आकाशात चढणारा बलशाली सूर्यसुद्धा संध्याकाळ झाली की मावळतो आणि रात्री तर लुप्त होऊन जातो. भारतीय जनता पक्षाच्या देशावरील सत्तेचाही अस्तकाळ (त्यांची सूर्यापेक्षा विखाराच्या अंधाराशीच जास्त जवळीक असल्याने सूर्याशी तुलना अशक्यच आहे) आता जवळ आलेला आहे. फरक इतकाच आहे की सूर्य मावळताना प्रसन्न रंगांची उधळण करतो, हा पक्ष अपेक्षेप्रमाणे मावळताना मागासबुद्धीच्या घृणास्पद विचारांचा शेणसडा घालून चालला आहे.
आता पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. सगळा गोदी मीडिया खिशात असताना आणि आपल्या सोयीने ‘आत्ता निवडणूक झाली तर (मोदी पार्टीच कशी जिंकेल)’ याची हास्यास्पद सर्वेक्षणे करणारे आकडेफिरवाफिरवशास्त्री भाट भोवती भिरभिरत असताना या निवडणुकांमध्ये बहुतेक ठिकाणी भाजपचा पाडाव होईल आणि इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची सरशी होईल, अशीच चर्चा आहे. गोदी मीडियालाही लाजेकाजेखातर काही ठिकाणी भाजप हरणार आहे, हे लाजत मुरकत, आडून आडून का होईना, सांगावं लागत आहे. इकडे महाराष्ट्राच्या बोडक्यावर बसवलेले बेकायदा सरकार शेवटच्या घटका मोजत आहे. बोगस डिग्रीधारक नार्वेकर डॉक्टरांनी कितीही काळ व्हेंटिलेटरवर ठेवले तरी पेशंट परलोक सिधार गया है, हे मिंधे, ईडीग्रस्त आणि यांना पाठबळ देऊन पस्तावलेली महाशक्तीसुद्धा जाणून आहे. त्यामुळे अपरिमित सत्ताबळ हाताशी असूनही एकही निवडणूक घेण्याची हिंमत या सरकारने केलेली नाही. इथे विधानसभेची निवडणूक असो की लोकसभेची, सरशी महाविकास आघाडीचीच होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि त्या दगडावर तिघांनी मिळून डोकं आपटूनही ती पुसली जाणार नाही.
पुढच्या वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकांमध्येही भाजपला अतिप्रचंड, नेत्रदीपक विजय मिळवणं कठीण होईल, याची चिन्हे आजच दिसू लागली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचे निवडणुका जिंकून देणारे यंत्र निकामी होऊ लागल्यावर आतापर्यंत तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत बसलेले त्यांचे पक्षांतर्गत सहकारी काय करतील, ते पाहण्यासारखे असेल. ईडी, सीबीआयच्या धास्तीने या तंबूत येऊन बसलेली आयाराम गयारामांची मांदियाळीही सुरक्षित तंबूकडे पळून गेली की फुगलेला बेडूक पंक्चरायला वेळ लागणार नाही. आगामी निवडणुकीत इंडिया आघाडी मुसंडी मारेल, या भीतीनेच मोदींनी ‘इंडिया’ या नावाचाच धसका घेतलेला आहे. गेली नऊ वर्षे पोतेर्याप्रमाणे कोपर्यात गुंडाळून ठेवलेली एनडीए नावाची आघाडी आहे, त्यात काही मित्रपक्ष आहेत, याचा भाजपला या वर्षी इंडिया आघाडीच्या बैठका सुरू झाल्यानंतर झालेला साक्षात्कारही बोलका आहे. त्याचबरोबर इतकी वर्षे मोदींना साथ देणार्या ऑल इंडिया अण्णा द्रमुक अर्थात एआयएडीएमके या दक्षिणेतल्या एकमेव साथीदाराने एनडीएला रामराम करणेही अन्वर्थक आहे. भाजप आणि त्यांच्या विचारधारेने आतापर्यंत एक सर्वसमावेशक जीवनपद्धती असलेल्या हिंदुत्वाचं रूपांतर कट्टर हिंदू धर्मात करण्याचा प्रयत्न केला आहे. आता अचानक हा कट्टरपणा आणखी प्रबळ करणार्या सनातन धर्माचे गोडवे गायले जाऊ लागले आहेत. सनातन धर्म आणि सनातनी प्रवृत्ती यांच्यात फरक आहे. भाजपचा सनातन धर्म सनातनी प्रवृत्तीचा आहे. दक्षिणेत त्याविरोधात एल्गार सुरू झाल्यावर अण्णाद्रमुक भाजपच्या सनातनी हिंदुत्वाची पाठराखण करण्याचा राजकीय धोका पत्करू शकत नाही. एक देश, एक भाषा यांसारख्या साम्राज्यवादी संकल्पना आणि त्यातून हिंदीसारखी मागासलेपणाची वाहक ठरलेली भाषा सगळ्या देशावर लादण्याचा प्रयत्न भाजपने चालवला आहे. त्यातून देशात उत्तर दक्षिण अशी दुफळी घडून येण्याची भीती आहे. २०२४चा कौल हा त्यादृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे.
