खाण्याच्या जागा तरी किती भिन्न प्रकारच्या असतात! रस्त्यालगतच्या टपरीपासून तारांकित हॉटेलपर्यंत अनेक जागी मी अनेक पदार्थांचा आस्वाद घेतलेला आहे. चला तर, कोकणातल्या गावातल्या तिठ्यावरचे एक टपरीवजा हॉटेल घेऊ.
– – –
मी काही खाण्याचा फार मोठा शौकीन नाही. काहीजण फक्त एखादा पदार्थ खाण्यासाठी लांबचा प्रवास करून जातात, तर काहीजण आयुष्यभर नुसते खाण्याचेच काम करताना दिसतात. पट्टीच्या खवय्यांसाठी शहरात हॉटेल्स तर चालू झालेली आहेतच, पण त्या जोडीला टीव्हीवर फक्त खाण्या-पिण्याच्या माहिती-मनोरंजनासाठी चॅनल्सही सुरू झालेली आहेत. अध्ये-मध्ये ते कार्यक्रमही मी चवीने पाहतो. सास-बहूच्या बेचव मालिकांपासून तेवढाच रुचिपालट! देशोदेशीच्या खाद्यपदार्थांची तेथे रेलचेल पहायला मिळते. चाखायला मिळत नसले तरी नुसते नेत्रसुख तरी मिळते. फॅशन टीवी चॅनलवरचे कपडे आपण कधी अंगावर घालतो का? तसेच काहीसे आहे हे. ते डॉक्टरसारखे दिसणारे शेफ. त्यांची ती चकचकीत भांडी. प्रोफेसरांसारख्या इंग्रजीत चालवलेले निवेदन. रांगोळीसारखी डिशची सजावट व रंगीबेरंगी पदार्थ! वा! मज्जा येते पाहायला!
मला आठवते. लहाणपणी खूप पाऊस पडायचा. अगदी आठवड्याचे आठवडे थांबायचाच नाही. म्हणजे कमी-अधिक व्हायचा, पण ढगाआडचा सूर्य काही दिसायचा नाही. थंडीही बर्यापैकी पडायची. दुपारी शाळेतून घरी आल्यावर बाहेर पडणारा पाऊस पाहात आम्ही मुले घरातच चुळबुळ करत बसलेले असायचो. बरेचदा पत्त्यांचा डाव रंगात आलेला असायचा. मग आई गरमागरम कांदाभजी तळायची. त्या वातावरणात ती इतकी छान लागायची. आताही कधी कांदाभजी खाताना तो बाहेर कोसळणारा पाऊस आठवतो. त्याचा तो एक छान लयीत चालणारा आवाज आणि तोंडात गरमागरम वाफाळती भजी. आहाहा! अप्रतिम अनुभव!
काही काही पदार्थांची लज्जत त्या त्या वातावरणातच येते. भेळ खाण्यासाठी समोर फेसाळणार्या दर्याच्या लाटा हव्यात. मक्याचे भाजलेले कणीस खाण्यासाठी थंड हवेत धुक्याच्या पडद्याआड जमलेली सवंगड्यांसोबत मैफिल हवी. हुरडा खाण्यासाठी खळ्यात टिपूर चांदणं पडलेली आणि समोर शेकोटी पेटवलेली रात्र हवी. पिज्झा मात्र एकट्याने हॉटेलच्या एका कोपर्यात बसून संध्याकाळी खावा. कॉफी भल्या पहाटे झुंजुमुंजू होत असताना तंबूमध्ये डोंगरमाथ्यावर घ्यावी किंवा पॅटिससोबत समुद्रकिनार्याजवळच्या टपरीवजा शॅकमध्ये दुपारी घ्यावी. अशा खाण्याच्या वेळा आणि जागा असल्या तर खाणे हा एक आनंदाचा प्रकार होऊन जातो.
