भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ५२कुळे यांनी पत्रकारांबाबत तोडलेल्या चित्रविचित्र तार्यांमुळे गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील सच्चे पत्रकार खवळून उठले, तर पत्रकारितेच्या नावावर मिरवणारे, स्वत:चा सर्व तर्हेचा भरपूर फायदा करून घेणारे, स्वार्थाच्या पोळ्या भाजणारे, सरकारचे मिंधे असलेले काही भंपक पत्रकार तोंडाला चिकटपट्ट्या लावून बोलती बंद झाल्यासारखे गप्प बसले. आमचा परमप्रिय मानलेला मित्र पोक्या मात्र ५२कुळेंवर नेहमीप्रमाणे भडकला. भाजपच्या विरोधात न लिहिता बाजूने लिहायचे असेल तर अशा पत्रकारांना ढाब्यावर घेऊन जा, चहा पाजा, त्यांच्याशी दोस्ती करा, भाजपच्या फक्त सकारात्मक बातम्या येण्यासाठी त्यांची सरबराई करा, असा त्यांच्या बोलण्याचा एकूण रोख होता. पोक्या मला म्हणाला, आपण दोघांनीही पत्रकारितेत काही वर्षे काढली आहेत. पत्रकारितेला धर्म समजणारे पत्रकार कितीही मोठा नेता किंवा मंत्री असला तरी त्याने एखादी चूक केल्याचे निदर्शनास आल्यावर आपली लेखणी तलवारीसारखी परजतो आणि त्या लेखणीचे धारदार वार करून त्या व्यक्तीला त्याची चूक दाखवून देतो. पत्रकारांनी अशा नेत्यांविरुद्ध सबळ पुरावे सादर केल्यानंतर अनेकांना पदाचा त्याग करावा लागलाय किंवा त्यांची पक्षातून लाजिरवाणी हकालपट्टी झालीय. म्हणूनच पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो… त्यावर मी म्हटलं, पोक्या, अशी लेक्चरबाजी करण्यापेक्षा तू सरळ जाऊन त्या ५२कुळेंशी बोलत का नाहीस? तर तो म्हणाला, मी त्यांना आजच्या तापलेल्या वातावरणात मुद्दाम जाऊन भेटणार आहे आणि त्यांच्या मनात नक्की काय आहे, ते विचारणार आहे. काही मिंध्या पत्रकारांना हाताशी धरून पक्षाची ५२ मीटर परीघ असलेली पोळी भाजून घेण्याच्या ५२कुळेंचा डाव असावा… पोक्या कधी गेला आणि कामगिरी फत्ते करून कधी आला ते कळलंच नाही. त्याच्या कामगिरीचा हा पुरावा…
– नमस्कार ५२कुळे साहेब.
– नमस्कार. काय चहा घेणार की कॉफी? काही थंड घेणार की गरम? काही तसलं हॉट घेणार की चिल्ड? की धाब्यावरच जाऊया खात खात मनमोकळ्या गप्पा मारायला?
– धाबा म्हटलं की भीतीच वाटते आता. पण मुंबई महाराष्ट्रातले सगळे धाबे भाजपा विकत घेणारय असं मी ऐकलं ते खरं आहे का?
– सांगता येत नाही. पण महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील धाबे, हॉटेल्स, बारमध्ये निवडणुकीपर्यंत तरी पत्रकाराने त्याचे भाजपापुरस्कृत ओळखपत्र दाखवले तर त्याला हवे तेवढे खाणे-पिणे मोफत द्यावे अशा कल्पना आमच्या काही नेत्यांच्या डोक्यात आहेत. मागच्या एका विधानसभा निवडणुकीत आमच्याच एका उमेदवाराने ग्रँट रोडचे एक हॉटेल कम बार पत्रकारांसाठी अशाच पद्धतीने खुले ठेवले होते. कधीही दिवसा, रात्री, अपरात्री या, खा-प्या, मजा करा. मात्र पुढे जे लिहायचे ते समजून लिहा असा गर्भित इशारा त्यात होता. अनेक मिंध्या पत्रकारांनी त्याचा लाभही घेतला होता. अशा खादाडभाऊ पत्रकारांना प्रेमाने हाताशी धरलं तर बर्याच गोष्टी राजकारणात साध्य करता येतात असा माझा होरा आहे. त्यामुळेच पत्रकारांशी प्रेमाने वागून त्यांना कसं आपलंसं करून घ्यावं, याचे धडे मी आमच्या कार्यकर्त्यांना देत होतो. त्यात मला काहीच वावगं वाटत नाही.
