गाईचे शेण, मूत्र वापरून तयार केलेल्या ‘पंचकव्या’मुळे आतापर्यंत 800 जण कोरोनामुक्त झाल्याचा दावा राष्ट्रीय कामधेनू आयोगाने केला आहे. राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथारिया यांनी ही माहिती दिली आहे.
कल्याण, वाराणसी, राजकोट, बडोदा या शहरात प्रत्येकी 200 कोरोनाग्रस्तांना जून ते ऑक्टोबरदरम्यान पंचकव्यचा डोस देण्यात आला होता. ते सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, असा दावा या आयोगाने केला आहे. ”आम्ही आमच्या या प्रयोगाचा अहवाल आयुष मंत्रालयाला पाठविणार आहोत. आतापर्यंत अॅलोपॅथीने आयुर्वेदिक उपचार कधी मानलेच नाहीत. मात्र येत्या 1-2 वर्षात त्यांनाही हे मान्य करावे लागतील’, असे कथारिया यांनी सांगितले. पुढच्या महिन्यात कामधेनू आयोगाकडून देशात पहिल्यांदाट ‘गौ विज्ञानाची’ (cow science) परिक्षा घेण्यात येणार आहे. त्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत कथारिया यांनी पंचकव्याच्या प्रयोगाबाबत सांगितले.
केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये पशू संवर्धन मंत्रालयाच्या अंतर्गत कामधेनू आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या आयोगाने रुग्णांना दिलेल्या पंचकव्याच्या गोळ्यांमध्ये गाईचे शेण, मूत्र, दूध, तूप व दही असते. चाचणी केलेल्या रुग्णांना पंचकव्यसोबतच संजीवनी बुटी व आयुर्वेदिक काढेही देण्यात आले होते.
लाल मुंग्यांची चटणी कोरोनावर ठरणार रामबाण उपाय
कोरोनावरील लसीबाबत जगभरातील अनेक कंपन्यांकडून संशोधन सुरू असतानाच आता ओडिशा आणि छत्तीसगडमधील आदिवासी बांधव खात असलेली लाल मुंग्यांची चटणी कोरोनावर रामबाण उपाय ठरणार असल्याचे समोर आले आहे. या चटणीला लवकरच कोरोना विषाणूविरोधातील प्रभावी औषध म्हणून आयुष मंत्रालय लवकरच मान्यता देण्याची शक्यता आहे. ओडिशा आणि छत्तीसगडसह देशाच्या अनेक भागांतील आदिवासी बांधव सर्दी-खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा आणि अन्य आजारांवर गुणकारी औषध म्हणून लाल मुंग्या आणि हिरव्या मिरचीचा समावेश असली चटणी खातात. त्यामुळेच आदिवासी भागात कोरोनाचा फारसा प्रसार झालेला नाही. त्याची दखल घेत नयाधर पाढीयाल यांनी सदर चटणीचा कोरोनावरील औषध म्हणून वापर करावा अशी मागणी केली होती. मात्र त्याला प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने पाढीयाल यांनी ओडिशा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
सौजन्य : दैनिक सामना