आपण मोठे व्हावे, असे प्रत्येकालाच वाटत असते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीजण चुकीचा मार्ग देखील निवडतात. सायबर विश्वात काहीजण तोतयेगिरीचा फंडा वापरून फसवणूक करतात. हे तोतये एखादी कंपनी, एखादा ग्रुप अशा ठिकाणी असणारी माहिती चोरून तिच्याआधारे समोरच्या व्यक्तीला अडचणीत आणून तिची फसवणूक करण्याचे ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. बर्याचदा असे प्रकार उघडकीस देखील येत नाहीत. त्यामुळे आपल्याकडे काम करणारी व्यक्ती खात्रीशीर, विश्वासार्ह आहे, असा जरी आपला समज झाला असेल तरी त्याच्यापासून महत्त्वाची, संवेदनशील माहिती दूर ठेवणे हिताचे ठरते आणि अशा प्रकारांमधून होणारे फसवणुकीचे प्रकार टाळले जाऊ शकतात.
नोकरीत पदोन्नती कोणाला नको असते? ती मिळावी, यासाठी अनेकजण विविध मार्गांनी प्रयत्नशील असतात. काहीजण त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात तर काहीजण अवैध मार्गाने काही मिळवता येईल का, अशा प्रयत्नामध्ये देखील असतात. यश मिळवण्यासाठी आपण सायबर स्पेसचा वापर केला तर तो फायदेशीर ठरू शकतो, असा विचार देखील काहीजण करतात. म्हणजे काय? तर कंपनीची संवेदनशील माहिती चोरून त्या आधारे आपल्याला साध्य असणारी गोष्ट करून घेण्याचा प्रयत्न करतात. नेमका हा प्रकार घडतो कसा? या कथेमधून जाणून घेऊया.
वाहनांचे सुटे भाग तयार करणार्या एका कंपनीत पूजा नावाची तरुणी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती. आपण कंपनीसाठी अहोरात्र मेहनत करत आहोत, कंपनीच्या प्रगतीसाठी झटत आहोत, त्यामुळे कंपनीच्या बरोबरीने आपले देखील भले व्हावे, आपल्याला पदोन्नती मिळावी, अशी तिची इच्छा होती. त्यासाठी तिचे प्रयत्न सुरू होते. पण तिला अपेक्षित यश मिळत नव्हते, त्यामुळे ती नाराज झाली होती. पदोन्नतीचे स्वप्न पूर्ण करायचेच, या ईर्ष्येने तिला झपाटले होते. प्रमोशन मिळवण्याच्या ध्येयापोटी तिने एक प्लॅन आखला तो आपला बॉस रोहित याची फसवणूक करण्याचा.
पूजा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात तरबेज होती, सायबर जगताचे तिला चांगले ज्ञान होते. त्यामुळे तिने रोहितला फसवण्याचा कट तयार केला. रोहितचा सेक्रेटरी अमित याच्याशी गप्पा मारून त्याचा विश्वास संपादन केला. त्याच्या चांगुलपणाचा फायदा घेत तिने त्याला सांगितले की अमित, मला थोडे काम करायचे आहे, ते ऑफिसचेच आहे, पण, माझा कम्प्युटर बंद पडला आहे. तुझा कम्प्यूटर थोड्या वेळासाठी देतोस का? अशी मागणी पूजाने अमितला केली होती, त्याने होकार देत, तिला संगणक वापरण्याची परवानगी दिली. पूजाने त्या संधीचा लाभ उठवत अमितच्या संगणकावरची रोहितच्या संगणकाची माहिती चोरली होती. त्यासाठी तिने नव्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला होता. पूजाने एक तासाच्या अवधीत केलेल्या या प्रकाराची कुणाला भनक देखील लागली नाही.
दोन दिवसांनी रोहितने पूजाला काही कामाच्या निमित्ताने बोलावले, काम काय आहे, ते समजावून सांगताना ते किती वेळात पूर्ण करणे अपेक्षित आहे, हे रोहित तिला समजावून सांगत होता. कदाचित तुला संध्याकाळी थोडा वेळ थांबून ते काम आजच पूर्ण करावे लागेल, या रोहितच्या बोलण्यावर पूजा त्याला म्हणाली, सर, तुम्ही माझ्याकडून कामाची अपेक्षा करता, पण प्रमोशनचा विषय काढला की काहीच बोलत नाही. त्यावर रोहित म्हणाला, बस झाला तो विषय! आता तो महत्वाचा नाही, तुला जे काम सांगितले आहे, ते निमूटपणे कर म्हणजे झाले, बाकीचे पुढचे पुढे बघू… रोहितच्या त्या बोलण्यावर पूजाचा पारा चढला आणि त्याला आव्हान देत पूजा म्हणाली, सर, मला प्रमोशन द्या, नाहीतर माझ्याकडे कंपनीच्या संवेदनशील माहितीच्या फाईल्स आहेत, त्या मी सार्वजनिक करेन. पूजाने दिलेली धमकी ऐकून रोहित हादरला. हा सगळा प्रकार कसा घडला, पूजाकडे फाईल कशा गेल्या? रोहित त्या कंपनीत जबाबदार पदावर काम करत होता, त्यामुळे त्याच्यासाठी हा सगळा प्रकार चक्रावून टाकणारा होता.
