मला सोशल मीडिया आवडतो. त्यातही इन्स्टाग्राम, फेसबुक नवे होते तेव्हा व्यसन लागले होते, पण नंतर लक्षात आले की तेव्हा फ्रेंड म्हणून गोळा केलेले आता त्रास बनत आहेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हॅप्पी बड्डेला जाणारा अलार्म… आणि मग येणार्या शुभेच्छा…
…शेवटी फेसबुक डिलीट केले. असो. तर मी व्हॉट्सअप आणि इन्स्टावर पडीक असते. खूप छान व्हिडीओ असतात. त्यात एक पिप्पल बाबा म्हणून आहेत!! हा माणूस परंपरागत विचार वेगळ्या आधुनिकरित्या सांगतो. अगदी चार पाच ओळीत. रोजचे जगण्यातील विषय, पण खूप व्यवहारी सल्ला.
असाच एक व्हिडीओ बघितला आणि विचार सुरू झाले. नातेवाईक… मला अनेकजण त्यांचे नातेवाईक, त्यांचे राग लोभ, त्यांच्यावर होणारा अन्याय (??) याबद्दल सांगत असतात. ध्रुवपद एक मरो ते नातेवाईक, सगळे दुष्ट… एकीला शेवटी मी म्हटले की, अगं तू पण कोणाची तरी नातेवाईक असशील ना? तुझ्याबद्दल असेच बोलले जात असेल!!
मुद्दा काय की भारतात सोडा, अगदी परदेशात पण नातेवाईक हा डोक्याला शॉट असतो.
आता मी वयाची साठी गाठली आहे… आणि अनेक फटके खाऊन अनुभव घेऊन थोडे व्यवहारी शहाणपण आले आहे. तरीसुद्धा मला या नातेवाईक प्रजातीचा उपद्रव होत असतोच. म्हणजे त्यांच्यात जा, जाऊ नका… ते शॉट देणारच.
आता यावर उपाय काय? तर सर्वसंगपरित्याग करून ‘हम तो फकीर हैं, झोला उठाके चले जायेंगे’असे करायचे?… पण ते शक्य नाही हो.
तर मुद्दा काय होता, नातेवाईक जमातीचे उपद्रव.
कुटुंबात एखादं लग्न असले म्हणजे हा उपद्रव कमाल पटीत वाढतो आणि माइंड यू, इथे आमचा असा असा अपमान झाला ही सुरस सुरम्य कहाणी पिढ्यानपिढ्या सुरू राहणार… आणि फक्त आपले भारतीय बांधवच असे असतात, असा तुमचा समज असेल तर तो पूर्ण चूक आहे. आपल्या ‘संस्कारां’पासून हजारो मैल दूर असणार्या परदेशी कुटुंबांत पण समान समस्या. अर्थात तिथं भेटणे बिटणे वर्षातून एकदा होत असल्याने धुसफूस जास्त नसते आणि परत या वर्षीचा नवरा अथवा बायको पुढील वर्षी कायम असेल याची पण शाश्वती नसल्याने फार प्रॉब्लेम होत नाहीत. तरीही ज्याला ‘फॅमिली डायनॅमिक्स’ म्हणतात ते तिथे पण असते हो. गोरे असोत अथवा कृष्णवर्णीय माणसं असोत, माणसं सगळीकडे सारखी.
कुटुंबातले सर्वजण काही कारणाने एकत्र येतात, तेव्हा दिसते की एक कोणीतरी अतिशय यशस्वी भावंडं असते, त्याला आपल्या संपन्नतेचं प्रदर्शन करायला आवडतं (कोकणात याला नोड्याची नोडेगिरी म्हणतात), त्याच्याकडून येणार्या भेटी महाग असतात. त्या तुलनेत साध्या भेटवस्तू देणार्या इतर लोकांना राग येणारच. घरातले आईवडील, ज्येष्ठ नातेवाईक समजूतदार असतील तर ठीक, नाहीतर यावरून धुसफूस होणारच होणार.
आपल्याकडे एनआरआय आईवडिलांना वर्षातून एकदा भेटायला येतात. तेव्हा आईवडील पण कौतुकाचा अगदी वर्षाव करतात, त्यांचे पोवाडे गातात. त्याचवेळी वर्षभर त्यांची देखभाल करणार्या मुलांना क्रेडिट काही नसते. त्यांचं बिचार्यांचं पूर्ण कुटुंब यांनाही सांभाळणार आणि दर वर्षी या व्हीआयपी पाहुण्यांची सरबराई करण्यात गर्क. …आणि इथेच डोक्याला शॉट सुरू होतात.
अनेकदा मूळ कारण पालकांच्या वर्तनात असते. पालक सारासार विचारबुद्धी ठेवून, निरपेक्ष आणि परखड वागणारे असतील तर हे घडत नाही, तथापि अनेक भारतीय पालक आजही दशरथ राजा आणि कुंती यांचा वारसा चालवत असल्याने मुलांच्या बाबतीत असा मूक अन्याय होतोच होतो. इथे मला सर्व एनआरआय अथवा पालक असेच वागतात हे अभिप्रेत नाहीये. पण अनेक जण असे असतात हे सत्य.
