• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

दुर्गप्रेमींना डोळस करणारा ग्रंथ

- राज कुलकर्णी (पुस्तक परिचय)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 5, 2024
in पुस्तक परीक्षण
0

दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे शिष्य म्हणजे कोल्हापूरचे दुर्ग अभ्यासक भगवान चिले यांनी महाराष्ट्रातील ३२५ किल्ल्यांवर आपल्या १० पुस्तकांमधे लेखन केले आहे. राज कुलकर्णी यांनी चिले यांच्या ‘गडकिल्ल्यांच्या राज्यात’ या पुस्तकाचा परिचय या लेखात करून दिला आहे. कोल्हापूरच्या शिवस्पर्श प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
– – –

गड, दुर्ग, कोट आणि किल्ले म्हणजे महाराष्ट्राचे वैभव! किल्ला आणि छत्रपती शिवराय हे महाराष्ट्रीय समाजातील अद्वैत आहे. लहानपणापासून किल्ला म्हटले की शिवाजी महाराज आठवतात ते या भावनेमुळे. पण महाराष्ट्राच्या इतिहासात प्रत्येक काळखंडातील राज्यांनी, सम्राटांनी किल्ले बांधलेले आहेत किंवा जुन्या किल्ल्याजवळ नव्याने किल्ले उभा केलेले आहेत. महाराष्ट्रात आजघडीला जवळपास ४०० किल्ले आहेत. या सर्व किल्यांवर दुर्गमहर्षी कै. प्रमोद मांडे यांनी लेखन केलेले आहे. मांडे यांचे शिष्य म्हणजे कोल्हापुरचे दुर्ग अभ्यासक भगवान चिले. त्यांनी दुर्गमहर्षींचा वारसा कायम पुढे चालवत महाराष्ट्रातील ३२५ किल्ल्यांवर यापूर्वी वर्णनात्मक लेखन १० पुस्तकांमधे केले आहे. ‘गडकिल्ल्यांच्या राज्यात’ हे चिले यांचे ११वे पुस्तक तर दुर्गवर्णन मालिकेतील हे पुस्तक म्हणजे सातवे पुस्तक आहे.
भगवान चिले यांची दुर्गजिज्ञासा एवढी प्रबळ की गेली २७-२८ वर्षे त्यांनी महराष्ट्रातील जवळपास सर्व किल्ले पायी फिरून अभ्यासले आहेत. फक्त गोंदिया आणि गडचिरोली भागातील किल्ले त्यांना नक्षली प्रभावामुळे तर ठाणे, अलिबाग, सिताबर्डी किल्ल्यांचे तुरुंग झाल्यामुळे अभ्यासता आले नाहीत. पण या पुस्तकातून त्यांनी महाराष्ट्राला अपरिचित असणार्‍या ४० किल्ल्यांच्या माहितीचा खजिना दुर्गअभ्यासकांसाठी शब्दबद्ध केला आहे.
‘गडकिल्ल्यांच्या राज्यात’ हे पुस्तक २०० पानांचे असून अनुक्रमणिका पाहिल्यावर वाचक ‘अरे इथेही किल्ला आहे?’ असे म्हणून अचंबित होतो. लेखकाने या पुस्तकात अगदी बारीकसारीक तपशीलासह प्रत्येक किल्ल्याची माहिती दिली आहे. हे केवळ दुर्गवर्णन नसून, त्या दुर्गाचे महत्त्व, तो कालखंड, त्या किल्ल्याचे वैशिष्ट्य यांवरही प्रकाश टाकला आहे. त्यामुळे दुर्गवर्णनासाठी केवळ दुर्ग भेटीची उर्मी असून भागत नाही, तर विविध संदर्भ ग्रंथ, ऐतिहासिक नोंदी, दस्ताऐवज याचाही अभ्यास लागतो, याचा प्रत्यय या पुस्तकात सतत येतो.
