पहिल्यांदा ‘बँडिट क्वीन’ पाहिला तेव्हा मस्तक दोन दिवस सुन्न झालेलं. उत्तर प्रदेशातील एका गरीब मल्लाह जातीच्या कुटुंबात फुलनचा जन्म झालेला. वसंतोत्सवात जन्मलेली म्हणून तिचे नामकरण ‘फुलन’! किती सुंदर कल्पना आहे ही! फुलनचे मायबाप अगदी दरिद्री, असहाय्य होते. वडिलांच्या तुलनेत आई स्वभावानं थोडीशी खाष्ट. फुलन तिच्या आईसारखी होती. निडर आणि फाटक्या तोंडाची! तिला चार भावंडं. पैकी तीन बहिणी आणि एक भाऊ. फुलनच्या बापाची सगळी जमीन तिच्या चुलत्याने हडप केलेली. वरतून तो त्यांना छळायचा. त्यांना शेतात पायसुद्धा ठेवू देत नसे. फुलनसह चारी भावंडांना ठोकायचा. अनेकदा उपाशी राहणारी फुलन सर्व घरकामे करण्यात तरबेज होती. मोठ्या बहिणीच्या लग्नानंतर वयाच्या ११व्या वर्षीच फुलनचं लग्न तीस वर्षाच्या पुट्टीलालसोबत लावून देण्यात आलं. फुलनला न्हाण येण्याआधीच तो तिला घरी घेऊन गेला. त्यानं तिच्यावर जबरदस्ती केली. चित्रपटातला हा सीन पाहताना अंगावर काटा येतो. लहानग्या फुलनच्या किंकाळ्या कानातून मस्तकात खोल उतरतात. तिचा अनन्वित छळ होतो, मारझोड होते. त्याच्या जाचाने भांबावून गेलेली फुलन दोनेकदा माहेरी पळून जाते. मात्र तिची कशीबशी समजूत घालून तिला पुन्हा त्याच्या ताब्यात दिले जाते.
आईसह फुलन उन्मळून पडते मात्र काहीच इलाज नसतो. पुढे जाऊन फुलन विरोध करू लागताच पुट्टीलालच तिला नावेत सोडून जातो आणि दुसर्या स्त्रीबरोबर पाट लावतो. फुलन गावी परतते. आपल्या आयुष्यात काही घडलंच नाही अशा पद्धतीने वागू लागते. मात्र जगाला हे रुचत नाही. नवर्याने सोडलेली बाई म्हणून तिची टवाळकी होऊ लागते. गावकीसोबतच तिच्या घरचे देखील तिला याच नजरेने पाहू लागतात. तिला गावातून हाकलून लावण्याच्या मागणीआडून शोषणाचा डाव रचला जातो. सरपंच, पाटील, चुलत भाऊ मायादीन हे तिला उघड उघड दम देऊ लागतात. यातूनच वयाच्या पंधराव्या वर्षी आई-वडिलांसमोरच तिच्यावर अनैसर्गिक बलात्कार होतो. सरपंचाचा मुलगा तिचे शोषण करतो आणि तिचेच नाव बदनाम करतो. फुलननेच आपल्याशी बदतमीजी केल्याने तिला शिक्षा देणे गरजेचे होते असं सांगतो. हट्टी, तोंडवळ फुलन दाद मागण्यासाठी पोलिसांकडे जाते. तिथेही तिच्या पदरी निराशा येते. दरम्यान फुलन मोठ्या बहिणीच्या गावी जाते त्या काळात सरपंच आणि मायादीन तिच्यावर डाकूचा आरोप लावून तिला व तिच्या बापाला पोलिस ठाण्यात टाकतात. तिथं काही पोलीसच तिच्यावर बलात्कार करतात. तिच्यावर अनन्वित अत्याचार होतात. धमकावले जाते की कुठे बभ्रा केलास तर तुझ्या गुप्तांगात मिरची टाकू आणि धिंड काढू! भेदरलेली फुलन गुन्हा कबुल करून बंदिवासात राहते. तिला जामीन मिळवण्यासाठी आईला कर्ज काढावे लागते इतकी त्यांची अवस्था बिकट होते. सुटकेनंतर ती गावी परतते, पण सरपंच आणि मायादीन तिला ठार करण्यासाठी डाकू बाबू गुज्जरला तिची सुपारी देतात. फुलनसह तिच्या घरच्यांना डाकू बेदम मारहाण करतात. जाताना फुलनलाही सोबत नेतात. बाबू गुज्जरसुद्धा तिच्यावर बलात्कार करतो. त्याच्याच टोळीतील डाकू विक्रम मल्लाहला हे सहन होत नाही. तो बाबूला ठार करतो. नंतर तो फुलनशी लग्न करतो, टोळीत स्थान देतो. येथून फुलनमध्ये परिवर्तन होतं. ती बँडिट क्वीन कम् लेडी रॉबिनहूड होते, गरिबांची मसिहा होते. आपल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी तिचे हात सळसळू लागतात आणि ती पहिला घाव अर्थातच पुट्टीलालवर घालते. गावच्या सरपंचाला मारताना भाऊ मायादीनला ती दया दाखवत नाही. विक्रमचा मित्र असणारा डाकू श्रीराम ठाकूर हा जेलमधून सुटून आल्यावर विक्रमला दग्याने मारतो. फुलनला पकडून नेतो. गावोगावी तिची विवस्त्र धिंड काढतो. तिच्यावर असंख्य बलात्कार करवतो. बंद खोलीत कोंडतो. तिची सुटका जो व्यक्ती करतो त्याला तो जिवंत जाळतो. तिथून पलायन करून आलेली फुलन दगडाच्या काळजाची होते. सुडाग्नी तिला जाळू लागतो.
