पक्ष पंधरवडा सुरु होणार म्हटलं की माझ्यावरील पाचकळ विनोदांना नुसता पूर आलेला आहे. माझे आयुष्य बहुधा याकरिताच आहे काय असा मला हल्ली प्रश्न पडू लागलेला आहे. एक तर या अखिल मनुष्यजातीची मोक्ष मिळवण्याची व्यवस्था करा आणि शिवाय यांची बोलणीही खा. कधीकधी तर मला मनुष्यप्राण्याचा रागच येतो.
अहो, का म्हणून काय विचारताय? मी त्या चिमणीसारखा कधीतरी यांच्या घरात शिरलोय का? कधीतरी विनाकारण माणसाशी सलगी करण्याचा प्रयत्न केला आहे का?
कुठल्याही प्रकारचा त्रास दिलेला नसतानाही मनुष्यप्राणी मला नेहमी नावे ठेवतो. अगदी लहान मुलांनाही आवडत्या पक्ष्यावर निबंध लिहा असे सांगितले की आधी तर पोपटाची निवड करतात. पोपट खरे तर माणसाच्या काहीही कामाचा नाही. नुसता पोपटपंची करत असतो. तरीही तो आवडता, कारण तो देखणा आहे ना आणि आम्ही कावळे मात्र काळे आहोत. अगदीच पोपटाची निवड नाही केली तर मग चिमणी, साळुंकी, मोर असे काहीही असते. पण, माझ्या नावाने कोणी निबंध लिहिलेला कोणी बघितला आहे का? बरे लिहिलेच तर एका वाक्यात लिहितात, ‘कावळा हा काळ्या रंगाचा सामान्य पक्षी आहे.’
जेव्हा काकस्पर्शाची वेळ येते ना तेव्हा तुम्हाला माझे असामान्यत्व कळते, पण ती कावण्याची वेळ नसते, शिवाय विनाकारण कोणावर डूख धरणे हा माणसाचा गुण आहे आमचा नव्हे. अगदी आमच्यातील डोमकावळासुद्धा असे कधी करत नाही.
आमच्यावर ना कधी निबंध लिहिला जातो ना फारशा कविता. अगदीच एखाद्या कवितेत किंवा गाण्यात आमचे नाव गोवले जाते. तेसुद्धा आमची हेटाळणी करण्यासाठीच असते. जसे की ‘कावळा पिपेरी वाजवतो, मामा मामीला नाचवतो.’ याला काय अर्थय? माझा आणि मामीच्या नाचण्याचा काय संबंध आहे?
अगदी बडबडगीतातसुद्धा किती बदनामी करावी? ‘एक घार आली, बोरं देऊन गेली’ या कवितेत सगळे पक्षी येऊन बाळाला काहीतरी देऊन जातात आणि शेवटची ओळ मात्र ‘मग आला कावळा… सगळं घेऊन गेला.’ अरे हा काय फालतूपणा आहे? बाळासमोरसुद्धा आमची इज्जत ठेवली नाही. आता ही कविता कशी वाटते बघा, ‘एक होता छब्बू भलताच ढब्बू, नजरेचा कावळा अगदीच बावळा,’ केवढा आमचा अपमान?
गोष्टीतही चिमणीचं घर होतं मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं. आम्हालाच नेहमी डावी वागणूक का दिली जाते? यासाठी सध्या आम्हा ‘जागतिक कावळे मंचा’च्या अखिल भारतीय संमेलनात चर्चा चालू आहेच. लवकरच आम्ही माणसाने कावळ्याच्या केलेल्या बदनामीवर काहीतरी तोडगा काढणार आहोत. शक्य झाल्यास आता पक्ष पंधरवाड्यातच यावर गरजेची अॅक्शन घेतली जाईल.
