• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

पराक्रमी मंत्रिपुत्र!

- टोक्या टोचणकर (टोचन)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 6, 2025
in टोचन
0

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा पुत्र सिद्धांत याने पराक्रमाची परिसीमा गाठत पित्याची प्रतिमा पार पुसल्यामुळे पार्टीच्या प्रतिमेला पोक! ही बातमी पेपरात पहिल्या पानावर आल्यानंतर माझा मानलेला परमप्रिय लाडका मित्र पोक्या भांबावून गेला हे त्याच्या आठवडाभरातील विक्षिप्त वागण्यामुळे माझ्या लक्षात आले. त्याला जाब विचारताच तो म्हणाला, टोक्या, शिरसाट हे शिंदे गटातील मंत्री असले तरी त्यांच्या पुत्राच्या लफडेबाजीमुळे त्यांच्यावर तोंड लपवण्याची पाळी यावी हे नक्कीच लांच्छनास्पद आहे. गेल्या वर्षी चिंबोरी फेम मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या पुत्राने महापराक्रम करून पित्याच्या अब्जावधी संपत्तीचा मनमानी वापर करत पित्यावर मंत्रिमंडळातून तोंड काळे करण्याची पाळी आणली आणि आता संजय शिरसाट यांच्या सिद्धांतने पूर्वाश्रमीची पत्नी असलेल्या अबलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिच्या अब्रूचे धिंडवडे काढले, हे सारे वेदनादायक आहे. महायुतीतील मोठ्या मंत्र्यांचे आशीर्वाद पाठीमागे असल्यामुळे राज्यातील गुंड प्रवृत्तींची पाठराखण करण्याचे प्रकार प्रमाणाबाहेर वाढले आहेत. मंत्री जेवढा जास्त भ्रष्ट तेवढा महायुतीच्या मंत्रिमंडळात त्याला जास्त मान हे गेली दोन वर्षे आपण पाहात आहोत, असेही पोक्या म्हणाला. त्यावर मी त्याला म्हणालो, तुला तसे वाटत असेल तर तू संजय शिरसाट तसेच सध्या फॉर्मात असलेले कॅबिनेट मंत्री छगनराव भुजबळ यांच्याच प्रतिक्रिया घेऊन ये. म्हणजे त्यावर खरा प्रकाश पडेल. त्याच या प्रतिक्रिया.
संजय शिरसाट : तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि आता त्या महिलेने तक्रार मागे घेतल्यामुळे प्रकरणावर पडदा पडलाय. मुळात माझा मुलगा सिद्धांत अवगुणी नसून सदगुणी आहे. तो वयात आल्यापासून आतापर्यंत काय काय करत होता, हे मला ठाऊक नाही. मी हाडामांसाचा समाज कार्यकर्ता आहे. माझं सारं आयुष्य समाजातील अन्याय दूर करण्यात गेलं. शिंदे साहेबांच्या शिवसेनेत आल्यापासून तर कामाचा व्याप इतका वाढलाय की मला इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. माझ्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप होतात. माझ्या संपत्तीबद्दल वाटेल ते बोललं जातं. पण पैसा कमावण्यासाठी मी किती घाम गाळला हे फक्त शिंदे साहेबांना माहीत आहे. त्यांच्याप्रमाणे माझंही कर्तृत्त्व मोठं आहे. म्हणून तर त्यांनी मला मंत्री केलं. राज्यात महिलांवर होणार्‍या अत्याचारांचा बंदोबस्त करण्यासाठी कठोरात कठोर उपाय योजावे अशी विनंती मी आमचे जागतिक कीर्तीचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना करणार आहे. माझ्या लाडक्या सिद्धांतने छत्रपती संभाजी नगरातील रेल्वे स्थानकानजीक असलेलं एक हॉटेल ६४ कोटी ७३ लाख रुपये किंमतीला लिलावात विकत घेतलं हे खरं आहे. पण मी म्हणतो, माझ्या सिद्धांतच्या मे. सिद्धांत साहित्य खरेदी व पुरवठा कंपनीने सहाव्या बोलीत हे हॉटेल