथॉलॉजिस्ट अथक प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन दोन जणांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
प्रामाणिकपणे काम करणार्या पॅथॉलॉजिस्टना अश्या लॅब आणि त्यातील रिपोर्ट देणार्या डॉक्टरविरुद्ध कारवाई व्हावी असे वाटत असले तरी कोणी त्यासाठी काही प्रयत्न करत नाही. मात्र पेणचे डॉ. केसकर, डॉ. राजीव राव, डॉ. प्रसाद कुलकर्णी, डॉ. दुर्गप्रसाद अगरवाल आणि आणखीही काही पॅथॉलॉजिस्ट या विषयाचा २००५पासून पाठपुरावा करत आहेत. ओळखीचा पॅथॉलॉजिस्ट जर असे काम करत असेल तर ते त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. काही जण अशा लॅबमधून आपले नाव काढून घेतात पण काहीजण आपले बेकायदा काम पुढे चालूच ठेवतात.
अरविंद यादव हा टेक्निशियन ऐरोलीमध्ये प्रतिमा क्लिनिक डायग्नोस्टिक सेंटर ही लॅब चालवत होता. विवेकानंद होनकेरी हे कर्नाटकमधील मेडिकल कॉलेजमध्ये पूर्णवेळ प्राध्यापक आहेत आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे सभासद नाहीत. तरीही त्यांची सही प्रतिमा क्लिनिकच्या रिपोर्टसवर होती. हे दोघे मिळून बेकायदा लॅब चालवून, बोगस रिपोर्ट देऊन रुग्णांची फसवणूक करत आहेत, हे सिद्ध करण्याचे डॉ. राजीव राव आणि त्यांच्या सहकार्यांनी ठरवले. यासाठी महेंद्र कारंडे यांचा युरिन रिपोर्ट आणि डॉ. प्रसाद कुलकर्णी यांना डमी पेशंट म्हणून पाठवून मिळालेला ब्लड शुगरचा रिपोर्ट पुरावा म्हणून जोडण्यात आला. त्यासाठी त्यांनी मोहोलकर असे नाव घेतले होते. रिपोर्ट्सवर डॉ. अरविंद यादव आणि डॉ. होनकेरी अशा दोघांच्या सह्या होत्या.
डॉ. होनकेरी एमएमसीमध्ये रजिस्टर नसून ते कर्नाटकात रजिस्टर आहेत, हे आधी सांगितलेच. अरविंद यादव डीएमएलटी असून तो स्वत्ाःच्या नावाआधी ‘डॉ.’ लावू शकत नाही. तो रिपोर्टसवर डॉक्टर म्हणून सही करू शकत नाही. लॅबचे दोन्ही रिपोर्ट, पैसे भरल्याच्या रिसीट तसेच माहितीच्या अधिकारात मिळवलेली माहिती- सर्व पुरावे देऊन २९ नोव्हेंबर २०१४ रोजी कोर्टात केस दाखल करण्यात आली. साक्षीदारांच्या साक्षी आणि पुरावे हे सर्व बघून १२ मे २०२२ रोजी खटल्याचा निकाल लागला.
दोघांनाही कोर्टाने वेगवेगळ्या १० कलमाखाली दोषी ठरवून एक वर्ष कारावास आणि १०००० ते २५००० रु. दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सर्व कारावास एकदमच भोगायचा आहे.
केस जिंकली असली तरी
१) त्यासाठी ७ वर्षांहून जास्त कालावधी गेला.
२) आरोपी वरच्या कोर्टात अपील करू शकतात.
३) हे फक्त एकच प्रकरण आहे, अशा असंख्य लॅब सर्वत्र चालू आहेत.
त्यांच्यावर आरोप करून खटले चालवण्यासाठी खूप वेळ, पैसा आणि परिश्रम हवेत. तो पॅथॉलॉजिस्टकडे नसतो.शासनाने या खटल्याची दखल घेऊन अशा बेकायदेशीर लॅबवर कारवाई केल्यास या खटल्याचा उपयोग झाला असे म्हणता येईल.