‘मार्मिक’मुळे मला खरी ओळख मिळाली… विचार करण्याची दृष्टी मिळाली. ‘मार्मिक आणि बाळासाहेब ठाकरे’ या दोन नावांचा दबदबा अनुभवता तर आलाच, पण कसं वागावं, वागू नये, काय करावं, करू नये याचं भान, प्रशिक्षण लाभलं. व्यक्तिगत जीवनात नोकरी गमवावी लागल्यानंतर तर ‘मार्मिक’चं सेनाभवनमधलं तिसर्या मजल्यावरचं कार्यालय माझा आधार झाला.
‘मार्मिक’ या मराठीतल्या पहिल्या (एकमेव) मराठी व्यंगचित्र साप्ताहिकाच्या हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त ‘मार्मिक आणि मी’ असा विचार जेव्हा मनावर येतो, तेव्हा दोन दशकांहून अधिक काळातील सुगंधी, भारून, भारावून टाकणार्या आठवणी मनामध्ये नव्यानं उमलतात. ताज्यातवान्या होतात. ‘मार्मिक’सोबत लेखक, मुलाखतकार, नाट्य समीक्षक, कार्यकर्ता, कार्यक्रम आयोजक म्हणून काम करण्याचा हा ‘सुवर्णकाळ’ म्हणजे ‘दैवदुर्मीळ’ जसा ‘भाग्यकाळ’ माझ्या वाट्याला आहे… त्याचा मला रास्त अभिमान होता, आहे… कायम वाटेल.
साक्षात प्रबोधनकार ठाकरे यांनी ज्याचं नामकरण केलं, जागतिक ख्यातीचे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे ज्याचे संस्थापक – संपादक आणि ख्यातकीर्त संगीतकार, व्यंगचित्रकार, सिनेपरीक्षक श्रीकांतजी ठाकरे हे सहसंपादक म्हणून कार्यरत होते अशा मार्मिक परिवारात मला सहभागी होता आलं, विपुल लेखन आणि कार्य करायला मिळालं याबद्दल जितकं लिहावं तेवढं कमीच आहे.
‘नाट्यदर्पण’कार सुधीर दामले यांच्यामुळे, तेव्हाचे आमदार, वक्ते, लेखक ‘मार्मिक’ची जबाबदारी सांभाळणारे प्रमोद नवलकर यांचा सहवास लाभला… आणि अर्थातच नवलकरांमुळेच ‘मार्मिक’मध्ये माझी एन्ट्री झाली. स्वत: नवलकर, सुप्रसिद्ध संपादक – लेखक ह. मो. मराठे, धारदार लेखणीचे अधिपती भाऊ तोरसेकर, साप्ताहिकांच्या विक्रमी खपाचे किमयागार वसंत सोपारकर, साक्षात प्रबोधनकारांपासून ‘पत्रकारिते’चा वसा-वारसा घेऊन तळपत्या लेखणीनं दबदबा निर्माण करणारे पंढरीनाथ सावंत अशा एकापेक्षा एक कर्तबगार कार्यकारी संपादकांच्या सहकार्यामुळे, पाठिंब्यामुळे इतकी वर्षं मला लिहिता तर आलंच, पण ‘मार्मिक मैफिल’सारख्या सर्वप्रिय उपक्रमाचे आयोजन पाच वर्षं ओळीनं करता आलं. सर्व संपादकांसोबत प्रबोधन प्रकाशनचे विश्वस्त मा. सुभाष देसाई, सुदेश म्हात्रे आणि साक्षात मा. उद्धवजी ठाकरे यांचं सकारात्मक भरूभरून प्रोत्साहन, मार्गदर्शन लाभलं तर जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार, शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा लाखमोलाचा शुभाशीर्वाद मला लाभला म्हणूनच ही दोन दशकांची माझी वाटचाल यशस्वी झाली, सुखरूप झाली असं वाटतं.
‘मार्मिक’मुळे मला खरी ओळख मिळाली… विचार करण्याची दृष्टी मिळाली. ‘मार्मिक आणि बाळासाहेब ठाकरे’ या दोन नावांचा दबदबा अनुभवता तर आलाच, पण कसं वागावं, वागू नये, काय करावं, करू नये याचं भान, प्रशिक्षण लाभलं. व्यक्तिगत जीवनात नोकरी गमवावी लागल्यानंतर तर ‘मार्मिक’चं सेनाभवनमधलं तिसर्या मजल्यावरचं कार्यालय माझा आधार झाला.