बहमाई गावात लुटीसाठी गेल्यानंतर तिच्यावर जबरदस्ती केलेल्या काही व्यक्तींना ती ओळखते, श्रीरामला मदत करणार्या बावीस ठाकूरांना ती रांगेत उभे करून गोळ्या घालते. देशभरात याची चर्चा झालेली. तिच्यावर इनाम जाहीर झाले होते. बंदोबस्त आणि वाढता पाठलाग याला ती भिक घालत नाही, मात्र श्रीराम ठाकूरला त्याच्या भावाने खलास केल्याची बातमी येताच ती काहीशी शांत झालेली. आणि अखेरीस तिने शरणागती पत्करलेली. तिच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले गेले. चित्रपटाच्या शेवटी क्रेडिट्स देताना फुलन १९९४मध्ये आझाद झाल्याची नोंद येते.
सीमा विश्वास या अभिनेत्रीने जीव तोडून फुलन साकारली होती. तिला विवस्त्र करून गावात फिरवतानाचे दृश्य नकळत आपली मान खाली घालायला लावते. पडद्यावर हे दृश्य दाखवले जात असताना पिटातले पब्लिक श्रीराम ठाकूरच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहत असेल तर त्यात नवल ते काय? एखाद्या गंभीर वा टेरर सीनच्या वेळेस थियेटरमधील शांतता काहीना बघवत नाही. ते कसला तरी विचित्र आवाज काढत राहतात आणि रसभंग होतो. तरीही पब्लिकला जे हवं होतं ते या चित्रपटात मिसिंग होतं. ती गोष्ट म्हणजे चित्रपटात फुलनचा दरारा कुठेच जाणवत नव्हता. मुळात शेखर कपूरनी सिनेमाला लाऊडटोन दिलाच नव्हता. बँडिट म्हणजे वाटमारी करणारे डाकू. हेच त्यांनी फुलनला दाखवले. मात्र वेगळ्या पद्धतीने. मन सुन्न करणारा चित्रपट त्यांना हवा होता तो त्यांनी केला, मात्र पब्लिकला हे आवडलं नाही. फुलनला पाहताच विजारी ओल्या करणारे गावकरी लोकांना अपेक्षित होते. तिची दहशत न जाणवता तिचेच शोषण डोक्यात राहते याला आपल्याकडे फारसे महत्व दिले गेले नाही, कारण आपणही कुठल्या तरी रुपातले शोषकच असतो!
चंबळच्या खोर्यातल्या डाकूंच्या कहाण्यांना विविध शेड्स आहेत. एखाद्या स्त्रीचे जबरी अपहरण करून तिला पळवून नेऊन कित्येक दिवस तिच्यावर घोर अत्याचार केले आणि चौदिशेने तिची नाकेबंदी केली तर तिच्यापासून समाजाने काय अपेक्षा करावी हे कोण निश्चित करणार? कुणा एकीस दोष देण्याआधी अथवा तिच्या भाळी दरोडेखोरीचा टिळा लावण्याआधी तिने गुन्हेगारीस का नाकारावे वा तिला त्याखेरीज काही पर्याय उपलब्ध होते का याचा विचार समाज म्हणून आपण कधीच करत नाही. इव्हन त्या स्त्रीला जीव देण्याची संधीही उपलब्ध नसते तेंव्हाही तिने सत्याच्याच मार्गावरुनच जावे अशी पोकळ नैतिकता कशाच्या आधारे आपल्याला अपेक्षित असते याचे उत्तर आपल्यालाही ठाऊक नसते, कारण आपणच भोंदू नैतिक असतो. अशीच कथा होती डाकू निर्भयसिंह गुर्जरची आणि त्याच्यासोबतच्या तीन स्त्रियांची! या तिन्ही स्त्रियांच्या आयुष्याची माती झाली. केवळ एक स्त्री असल्याने समाजाने त्यांना स्वीकारले नाही आणि सुधारण्याची साधी संधीही दिली नाही. गुन्हेगारीचे नामोनिशाण मिटेपर्यंत चंबळचे खोरे महाभारतातील एका स्त्रीच्या शापाचे ओझे उचलत राहिले. आगामी काळातही अजून किती पुतली, फुलन, सीमा, कुसुमा आणि गौरी यांचा बळी दिला जाईल हे कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही हीदेखील एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. हे सर्व पाहू जाता चंबळचे खरे गुन्हेगार कोण याचे उत्तर नकळत मिळते!
