नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2021 रोजी जगभरात सुमारे 3 लाख 71 हजार 504 बाळं जन्माला येतील असा अंदाज होता. त्यापैकी सर्वाधिक 60 हजार बाळं हिंदुस्थानातील असतील, असे युएन चिल्ड्रेन फंडने जाहीर केले आहे.
2021 या वर्षात तब्बल 14 कोटी बाळं जन्माला येतील, असा अंदाज आहे. तसंच या सर्व बाळांचे सरासरी वय 84 वर्षांपर्यंत असेल. पॅसिफिकमधील फिजी येथे 2021 च्या पहिल्या बाळाचा तर अमेरिकेत सर्वात शेवटच्या बाळाचा जन्म होईल, असाही अंदाज वर्तवण्यात आला. संपूर्ण जगभरामध्ये 1 जानेवारी रोजी जन्म घेणाऱ्या मुलांच्या संख्यापैकी निम्म्याहून अधिक मुलं केवळ 10 देशांत जन्म घेतील. यामध्ये हिंदुस्थान 59 हजार 995 , चीन 35 हजार 615 , नायजेरिया 21 हजार 439, पाकिस्तान 14 हजार 161, इंडोनेशिया 12 हजार 336, इथिओपिया 12 हजार 06, अमेरिका 10हजार 312, इजिप्त 9 हजार 455, बांगलादेश 9 हजार 236 असे युनीसेफचे म्हणणे आहे.
बाळांसाठी जगातील वातावरण हे आधीच्या वर्षांपेक्षा खूपच उत्तम आहे. नवीन वर्ष नव्या उमेदी आणि नव्या संधी घेऊन येईल. आपण जे जग बनवू त्या जगाचे ही येणारी पिढी संवर्धन करेल. 2021 हे वर्ष मुलांसाठी अधिक सुरक्षित, आरोग्यदायी आणि समान संधीचे बनवू, असे युनीसेफचे कार्यकारी संचालक हेनरीटा फोर यांनी म्हटले.
सौजन्य : दैनिक सामना