हिंदळकरवाडी ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय.
अच्छे दिनातील जागतिक दर्जाच्या स्मार्ट १०० शहरांच्या यादीतलं शेवटचं गाव. गावातले फ्लायओवर गटारांवर बांधले आहेत. भुयारी मेट्रो इतक्या भुयारात आहेत की उत्खननात हडप्पानंतर सापडाव्या. विकास गावात इतका झिंगलाय की एमेसमीमधून दारूगाळपाचे उच्च दर्जाचे मद्य पिऊन हाती एमेसमीत बनलेले अत्युच्च आधुनिक कोयते घेऊन तो प्रगतीची भर रस्त्यात छेड काढतोय. वगैरे वगैरे. हे सगळं नित्याचंच.
त्यात आज धुवेंदर लहरणीस यांना गोमय पिऊन वेगळी हुक्की आलीय, पोरांना विश्वउत्पत्ती, अंतराळ विज्ञान, मानवी हक्क यांबद्दलचे समग्र ज्ञान मिळण्याकरिता हिंदी शिकविण्याची. त्यासाठी त्यांनी काखेतून त्रिभाषा सूत्र काढलंय. इंग्रजी ही केवळ इंग्रजांच्या स्मरणार्थ आणि त्यांनी लहरणीस यांच्या वाडवडिलांवर केलेल्या उपकाराप्रित्यर्थ शिकवणे. मराठी ही यत्किंचित भाषा नरुतात्यानं अभिजात जर्द्यात मळल्यामुळं शिकवणे. आणि हिंदी ही विश्वभाषा, काका म्हणतात तशी पचास खोक्यांची भाषा असल्याने रास्त भाषा, संपर्काची भिस्त भाषा तसेच मधाळ कवींची मदमस्त भाषा असल्याने तसेच नरुतात्यांची संपर्कवाणी असल्याने शिकवणे. असा अनिवार्य नसला तरी साधारण तत्त्वतः वा अंशतः बंधनकारक आदेश काढलाय. बरं त्यात त्यांच्या सहकार्यांची ‘आमदारको’, ‘करांगो’ ‘मेरेकू’ अशी हिंदी दुरुस्त करण्यासाठी पह्यल्यापासूनची हिंदी सक्ती पहिलीपासूनच्या लहानग्यांना केली. उद्या नको बाबा, गुवाहाटी रिटर्न मेंबर ‘टेबल पे नाचके धिंगाणा घाल के हिंदी कू बदनाम करे!’
पण यात गोची अशी झाली की तुमच्या मगजमारीत आमच्या पोरांच्या पाठीवर का ओझं, असं विचारत लोकं चिडलेत. एक उपमामु पह्यल्यापासून का पाहिजे? पाचव्या वर्षाला इलेक्शन होतं, मग पाचवीपासून ठिवा बाबा, असं म्हणतात. तर दुसरे उपमूकमती गप्प हैत. त्यांची पंटर लोकंच आसामान्य बंडाची आठवण म्हणून आसामी का नको, म्हणून हटून बसलीत, देवीला बळी द्यायच्या रेड्यावानी गप्प रवंथ करत. नाही म्हणायला धुवेंदरची पिलावळ नाशवंत कुबुद्धे, हराम ड्रम, खुसपट ग्वाड, अवगुणी कथणे अशी चांडाळ चौकडी काहीबाही बोलून वेळ मारून नेत आहेत. पण लोकं ऐकायला तयार नाहीत.
मग बाबा करायचं काय? तर लहरणीसनं अनिवार्य नाहींच्च! पण साधारणपणे बंधनकारक राहील असं सोप्या भाषेत सांगून बघितलं. पण च्यामारी लोकं ऐकेना. मग करायचं काय? तर साठसत्तर वर्षाचा जुना डेमोक्रॅटिक फॉर्म्युला म्हणून एक कमिटी नेमायची बुधा बुचे यांची. त्यांनी कानोसा घ्यायचा, का लोकं लैच तर शिव्या हासडतील ना? शिव्या देणारी, अक्कल शिकवणारी लोकं बोलवून सरकारी चहाच्या कोपात थंड करून पहायची. काहीच नसलेल्यांना बिस्कीटवाटप करायचं. बरंच काही असलेल्यांना मुस्कट आवरायचं दम देण्याचं काम बुचे करणार.