खाण्याच्या जागा तरी किती भिन्न प्रकारच्या असतात! रस्त्यालगतच्या टपरीपासून तारांकित हॉटेलपर्यंत अनेक जागी मी अनेक पदार्थांचा आस्वाद घेतलेला आहे. चला तर, कोकणातल्या गावातल्या तिठ्यावरचे एक टपरीवजा हॉटेल घेऊ. तेथे मोजकेच पदार्थ असतात. चिवडा, चुरमुर्याचे लाडू, कडक शेवेचे लाडू, चहा आणि कट-वडा! तुम्ही तेथे मुळात चहा पिण्याच्या तलफेनेच आलेला असता. कट-वडा सोडला तर बाकीचे पदार्थ तुमच्या खिशाला नव्हे तर दाताला परवडणारे नसतात. मित्राच्या आग्रहास्तव तुम्ही कट-वड्याची ऑर्डर देता. या कटात सामील झालेले पदार्थ म्हणजे हळद, मिर्ची पावडर व मीठ. चणे व त्यांचे कुठेतरी बिनसलेले असते. त्यामुळे स्वतंत्र चव नसलेला हा पदार्थ बटाटावड्याच्या संगतीनेच खावा लागतो. बटाटावडासुद्धा कटासारखाच कफल्लक असतो. म्हणजे त्यात नुसता उकडलेला बटाटा आणि हळद यांची निपुत्रिक जोडी असते! थंडगार वड्यावर गरम कट टाकलेले हे कोमट रसायन कसेबसे पोटात ढकलल्यावर तुम्ही चहा प्यायला घेता. त्यात साखरेच्या पाकातच चहाची पावडर टाकून केल्यासारखा गोड चहा तोंडाची उरली-सुरली चवही बिघडवून जातो.
नुसत्या चहाचे तरी कितीतरी प्रकार आहेत. माझ्यासारख्या चहाप्रेमी मंडळींमध्ये तुम्ही सामील असाल तर हमखास असे अनेक प्रकार अनुभवले असतील. बसस्टँडवरचा चहा. हा दिवसातले चोवीस तास उपलब्ध असतो. तो कधी बनवतात हा संशोधनाचा विषय आहे. कधीही प्या, तो उकळवून-उकळवून कडवट झालेलाच मिळतो. तो कडवटपणा मारून टाकण्यासाठी त्यात साखरेचा मुक्तहस्ते वापर केलेला असल्यामुळे तो कडवट-गोड अशी चव जिभेवर निर्माण करतो. प्रवास करून मरगळलेला व चहाची तल्लफ अनावर झालेला प्रवासी त्या चवीची तमा न बाळगता हे हलाहल अमृत समजून प्राशन करतो.
वडा-पाव अख्ख्या हिंदुस्थानात सर्वत्र मिळतो. स्थानमहात्म्यानुसार नाव बदलते एवढेच. कुठे ‘आलु बोंडा’ म्हणतात तर कुठे ‘बटाटावडा’. सापुतार्याला एका ढाबा टाईप हॉटेलमध्ये ‘बटाकापौआ’ हा पदार्थ मागवला तर चक्क कांदेपोहे निघाले! या असल्या हायवेलगतच्या ढाब्यांमध्ये बाहेर गाड्या पार्क करायला मोकळी जागा असते. जवळच पेट्रोल पंप व गॅरेज असते. शेजारी पानाची टपरी असते. त्यावर मोठ्या आवाजात गाणी लावलेली असतात. आत जाताना गल्ल्यावर बसलेला शेठ किंवा मॅनेजर असतो. आतमध्ये आजकाल प्लॅस्टिकची खुर्च्या-टेबले सर्वत्र वापरली जातात. त्या नाजूक खुर्च्यांवर जरा सांभाळूनच बसावे लागते. तुम्ही खुर्चीत बसता न बसता तेवढ्यात वेटर चार पाण्याच्या ग्लासांत आपली पाचही बोटे बुडवून खाडकन् टेबलावर आपटतो. सर्व पदार्थांच्या प्लेट्स जोशात टेबलवर आपटल्याशिवाय सर्विस दिली असे त्यांना वाटतच नसावे! एखादे
प्लॅस्टिकमध्ये लॅमिनेट केलेले, फाटून चिंध्या होण्याच्या मार्गावर असलेले मेन्युकार्ड देण्यात येते. त्याकडे फार गांभीर्याने पहायचे नसते. (कारण त्यातल्या बर्याचशा पदार्थांची संस्थानं केव्हाच विलीन झालेली असतात आणि ते पदार्थ नामधारी राजासारखे मेन्युकार्डावर नावापुरतेच विराजमान असतात.)
आपण फक्त गरम काय आहे, हे विचारायचे असते. वेटर मग आपल्याला समजेल न समजेल याची पर्वा न करता ते चार-सहा पदार्थच एवढ्या घाईत सांगतो की जणू काही आता बाँबच फुटणार आहे. (वेटर व एफेमवरचे आरजे नेहमी एवढ्या भरभर का बोलतात या प्रश्नाचे उत्तर मला अजून मिळालेले नाही!) त्यातला एखादा परिचित पदार्थाचा शब्द पकडून आपण त्याला आपली ऑर्डर आणायला सांगतो. आपण न विचारताच ‘टाइम लगेगा’ म्हणत तो ओरडूनच आतल्या किचनमध्ये डायरेक्ट ऑर्डर फर्मावतो आणि दुसर्या टेबलाकडे मोर्चा वळवतो. गल्ल्यावर बसलेला मालक तीच ऑर्डर किचनकडे परत एकदा देऊन खात्री करून देतो. टाईम लगेगा वगैरे म्हटले असले तरी पाच मिनिटांतच आपली थाळी टेबलवर आपटण्यात येते. वेटर ‘गिळा एकदाचे’ असे त्या आपटण्यावरुन आपल्याला सूचित तर करत नसेल ना, अशी शंका घ्यायला वाव आहे.
