‘काय अंतूशेठ? बातम्या पाहिल्यात की नाही?’
पाखाड्या नावालाही उरल्या नाहीत आता रत्नागिरीत, रस्ते झाले ज्याच्या त्याच्या दारासमोर. अशाच अंतूशेठच्या दारासमोरच्या रस्त्यावरून जाता जाता ओल्या झालेल्या झावळींची मोळी बांधायला वाकलेल्या अंतूशेठचा पाठमोरा देह पाहून मी थांबलो.
‘कसल्या रे बातम्या? आभाळ फाटलं की तेलाच्या विहिरी सापडल्या करबुडातल्या रेल्वे रुळाखाली?’
‘आभाळच फाटलंय. चिपळूणात बारा फुटापर्यंत पाणी साठलंय म्हणतात. वाशिष्ठीनं पात्र सोडलंनच शेवटी दरवर्षीप्रमाणे. पण यंदा माघारी आलेल्या माहेरवाशिणीसारखी दिसतेय.’
‘अरे बापरे… मग बोटी धाडल्यानी आहेत की नाही कार्यतत्पर जनप्रतिनिधींनी?’ शेवटच्या दोन शब्दांवर किंचित भर देत सानुनासिक पण सुस्पष्ट आवाजात अंतूशेठनी प्रश्न केला.
‘हो पाठवल्याचं पाहिलं आत्ताच बातम्यात.’
त्यांच्या बोलण्याच्या एकूणच लकबीकडे पाहून त्यांना याचं फारसं काही वाटत नसल्याचं जाणवलं म्हणून मीच विचारलं पुन्हा…
‘तुम्ही पाहिल्या नाहीत बातम्या?’
‘मी बापडा काय करणार पूर पातळीचे आकडे ऐकून. आम्ही कोणी कलेक्टर नाही का पुढारी नाही.’
‘म्हणजे? असतात तर पाहिल्या असतात?’
अंतूशेठ उत्तरादाखल फक्त मिष्कील हसले. त्यांच्या चेहर्यावरचे ते भाव आजपर्यंतच्या भारतीय राजकारणाचा सारांश सांगणारे होते जणू.
‘बांधा आणखी डोंगर फोडून रस्ते. पठारं करा जिकडे तिकडे. गाड्या वेगानं पळाय हव्यात ना यांच्या. कोकणचा विकास करा. पर्यटनाचं केंद्र करा कोकणचं. मेल्या दारवा प्यायला जगदुनियेची गर्दी आपल्या खळ्यात आणून बसवली की घरावर इमले का चढतात? खुळ्याचा बाजार नुसता.’
‘असं कसं म्हणता अंतूशेठ. मोठे रस्ते ही काळाची गरज आहे. रहदारीबरोबर रोजगार येतो. चार पैशे मिळतात लोकांना.’
‘हो… बरोबर. नि सुखाचं काय? ते कुठल्या दुकानात मिळतं? रामाच्या आळीत की चिंच नाक्यात?
‘म्हणजे?’ अंतूशेठचा एकंदर पवित्रा पाहून नवीन काही विचारण्यापेक्षा ते काय बोलतात हे ऐकण्यात मला अधिक स्वारस्य होतं.
‘म्हणजे मेल्या हा जो काही पश्चिम घाट का काय जो म्हणतात ना… तोच जर आकेशियाची खोडं कापतात कुर्हाडीनं तसा कापत नेलेनी उभा नि आडवा तर आपल्या कोकणची ‘ग्रीनरी ग्रीनरी’ काय म्हणतात ती अशीच कायम ‘रेड अलर्ट’च्या छायेखाली राहायची. आमच्या हयातीत झाली नाहीत एवढी वादळं नि पूर अंगावरनं काढलेत कोकणानी गेल्या पंधरा वर्षांत. ते आले कुठून? कसे आले?’
‘पण अंतूशेठ कनव्हिनिअन्सला किंमत आहे लोकांच्या मते.’
‘अरे जगलो वाचलो तर काय तो कनव्हिनिअन्स ना तुझा? पाहुण्याच्या कनव्हिनिअन्स पायी यजमानाच्या क्रिमेशनची वेळ आणलीता आता. मेल्या मढ्याच्या छातीवर का मिरवणार बँक बॅलन्सनच्या आकड्यांनी भरलेली पासबुकं? पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन आवट्यातल्या लाकडांवर आडवाच केलानी एकदा की काय करायचं या विकसित कोकणाचं?’
‘पण मग करायचं काय? विकास करायचाच नाही?’
‘मला मेल्याला काही वाटलं तरीही फरक काय पडणार आहे? ज्यांनी डोंगरच्या डोंगर कापलेनी फक्त वेगात येणार्या चारचाकीच्या रस्त्याला वळणं नकोत म्हणून त्या माणसांच्या मेंदूत माझ्या एवढ्याशा टेंभ्यानी का उजेड पडायचाय? ते जाऊ दे, तू आत ये. शहाळी काढून घेतलेयंत दोन. तेवढी तूच डोकी उडव त्यांची नि तांब्यात ओत. ती बघ तिथे कोयती.’