आजघडीला चंबळचे खोरे शांत आहे. सरकार तिथे पर्यटन योजना राबवण्याच्या विचारात आहे. चंबळच्या खोर्यात अनेक हत्या झाल्यात, डाके पडलेत, लूटमार झालीय, काही प्रसंगी स्त्रियांवर हात टाकले गेलेत! चंबळचे नाव घेताच हिंदी सिनेमातले डाकूपट आठवतात, हिंदी साहित्यातले दरोडेखोर समोर येतात. चंबळ म्हटले की दुर्गम प्रदेश, डोंगरदर्यांचे चित्र डोळ्यांपुढे तरळते. ‘बिहड’ शब्द कानी येतो. बिहड म्हणजे जमिनीचे उंचसखल असणारे रुक्ष निकृष्ठ भूस्वरूप, चंबळच्या कृपेने हा शब्द जगभर ज्ञात झाला! चंबळ ही यमुनेची उपनदी असून मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांतून वाहते. या तिन्ही राज्यांच्या सीमा चंबळच्या जंगलाला लागून आहेत. मध्य प्रदेशातील ‘जानापाव’ येथे विंध्य पर्वतात तिचा उगम असून चंबळ नदीची एकूण लांबी ९६० कि.मी. आहे. चंबळ क्षेत्रातील लोकसंख्या पन्नास लाखाच्या आसपास आहे. चंबळच्या घाटीत असणार्या ओसाड उष्ण जंगलात बिहडमध्ये आश्रय घेऊन राहणार्या डाकूंनी चंबळची कुप्रसिद्ध ओळख निर्माण केली असं म्हणणं या नदीचा अवमान ठरेल आणि सत्य पुन्हा एकदा दडपले जाईल! १९६०च्या दशकात चंबळचे खोरे मध्य प्रदेशातच नव्हे तर संपूर्ण भारतात कुप्रसिद्ध होते. तेव्हा या खोर्यात डाकूंच्या अनेक टोळ्या होत्या. त्यांच्या एकमेकांमध्ये लढाया व्हायच्या. रोज खून, लुटालूट होई आणि बंदुकीच्या गोळ्यांचा पाऊस पडत असे. इथले लोक अक्षरश: जीव मुठीत घेऊन जगायचे.
चंबळचे नाव गत शतकात बदनाम झालेय असे काही नाही. यमुनेच्या पाठीकडील भागांत जे विस्तीर्ण भकास बिहड आहेत त्यांच्या मधोमध चंबळचे देखणे नितळ पात्र आहे. आश्चर्य वाटेल की उत्तरेकडील ही एकमेव उपनदी आहे जी प्रदूषणमुक्त आहे, परंतु मानव किंवा एखादे जनावरही या नदीचे पाणी पीत नाही. गंगा, यमुना, कृष्णा, क्षिप्रा यांसारख्या अनेक नद्यांची भारतात पूजा होते. देशात अशी कोणतीच नदी नसावी की जिची पूजाअर्चा होत नाही. अपवाद फक्त चंबळचा असावा! कारण चंबळला एक शापित नदी म्हणून ओळखले जाते. चंबळचा संदर्भ पुराणकाळातही आढळतो. महाभारताशी तिचे नाते आहे. मुरैनाच्या नजीक चंबळच्या काठावर शकुनीने पांडवांना द्युतामध्ये हरवले होते. याच ठिकाणी द्रौपदीच्या चिरहरणाचे आदेश दिले गेले होते. म्हणून चिडलेल्या द्रौपदीने या नदीला शाप दिला होता. अजूनही हा शाप प्रमाण मानून या नदीची पूजा केली जात नाही किंवा तिचे पाणी प्यायले जात नाही. या कथित शापामुळेच या नदीच्या काठची लोकवस्ती अतिशय कमी आहे, म्हणूनच ही नदी अतिशय स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त आहे. या परिसरात चंबळ हा पाण्याचा एकमेव स्त्रोत आहे आणि जो बर्याचदा कोरडा पडतो त्यामुळे इथे सगळ्याच डाकूंना स्थान मिळाले नाही. इथे आपली सत्ता चालावी म्हणून सातत्याने संघर्ष होत राहिले त्याला कारण हिचे दर दुष्काळात आकसत जाणारे पात्र! चंबळच्या याच वेदनेशी मिळतीजुळती कथा फुलन तिच्या आयुष्यात जगलीय.