डुगडुगते प्लॅस्टिकचे टेबल एका पायाने पकडून धरत आपण समोरचे पदार्थ खायला सुरुवात करतो. कुठुनतरी सांडलेला पाण्याचा ओघळ टेबलावरून नेमका आपल्या पँटवर पडत असतो. ते चुकवत आपण समोरचे पदार्थ खायला सुरुवात करतो. हाताचे कोपरे टेबलवर टेकवले की तो टेबल एका बाजूला झुकतो आणि एखादा पाण्याचा ग्लास नेमका आपल्या ताटात उपडा होतो. पापड आपला कडकपणा सोडून पुरीसारखा कोमलहृदयी होतो. आधीच पाणिदार असलेले छोले आणखीनच राजबिंडे दिसू लागतात. लोणचे व भाताचे मेतकूट जमते. गुलाबजाम तेवढ्यात चान्स मारत कोशिंबिरीशी घसट वाढवतो. कसेबसे पूरग्रस्त ताटातल्या पदार्थांना वाचवून आपण खायला सुरुवात करतो.
एव्हाना आपल्या लक्षात येते की हे पाणी नुसते आपल्या ताटात सांडलेले नसून आपल्या खुर्चीवरही स्थानापन्न झाले आहे आणि ते हळुहळू आपल्या पार्श्वभागाकडे कूच करत आहे! साहजिकच खाण्यावरचे आपले लक्ष विभाजित होते. आपण भराभरा खाण्याचा प्रयत्न करतो. त्या प्रयत्नात एकदा आपली जीभ आपल्याच दाताखाली चावली जाते तर एकदा ठसकाच लागतो. शेवटी पाणी इच्छित स्थळी पोहचते आणि त्याच घटकेला आपले जेवणही संपते! एखादे नवखे गिर्हाईक सवयीप्रमाणे टिश्शू पेपर मागते. त्याच्या हाती वर्तमानपत्राच्या रद्दीतला एक तुकडा देण्यात येतो! आपले बिल परस्पर गल्ल्यावरच्या इसमास कळवण्याची व्यवस्था झालेली असते. आपण हात धुऊन फक्त पैसे जमा करायचे! वेटरला टिप देणे वगैरे लाड येथे चालत नाहीत.
अजून एक हॉटेलचा प्रकार म्हणजे नावाजलेले फेमस हॉटेल. या हॉटेलचे नाव तुम्ही बर्याच लोकांच्या तोंडून ऐकलेले असते. तुमचा एखादा ऑफिसमधला सहकारी तुम्ही उपासाची भगर जबरदस्तीने तोंडात कोंबत असताना ‘सुरमई खावी तर क्षीरसागरमध्येच’ असा अनाहूत सल्ला देतो. आपल्या तोंडातली भगर मग अजूनच कडवट लागायला लागलेली आहे याची त्याला कल्पनाही नसते. असेच कुणीतरी ‘एकदा तरी चव घेऊन पाहायलाच हवे’ म्हणून आपल्याला डिवचून गेलेले असतात. म्हणून आपण एकदा त्या बाजूला काही कामानिमित्त गेल्यामुळे ‘एकदा ट्राय करू‘ म्हणत त्या तसल्या म्हणजे ‘फेमस’ हॉटेलात जातो. दुपारची वेळ असते. त्यामुळे दुपारचंच ऊन असते! हॉटेलबाहेर दरवाजातच गारुड्याचा खेळ पाहायला जमल्यासारखी लोकांची गर्दी जमलेली असते. तुम्ही त्या गर्दीत कुठे गारुडी दिसतो का, की साप दिसतो ते पाहण्यासाठी टाचा उंचावून पाहता. पण तुम्हाला काहीच दिसत नाही. मग अचानक एक ‘जादूगार’ येऊन दोन बोटे दाखवतो. मग लगबगीने गर्दीतले दोघे हॉटेलच्या आत शिरतात… तेव्हा तुम्हाला अचानक जाणवते की तो जादूगार नसून वेटर आहे! हा गारुड्याचा खेळ पाहण्यासाठी जमलेला जमाव नसून हॉटेलात जागा नसल्यामुळे खोळंबलेला ग्राहकवर्ग आहे! वेटर जेवढ्या जागा रिकाम्या झाल्या तेवढी बोटे त्यांना दाखवून आत सोडत आहे! आपोआप गरीब बिचार्या याचकाचे भाव तुमच्या चेहर्यावर उमटतात.
