साहित्य : काळा पैसा पांढरा करण्याच्या तयारीत असलेला एक निर्माता, एक कुणी विचारत नसलेला हिरो, टीव्ही सिरीअलमध्ये काम मिळत नसल्यामुळे घरीच बसलेली एक हिरोईन, विदूषकासारखा दिसणारा एक व्हिलन, चारपाच हिंस्र दिसणारे व्हिलनच्या हाताखालील पंटर, हिरोची बहीण (व्हिलनच्या बळजबरीपुरती), हिरोचे चारपाच रिकामटेकडे चमचे, चवीपुरती स्टोरी व एक सांगकाम्या डायरेक्टर.
कृती : सर्वप्रथम निर्मात्याकडून सिनेमाचे बजेट वाढवून घ्यावे. त्यासाठी त्याला आपल्याकडे असलेली स्टोरी म्हणजे जगात कुणाकडेच नसलेली एक अतिशय मौल्यवान वस्तू आहे असे पटवून द्यावे. आपले पिक्चर अगदी ‘सुपर-डुपर’ हिट होईल अशी पैजच लावावी. पैसे हातात आल्यावर लोकेशन पाहण्यासाठी एखादी विदेशवारी करुन यावी. सर्वप्रथम हिरो-हिरोईनला घेऊन या विदेशातील (हो, स्टोरी खेडेगावातील असली तरी!) लोकेशन्सवर डान्सची शूटिंग पूर्ण करुन घ्यावी. त्यासाठी कोरिओग्राफर न मिळाल्यास ‘सनी’चे (नरोवा-कुंजरोवा!) काही सिनेमे पाहून त्यातील ‘अॅक्शन’नुसार स्टेप्स बसवून घ्याव्यात. फक्त ‘डान्स’ व ‘संगीत’ या दोन गोष्टींचा कुठेही मेळ बसत तर नाही ना? याची खबरदारी घ्यावी! सिनेमाच्या एकदम सुरुवातीला, अधे-मधे किंवा संपल्यावर अशा कुठल्याही वेळी असे डान्स कुठेही ‘पेरता’ येतात. (वि. सू. : सिनेमा संपल्यानंतर लगेच डान्स दाखवावा. प्रेक्षक घरी पोहोचल्यावर रिकाम्या थिएटरमध्ये दाखवून काय फायदा?)
कुटुंबप्रधान चित्रपट असला तरी मारामारीच्या सीन्सशिवाय शोभा नाही. मारामारी दाखवण्यासाठी भौतिकशास्त्राचे (म्हणजे मराठीत ‘फिजिक्स’ म्हणतात बहुतेक…) नियम आधी गुंडाळून ठेवावेत. (न्यूटनच्या फोटोला अगरबत्ती किंवा मेणबत्ती लावून क्षमा मागावी. उगा त्याच्या आत्म्याचा त्रास नको आपल्याला!) हिरोने फक्त एकच ठोसा लगावल्यावर व्हिलन दहाबारा कोलांटऊड्या हवेत वरच्या-वर मारुन खाली पडला पाहिजे. हिरोच्या एका गोळीने व्हिलनची चार-पाच माणसे मरतील अशी विशिष्ट बंदूक हिरोला द्यावी. व्हिलनने मात्र बॉम्ब टाकला तरी हिरोच्या गॉगलची काचही तडकणार नाही असे अफलातून सीन टाकावेत. इंटरवलच्या आधी हिरोच्या बहिणीची व्हिलनकडून छेडछाड विधिवत उरकून घ्यावी. नंतर चार-पाचवेळा तोच सीन ‘फ्लॅशबॅक’ने दाखवून प्रेक्षकांना इमोशनल करता येते. (हिरोच्या अंगी सुपरमॅनसारखी शक्ती असता त्याच्या बहिणीला मात्र व्हिलनला ढकलण्याइतकीही शक्ती नसावी… असे कसे काय? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे काम प्रेक्षकांवर सोपवावे. तेवढाच त्यांच्या मेंदूला व्यायाम!)
मारामारीच्या सीन्सला आधुनिक तंत्रज्ञान वापरुन सीन्स अगदी अविश्वसनीय करुन घ्यावेत. त्याच्या झालेल्या खर्चाची भरपाई हिरोईनच्या कपड्यात कपात करुन भरुन घ्यावी. हिरोईनला शक्यतो ‘सुकं’ ठेवू नये. (अशीही ती डाएटिंग करुन सुकलेल्या चेहर्याची दिसत असते) तिला सतत पाण्यात भिजलेली दाखवावे. धबधबे, तलाव, पाऊस इत्यादी म्हणजे थोडक्यात; जिथे-जिथे बेडूक आढळून येतात त्या त्या पाणथळ जागेवर हिरोईनला फिरवून आणावे. (भिजवून मोड आलेले मूग जसे अधिक पौष्टिक होतात, तसे हे सीन्स सिनेमा चालण्याच्या दृष्टीने पौष्टिक असतात.) अधनं-मधनं काही टुकार विनोदाचा शिडकावा करुन पिक्चर रिलीज करावे.