छगन भुजबळ
अट्टहास करून तेव्हा
संधी माझी हुकली
मंत्रिपदाचा हार पाहता
मुंडी माझी झुकली
मी तर आहे स्वयंघोषित
ओबीसींचा मोठा नेता
तुरुंगातही सडलो तेव्हा
खाता-पिता ढेकर देता
तेही दिवस निघून जातील
होती मजला पूर्ण खात्री
माझ्याशिवाय अपुरी राहील
भ्रष्ट मंत्र्यांची मोठी जंत्री
—– —– —–
डॉ. खा. श्रीकांत शिंदे
केवढी मोठी जबाबदारी
माझ्यावरती त्यांनी टाकली
जगात माझे नाव झाले
दुनिया सारी पुरती झुकली
बाबा सगळे रूसवे-फुगवे
क्षणात पटकन विसरून गेले
आता गावी जातच नाहीत
अच्छे सच्चे दिन ते आले
मी तर जागतिक नेता बनून
अशी फक्कड भाषणे देईन
डोनाल्ड ट्रम्पही चाट होईल
त्याचे नोबेल घेऊन जाईन
—– —– —–
भाजप मंत्री विजय शाह
मुस्लीम द्वेष माझ्या अंगात
वीरांगनेला नाही सोडले
अतिरेक्यांची भगिनी ठरवून
अकलेचे मी दिवे पाजळले
मी नाही घाबरत कोर्टालाही
जरीही त्यांनी झोड झोड झोडले
भाजप माझा रक्षणकर्ता
म्हणूनच त्यांनी नाही हाकलले
बिनशर्त माफी नाही मागणार
जरीही ठरलो मी अतिरेकी
भाजपकडून हेच शिकलो
तेच ओठावर आले हळूच की
—– —– —–
न्यायमूर्ती भूषण गवई
माझा इतका धसका घेतला
कळून चुकले भविष्य त्यांना
स्वागतालाही पाठ फिरवली
अपमान माझा नडेल यांना
पक्ष फोडूनी असली ज्यांचे
गद्दार-राज्य स्थापूनी काळे
आशीर्वाद ते दिल्लीश्वरांचे
पाहत होतो सगळे चाळे
सहा महिनेही पुरतील मजला
यांना शिकवीन चांगलाच धडा
आता हळूहळू भरत येईल
पापांचा ‘त्या’ मोठा घडा
—– —– —–
संतोष देशमुख
पाकिस्तानला धडा शिकवला
बीड जिल्ह्याला नाही वाली
दहशतीच्या रेट्याखाली
निष्पापांची हत्या झाली
वाल्मिक कराडची क्रूर अवलाद
वळवळतेही अजून तिकडे
पराक्रमाच्या कसल्या बाता
मारत बसला फुकाच इकडे
एकमेकांना सावरणारे
मंत्री कसले संधीसाधू ते
लाज वाटते महाराष्ट्राला
अप्पलपोटे पाहून नेते