पुस्तकात विविध दुर्गांची रंगीत छायाचित्रे असून मला सर्वात आवडलेली बाब म्हणजे प्रत्येक किल्ल्याला भेट देण्यासाठी, त्या किल्ल्याचे भौगोलिक स्थान समजण्यासाठी नकाशा दिलेला आहे आणि अंतरही नमूद केले आहे. काही गडकिल्ल्यांची नावे वाचल्यावर असेही वाटते की अशा नावाचे किल्ले कसे काय असू शकतील बरे! पुस्तकातील पहिलेच प्रकरण गमतीदार नाव असलेल्या नवरा-नवरीच्या किल्ल्याचे वर्णन करणारे आहे. नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाताना घोटी मार्गावर पाहीने या गावाजवळ हा नवरा-नवरीचा किल्ला आहे. डोंगराच्या सुळक्यावरून हे नाव स्थानिकांनी दिले आणि आजतागायत चालू आहे.
प्रत्येक किल्ल्याची माहिती लेखकाने शीर्षकांच्या रूपाने एका ओळीत ठळकपणे करून दिली आहे. दुर्ग म्हणून ओळख गमावून बसलेला जातेगांवचा किल्ला, तोफांतील वैविध्यतेमुळे संस्मरणीय ठरणारा परंडा किल्ला, जागृत देवस्थानचा शेजारी मोहोळचा किल्ला, छोटेखानी परंतु खणखणीत बांधणीचा पिलीवचा किल्ला, विस्मृतीत गेलेला नांदेडचा किल्ला, गडखुणा शोधत पाहावा लागणारा सांगोल्याचा किल्ला, नागपूरकर भोसलेंनी बांधलेला, अफाट पसार्‍याचा चंद्रपूरचा किल्ला अशा अनेक किल्ल्याची माहिती त्याच्या भौगोलिक स्थानासह नि वैशिष्ट्यांसह या पुस्तकात आहे.
माचणूर येथील बेगमपूरचा किल्ला छोटेखानी आणि महत्वपूर्ण असा. मराठे आणि औरंगजेब यांच्यातील युद्धात स्वत: औरंगजेब बादशाह इथे १६९५ ते १६९९ तळ ठोकून होता. हा किल्ला औरंगजेबाने त्याकाळी ४० हजार रुपये खर्च करून बांधला, कारण मराठे कधीही रात्री-बेरात्री हल्ले करत असत. औरंगजेब आपल्या कुटुंबकबिल्यासह इथे राहत असे, म्हणजे एका अर्थाने मुघल साम्राज्याची राजधानीच जणू इथे पाच वर्ष होती. औरंगजेबाची एक मुलगी इथे आजारी पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. तिची कबर इथे दिसते. गावकरी तिला बेगमबी म्हणतात. पण तसा कागदोपत्री पुरावा मात्र आढळून येत नाही. पूर्वी या परिसराचे नाव घोडेश्वर होते, ते बदलून औरंगजेबाने बेगमपूर केले. बेगमपूरजवळच माचणूरचा किल्ला असून हा किल्लाही औरंगजेबानेच १६९६मधे बांधला असा उल्लेख आहे. इथल्या महादेव मंदिराला उद्ध्वस्त करण्याचा आदेश औरंगजेबाने दिला. मात्र इथे त्याच्या सैनिकांना दैवी प्रत्यय आल्यामुळे औरंगजेबाने मंदिर तोडण्याऐवजी मंदिराला दान दिले, जे आजही चालू आहे. अशी रंजक माहिती या पुस्तकात दिली आहे.
माचणूरच्या किल्याचे वैशिष्ट्य असे की याच किल्यात औरंगजेबाने शिवरायांच्या पत्नी सकवराबाई, महाराणी येसुबाई, बाळराजे शाहू यांना वैâदेत ठेवले होते. सेनापती संताजींची हत्या केल्यावर त्यांचे शिर कापून औरंगजेबाला याच किल्ल्यातील छावणीत पाठवले होते. याच माचणूर किल्ल्याजवळ ब्रह्मपुरी येथील एका शेतात राजे जगदेवराव जाधव म्हणजे आई जिजाऊ यांच्या भावाचे नातू यांची समाधी आहे.
