कार्टूनिस्ट कंबाईन, कार्टूनिस्ट कॅफे क्लबतर्फे आम्ही वेगवेगळे उपक्रम करीत असतो. त्या उपक्रमांना बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक, प्रबोधन प्रकाशन, मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिकाची उत्तम साथ मिळत असते. चांगलं, वेगळं काम करणार्या तरूण व्यंगचित्रकारांच्या जाहीर व्यासपीठावरून मुलाखती घेणे, ज्येष्ठ व्यंगचित्रकारांचा सन्मान आणि त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविणे, त्या ज्येष्ठ व्यंगचित्रकारांच्या अनुभवाचा फायदा तरूण व्यंगचित्रकारांना व्हावा म्हणून त्यांच्या मुलाखती घेणे, बसमधून तरूण व्यंगचित्रकारांना बाहेरगावी नेऊन तेथील ज्येष्ठ व्यंगचित्रकारांच्या मुलाखती त्या तरूण व्यंगचित्रकारांनाच घ्यायला लावणे, असे अनेक कार्यक्रम आम्ही केले. आतापर्यंत शि. द. फडणीस, ज्ञानेश सोनार, खलील खान, चारुहास पंडित, आबिद सुरती, विजय पराडकर, प्रभाकर वाईरकर, सुरेश सावंत, प्रशांत कुलकर्णी यांच्या जाहीर मुलाखती वेगवेगळ्या व्यंगचित्रकार संमेलनांत जाहीर व्यासपीठावरून घेतल्या.
या मालिकेतच आम्ही काही हटके काम करणार्या तरूण व्यंगचित्रकारांच्या मुलाखती `मार्मिक’च्या चोखंदळ वाचकांसमोर सादर करणार आहोत. सिद्धांत जुमडे अशा वेगळं काम करणार्या व्यंगचित्रकारांपैकी एक. त्यांच्याशी मारलेल्या या गप्पा.
`सिद्धांत, पाच मे जागतिक व्यंगचित्रकार दिनी तुझी योगेंद्र भगत आणि मी जाहीर मुलाखत घेतली. तुझी पहिलीच मुलाखत असावी. तुला कसं काय वाटलं?
मी तुमचे आभार मानतो. तुम्ही एवढं मोठं व्यासपीठ मिळवून दिलं. मी या मुलाखतीनंतर नोईडा, दिल्लीला परतलो, तो वेगळा उत्साह घेऊनच. या संमेलनात अनेक मोठमोठे व्यंगचित्रकार भेटले. त्यांच्याशी बोलून एक वेगळीच उर्जा घेऊन मी परतलो.
आम्ही सगळे हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख, थोर व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांचे अनुयायी. त्यांच्या शैलीने प्रभावित होऊन काम केलं. बाळासाहेब नेहमी म्हणायचे, `व्यंगचित्रकार हा त्यांच्या सहीपेक्षा त्याच्या शैलीवरून रेषेवरून ओळखता यायला हवा.’ तुझीही शैली वेगळी आहे. तुझ्यासमोर कोणत्या व्यंगचित्रकाराचा आदर्श आहे?
मी जे. जे. स्कूल ऑफ आटर््सला शिकत असताना दुसर्या वर्षाला इलस्ट्रेशन हा विषय घेतला होता. त्यावेळी बाळासाहेबांची भरपूर व्यंगचित्रे पाहिली. वॉल्ट डिस्नेची पाहिली. बाळासाहेबांच्या कल्पना व रेषांनी प्रभावित झालो. त्याचबरोबर बाळासाहेबांच्या मुलाखतींमध्ये ऐकताना डेव्हिड लो आणि इतर परदेशी व्यंगचित्रकारांचा उल्लेख व्हायचा. त्यांची व्यंगचित्रे पाहायला लागलो. आणि मला जेव्हा `हिंदुस्थान टाइम्स’ या इंग्रजी दैनिकात पहिलं काम मिळालं, तेव्हा त्यात मी बाळासाहेबांच्या रेषांचं अनुकरण केलं. बाळासाहेब चर्चिल किंवा कुणाचेची अर्कचित्र करताना मिनिमल म्हणजे कमीत कमी रेषांचा वापर करायचे. माझ्या सुरुवातीच्या अर्कचित्रांमध्ये मी तशा कमीत कमी रेषा वापरल्या आहेत.
कमीत कमी रेषांत एखाद्या व्यक्तीला पकडणं कठीण काम आहे. मा. बाळासाहेब, श्रीकांतजी ठाकरे, आर. के. लक्ष्मण यांना ते सहज जमायचं. तू कसं साध्य केलंस हे?
खरं तर ते बाळासाहेब, डेव्हिड लो, आर. के. लक्ष्मण यांची व्यंगचित्रं अभ्यासता अभ्यासता जमलं. हिंदुस्थान टाइम्समध्ये रोज एक अर्कचित्र करावं लागायचं. पण एक अर्कचित्र छापून येण्यासाठी त्याच राजकीय व्यक्तीची संपादकांना किमान दहा अर्कचित्रं दाखवावी लागायची. संपादक त्यातलं एक निवडायचे. मग त्या एकावर पुन्हा मला आणखी काम करायला लावायचे. त्यामुळे माझा चांगला सराव झाला. एखाद्या व्यक्तीची वैशिष्ट्ये कशी टिपायची हे मला त्यातून कळलं. इंदिरा गांधींचं नाक करताना बाळासाहेब बोल्ड रेषा वापरायचे, मोठ्ठं पोट काढतानाही ते जाड रेषा वापरायचे. बाळासाहेब, डेव्हिड लो, आर. के. लक्ष्मण हे कुठे जाड, कुठे बारीक रेषा वापरायचे याचं तंत्र मी बर्याच मेहनतीने थोडं फार आत्मसात केलं.