पण समितीचं नाव ठेवायचं काय? सत्य शोधावं इतकी आपली कुवत नाही, हे धुवेंदरच्या ध्यानी आलेलं. त्यात हिंदीची आवश्यकता का शोधायची? मग समितीचं नाव डिक्लेर झालं, मिथ्याशोधन कमिटी. त्यांनी हिंदी अनावश्यकतेचे सगळे मुद्दे शोधून काढावे. असं ठरलं. केवळ लहरणीस यांच्या एकमताने.
प्रथम कमिटी तरुणांपुढे गेली. त्यांना हिंदी अनावश्यकतेचे मुद्दे समजून सांगताना बुचे भावविभोर झाले. थरथरणार्या कापसाच्या बोंडागत टाळूवर हात फिरवत ते नसलेले अनावश्यक मुद्दे सांगतात. अभिशाप जर्द्याच्या सुरस कथा रंगवून सांगताना घश्याला कोरड पडते. ते हळूच पाणी बॉटल उचलून मुखास लावतात.
‘पण तर्री लहान मुलांना एकावेळी तीन भाषा का शिकवायच्या?’ एक तरुणी उभी राहते.
‘चांगला प्रश्न आहे. आपण मुलांना पहिली तीन वर्षे केवळ मौखिक शिकवू…’ बुधा बुचे सांगू बघतात.
‘हां, माझ्यावर एक मुलगी एकतर्फी प्रेम करते. ती पण सेम असंच म्हणते, पहिली तीन वर्षे फक्त मौखिक ट्राय करू. व्वां, उव्वांह नि चुंबन फक्त! पण सगळं मौखिक! तीन वर्षांनी तुला प्रेम पटेलच. मग कन्टीन्यू करू. पण मला प्रेमच नाहीय. तर का करू मौखिक? बोला ना सर!’
बुचे आणखी मौखिक मिळण्याआधी तिथून काढता पाय घेतात. ते पोहोचतात ते थेट गृहिणींपुढे.
त्यांना तसा मांदेकर संगतीचा थोडाथोडका लाभ झाला असेल. त्यानुसार तेही भावोजी बनत त्या होम मिनिष्टर असलेल्या महिला मंडळापुढे धाडसाने जातात. केसाला रंगवण्याचा फार अनुभव नसला म्हणून काय झाले? मिंधेगत बाता आणि व्यथा रंगवून सांगण्याची थोडी फार हातोटी असल्याने बुचे तिथेही जादू करतात. बघता बघता नो बिंदी नो बिझनेसपासून नो हिंदी नो सेन्सपर्यंत धडक मारतात.
‘पण तर्री सक्ती का करता तुम्ही मुलांवर?’ अवचित एक महिला भगिनी उठते.
‘हे बघा, हिंदी शिकणं अनिवार्य नाहीय. साधारण कुठली भाषा घेण्यापेक्षा हिंदी ही सर्वसाधारण सहमतीची म्हणून शिकविली जाईल. पण वीसपेक्षा अधिक मुलांनी त्याला विरोध केला तर दुसरी सहमतीची भाषा शिकवली जाईल, असं सोपं आहे हे.’ बुचे साधारण धुवेंदर अंगात भिनल्यागत उत्तर देतात.
‘म्हणजे घरात बाईनं झाडलोट-सैंपाकपाणी करणं अनिवार्य नाहीय. पण सर्वसाधारण सहमती होत नाही आणि विरोधाला बाईच्या बाजूनं मतांचा कोरम मिळत नाही, तवर बाईच घरातील चुलीवर हात शेकील. ह्या थाटात तुम्ही सांगताय? लाज धर बाबा काही!..’ स्त्रीमुक्तीवादी महिलांच्या लाखोल्या कानापर्यंत येईतो बुचे कावळगाव कारखान्याला टर्न घेत मतदारसंघात एन्ट्री घेतात.
