मी माझ्या मैत्रिणीला माझ्या मित्राकडे पहिल्यांदाच घेऊन गेलो होतो, ‘वहिनी’ची भेट करून द्यायला; तर त्याच्याकडच्या कुत्र्याने तिला पाहताच शेपटी हलवत आनंदाने गिरक्या घ्यायला सुरुवात केली. अनोळखी कुत्रा असा कसा काय वागू शकतो कुणाशी?
– संकेत पारखे, अहमदनगर
कुत्र्याने दिलेला संकेत ओळखा संकेतराव… तरीही शंका वाटत असेल तर मित्राकडून खात्री करून घ्या. मित्राला पटवा आणि कुत्रा घरी घेऊन या… आणि त्याचा अभ्यास करा की अनोळखी कुत्रा असा कसा वागू शकतो (तिची काळजी करू नका… तिचा अभ्यास मित्र करेल… अशाच अभ्यासाला जाण्यायेण्यामुळे मित्राच्या कुत्र्याची आणि तिची ओळख झाली असेल… तिच्या त्या ओळखीमुळे कुत्रा तुमच्या अंगावर धावला नाही हे नशीब समजा…)
भारताने टी२० वर्ल्ड कप जिंकला तो खेळाडूंच्या मेहनतीमुळे नाही, तर आपण पॅसेजमध्ये गेल्यावर दक्षिण आप्रिâकेच्या विकेट पडतात, हे कळल्यावर पॅसेजमध्येच उभ्या राहिलेल्या एका काकूंमुळे, असं नुकतंच वाचनात आलं… यांना वुमन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायला नको का?
– श्रीराम पंडित, दादर
तुम्ही वाचनात आलं असं म्हणताय, पण तुम्हाला पुस्तक वाचण्याची ‘आवड’ आहे, की माणसं वाचण्याचा ‘शौक’ आहे ते कळत नाहीये. तरीही अंदाजाने सांगतो तुम्हाला काकूंना पुरस्कार द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता काका. फक्त तो ‘त्या पॅसेज’मध्ये जाऊन देऊ नका. सार्वजनिकरित्या द्या… कारण तुम्ही ‘श्रीराम’ असलात तरी तुमची सीता क्रिकेट’पंडित’ नसेल तर उगाच नको ते रामायण घडायचं.
मी तिला खूप इम्प्रेस केलं, तिची खूप काळजी घेतली, तिने मागितलं ते आणून दिलं, तिला फुलासारखं जपलं आणि आता ती म्हणते, जिचं तुझ्याशी लग्न होईल ती माझी वहिनी खरी भाग्यवान!… आता मी काय करू?
– विघ्नेश पाटील, कोपरखैरणे
तुम्ही फुलं ओळखायला शिका. सगळ्याच फुलांना जपलेलं नाही आवडत. काहींना माळलेलं आवडतं. काहींना वाहिलेलं आवडतं. काहींना कुस्करलेलं पण आवडतं… हे तुम्हाला कळलं नाही आणि तुम्ही तिला फुलासारखे जपत राहिलात; परिणामी तिला तुम्हीच FOOL वाटले असणार. त्यामुळे ह्या धोत्र्याच्या फुलाला एखादे एरंडाचे फूलच शोभून दिसेल असं म्हणत तुमच्या फुलाने तुम्हाला एप्रिल फूल बनवले असणार (असो, आता पदरी पडेल ते फूल पवित्र माना… ते कोणाच्या चरणी वाहू नका). उत्तर टोचलं तर स्वत:ला गुलाब समजा आणि गुलाबाच्या नशिबी काटे असतातच हे समजून घ्या.
पावसाळा आला की कोणाला मलेरिया होतो, कोणाला सर्दी खोकला होतो; काही लोकांना कविता व्हायला लागतात म्हणे! असं कसं होत असेल?
– सविता कारखानीस, चिंचवड
म्हणजे हे सगळं वर्षभर झालेलं चालेल? पण खरं म्हणजे हे सगळं पावसाळ्याच्या आधी नऊ महिने होतच असतं. पावसाळ्यात त्याला ऊत येतो. जसं पावसाळ्यानंतर नऊ महिन्यांनी जास्ती बाळं जन्माला येतात, तसं (कोणाला कविता होतात, कोणाला कवी होतात). अहो, करून जातो गाव आणि पावसाळ्याचं नाव असं आहे ते). यापेक्षा छान कवितेत तुम्हाला उत्तर दिलं असतं. पण तुम्हीच म्हणाल, पावसाळा आला आणि याला कविता झाली.
पावसाळ्यात कुणाला कांदा भजी आणि चहाची तलफ येते, कुणाला कबाब आणि रमचे डोहाळे लागतात… तुम्ही कोणत्या गटातले?
– रोशन फुलारी, वर्धा
तुम्ही बोलवलंत तर तुमच्या गटाचे.. पण येताना आम्ही एकटेच येऊ. ३०/४० जण बरोबर घेऊन तुमच्या गटात येण्याएवढी ‘पावर’ आमची नाही आणि तुम्ही ‘रम’ता त्यात ‘रम’ण्याएवढे आम्ही ‘मिंधे’ नाही. (उत्तर पॉलिटिकल वाटलं तर तुमच्या प्रश्नातला ‘गट’ हा शब्द काढून टाका, उत्तर नॉन-पॉलिटिकल वाटेल.)
मेंढ्यांच्या कळपातून अधूनमधून एखादी मेंढी गायब होत असते, त्या दिवशी मेंढपाळाच्या घरातून मटणाचा दरवळ सुटतो; तरीही कळपातल्या इतर मेंढ्यांचा मेंढपाळावर विश्वास कसा टिकून राहतो?
– सत्यवान कांबळे, तुमसर
कसं आहे… मेंढ्यांना वाटत असतं मेंढपाळ हा माणूस नाहीये .. त्याला परमात्म्याने आपल्या रक्षणासाठी पाठवला आहे. त्यामुळे ज्या मेंढ्या कापल्या जात नाहीत त्यांना वाटतं या परमात्म्याच्या बंद्यामुळेच आपण सुरक्षित आहोत… (कारण मेंढपाळाने त्यांना ‘लांडग्यांची’ भीती दाखवलेली असते) आणि मेंढपाळ ज्या मेंढ्यांना कापतो, त्या मेंढ्यांना वाटतं की आपण आपल्या ‘धर्मा’साठीच मरतोय (मेंढपाळासाठी मरणं हाच आपला धर्म आहे, असं मेंढ्यांना शिकवलेलं असतं). आणि मेंढ्या कापल्या जातात या गोष्टीचा तुम्हाला त्रास होत असेल, तर आपल्याला मेंढ्या लोकर देतात हे शाळेत शिकवलेलं विसरा आणि मेंढपाळच लोकर देतो असा विचार करा… त्रास होणार नाही.