वसंत सोपारकर – पंढरीनाथ सावंत या दोघांनी ‘घरात रिकामं बसण्यापेक्षा ‘मार्मिक’मध्ये येऊन प्रूफं तपासा, छोटेमोठे लेख, स्फुटं लिहायला हातभार लावायचा’ असा प्रेमळ आदेशच दिला. मग काय? मार्मिक ही माझी कर्मभूमीच झाली. यातूनच पुढे पाच वर्षे मार्मिक मैफील, बाळासाहेबांचा ७५ वा वाढदिवस आयोजित करण्याचे आव्हान लीलया पेलण्याचं बळ आणि भाग्य मला लाभलं. कडक शिस्तीच्या, कल्पक, नावीन्याचे स्वागत करून पाठीशी उभं राहून विश्वासानं जबाबदारी टाकून, काम करवून घेणार्या मा. सुभाष देसाई साहेबांमुळे आणि सुदेश म्हात्रेमुळेच हे सारं मला करता आलं, जमलं. त्यात यश मिळालं हे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो… नि:स्वार्थपणे झोकून देऊन हे सगळं केलं. करता आलं.
मार्मिक – मा. बाळासाहेब ठाकरे – व्यंगचित्र – शिवसेना या चार नावांचा महिमा, दबदबा मला अनुभवता आला. या चौघांबद्दलचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, आदर, अभिमान ‘मार्मिक मैफील’ या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या वेळेस, पाचही वर्षं बघायला मिळाला. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, रमेश जोशी (जनता दल) हे मार्मिक मैफीलमध्ये सहभागी झाले ते मा. बाळासाहेबांच्यामुळेच. बोरिवलीच्या मार्मिक मैफिलीत मराठी नाट्य-चित्रपट-मालिका क्षेत्रातील १७ ‘विनोदवीर’ एकाच वेळेस सहभागी झाले तेही याच दोन नावांच्या प्रेमामुळे, ओढीमुळे. दादरमधल्या पहिल्या मार्मिक मैफिलीचा आरंभ मा. उद्धवजींच्या सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या पहिल्या जाहीर मुलाखतीनं झाला तर समारोप दस्तुरखुद्द मा. बाळासाहेबांच्या मुलाखतीनं झाला होता. मराठीतील नामवंत कवी, कलाकार, व्यंगचित्रकार, कॉमेडियन्स, विचारवंत, अभ्यासू विद्वान यांनी मार्मिक मैफील सजवली तर या सर्व मार्मिक मैफिलींचा वृत्तांत स्वत: पंढरीनाथ सावंत यांनी मार्मिकसाठी सगळ्या ऑडिओ कॅसेटस् ऐकून लिहून काढला होता.
मा. बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त संपन्न झालेल्या सोहळ्यात मराठी नाटक, चित्रपट, संगीत, साहित्य, व्यंगचित्र, मालिका क्षेत्रातील ७४ कलाकार सहभागी झाले होते. ‘आम्हाला ७५वा कलाकार यावा असं मन:पूर्वक वाटते, पण त्यांना तुम्हीच आणू शकता’, असं जेव्हा आम्ही मा. बाळासाहेबांना सांगितलं त्यावर ते म्हणाले, ‘कोण आहे तो कलाकार?’ ‘‘जागतिक ख्यातीचे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे’’ असं आम्ही सांगताच, साहेबांनी हसत हसत संमती दिली होती व ते कार्यक्रमात प्रत्यक्षात सहभागी झालेही होते…
मार्मिक आणि मा. बाळासाहेब ठाकरे या नावाचा आदरयुक्त करिष्मा मला स्वत:ला लंडनच्या हिथ्रो विमानतळावर अनुभवता आला. विमानतळावर आम्ही सर्वजण एका रांगेत उभे असतानाच, एका हाताच्या अंतरावर आपल्या लोकसभेचे काही खासदार दुसर्या रांगेत उभे होते. त्यात आदरणीय सुषमाजी स्वराजही होत्या. त्यांना मी माझं ‘‘प्रतिनिधी – सा. मार्मिक’’ हे कार्ड देऊन नमस्कार केला, तेव्हा त्या, ज्या आपुलकीनं, अगत्यानं, आनंदानं माझ्यासारख्या छोट्या माणसाशी बोलल्या ना, ते बघून मी मार्मिक – मा. बाळासाहेबांना त्रिवार दंडवतच घातला.
जोवर व्यंगचित्र – मार्मिक – मा. बाळासाहेब ठाकरे – शिवसेना हे चार शब्द असणार आहेत तोवर मार्मिक पिढ्यान्पिढ्या राहणार आहे… एवढं खरं!!