‘गीदड की जब मौत आती है, तो वो शहर की तरफ भागता है’ असं म्हटलं जातं. पराभवाचा धोका दिसू लागला की फॅसिस्ट प्रवृत्तींचाही असाच थयथयाट सुरू होतो. दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणं, सरकारच्या एजंटांकडून भडकावू भाषा वापरून दंगली घडवणं, आपणच घातपात घडवून त्याचा दोष निरपराधांवर टाकून बहुसंख्याकांना ‘शत्रू’ दाखवणं, अशा चाली खेळल्या जातात. आज देशातलं वातावरण वेगाने गढूळ केलं जात आहेच. त्याचबरोबर भाजपेयींच्या जिभाही घसरू लागल्या आहेत. संसदेपासून लाल किल्ल्यावरही पातळी सोडून पक्षप्रचार करणारे सर्वोच्च नेतेच त्या बाबतीत त्यांचे आदर्श आहेत. अलीकडेच रमेश बिधुरी नामक दिल्लीच्या खासदाराने संसदेत हिडीस भाषा वापरून आपला मेंदू किती सडलेला आहे, याचा दाखला दिला. त्याला वरकरणी दटावल्यासारखे करून पक्षात महत्त्वाच्या जबाबदारीची बक्षिसी दिली गेली आहे. हे घृणास्पदतेच्याही खालच्या दर्जाचे आहे.
इकडे महाराष्ट्रात कोणी एक खुळे आपल्या पक्षकार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, ‘पत्रकारांना ढाब्यावर न्या, त्यांना चहापाणी करा, म्हणजे ते आपल्याविरोधात लिहिणार नाहीत’ असा सल्ला विनोदाने देते झाले म्हणतात. त्यांची अशी हिंमत कशी झाली वगैरे आकांडतांडव करण्याचा किती पत्रकारांना नैतिक अधिकार असेल, हा प्रश्नच आहे. मालकांचे राजकीय हितसंबंध जपण्यासाठी आणि स्वत:ची विचारधारा तीच आहे म्हणून अनेक पत्रकारांनी, वृत्तपत्रसंस्थांनी, वृत्तवाहिन्यांनी सत्तेशी कशी उघड शय्यासोबत चालवली अाहे, ते पत्रकारांनाही माहिती आहे आणि वाचक-प्रेक्षकांनाही. हिंदीतल्या वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांना लाज वाटेल अशा चेवाने भाजपची, मिंध्यांची तळी उचलणारे वीर इथे कमी नाहीत. त्यांनी पत्रकारिता आधीच ‘धाब्या’वर बसवलेली आहे. मात्र, सत्तेला प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवणारे पत्रकारही खूप आहेत आणि चहापाण्याच्या गप्पा करून या खुळ्यांनी त्यांचाही रोष ओढवून घेतलेला आहे. बुडत्याचा पाय खोलात जातो तो असा.
बिधुरी असोत, खुळे असोत की खुळावलेले पत्रकार असोत- वेळेवर ताळ्यावर या, एवढाच सल्ला आपण त्यांना देऊ शकतो… नाहीतर जनता योग्य वेळी, योग्य भागावर इंजेक्शन देऊन यांना ताळ्यावर आणणार आहेच!