जगाच्या बहुतांश भागात आम्हाला सामान्यत: उपद्रवी मानले जाते. आम्ही शेतात राहू शकत नाही, कारण आम्ही पिकांचे नुकसान करतो असे शेतकर्यांचे म्हणणे आहे. आम्ही कुठल्याही गृहसंकुलात राहू शकत नाही, कारण आम्ही अस्वच्छ असतो, कचरा विखुरतो, अन्न चोरतो असे माणसाचे म्हणणे आहे. शिवाय आमच्यामुळे रोगराई पसरवली जाते असाही आमच्यावर आरोप आहे. कावळा जातीचा प्रतिनिधी म्हणून मी इथे नमूद करू इच्छितो की हे सगळे धादांत खोटे आरोप आहेत. मुळात मला सांगा, माणूस जंगलतोड करतो, प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या अधिवासात तो राहायला येतो. आणि आम्हालाच आमच्या जागेतून हुसकावून लावतो, वर आम्हीच घाण करतो हा आरोप. अरे, आमचे घर आहे. आम्ही काहीही करू. शिवाय कबुतरासारखा घाणेरडा पक्षी यांना दाणे घालायला चालतो. हल्ली तर ही कबुतरे काही कामाची राहिलेली नाहीत. पूर्वी तरी ती प्रियकर-प्रेयसीच्या चिठ्ठ्या इकडून तिकडे पोचवत असत. आता तेही नाही. तरीही यांना तो पक्षी चालणार. आम्ही चालणार नाही. यांना चिमण्याही चालतात. चिमण्या तर इतक्या बदमाश असतात की त्या गोड गोड बोलत, चिवचिवाट करत थेट घरात घुसतात. आम्ही कधीतरी माणसाच्या घरात घुसतो का? माणसाचा आमच्यावर अजून एक आरोप आहे की आम्ही फार कावकाव करतो. हा शब्द त्यांना इतका आवडतो की त्यांच्यातही कोणी फार बोलू लागले तर ते त्यांना म्हणतात, ‘ए चूप रे, जास्त कावकाव करू नकोस.’ यांना चिवचिव चालते, कबुतरांची गुटुरगू चालते, पोपटाची फालतू बडबड चालते, त्रास फक्त आमच्या कावकावीचा होतो काय? आता हे काय आमचे बोलणे थांबवून आमच्या पक्षीस्वातंत्र्यावर गदा आणणार आहेत का?
बर्याच बडबडगीतांत ही चिमणी आमच्या जोडीला बसवलेली आहे. ‘एक घास काऊचा, एक घास चिऊचा’ आणि एवढे म्हणून घास खातो कोण तर यांचा बाळ…
‘चिऊ चिऊ ये, काऊ काऊ ये’. सगळीकडे कशाला ही चिमणी बरोबर हवी?
तुम्हाला कल्पना नाही, ही चिमणी एवढी स्वार्थी आहे की एकदा पावसात मी तिची मदत मागायला गेलो तर तिने मदत केली नाही. काय तर म्हणे बाळाला न्हाऊ घालू दे, बाळाला तीट लावू दे, असे काहीतरी बहाणे करत बसली.
बॉलिवुडच्या गीतातही आम्हाला असेच हीनपणाने वागवले आहे. आता बघा, ‘छत पर काला कव्वा बैठा, काय काय करता रहता, सबसे कहता आते जाते, झूठ बोले कव्वा काटे.’ किंवा ‘झूठ बोले कव्वा काटे, काले कौवे से डरियो, मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो.’ अरे तुमच्या बायकांना जायचे आहे माहेरी तर जावे ना, आम्हाला का तुमच्या भांडणात घेताय? आता मला सांगा एखाद्याला ‘काटणे’ तर दूरच, मी कधी कोणाला चोच तरी लावलेली तुमच्या ऐकिवात आहे का? मग का माझ्या नावाने तुम्ही सगळ्यांना घाबरवता? एक तर तुम्ही मला छतावर बसू देत नाहीत, कावकाव केलीच तर लगेच उडवून लावता आणि वर गाण्यात खोटे लिहिता की ‘छत पर काला कव्वा बैठा, काय काय करता रहता…’ वाटते आम्हाला बडबड करावीशी, करतो. तुमच्या बायकोला जेव्हा करावीशी वाटते तेव्हा करतेच ना तीदेखील, तिला तुम्ही कधी उडवून लावता का? शिवाय नुसते छतावर पंख आडवे करून बसण्यावाचून आम्हाला काय दुसरी कामे नाहीत का? पावसाळ्याच्या आधी आम्हाला अन्नाची बेगमी करावी लागते. घरचं काय हवं नको ते बघावं लागतं, नाहीतर कावळी माझा जीव हैराण करून टाकते. एवढ्या बाबतीत ती माणसांवर गेली आहे. घरचं बघून आम्हाला माणसाच्या भल्याचेही बघावे लागते. रोज दशक्रिया घाटावर जायचे, तिथे कोणा कोणाला मुक्ती द्यायची आहे ते ठरवायचे. तुम्हाला म्हणून सांगतो, माणसात आधीच्या काळासारखे पेशन्स राहिले नाहीत हो आता. आधी आम्ही अन्नाला चोच लावली नाही तर माणसे तासंतास वाट बघायची. कधीकधी आठ आठ तासही थांबायचे. आता मात्र तसे नाही. कुठे जरा वेळ झाला की चालले लगेच दर्भाचा कावळा करायला.