– असं होतं तर मग त्याची बोंबाबोंब झाल्यावर पलटी का मारलीत? माझ्या वाक्याचा संदर्भ तोडून सोयीस्कर अर्थ काढत माझ्यावर टीका करण्यात आली, असा का खुलासा केलात? स्वत:ची किंमत मोजून नेत्यांकडून फायदे उकळणारे धंदेवाईक पत्रकार आणि त्यांचे मालक या व्यवसायात भरपूर आहेत. महाराष्ट्रात पासरीभर छोटी मोठी वृत्तपत्रे काढून त्याद्वारे हवे ते पदरात पाडून घेणारे, पत्रकारितेला काळिमा फासणारे अनेकजण ब्लॅकमेकिंग करून पोट भरत असतात. त्यांना सत्याशी, प्रामाणिकपणाशी, पत्रकारितेच्या धर्माशी, निष्ठेशी काहीच देणंघेणं नसतं. अशा पत्रकारांना हाताशी धरून तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू पाहाल तर ते कधीच साध्य होणार नाही. अशा तथाकथित पत्रकारांची जातकुळी जनताही ओळखून असते. आपल्या एका बातमीने सरकारला सळो की पळो करून सोडणारे अनेक पत्रकार सीमेवर लढणार्या सैनिकाप्रमाणे व्रत बजावत असतात. सत्य सांगताना होणारे जीवघेणे हल्ले पचवत असतात. अनेकजणांनी निर्भीड पत्रकारितेच्या हव्यासापोटी आपले प्राणही गमावले आहेत. पण तुमच्यासारखे नेते काही पाळीव कुत्र्याप्रमाणे काही पत्रकारांपुढे हाडके टाकून त्यांना विरोधकांवर भुंकायला लावतात. पण सरसकट सर्व पत्रकारांबद्दल तुम्ही वादग्रस्त विधाने करू नका. सच्चे पत्रकार पैशासाठी, पाकिटांसाठी, छोट्यामोठ्या गिफ्टसाठी कुठल्याही पक्षाला वा नेत्याला कधीच शरण जात नाहीत. नेत्यांची मैत्री असणं वेगळं आणि त्यांच्यासाठी इमान विकणं वेगळं, याची खर्या पत्रकाराला जाणीव असते. अशा पत्रकाराला कोणीही खरेदी करू शकत नाही. आज पत्रकारितेला जागणार्या निष्ठावंत पत्रकारांमुळेच भाजपचा, मोदींचा, त्यांच्या लुटारू मित्रांचा भांडाफोड झाला आहे. येत्या निवडणुकीत तर भाजपचा दुटप्पीपणा आणि सरकारचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर येणार आहे. समुद्र कितीही विशाल असला तरी विष्ठा शेवटी पाण्यावर तरंगतेच. त्याचा प्रत्यय हळूहळू भाजपाला येईल. पत्रकारितेचे हत्यार सरकारच्या पोटात कधी आणि किती खोलवर घुसेल हे येत्या निवडणुकीत समजेलच. पत्रकारांना पक्षाच्या कवेत घेण्याचा तुमचा सल्ला तुम्हाला आणि पक्षाला कसा आणि किती महागात पडतो, हे क्षणोक्षणी तुम्हाला दिसेल आणि त्याची फळं निवडणुकीत भोगावीच लागतील.
– पण आमच्या फडणवीसांनी माझं बोलणं व्यंगात्मक होतं, ते मनावर घेऊ नये, असं म्हटलंच आहे.
– आता तुमच्या या व्यंगाचे बिंग लवकरच किती जोरात फुटते याची वाट बघत रहा!