मला खुणेनी कोयती दाखवून अंतूशेठ झावळा परसाच्या कोपर्यात टाकून आले. निळ्या पिंपातलं पाणी घेऊन हात पाय धुतले. मी जवळच्याच दोन पेल्यात थोडं थोडं पाणी ओतून ओटीवरच्या खांबापाशी बसलो होतो.
‘कसा आहे विषय की… कितीही चाललास भराभर तरी दोन तंगड्या बरोबर!’ असं म्हणत हसत हसत त्यांनी पेला तोंडाला लावला. सदर्याच्या टोकाने थरथरत्या हातांनी तोंड पुसत म्हणाले,
‘आणि काय रे… आपल्या रत्नागिरीत काय केव्हा पाऊस पडला नाही. पण २००७च्या पूर्वी कधी ऐकलयंस असलं काही? जगबुडी, वाशिष्ठी, काजळी, कोदवली, शास्त्री, सोनवी, मुचकुंदी नि बाव…आठ नद्या आहेत जिल्ह्यात. सगळ्यांना एकावेळी हौर आलाय असं किती वेळा झालंय आजपर्यंत? मग आत्ताच रे कसं झालं?’ ‘काही कळायला मार्ग नाही.’
‘न कळाय काय झालंय. पैशाच्या मागे धावणार्या औलादी उदंड झाल्या. जमिनीचं चलन झालं. आई बापाची झाली ओझी नि मुंबई पुण्याच्या बिल्डींगीत दिसला यांना स्वर्ग. मग काय? ज्यानी त्यानी घेतलेनी गाड्या, बांधलेनी बंगले, धाडलेनी पुण्या-मुंबयंस नोकर्या कराय पोरांना नि कोकण उरला शनिवार-रविवारपुरता. मजा मारायच्या जागेशी नाळ राहिली नाही कुणाचीच. मग काय… येजा करायला गाड्या आल्या, रस्ते आले, रेल्वे आली, पैसा आला पण सुखं तेवढी हरवली. घरातली ‘सौभाग्यकांक्षिणी’ वंशावळ वाढवायची गिरण नाही ‘लक्ष्मी’ असते, ‘अन्नपूर्णा’ असते, ‘आई’ असते हेच विसरलात. आता भोगा. दुसरं काय!’
‘मग व्हायचं कसं आता?’
‘व्हायचं काय आता… करतील बचाव सगळ्यांचा हळूहळू. आज रात्री कोयनेतनं पाणी सोडायलाच लागणार असेल तर मात्र उद्याची सकाळ काय घेऊन येईल सांगता येत नाही.’ अंतूशेठच्या कपाळावर कधी नव्हे ती काळजीची रेष उमटली होती.
‘अडलेल्या बाया, डायलिशीस वरचे बापे लोक सगळ्यांचाच प्रश्न. दुधाच्या पिशवीला सोन्याचांदीची किंमत येईल सकाळला उद्या… असो.
शेवटी काय… यमाचा रेडा दावं तोडून उधळला की त्याला धरून परत धाडायचा तरी कोणी हो?’ पुन्हा त्याच्या नेहमीच्याच पवित्र्यात येत डोळे मिचकावत खांदे उडवत अंतूशेठनी विचारलं.
‘पण अंतूशेठ…’
‘पण बिण राहू दे. म्येल्या आपल्यास करायचंय काय. म्हणून मी त्या च्यानेलवाल्यांच्या बातम्या बघीत नाही. दादला… भाट्याची खाडी… आहे का लक्षात? परिस्थिती आजही तीच आहे. याचा त्यास उपयोग नाही नि त्याचा यास उपयोग नाही. तो बुडतोय तिथे!’ अंतूशेठ उठून धोतर वर खोचत पुन्हा परसावाकडे गेले. मी पण रस्त्याने पुढं निघालो. कोकणच्या काळजीने ऊर भरून आलेल्या न्यूज च्यानेलच्या आवाज ज्याच्या त्याच्या घरातनं वाढवला जात होता.
‘आभाळ खरंच फाटलं होतं की
आपण आपल्या हातांनी फाडलं होतं?’
असा विचार करेपर्यंत अंतूशेठच्या खणखणीत आवाजाने तंद्रीतून बाहेर आलो. अंतूशेठ हात वर कडून गडग्यामागे उभं राहून सांगत होते…
‘शमीच्या पानाएवढ्या देहानं जगदुनियेच्या कारभाराला पडलेली भगदाडं झाकली जायची नाहीत रे पोरा! सध्या तुझ्या म्हातारीला काय ती लस तेवढी देऊन आण लवकर. बाकी विश्वेश्वराचा दरबार, त्याचा तोच सांभाळील.’