बरे त्यातही कसे आहे, घाटावरच्या कावळ्यांच्यात आणि आम्हा गृहसंकुलात राहणार्या कावळ्यांच्यात खूप टशन आहे. तिकडचे कावळे आम्हाला त्यांच्या भागात येऊ देत नाहीत. आमच्या जाण्याने त्यांचा धंदा जातो ना.
पण देवाने जी दिव्य नजर दिलेली आहे ती आम्हा सगळ्यांनाच दिलेली आहे. त्यामुळे आलटून पालटून घाटावरचा बिझिनेस घ्यायचा असा प्रस्ताव आता आम्ही आमच्या मंत्रिमंडळाकडून संमत करून घेणार आहोत.
तशी माणसे आम्हाला घाबरून असतात. एकाच वेळी दोन ठिकाणी बघू शकणारी आमची नजर माणसाला माहिती आहे. तसा आमच्या अक्कलहुशारीचा त्यांना बरोबर अंदाज आहे. म्हणूनच काही गोष्टींत ‘रांजणातून हुशारीने पाणी काढणारा कावळा’ त्यांनी रंगवला आहे. आम्ही तसे असतोच हुशार. म्हणजे कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त साध्य कसे करायचे हे आम्हाला चांगले ठाऊक आहे. आता म्हशीच्या पाठीवर बसून जाणारा कावळा तुम्ही बघितलाच असेल. म्हैस जातेच आहे तर आपण कशाला उडून आपल्या पंखाना कष्ट द्या.
तसे आमच्याबद्दल माणसाने काही चांगले शकुनही सांगितले आहेत. उदा. आम्ही चोचीत चारा घेऊन उडत असू तर तो माणसासाठी शुभशकुन आहे. अशाने त्यांच्या घरात धनधान्य-समृद्धी येणार असे त्यांना वाटते. आम्ही पाण्यावर बसलेले दिसलो तर त्या वर्षी पाऊस चांगला असणार असा त्यांचा होरा असतो. छतावर आम्ही कावकाव केली तर घरात पाहुणा येणार अशी समजूत आहे. आधीच्या काळी माणसांना अशाने फार आनंद होत असे, पण हल्ली आमची कावकाव ऐकली की आम्हाला हुसकावून लावतात. त्यांना पाहुणे आलेले नको आहेत. खरे तर आम्ही माणसासारखे स्वार्थी अजिबात नाही. ती दुष्ट कोकिळा आमच्या घरट्यात अंडे घालून जाते. पण, आमची कावळी कधीही काही म्हणत नाही. आमच्या अंड्यांबरोबर ती ही अंडीदेखील उबवते.
तुमची ती ज्ञानोबा माऊली मात्र आमचे फार म्हणजे फार आदराचे स्थान हो. केवढे काय लिहून ठेवले आहे आमच्यावर. त्यांची ती वचने आम्ही आमच्या गौरवार्थ आमच्या पिल्लांच्या शाळेत लावून ठेवलेली आहेत.
पैल तो गे काऊ कोकताहे
शकुन गे माये सांगताहे…
तेवढ्यावरच माऊली थांबत नाहीत, याचे पाय सोन्याने मढवणार म्हणतात, दहीभात दुधाची वाटी आंब्याची डहाळी आमच्या तोंडी लावणार म्हणतात. माणसातून आमच्यावर प्रेम करणारे हे संत म्हणूनच महनीय वाटतात.
चला, तुमच्याबरोबर बोलत बसलो, पण पक्ष पंधरवडा आहे, घासाला चोच लावायची वेळ आहे. मला जावे लागेल.
तुमचा शुभशकुनी कावळा.