• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

एका कुटुंबाचा लाईव्ह टेलिकास्ट

- संजय डहाळे (तिसरी घंटा) (नाटक : थेट तुमच्या घरातून)

Nitin Phanse by Nitin Phanse
May 30, 2025
in मनोरंजन
0

‘अ‍ॅक्शनऽऽ’ऐवजी तिसरी घंटा खणखणली. कॅमेरा नाही तर समोर रंगमंच आला. प्रेक्षक बदलला. माध्यम बदलले. आणि त्यातून ‘लाफ्टर क्लब’ अधिकच जवळ आला. हे जसे रंगमाध्यमांतरच! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची हास्यटीम आता नाटकातून रंगमंचावर स्थिरावत आहे. रसिकांनीही त्यांचे स्वागतच केलंय. हास्यजत्रेतले वारकरी एकामागोमाग एक रंगमंचावर स्थिरावत आहेत. आवडत्या विनोदवीरांना भेटण्याची इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी रसिकही गर्दी करताहेत. त्यात धन्यता मानताहेत. प्रत्यक्ष भेटीचा आनंद घेताहेत. नाटक संपले तरी रंगपिटात सेल्फीचे नाटक सुरूच आहे. हा बदल निश्चितच नोंद घेण्याजोगा.
‘विषामृत’मध्ये प्रियदर्शनी इंदलकर, ‘ठरता ठरता ठरेना’त वनिता खरात, ‘७ बेलवलकर’ नाटकात श्रमेश बेटकर’, ‘पाहिले न मी तुला’मध्ये हेमंत पाटील, ‘आबा की आयेगी बारात’ यात प्रभाकर मोरे, ‘मर्डरवाले कुलकर्णी’ यात निमिष कुलकर्णी आणि ‘थेट तुमच्या घरातून’ यात प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, प्रथमेश शिवलकर आणि ओमकार राऊत!
पडदा उघडतो आणि दीपक कदम या मध्यमवर्गीय कुटुंबप्रमुखाचे घर प्रकाशते. चक्क घरच आपल्याशी ‘सुसंवाद’ साधू लागते. भिंतींनाही कान, डोळे, तोंड हे अवयव असतात असं सांगून या घरात स्वागत करण्यात येते. आणि या घरातले इरसाल नमुने पुढे येतात. मिस्टर कदम यांची पत्नी संध्या कदम. कायम कंबरदुखीचा त्रास. ‘श्री स्वामी समर्थ’ करीत स्वामींशी बोलणारी. दोन्ही मुलांवर प्रेम करून त्यांना आधार देणारी टिपिकल आई. दोन मुलांमध्ये मुलगा राहुल. उद्याचा सुपरस्टार असल्याचं भूत त्याच्या सर्वांगात शिरलेलं… चित्रपटाचे वेड. त्याला एका चित्रपटाच्या ऑडिशनला जायचंय, पण ‘पोर्टफोलिओ’ करण्यासाठी ५० हजार रुपयांची त्याची मागणी आहे. ‘२६ वर्षांचा घोडा झालाय. बापाला मदत करायची सोडून पैसे मागायला लाज वाटत नाही!’ हा नेहमीचा डायलॉग ऐकून घेण्याची राहुलला जणू सवयच झालीय. आईने या पोराला लाडावून ठेवलंय. मुलगी श्रृती हिचं जग म्हणजे मोबाईल. दिवसरात्र मोबाईलमध्ये बिझी. एका दिवसभरात तिला १९ मिसकॉल, ७२ मेसेज आणि १८५ व्हॉट्सअप मेसेज आहेत. तिचा मोबाईल पाण्यात पडतो आणि दिवसभर ती रडतेय. या श्रृतीचा एक बॉयफ्रेंड आहे. किरण त्याचं नाव. घरातल्या सर्वांना ‘किरण’ म्हणजे श्रृतीची मैत्रीण असल्याचं वाटतं, पण तो तिचा ‘यार’ आहे! तासन्तास ती ‘किरण’सोबत चॅट करण्यात वेळ घालवतेय. मिस्टर कदम यांच्या घरातले हे नग! अतिशहाणे वारसदार!!
‘बिचारा बाप हा कसंबसं घर सांभाळतोय. मिरा रोडच्या घरासाठी घेतलेल्या लोनचा प्रिमियम भरण्याची चिंता त्याला आहे. घरात एकमेव कमविता. त्याला कुणाचीही मदत नाही आणि मुलांच्या खर्चाचं टेन्शन! एके दिवशी भावी सुपरस्टार राहुल हा ‘बिग बॉस’सारख्या रिअलिटी शो असलेल्या कार्यक्रमाचा प्रस्ताव आणतो. कळस म्हणजे, घरच्यांची परवानगी न घेता करारही करून येतो. ‘थेट तुमच्या घरातून!’ हे त्या ‘शो’चं टायटल. चॅनलवाले कदम यांच्या घरात अनेक कॅमेरे बसविणार आणि घरात सुरू असलेल्या घटना थेट रसिकांपर्यंत पोहचविणार, अशी ही संकल्पना. देशभरातील दहा कुटुंबं त्यासाठी निवडण्यात आलीयेत. त्यात एक कदम फॅमिली. एक गॉडफादर जो आदेश देणार त्याचे पालन सर्वांनी करणे बंधनकारक. आणि सुरू होतो रिअलिटी शो, जो या नाटकातील महत्वाचे वळण ठरते. कदम कुटुंबीयांच्या अंतरंगात डोकावणारा हा खेळ रंगतो.
