जगात फक्त सत्तेची आणि पैशाची भाषा चालते, आपण समर्थ झालो तरच भाषा समर्थ होईल, हे मराठी माणसाला कधी कळेल?
– विकास रेळेकर, गोरेगाव
मग काय स्वत:ला धड बोलता न येणार्या भाषेची सक्ती करावी त्याप्रमाणे सत्तेची आणि पैशाची भाषा शिकण्याची सक्ती मराठी माणसावर करावी का? पण प्रश्न हा नाहीये… मराठी भाषेप्रमाणे वळवावे तसे वळणारे सगळेच नसतात.. मोडू पण वाकणार नाही अशी भाषा बोलणारेही असतात, हे मोडून वाकून लोटांगण घालणार्यांना कधी कळेल, हा खरा प्रश्न आहे.
अपघाताच्या स्थळी ताबडतोब धाव घ्यावी आणि तिथे त्या पार्श्वभूमीवर फिल्मी फोटो काढून घ्यावेत, अशी तीव्र इच्छा होणे, हा कोणता रोग आहे?
– वंदना कोल्हे, जुन्नर
असा रोग माणसांमधल्या ‘कोल्ह्यांना’ होतो, कोल्हे आडनाव असणार्या ‘माणसांना’ या रोगाची लागण होत नाही. काळजी नसावी. अशा प्रसंगीच माणसातली माणुसकी आणि कोल्ह्यांमधील लबाडी दिसून येते, त्या अनुषंगाने उत्तर दिलंय. फार लोड न घेता उत्तर गोड मानून घ्यावं.
वृत्तवाहिन्यांवरच्या चर्चांमध्ये सहभागी झालेले वेल्डिंगचा चष्मा घातलेले एक गृहस्थ बोलण्याऐवजी चक्क भौ भौ भुंकताना दिसत होते हो? एखादा पक्ष अशा लोकांना का पाळत असेल?
– विलास यंदे, जळगाव
कारण कळल्यावर अशा लोकांना तुम्हाला पाळायचंय का? उद्या उलटून तुमच्यावरच भुंकायला लागेल तेव्हा कळेल. पाळीव प्राण्याची फितरत असते. अशा प्राण्यांना खायला घालू नका, मग बघा, बैल कसा शिंग उगारतो, कुत्रा मालकावरच तंगडं वर करतो, गाढव लाथा झाडतं. तरीही काही गाढव, गाढव पाळतात. उद्या गाढव ओझं वाहण्याच्या कामाचं राहणार नाही, तेव्हाच गाढवाला त्याची किंमत कळेल. हे ज्या माणसाला माहीत असतं तो ‘अशा’ प्राण्यांना पाळत नाही.
पावसाळा हा तुमच्या मते चहाबरोबर भजी खाण्याचा सीझन आहे की रमबरोबर भडंग, भेळभत्ता खाण्याचा?
– अशोक दिवाण, परतूर
नुसतं विचारू नका कधीही बोलवा… ‘कधीही’ यासाठी म्हटलं की हवामान खात्याचा अंदाज घेऊन बोलवणार असाल तर त्यांचं आणि आपलं जुळणार नाही… त्यांच्या अंदाजाने पाऊस येणार म्हणून बोलवाल आणि पाऊस नाही आला तर बेत रद्द कराल. उगाच खाया ना पिया, जाने आने का खर्च बारा आना असं व्हायचं. आणि महत्त्वाचं… आम्ही चहाच काय (पाणी सोडून) काहीच पीत नाही… फक्त खातो आणि पिणार्याला अडवत नाही. कारण तो काय आपल्या बापाची पीत नाही. बघा… जमवा कधीही. नाही तर विचारण्यातच तुमचा सीजन निघून जायचा. आम्हाला काय सगळेच सीजन सारखे.
कोणीतरी एक फडतूस आमदार सरळ विरोधकांना सांगतो की तुम्हाला रेशनपासून कपड्यांपर्यंत सगळं आम्ही देतो, मोदी साहेब देतात… जनतेचे सेवक ना हे? मालकांशी या भाषेत बोलण्याची या हरामखोरांची हिंमत कशी होते?
– शरद पेठे, काळबादेवी
कारण साहेबांशी या भाषेत बोलण्याची हिंमत होत नाही, कारण साहेब त्यांना आपल्याबरोबर फोटोत घ्यायची सुद्धा किंमत देत नाहीत. आणि त्यांनी लोकांसमोर कितीही आव आणला तरी स्वतःची खरी किंमत त्यांना माहित असते. ती लोकांना कळू नये म्हणून लोकांशी अशा भाषेत बोलणे ही त्यांची मजबुरी असते.
इराणसारख्या देशाने इस्रायल आणि अमेरिका यांना एकाच वेळी नमवून दाखवलं, डोनाल्ड ट्रम्पच्या धमक्यांची हवा काढून घेतली. आपले नेते त्या मनोरुग्ण अहंमन्य इसमापुढे इतके लाचारीने का वागत असतील?
– शिवांगी पाटील, करमाळा
आपल्या दुखर्या जागेवर आपणच बोट ठेवलं तर जास्त दुखू नये म्हणून वाकावंच लागतं. तेच बोट दुसर्या माणसाने ठेवलं तरी वाकावं लागतं आणि जास्त दुखू नये म्हणून समोरच्याला विनावावं लागतं. पण तुमच्यासारख्या लोकांना ते लाचार झाल्यासारखं वाटतं. हे एक कारण असावं किंवा हे लाचार होणं नसेल तर तुम्ही म्हणताय तशा इसमाचं त्याच्यासारख्याच इसमांशी जुळत असावं, जसं एकमेकांशी जुळून चोरांची गँग होते, डाकूंची टोळी बनते, राजकारण्यांचा गट केला जातो, अगदी तसं… दोन्ही कारणं सांगितलीयत, तेव्हा एकांगी विचार करू नका शिवांगी ताई. दोन्ही कारणांचा विचार करा. दोन्ही कारणं सेम वाटली, तर तेच सत्य आहे असं समजून स्वीकारा…