यात भर घालायला अन्य जवळचे, लांबचे नातेवाईक असतात. कुठेतरी वाचले होते, ‘जेव्हा तुम्ही तुमची चाळिशी गाठता तेव्हा कोणत्याही कौटुंबिक समारंभाला फार न येणार्या, थोडे अलिप्त वागणार्या काका/आत्या/मावशी यांचे वागणे उमगते.’ या विधानाबद्दल अनेकांना आक्षेप वाटेल, कारण आजही कुटुंब, नाती यांच्याकडे आपण वस्तुनिष्ठ, व्यक्तिवादी नजरेतून बघत नाही. १००वर्षे आधीची कौटुंबिक मूल्ये आपण आजही रुजवू पाहतो. बदललेली जीवनशैली, प्रागतिक विचार, शिक्षणात पडलेला फरक, आर्थिक पत, आणि कुटुंबसंख्या यानुसार मानसिक बदल घडत नाहीत, त्यामुळे नव्या जुन्या विचारांचा संघर्ष अपरिहार्य असतो. म्हटले तर किरकोळ आणि म्हटले तर खोल परिणाम करणारी गोष्ट. उदाहरण द्यायचे तर मुलाचे योग्य कौतुक केलं तर ते वाया जाईल या मूर्ख भीतीने मुलांना पालकांची प्रशस्ती मिळत नाही, त्यांची सतत तुलना हुशार भावंडं, आजूबाजूची मुले यांच्याशी होते आणि असे मूल मग खूप मानसिक समस्या घेऊन वाढते. आता कुठे या गोष्टीचा विचार आपण करू लागलो आहोत.
दिसायला अगदी साधी गोष्ट, पण मुलाच्या भावविश्वाचा कोंडमारा होतो. ही तुलना सर्व नात्यात असते बरं, जावा-जावा, भावंडे, पालक, दीर, सर्व ठिकाणी तुलना अपरिहार्य असणार. एखाद्याचे कौतुक आपण कसे करतो तर दुसर्याला कमी लेखून- हा बघ कसा हुशार नाहीतर तू, काय स्वयंपाक करते, अमुक नाहीतर तमुक; नोकरीत किती प्रगती केली त्याने/तिने, आणि हा/ही बघा, आहे तिथेच; त्याचे आई वडील बघा कसे वागतात, नाहीतर तुम्ही; तिचा नवरा काय चांगला आहे, नाहीतर आमचे हे; किती समंजस गुणी बायको आहे, आमची बायको नुसती कटकट करणारी.
वरकरणी सहज बोललेल्या अशा शेर्यांमुळे त्या व्यक्तीच्या मनावर खोल जखमा होतात. म्हटले तर साधे शेरे, म्हटले तर मानसिक छळ. थोडक्यात काय, डोक्याला शॉट.
हे झाले परंपरागत पालकांच्या मनोवृत्तीबद्दल, पणं आजकाल जे नवे पालक दिसतात, ते बघून वाटते की जुने परवडले, पणं हे नवे पालक नको. मुलांना नकारात्मक काही सांगायचं नाही, म्हणजे नो, नाही हा शब्द बिलकूल वापरायचा नाही. एका सीरिजमधे असेच एक कार्टे उच्छाद मांडते, उचक पाचक कर, पॅक खाली टाक असे आणि आई काहीही बोलत नाही. शेवटी तो मालक वैतागतो, पण आईचे म्हणजे काय की तो आपणहून समजून जाईल.. तोपर्यंत मालक कर्जबाजारी. असले आधुनिक पालक हल्ली नवा शॉट होत चालले आहेत. मुलांना ओरडायचे नाही, रागवायचे नाही, ते स्वत:हून बदल घडवतील म्हणे; माय माझे, तोपर्यंत जो उच्छाद होतो त्याचे काय? एका साऊथ ईस्ट एशियन पोट्ट्याने सुपर मार्केटमध्ये माझी ट्रॉली जोराने ढकलून त्यामधील कलिंगडाचा शिरच्छेद केला होता. आता मी ओरडले तर तो व्हिडिओ जगभर जाणार… नाही बोलले तर माझा संताप मला अॅसिडीटी देणार. बरं आई मोबाईलमध्ये गर्क आणि आजूबाजूची मिलेनियल जनता मोबाईल सरसावून सज्ज. बिल देताना त्या माणसाला सांगितलं की याचे पैसे मी भरणार नाही, ते या आईकडून घ्या. तेव्हा कुठं त्या माऊलीने अगम्य भाषेत कार्ट्याला झापले आणि मला चार वेळा कंबरेत वाकून सॉरी म्हटले. अर्थात असे वर्तन भारतीय पालक करतील? सोडा राव… लहान आहे, बच्चा है हे वाक्य ऐकवले जाईल. खास करून विमानात तर मला धडधड होते, मागे पुढे कोणी मूल आहे का म्हणून… मुलांना सतत धाकात ठेवणे जितके चूक, तितके असे वर्तन पण चूक. इथे नकळत तुम्ही एक राक्षस तयार करताय, जो/जी असे वागणे नेहमीचे समजते आणि दहा पंधरा वर्षांनी हे पालक म्हणू लागतात की आम्ही याला कधी कशासाठी नाही म्हटले नाही, पण तरीही असे का वागतोय?
तो प्रश्न तुमचा आहे, मला त्याच्यात स्वारस्य नाही. पण तुमच्या उपद्रपी कार्ट्यामुळे मला अनेकदा त्रास झालाय. मुलांना ओरडायचे नाही? हा काय भांपक प्रकार आहे राव. आमच्या वेळी ‘नाही’ हा शब्द दिवसातून हजारो वेळी ऐकायला मिळायचा. अर्थात ते पण योग्य नव्हते आणि हे असे वर्तन पण. ही मुले मग हक्क समजून जातात पण जबाबदारी नाही.
मुद्दा काय, माणसाच्या डोक्याला त्रास देण्यासाठी अगदी घरात भरपूर गोष्टी असतात, त्यात भर घालायची तर नातेवाईक घ्या. शॉट मागून शॉट… शब्दश: तोंड दाबून बुक्क्यांचा मार होतो. तुमच्याकडे काही जालीम अक्सीर इलाज असल्यास सांगा बरे…