त्यांच्या पळापळीच्या खबरा ऐकून लहरणीस नाराज होतात. काही बायांना घाबरून बुचे यांनी पळावं? अरे शिका काही तिरकीट गवय्याकडून. आयुष्याचे भोंगे लागूनही बेशरम माणूस तोंड दाखवणं सोडत नाही. लाख शिव्या, लाख चपला पडूनही माणूस नुकत्याच गटारातून बाहेर पडलेल्या वराहाइतकाच ताजातवाना! दुसरा चिंटेश कण्हे? बिचारा! कुणी येऊन त्याला थोबडवून जातं तरी निर्लज्जपणे कोंबडी काळीज सम्राटचे बोर्ड लावून फिरतो. तिसरा… असूं दे! इथं खुर्च्या देण्याचा क्रायटेरियाच निर्लज्जपणा आहे. बेशर्मी, मक्कारी वगैरे आहे. व्वा! सक्तीने इतकं हिंदी सुचावं? लहरणीस बहरतात. ते चांगल्या मूडमध्ये नरुतात्यांचे उपकार स्मरायला लावतात. खाल्या ह्या… त्या… ची आठवण करून देतात. बुचे पुन्हा ‘मना गाव, मना देस, मना नेता!’ म्हणत गाडीत बसतात. आता तरुण-बायांपेक्षा व्हाट्सअप विद्यापीठाचे विद्यार्थी तथा प्रौढ लोकांपुढे हिंदी अनावश्यकतेचे मुद्दे सांगून मिथ्याशोधन कमिटीच्या पॉझिटिव्ह नोंदी करवून घेता येतील ह्या आशेने बुचे प्रौढ लोकांच्या ‘पुढे ढकला’ ग्रुपला संबोधित करण्यासाठी जातात.
त्यांच्या येण्यानं प्रौढ खाष्टप्रथम ग्रुपचे मेम्बर लोकं नमोस्तु नमोस्तु वगैरे गीत गातात. ते कुणास नमविता आहेत याची कल्पना बुचेंना लागत नाही. बैचेन बुचे चुकून सर्वसाधारण हिंदी अनावश्यकतेचे मुद्दे अनिवार्य संस्कृतप्रचुर वा संस्कृतवेष्टित मराठी सक्तीने विसरू लागतात. एकतर जे ‘मि!’ ‘ति’ अत्यंक शब्द त्यांची भंबेरी उडवतात. त्यात ती पचपचीत तूपमिश्रित भाषा शब्दांची वाक्यांची कानावरून घसरगुंडी घडवते. त्यामुळे मेंदूपर्यंत काहीही थेट पोचत नाही. समोरले प्रश्नार्थक चेहरे जेव्हा प्रतिसादाची अपेक्षा धरतात तेव्हा किंचित स्मितहास्य करून बुचे वेळ मारून नेतात. अंती बुचे स्वतः उठतात. समोरले अनोळखी चेहरे बघून प्रथमतः गांगरून जातात. पण धीर करून ते बोलू लागतात. फार फार दीर्घ बोलतात. पण प्रतिसाद म्हणून कुणाच्याही चेहर्यावरील साधी रेषही हलत नाही. त्याने त्यांच्या मनात धस्स होतं.
‘का हो, पण ही सर्वसाधारण सक्ती आताच का?’ एक प्रौढ उठतो.
‘हे बघा, हे पाप आमच्या आधीच्या खुर्चीत बसलेल्या व्यक्तीचं आहे. उलट आम्ही खुर्चीत बसल्यावर नरुतात्याला हट्ट करून जर्दा मिळवला ना? विसरला?’ बुचे पॉईंट काढतात.
‘बाप चुकला. हे नाक वर करून सांग बेट्या! तेवढंच खापर (खुर्चीत) नसलेल्याच्या माथी फोडता येईल. पण तुझं म्हणून काही कर्तृत्व नाही का? तुला चूक ध्यानी आल्यावर ‘हे चूक आहे.’ म्हणण्याचं धाडस नसेल तर पळवलेल्या बापाचं नाव कुठल्या छातीनं लावतो? आणि ह्या तुझ्या तात्यांनं दर्जा दिला म्हणतोस. तो जर्दा मळायच्या कामं तरी येतोय का? याबद्दल बी बोल की रे!’ एक म्हातारा उभा ठाकून प्रश्न करतो. अरे बाप रे! इथं पण शुद्धीतली माणसं आहेत तर… बुचे घाम पुसून बाहेर निघतो. मिथ्याशोधन कमिटीच्या हिंदी अनावश्यकतेचे मुद्दे आता कुणाच्या गळी उतरवावे ह्या प्रश्नात बुचेला एक पोर समोर दिसतं. घाईने बुचे धावत त्याकडे जातो.
‘हे घेणाल?’ एक चकचकीत नवं हिंदीचं बुक त्याच्यापुढे धरत बुचे विचारतो.
‘नाही! सुसू कलनाल मी!’ पोरगं कार्यक्रम उरकतं!
त्यात त्रिभाषा धोरण लहरणीसबरोबर वाहत जातं.