रीतसर विकत घेतल्यानंतरही विरोधी पक्षांच्या पोटात का दुखतं? मराठी माणसाने मोठमोठी हॉटेल्स विकत घेऊच नयेत का? पैसे त्याचे आहेत, माझे नाहीत. त्याच्या पैशात त्याने काय करावं हा त्याचा प्रश्न आहे. त्यात तुम्ही मला का ओढता? त्याच्याकडे एवढे पैसे कुठून आले या प्रश्नाला माझ्याकडे समर्पक उत्तर आहे. लहानपणापासून त्याच्याकडे पैसे साठवण्याची पिगी बँक आहे. ती आकाराने मोठ्या खोक्याएवढी आहे. तिच्यात तो पैसे साठवत असे. मला भेटायला कुणी नेते वा मंत्री आले की ते निघताना दारात तो त्याची पिगी बँक पुढे करायचा. मग ते स्वत:च्या कोटाच्या खिशात हात घालून त्या बँकेत नोटांचं बंडल टाकायचे. त्यासाठी बँकेचा होल त्याने मोठ्या आकाराचं नोटांचं बंडल आत जाईल इतका मोठा केला होता. महिनाभरात एक खोका हाऊसफुल्ल झाला की दुसरा खोका लावायचा. आज तुम्ही त्याला खोकासम्राट म्हटले तरी आश्चर्य वाटायला नको. नोटबंदीसारखी वेळ आली की खोका फोडून ती रक्कम घेऊन तो रिझर्व्ह बँकेत जायचा आणि नोटा बदलण्याची रिक्वेस्ट करायचा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते हॉटेल लिलावात घेण्याचं ठरल्यावर ते शंभर खोके फोडले तेव्हा त्यात तब्बल ७० कोटी रुपये होते. जे त्याला खाऊसाठी मिळालेले पैसे होते. त्याच्या मालकीचे होते. त्या पैशाशी माझा काहीच संबंध नसताना माझ्याकडे बोट दाखवले गेले व मी गैरमार्गाने ते पैसे कमावल्याचा, भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर विनाकारण केला गेला. त्याचा मी तीव्र निषेध करतो. प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला लहानपणापासून पिगी बँक वापरून घरी आलेल्या पाहुण्यांकडे पैसे मागून त्याची साठवणूक करण्याची सवय लावली, तर त्या सेव्हिंगमुळे तीही मुले कोट्यधीश होऊ शकतील. त्यांनाही नोकरी करण्याची गरज भासणार नाही. माझ्या लाडक्या पुत्रावर नको ते आरोप झाल्याने गेले दहा दिवस मी खूप अस्वस्थ होतो, परंतु आता मी शिंदे सेनेचा प्रवक्ता म्हणून चॅनेल्सवर पक्ष प्रतिमा उजळ करण्यासाठी प्रतिक्रिया देण्याच्या दैनंदिन कार्यक्रमावर रुजू झालो आहे. टीव्हीवर माझा चेहरा तुम्हाला पडलेला वाटत असला तरी तो खात्यातील कामाच्या ताणामुळे होणार्‍या जागरणाचा परिणाम आहे. धन्यवाद.
छगन भुजबळ : कोणी कुठल्या मार्गाने पैसा कमावावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप नेहमीच केले जातात. त्यात नवल काहीच नाही. मी मंत्री झाल्यापासून आजपर्यंत माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यातून मिळालेल्या पैशावर मी, माझ्या मुलाने, पुतण्याने चैन केली असेही आरोप झाले. तेलगी प्रकरणात तर मला दोन वर्षे तुरुंगात डांबण्यात आलं. मंत्री झालात की तुमच्या मागे पैशाचा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांचा एकाच वेळी ओघ लागतो. तो थोपवण्याचा प्रयत्न मंत्र्याने अजिबात करू नये. तुमच्यात दम असेल तर मंत्रीपद तुमच्याकडे चालून येतं. त्याचा साक्षात पुरावा माझ्या रुपाने तुमच्यासमोर उभा आहे. जय महाराष्ट्र. जय जय ओबीसी!

Previous Post

राशीभविष्य

Next Post

नाय, नो, नेव्हर…

Next Post

नाय, नो, नेव्हर...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.