मला प्रमोशन हवेच आहे, असे सांगून पूजा रोहितच्या केबिनमधून बाहेर पडली. दरम्यान, या प्रकारामुळे रोहित चांगलाच अडचणीत आला होता. आपला कम्प्युटर अन्य कोणीच उघडू शकत नाही, मग हे कसे घडले? त्यामुळे रोहितने सायबरतज्ज्ञाची मदत घेऊन हा सगळा प्रकार कसा घडला याचा शोध घेतला, तेव्हा लक्षात आले की अमितच्या कम्प्युटरवर असणारी रोहितच्या कम्प्युटरची सर्व तपशीलवार माहिती पूजाने कामाचा बहाणा करून चोरली होती. ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने रोहित बाहेर असताना तिने त्याचा कम्प्युटर उघडून त्यावर असणारी पेटंट, संवेदनशील फाईल असा सगळा डेटा चोराला होता, त्याच्या आधारे ती रोहितला प्रमोशन देण्यासाठी ब्लॅकमेल करत होती. मला पदोन्नती दिली की मी लगेच हा डेटा तुला परत करेन, ही गोष्ट आपल्या दोघांतच राहील, अन्य कुणाला काहीच समजणार नाही, याची खात्री देते, असे पूजाने रोहितला सांगितले होते.
रोहितने या सगळ्या प्रकारची कंपनी व्यवस्थापनाकडे तक्रार केली, त्या नंतर पूजाच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली. तिला कामावरून कमी करण्यात आले. पोलिसांनी पूजाने हा प्रकार कसा केला, याची तपासणी केली. तेव्हा हे उघडकीस आले की तिने रोहितच्या कम्प्युटरसाठी असणार्या ‘डिजीटल की’ची चोरी करून तिने हा उद्योग केला होता. रोहितच्या सेक्रेटरीला विश्वासात घेऊन तिने त्यावरून रोहितच्या कम्प्युटरचा तपशील मिळवला होता. तिला हव्या असणारी ‘डिजीटल की’ तयार करणार्या त्या कंपनीच्या प्रतिनिधीला रोहितच्या अधिकृत मेलवरून आपल्याला की हवी आहे, असे सांगणारा ईमेल पूजाने पाठवला होता, त्यामुळे की तयार करून देणार्या कंपनीला देखील तो रोहितच असल्याचे वाटले आणि त्यांनी लगेचच डिजिटल की उपलब्ध करून दिली. पण हा सगळा उद्योग पूजाने केला होता.
या सगळ्या प्रकारामुळे तिला कंपनीने कामावरून कमी तर केलेच, पण तिच्या या गुन्ह्यांमुळे ती कायद्याच्या कचाट्यात अडकली. या सगळ्या प्रकारामुळे कंपनीला शहाणपणा आहे आणि त्यांनी आपली तांत्रिक सुरक्षा अधिक कडक केली.
हे लक्षात ठेवा
– सुरक्षेला महत्त्व द्या : कामाच्या ठिकाणी आवश्यक असणारी तांत्रिक सुरक्षा व्यवस्था कडक ठेवा.
– लॉगिनवर लक्ष ठेवा : संवेदनशील माहिती असणार्या संगणकाचे लॉगिन ज्या व्यक्तीच्या नावावर आहे, त्याला संगणक सुरु केल्यावर त्याचा मेसेज जाईल अशी व्यवस्था कार्यान्वित करा. त्यामुळे जो कोणी संगणक सुरु करेल त्याची माहिती त्या व्यक्तीला मिळेल.
– पडताळणी प्रोटोकॉल : नेतृत्वाच्या भूमिकेतील व्यक्तींची ओळख पडताळण्यासाठी स्पष्ट कार्यपद्धती स्थापित करा, विशेषत: कंपनीच्या महत्त्वाच्या घटनांसाठी. कंपनीतील संवेदनशील माहिती बाहेर जाणार नाही, यासाठी आवश्यक असणार्या तांत्रिक बाजू भक्कम करण्याला प्राधान्य द्या.