पण तू आता `इंडिया टुडे’मध्ये जी अर्कचित्रे करतोस ती पूर्णपणे भिन्न आहेत. तुझी शैली पूर्णपणे बदलली आहे. पूर्ण डिजिटल झाली आहे. या डिजिटल शैलीची रहस्ये सांगशील का?
जेव्हा जेव्हा मी एखादी प्रकाशन संस्था निवडली, तेव्हा तेव्हा त्यांच्या प्रकाशनांचं स्वरूप वेगवेगळं असायचं. त्यामुळे तिथे काहीतरी नवं, वेगळं करायला वाव होता आणि आताच्या पिढीला जी शैली आवडते, त्या शैलीने काम करून पाहावं म्हणून गुगलवर वेगवेगळ्या शैलींचा अभ्यास केला आणि त्यातली जी आवडली ती निवडली. सुरुवातीला कागदावर रंगीत चित्र काढायचो, नंतर कॉम्प्युटरच्या फोटोशॉपमधून तसं रंगविण्याचा प्रयत्न करायचो. रेषांचे फटकारेही प्रथम कागदावर काढायचो, नंतर स्कॅन करून कॉम्प्युटरवर अॅडॉब इलस्ट्रेटरच्या अॅपने करण्याचा प्रयत्न करायचो. पण कागदावरच्या रेषेत जो फ्लो, रिदम यायचा, तो कॉम्प्युटरवर जमायचा नाही. पण कॉम्प्युटर ही हल्लीच्या युगाची गरज आहे हे कळत होतं. म्हणून मी रात्रंदिवस मेहनत करून ते तंत्र आत्मसात केलं आणि तो फ्लो, रिदम आणला.
ही वॉल्ट डिस्ने ग्रूपची आताची शैली आहे. डिस्नेची टीम या प्रकारची व्यंगचित्रे त्यांच्या चित्रपटांत, पुस्तकांत वापरते. ही कला कशी जमली?
मलाही सुरुवातीला ते जमत नव्हतं. पण नंतर मी त्या कलाकारांशी माझं मन आणि हृदय जोडण्याचा प्रयत्न केला. मी तोच कलाकार आहे असा विचार करून काम करायला लागलो आणि मला जमायला लागलं.
तुझी पिढी डिजिटल, नवं तंत्रज्ञान वापरणारी आहे. हे तंत्र तरूण पिढीने कसं आत्मसात करावं? काही लोक म्हणतात की हल्ली वेगवेगळी अॅप आली आहेत. त्यांच्यावर पटकन् अर्कचित्र काढता येतं. हे कितपत खरं आहे?
फोटोशॉपमध्ये काही जण एखादा फोटो घेऊन त्याचे नाक, कान, ओठ, डोळे डिस्टॉर्ट करून मोडतोड करून अर्कचित्रासारखं काहीतरी बनवतात. त्याला अर्थ नाही. अर्कचित्रात गोडवा हवा. बेबी फेससारखं अर्कचित्र हवं. हा गुगलवर `प्रो क्रिएट अॅप’ आहे. त्यावर मी हे सध्या काम करतो. पण तुम्ही कोणत्याही तंत्राने काम करा. तुम्हाला स्वत:च स्किल, डोकंच वापरावं लागतं. तुम्हाला वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांची शैली बघताना त्याचं मन पकडता आलं तर काम करणं सोप होईल.
सिद्धांत, तुझी शैली थोडी परदेशी वळणाकडे जाणारी आहे आणि परदेशी अर्कचित्रकार अर्कचित्र करताना चेहर्याची मोडतोड आणि अतिशयोक्ती, एक्झॅगरॅशन खूप करतात. तू तसं कमी करतोस. याचं कारण काय?
मीही पूर्वी तसंच करायचो. एकदा ममता बॅनर्जी यांचं अर्कचित्र `इंडिया टुडे’साठी केलं होतं. त्यात त्यांचा चेहरा खूप अतिशयोक्ती करून दाखवला होता. त्यांच्या सचिवाचा आमच्या संपादकांना फोन आला. त्यावेळी संपादकांनी मला सांगितलं. एवढी अतिशयोक्ती करू नका. त्यामुळे मग मी माझ्या प्रत्येक अर्कचित्रात गोडवा आणण्याचा प्रयत्न करतो. अर्कचित्राला बेबी फेस देतो. माझी अर्कचित्रं त्यामुळे वेगळी वाटतात. त्यासाठी व्यक्तीच्या डोळ्यांचा, देहबोलीचा, वेषभूषेचा, त्याचं राजकारणात आता काय चाललंय याचा खूप अभ्यास करावा लागतो. मी काही वर्षांपूर्वी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केल्यामुळे सिनियरही माझ्याकडून खूप काम करून घ्यायचे. त्याची मला आवड असल्यामुळे कंटाळा आला नाही. आता खूप फायदा होतो.