भुकेमुळे पोटात कावळे ओरडत असतात. तास दीड तास उपाशी भिकार्यासारखे दारात उभे राहिल्यावर साहजिकच हळूहळू जेवत असलेल्या आतील ग्राहकांबद्दल तुमच्या मनात हिंस्र विचार येतात. आपल्यामुळे काही उपाशी जीव उन्हात ताटकळत उभे आहेत याची त्यांना जराही फिकीर नसावी? कुणी इतकं भावनाशून्य कसे काय असू शकते? मनुष्यप्राणी हा आप्पलपोटा, स्वार्थी आणि फक्त स्वत:पुरते पाहणारा प्राणी असतो याची तुम्हाला आता मनोमन खात्री पटलेली असते. आतापर्यंत तुमची भूक पार मरून गेलेली असते. पोटातले कावळेही ओरडून-ओरडून दमून झोपी गेलेले असतात. पोटातली आग आता विझलेली असते पण एवढा वेळ नाहीतरी वाया गेलाच आहे तर आत जाऊन जेऊनच जाऊ अशा इरेसरीला तुम्ही पेटलेले असता.
न राहवून एकेक पाऊल पुढे टाकत तुम्ही आधीच तुमच्या नकळत हॉटेलात आलेले असता आणि टंगळमंगळ करत जेवणार्या समोरच्या इसमाकडे खाऊ-की-गिळू नजरेने पाहत असता. तो उठून पूर्णपणे उभाही राहत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्या टेबलवर विराजमान झालेले असता. ‘ओय-ओय, शुक-शुक’ असा इशारा करून तुम्ही वेटरल्ाा बोलवता. ‘एक सुरमई थाली…’ एवढे शब्द तुमच्या तोंडून बाहेर पडतात न पडतात तोच तो वेटर गायब होतो. खरकटी ताटे उचलायला तुम्ही एका खांद्यावर रुमाल टाकलेल्या मद्रासी गबाळ्या वेटरला बोलवता व ‘ये सब हटाव’ म्हणून ऑर्डर सोडता. वेटर पण तुम्हाला रागावत ‘मई कायकू करेगा? वेटेर को बताओ!’ म्हणत निघून जातो. म्हणजे हे गिर्हाइक होते तर, हे लक्षात येताच तुम्ही खजील चेहरा करून खाली मान घालून बसता.
बर्याच वेळाने तुमची सुरमई समोर येते. जिवंत असती तर सहज पोहू शकली असती एवढ्या तेलात थबथबलेली सुरमई तळून चांगलीच कडक प्रâाय केलेली असते. आमटीसुद्धा भरपूर मसाले घालून तिखटजाळ बनवलेली असते. तुम्हाला तर त्यात काही खास गोष्ट दिसून येत नाही. दोन घास खाताच तुम्हाला तुमच्या मागे कुणीतरी खेटत असल्याचे जाणवते. त्याची खाऊ की गिळू नजर तुम्हाला पाठीमागून सुद्धा जाणवत राहते. कुणी जेवत असताना असे अधाशासारखे त्याच्या ताटाकडे बघणे हे सुसंस्कृत माणसाचे लक्षण नव्हे! दोन घास निवांत खाण्यासाठीच तर आपण पोटापाण्याचे उद्योग करत असतो ना? आपण स्वत:च्या पैशाने खातोय, याच्या बापाच्या पैशाने नाही, होऊन जाऊदे सावकाश, असा सुज्ञ विचार करून तुम्ही घास अजून जास्त वेळ चावत खायला लागता.
अव्वाच्या जागी सव्वा आलेले बिल काऊंटरवर मुकाट्याने भरता. आपल्याला कुणीतरी मूर्ख बनवलेले आहे असे तुम्हाला उगाचच वाटत राहते. याचा सूड घेण्यासाठी गल्ल्यावरच्या मॅनेजरची नजर चुकवून मूठभर बडीशोप तोंडात कोंबत कोण-कोणाला हे हॉटेल सुचवायचे याची यादी मनातल्या मनात करत तुम्ही बाहेर पडता!