(ब्यादश्या सलामत नौरंगजेब चार फळकूट ठोकून बनवलेल्या तथाकथित सिंहासनावर हातात मच्छर मारायचं रॅकेट घेऊन उडणारं धेडूस हाकलण्यासाठी घाबरून बसलेला. समोर वजीर-ए-खारजा खालमानेनं खजील उभा. बाजूला कोपर्यात दोन शिपाई बसलेले. पैकी एक दुसर्याच्या डोक्याला मालिश करतोय.)
शिपाई १ : ह्या फळकुटा कधी ठोकल्या रे?
शिपाई २ : काल तिन्हीसांजंला ठोकल्या असतील.
शिपाई १ : असतील? तुला माहीत नाही का?
शिपाई २ : मी ते पितळेची चर्वी विकायला गेल्थो! ब्यादश्या सलामत म्हणी कौमी मजलिसच्या उद्घाटनाला नवीन कपडे लागतील. मग गेलो आणायला.
शिपाई १ : पण कालचं ठोकल्या असतील म्हणा!! फळ्या सागाच्याच असतील ना?
शिपाई २ : ब्यादश्याला कुठं काय कळतं? बाभळीतला नि सागातला फरक?
शिपाई १ : आता हे ध्यान हातात रॅकेट का काय घेऊन बसलंय. नेमकं कश्याला भिलंय हे आज?
शिपाई २ : त्यांना भ्यायला कारण थोडीच लागतं का? परवाच्या दिवशी चाचणं भिरभिरतात म्हणून त्यांनी मच्छर मारायचं लिक्विड शिंपडलं व्हतं घरभर.
शिपाई १ : ते जाऊदे, गावभर ठेवलेल्या कुंड्या/झाडं आणलीत का?
शिपाई २ : काही आणली, काही लोकांनी पळवली.
शिपाई १ : आणि ती हिरवी नेट? काही रस्त्यांवर १०-१२ फूट उंच उभी केलेली ती?
शिपाई २ : गया था निकालने। पण एक खातून बोली ‘बेटा, तेरे मेहमानों से हमें छुपाने के वास्ते तूने जो ये इंतजामात किये ना? रहने दें। पहले तू हमारे मुँह छुपाना चाहता था। अब हमें भी ब्यादश्या सलामत का मुँह देखना नहीं हैं।’
शिपाई १ : तू सांगू नाही का, ‘वैसे तो उसका मुँह देखने लायक है ही नहीं। लेकिन पापी पेट के लिए देखना पडता हैं।’
शिपाई २ : पण का रे, ती सोन्याची ताटं, चांदीची चमचे परत दिलीत का?
शिपाई १ : दिली बाबा!
शिपाई २ : मागल्या येळी काही चमच्यांनी चमचे पळवली होती ना? मग ह्यावेळी…
शिपाई १ : ह्या वेळी सीसीटीव्ही लावले होते. दर कोपर्याला! पण तरी थोडी गडबड वाटती, बघू काही कॉल आला तर…
शिपाई २ : पण हा वजीरे खारजा अजून इथंच का उभा आहे?
शिपाई १ : त्याच कार्यक्रमात वो कोनाड्यातल्या मुल्काचा महाराजा जतिनसिंग कद्रू भांडून गेला ना? त्याबद्दल काही चालुय त्यांचं…
(काहीतरी उडल्याचा भास होतो. तसा ब्यादश्या नौरंगजेब बेडूकउड्या घेतो, आवाजाच्या दिशेनं निरखून पाहतो. वजीरे खारजा मात्र खालमानेनं ढिम्म उभा.)
नौरंगजेब : वजीर-ए-खारजा! आप चुप क्यूँ हो?
वजीर-ए-खारजा : हुजूर, अभी खाना खाया हैं। त्यात वामकुक्षीची वेळ! उसमें आपने बुलाया…
नौरंगजेब : तो हमारे सामने खड़े खड़े सो रहे हों?
वजीर-ए-खारजा : गुस्ताख़ी माफ़ हो हुजूर। एक झपकी सी आयी थी। बस।
नौरंगजेब : हम २४ घंटे सोते नहीं हैं और आप?
वजीर-ए-खारजा : माफी हुजूर!
नौरंगजेब : क्या खबर लाये हो?
वजीर-ए-खारजा : जतिनसिंग कद्रूने आपल्या वकीलाला हाकललं.
नौरंगजेब : उसका कोई आदमी होगा यहाँ? तर हाकला त्याला!
वजीर-ए-खारजा : आपने वज़ह नहीं पूँछी?
नौरंगजेब : ये बचपन से हमरा उसूल था, किसीने कट्टी घेतली की आम्ही पण घ्यायचो. कारणं वगैरे विचारत बसत नसायचो!
वजीर-ए-खारजा : हुजूर वहाँ, उस मुल्क में कोई आतंकवादी मारा गया, आणि ते आळ आपल्यावर घेताय…
नौरंगजेब : हम भी वैसा ही करेंगे। घ्या आळ कुणावर तरी!
वजीर-ए-खारजा : ऐसा नहीं होता चहापन्हा!
नौरंगजेब : अब इस खेल में हमें मजा आने लगा था, तो तुम मूड खराब कर रहे हो। जाऊदे बाबा! अश्यानं आम्ही नाही खेळणार जा!
वजीर-ए-खारजा : हुजूर ये एक बड़ा मुल्क हैं। लगभग बीजिंग के छि पिंगटराव के मुल्क के बराबर… (नौरंगजेब नुस्त्या नावाने इतका धास्तावतो की सिंहासनाच्या पलीकडे उडी घेतो.)
नौरंगजेब : (लहान मुलागत) आप बहोत बुरे हो! हमें हर वक्त डराते रहते हो। चले जाव।
वजीर-ए-खारजा : ऐसा नहीं डरते चहापन्हा! आगे आ जाइये। आइंदा हम किसीका नाम नहीं लेंगे। (नौरंगजेब हळूच डोकावतो, आणि पुन्हा सिंहासनावर येऊन बसतो.)
नौरंगजेब : आखिर ये बड़े मुल्क हमारे ही पीछे क्यों पड़ते हैं? और आप हर बार ऐसेही मुल्कों से क्यूँ झगड़ते हो? कोई नेपाल, मालदीव, मॉरिशस वगैरा मुल्क मिलता नहीं है क्या आपको?
वजीर-ए-खारजा : हुजूर…
नौरंगजेब : हमें नहीं सुननी आपकी बात। (रागात निघून जातो.)
शिपाई २ : का रे आता देश के दुश्मनों को पाकिस्तानात पाठवण्याऐवजी ही धमकी द्यायची का… ‘कोनाड्यात जा!’
शिपाई १ : पण त्यातही कुणी म्हणालं तर, ‘हा निघालो, द्या व्हिसा!’ तर?