घर पुरतं बदललेलं. दिवसभर घरातले सर्व कुटुंबीय जागे. माईक गळ्यात घालणं बंधनकारक. घरातलं कॉम्प्युटर, मोबाईल, टी.व्ही. सबकुछ बंद. हा ‘शो’ संपेपर्यंत सदस्य घराबाहेर जाणार नाहीत आणि कुणीही आत येणार नाहीत. सार्यांना आता हसतं-खेळतं कुटुंब असल्याचं सिद्ध करावं लागणार. कारण ‘विजेते’ ठरले तर चांगला पैसा मिळणार. ‘खेळ’ सुरू होतो. ‘सारा’ नावाची सुंदर तरुणी प्रगटते. ‘अतिथी देवो भव!’ म्हणत पाहुणचार घेते. हा प्रकार या शोचाच भाग असल्याचे ‘गॉडफादर’ सांगतो. ती बॅग आणायला सांगते. मॉलिश करण्याचा आग्रह धरते. बीयर पिण्याची तिची तयारी असते. फ्रेश ज्यूस सांगते. एक ना दोन… हा ‘गेम शो’ तापदायक झाल्याने बंद करण्याच्या निर्णयापर्यंत कदम येतात खरे, पण पुन्हा एक अडचणच. कराराप्रमाणे हा ‘शो’ अर्धवट सोडला तर २५ लाख रुपये कदम कुटुंबीयांनी द्यायचे आणि पूर्ण केला तरच २५ लाखांची रोकड मिळणार! पुन्हा एकदा हा ‘शो’ सुरू होतो आणि त्यात पहिला खेळ होतो तो बाहेरच्या जगातील एखाद्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा! त्यात एक सावळागोंधळ उडतो.
या ‘शो’मधल्या गेममध्ये भूमिका बदलण्याचा खेळ शेवटी रंगतो, जो या नाट्याचा कळस आहे. त्यात बापाची भूमिका पोराला आणि पोराची भूमिका बापाला करावी लागते. आई बनते मुलगी. हे केवळ वेशांतर ठरत नाही तर त्यातून सुखी जगण्याचा मेसेज अलगदपणे मिळतो. ‘रिअ‍ॅलिटी शो’च्या निमित्ताने स्वभावातील ‘रिअ‍ॅलिटी’ उघड होते.
लेखन, दिग्दर्शन, निर्माता आणि अभिनय अशा चौरंगी भूमिकेतून रसिकांचा लाडका विनोदवीर प्रसाद खांडेकर यांनी बाजी मारली आहे. मुळात एका घरातील ताणतणावाचा प्लॉट. पण त्यात मनोरंजनाचा कोलाज मस्त भरलाय. दोन्ही अंक वेगवान. नाट्य कुठेही रेंगाळणार नाही, याची पुरेपूर दक्षता लेखन-दिग्दर्शनात आहे. हास्यजत्रेची नवी मैफल दोन अंकी नाट्यात खुबीने बसविली आहे. रसिकांची आवड-निवड घेऊनच संहितालेखन केले असून रोज घरात दिसणारी नटमंडळी एका ठिकाणी आणण्यातही यशस्वी झाले आहेत. ‘होम मेकर गॉडफादर’ किंवा ‘रिश्तों का लाईव्ह टेलिकास्ट’ ही दोन नावे या नाटकाला होती. तसेच मिस्टर कदमऐवजी मिस्टर बापट असे नाव होते, पण त्यातही बदल केलाय, जो पुरेपूर पटतो. आजच्या वेगवान संगणक युगात मोबाईल, इंटरनेट अशा प्रगत तंत्रज्ञानामुळे आपण कुठेतरी हरवत चाललो आहोत. कुटुंबातील संवाद, संस्कारही संपत चालले आहेत. ते कुठेतरी हलक्याफुलक्या शैलीतून मांडण्यात प्रसादने कमाल केलीय. मिस्टर कदमच्या भूमिकेतही हक्काचे हशे व टाळ्या त्यांनी वसूल केलेत, पण संयमी अभिनय नजरेत भरतो.