‘बँडिट क्वीन’ हा सिनेमा १९९४ मध्ये रिलीज झाला होता. तो काळ वितरकांच्या कमाईचा होता. ज्याने मलाईदार टेरीटरीचे हक्क घेतलेले असायचे तो फिल्म प्रोड्युसरला अक्षरश: ब्लॅकमेल करायचा. त्याच्या पुढे गुडघे टेकवण्याशिवाय पर्याय नसे. आतासारखे अभिनेत्यांचे वा निर्माते दिग्दर्शकांचे वितरणाचे जाळे तेव्हा नव्हते. शेखर कपूरने ‘बँडिट क्वीन’चे दिग्दर्शन केले होते. बॉबी वेदी हा याचा निर्माता होता. नुसरत फतेह अली खांसाहेबांचे संगीत लाभले होते. सिनेमा प्रदर्शनाला तयार होताच फुलनदेवींनी निर्मात्यांविरुद्ध न्यायालयात दावा दाखल केला. मात्र तो टिकला नाही. परंतु दरम्यानच्या काळात बेसिक स्क्रीन टाइम निघून गेला. दिवाळीच्या आधीच्या ऐन परीक्षांच्या काळात सप्टेंबरमध्ये चित्रपट रिलीज झाला. माऊथ पब्लिसिटी निगेटिव्ह आल्याने आणखीच फटका बसला. वितरक कॉच विजन यांना महत्वाच्या टेरिटरीज उशिरा मिळाल्या. सिनेमा फ्लॉपमध्ये गणला गेला. एका चांगल्या कथेचे मातेरे झाले. एक बायोपिक झिरझिर्या कपड्यागत उसवून निघाला. हे अगदी फुलन देवीच्या रिअल लाईफसारखं झालं.
आजकाल सामान्य माणसांनाही हिंसेचे तसेच गँगवॉरटाईप क्रिमिनल जगताची खूप ओढ असते. आजवर अनेकदा हे सिद्ध झाले आहे. हिंसेच्या लालसेच्या प्रचंड ओझ्यापुढे ‘बँडिट क्वीन’ खर्या अर्थाने पब्लिकला पसंत पडला नाही ही गोष्ट हेच अधोरेखित करते. एका गोष्टीची नोंद केल्याशिवाय लेख अधुरा राहील. या चित्रपटातील न्यूड सीनची अफाट चर्चा झाली असल्याने आंबटशौकीन मोठ्या प्रमाणात थिएटरमध्ये असत. त्यांच्या पांचट शेरेबाजीतून त्यांची मानसिकता लक्षात येत असे. याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट असा झाला की सिनेमाकडे स्त्रियांनी पाठच फिरवली. मी जेव्हा हा सिनेमा पाहिला तेव्हाच्या ‘शो’ला थियेटरमध्ये केवळ दोन स्त्रिया होत्या. एक प्रौढा आणि एक तरुण मुलगी. मध्यंतराच्या वेळेस त्यांच्याकडे लक्ष गेले नाही मात्र सिनेमा संपल्यानंतर थिएटरबाहेर पडताना लोक त्यांच्याकडे इतक्या विचित्र आणि भयानक नजरेने पाहत होते की त्यांना नक्कीच वाटलं असेल की, सीमा विश्वासच्या जागी आपणच आहोत, आपल्या अंगावरचे कपडे असून नसल्यासारखे आहेत! खूप खजिल करणारं ते दृश्य मी आजही विसरू शकलो नाही. अॅडल्ट मुव्हीजला स्त्रियांनी येऊ नये ही मानसिकता आणि फुलनचं शोषण करणारी मानसिकता एकाच धाग्यातली असण्याची ती टोचणी होती. बँडिट क्वीन संपली नाही, मरणही पावली नाही ती अजूनही आपल्या हरेकाच्या अवतीभवती तगून आहे. तिचे शोषण आपण सारेच करत असतो! त्यासाठी आपण जननेंद्रिय वापरत नाही, कारण आपली अधाशी वखवखलेली नजरच पुरेशी असते! बॉलिवुड एनकेन प्रकारे कधी सौम्य स्वरूपात तर कधी जहाल स्वरूपात हे सत्य मांडत असते. त्याला सपोर्ट तर केलाच पाहिजे!