सोलापूरचा किल्ला सोलापूरकर आणि इतरांसाठी अगदीच परिचयाचा आहे. कारण इथली पाणीपुरी आणि कचोरी, पण सोलापूरचा किल्ला कितीजणांनी पाहिला आहे? हा एक भुईकोट आहे. सोलापूरसारख्या शहराच्या मधोमध २८ एकरचा परिसर असणारा किल्ला केवळ राज्य संरक्षित स्मारक असल्यामुळे आजही जिवंत आहे. अन्यथा याचे स्पेशल
इकॉनॉमिक झोन करायला वेळ लागला नसता. हा किल्ला आदिलशहाने बांधला असून एका बाळंतीण स्त्रीचा बळी दिला म्हणून एका बुरुजास बाळंतिणीचा बुरुज म्हणतात!
पुस्तकातील १५वे प्रकरण नळदुर्ग या किल्ल्याबद्दल आहे. केवळ मध्ययुगीन कालखंडातील महत्त्व नव्हे तर आधुनिक म्हणजे ब्रिटीश आमदनीतील इतिहासावरही लेखकाने या दीर्घ प्रकरणात प्रकाश टाकलेला आहे. ब्रिटीश अधिकारी कर्नल मेडोज टेलर या किल्ल्यात पाच वर्षे वास्तव्यास होता. त्याने या किल्ल्यावर लेखन केले आहे. रंगमहाल, उपली बुरुज, पाणीमहल, रणमंडळ किल्ला ही माहिती थक्क करणारी आहे, म्हणून हे प्रकरण मुळातून वाचायला हवे!
किल्ले, दुर्ग, कोट, गड असे किल्ल्याचे विविध प्रकार आहेत. त्याची वैशिष्टे वेगळेपण अभ्यासक सांगू शकतील, पण आपल्या गतवैभवाची ओळख करून देणारे, वैभवाचे साक्षीदार असणार्‍या या ऐतिहासिक स्थापत्यांना भेट देऊन, त्याचे महत्त्व समजून घ्यायला हवे. त्यातून इतिहासाकडे पाहण्याची निकोप दृष्टी मिळते. इतिहासाचे अध्ययन हे वर्तमान आणि भविष्य यांच्याशी संवाद साधण्याची प्रक्रिया असते. त्यात गड, कोट, किल्ले ही स्थापत्ये आपणास भविष्य उज्ज्वल करण्याची प्रेरणा देतात.
भगवान चिले यांनी महाराष्ट्र राज्य दुर्गसंवर्धन समितीचे आणि रायगड विकास प्राधिकरणाचे सदस्य म्हणूनही काही काळ कार्य केले आहे. त्याचबरोबर ते राजर्षी शाहू चरित्रे व साधन समितीचेही सदस्य असून शाहू चरित्राचे विश्वकोष असणार्‍या गुरुवर्य डॉ. रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करत आहेत. विशेष चिले सर हे वाणिज्य शाखेचे स्नातक असूनही आजवर दुर्गसंवर्धनासाठी केलेल्या कार्याबद्दल विविध पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. दुर्गमहर्षी मांडे सरांचा वारसा ते तितक्याच क्षमतेने चालवत आहेत. अनेक विषयांवर वस्तुनिष्ठ इतिहासाची मांडणी करणारी अनेक व्याख्याने त्यांनी महाराष्ट्रभर दिलेली आहेत. महाराष्ट्रात अनेक इतिहासकार व व्याख्याते आपली मांडणी पुस्तकांच्या सहाय्याने करत असताना चिले सर प्रत्यक्ष फील्ड वर्क करत, पदभ्रमंती करून मांडतात हे अधिक आश्वासक आहे. वाचकांना दुर्गवर्णन वाचून दुर्गांना भेट देण्याची आणि इतिहास, वर्तमानासह भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी मिळावी ही सदिच्छा!

‘गडकिल्ल्यांच्या राज्यात’

लेखक : भगवान पांडुरंग चिले
प्रकाशक : शिवस्पर्श प्रकाशन, कोल्हापूर
किंमत : रु. २००/-
पृष्ठसंख्या : १९८

Previous Post

तत्त्वत:, अंशत: आणि अटी शर्तींसह थुक्का!

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.