विनोदाची उत्तम जाण असलेली सहाजणांची तयारीची ‘टीम’ ही यातील जमेची बाजू. त्यांची भेट घरात रोजच होतेय, त्यामुळे कुठेतरी ऋणानुबंध नकळत जुळलेले. मनोरंजनाचे हुकमी एक्केच. ‘सबकुछ’ प्रसाद खांडेकर यांच्यासोबत ट्युनिंग असणारे हे कलाकार. त्यामुळे उत्स्फूर्ततेला पूर्ण वाव! दादरचा ‘अमोल पालेकर’ओमकार राऊत याने ‘राहुल’च्या भूमिकेत मस्त डायलॉगबाजी केलीय. टायमिंगचा उत्तम सेन्स त्याला आहे. गोड आवाजाची देणगीही आहे. त्याचा पुरेपूर वापरही केलाय. त्याने पेश केलेल्या ‘गझल’ला वन्स मोअर हा पक्का ठरलेलाच. भीमराव पांचाळे यांच्या जवळ जाणारे सूर कमालच. लॉली उर्फ नम्रता संभेराव हिनेदेखील भूमिकाबदलात जो नृत्यताल धरलाय तो थक्क करून सोडणारा. त्यालाही वन्समोअरची दाद मिळतेय. टिपिकल आईचं रूप तिने ताकदीने पेश केलंय. प्रथमेश शिवलकर याचा मालवणी गॉडफादर शोभून दिसतो. अभिनयात सहजता आणि हक्काच्या जागा वसूल करण्याचं तंत्र विलक्षणच. ‘सारा’च्या भूमिकेत भक्ती देसाई हिचा वावर चांगला आहे. ‘इंप्रेशन’ पाडण्यात आघाडीवर आहे. कदमकन्येच्या भूमिकेत भाग्यश्री मिलिंद हिनेही चांगली साथसोबत केलीय. अचूक पात्रनिवड असल्याने त्याचा एकत्रित परिणाम प्रयोगावर सकारात्मक होतो.
या कलाकारांच्या भेटीसाठी जी काही गर्दी उसळते ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे श्रेय आहे. या कलाकारांसाठी का होईना नाटकांपासून दुरावलेला प्रेक्षक काही प्रमाणात यामुळे तरी नाट्यगृहाच्या पायर्या चढू लागलाय, हेही नसे थोडके!
नेपथ्यकार संदेश बेद्रे यांनी कदमांचं मध्यमवर्गीय घर तपशीलांसह उभं केलंय. ‘रिअ‍ॅलिटी शो’साठी करण्यात आलेला बदलही शोभून दिसतो. रंगसंगती उत्तम. सुशील कांबळे याचे संगीत समर्पक. श्याम चव्हाण यांची प्रकाशयोजनाही चांगली आहे. तांत्रिक बाजू कथेला न्याय देणाऱ्या आहेत.
प्रत्येक घरात थोड्याबहुत प्रमाणात आज अशीच परिस्थिती आहे, जी दिवसेंदिवस अधिकच बिघडत चाललीय. संवाद हरविलेल्या कुटुंबांना पुन्हा सुसंवाद मिळवून देण्याचा यातील प्रकार म्हणजे विलक्षणच ‘खेळ’ म्हणावा लागेल. कारण आजच्या सुपरफास्ट दुनियेत कित्येक दिवसात घरात एकत्रितपणे आनंदाचे क्षण जगता येत नाहीत. सारे बिझी. पण अशा ‘शो’मुळे विस्कळीत घर एकत्र येतं. मन मोकळं केलं जातं, जे हृदय हेलावून सोडतं. कुठेतरी आपणही यातून जातोय, असं वाटत राहातं, यातच नाटकाचं यश आहे. नाटककार, दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांच्या कल्पकलेचं दर्शनच सादरीकरणातून होतंय.
मराठी नाटक हा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित खेळ कधीही नव्हता आणि नाही. तर तो रसिकांना जागं करणारा बदलत्या काळातला आरसाच आहे. नाटकांना पिढ्यान् पिढ्यांचा संमृद्ध वारसा लाभलाय. सामाजिक, कौटुंबिक, पौराणिक, राजकीय, सांस्कृतिक अशा अनेक बदलांवर भाष्य करणारा जणू साक्षीदारच. ‘थेट तुमच्या घरात’ शिरून कुटुंबाचे अंतरंग नव्या चष्म्यातून या आविष्कारात समर्थपणे टिपले आहेत.

थेट तुमच्या घरातून

लेखन / दिग्दर्शन : प्रसाद खांडेकर
नेपथ्य : संदेश बेंद्रे
संगीत : सुशील कांबळे
प्रकाश : श्याम चव्हाण
वेशभूषा : पौर्णिमा ओक
रंगभूषा : उलेश खंदारे
सूत्रधार : गोट्या सावंत
निर्माते : प्रसाद खांडेकर, सचिन कदम

[email protected]

Previous Post

सोमीताईचा सल्ला

Next Post

मसालेदार मेक्सिकन!

Next Post

मसालेदार मेक्सिकन!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.