कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या संसदेतील भाषणात, खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंह निज्जर याच्या १८ जून २०२३ रोजी कॅनडात झालेल्या हत्येसाठी भारताला जबाबदार धरल्यामुळे वादाची ठिणगी पडली असून जवळजवळ चार दशकांपूर्वीचा स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीचा मुद्दा फिरून एकवार ऐरणीवर आला आहे.
सत्तरच्या दशकात पंजाब राज्यात उफाळून आलेला हा वाद तिथे मिटला आहे. मात्र कॅनडा, ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मलेशिया आणि युगांडा इथे वास्तव्य करणार्या काही अतिरेकी शीख संघटनांनी स्वतंत्र खलिस्तानची मागणी जिवंत ठेवली असून त्यांना परदेशांत स्थायिक झालेल्या काही भारतीयांची सहानुभूती मिळते. शिवाय या अतिरेक्यांना पाकिस्तानच्या आयएसआयची साथ असल्याचेही वेळोवेळी सिद्ध झाले आहे. भारतात घुसखोरी करणार्या अतिरेक्यांना पाकिस्तानात अतिरेकी कारवायांचे प्रशिक्षण दिले जाते हे सर्वश्रुत आहे.
याचबरोबर भारतावर आरोप करणारा कॅनडा अतिरेक्यांना पाठीशी घालत असल्याची बरीच उदाहरणे आहेत. जस्टिन ट्रुडो यांचे पिता पियर ट्रुडो यांनी १९८२मध्ये अतिरेकी तलविंदर सिंग परमार याच्या प्रत्यार्पणासाठी भारताने केलेली विनंती धुडकावून लावली होती. त्यानंतर गेल्या काही वर्षांत अतिरेक्यांच्या प्रत्यार्पणासाठी भारताने सादर केलेल्या प्रस्तावाला कॅनडाने दाद दिलेली नाही.
१५व्या शतकात स्थापन झालेल्या शीख धर्मात, तत्कालीन मुस्लीम राजवट आणि काही शीख धर्मगुरूंच्या भ्रष्टाचाराला कंटाळून १६९९मध्ये गुरु गोबिंद सिंग यांनी काही सुधारणा केल्या होत्या. शिखांसाठी वेगळ्या राज्याची मागणी सर्वप्रथम काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात मास्टर तारासिंग यांनी १९२९मध्ये केली होती. ते श्री गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे पदाधिकारी देखील होते. त्यांनी त्या काळी पंजाबवर असलेल्या मुस्लिमांच्या दबावाला विरोध करून अकाली दलाचे वर्चस्व पुढे रेटले होते. ‘जब तक हाथ वीच है किर्पान, नहीं बनेगा पाकिस्तान,’ अशा घोषणा देखील हिंदू व मुस्लिम विद्यार्थी देखील त्या काळी देत असत. पण देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायच्या प्रयत्नात स्वतंत्र राज्याचा मुद्दा मागे पडला.
देश स्वतंत्र झाल्यानंतर बर्याच वर्षांनी कट्टर खलिस्तानी अतिरेकी दिवंगत जर्नेलसिंग भिंद्रनवाले आणि निरंकारी पंथाचे अनुयायी यांच्यात एप्रिल १९७८मध्ये वाद होऊन हाणामारी झाली. भिंद्रनवाले स्वतंत्र खलिस्तानची मागणी करीत होते तर निरंकारींचा त्याला विरोध होता. भिंद्रनवाले आणि त्यांचे सहकारी निरंकारींवर पाखंडी असल्याचा आरोप करीत होते. १९८०पासून भिंद्रनवालेंनी पंजाबातील अमृतसर येथील शीखांचे पवित्र स्थान असलेल्या सुवर्णमंदिरात तळ ठोकला व तेथून तो अतिरेकी कारवाया करू लागला. त्याच्या समर्थकांनी हिंदूंवर हल्लेदेखील करण्यास सुरुवात केली. त्याच काळात खलिस्तानचे विरोधक आणि पंजाब केसरीचे प्रकाशक लाला जगत नारायण यांची हत्या झाली. त्यानंतर पंजाबमध्ये हिसाचाराचा प्रक्षोभ झाला.
खालसा दिन
६ जून १९८४ रोजी सुवर्णमंदिरात दडून बसलेल्या अतिरेक्यांविरुद्ध भारत सरकारने लष्करी कारवाई (ऑपरेशन ब्ल्यू स्टार) केल्याच्या निषेधार्थ कॅनडात दरवर्षी खालसा दिन साजरा केला जातो. २०१७मध्ये जस्टिन ट्रुडो स्वत: या खालसा दिन सोहळ्यात सहभागी झाले होते. त्याअगोदर तत्कालीन पंतप्रधान पॉल मार्टीन यांनीही २००४मध्ये खालसा दिन कार्यक्रमात भाग घेतला होता. याचबरोबर या वर्षी जूनमध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची दोन शीख सुरक्षारक्षकांनी दिल्लीत केलेली हत्या दाखविणारा चित्ररथ ब्रॅम्पटन शहरात फिरविण्यात आला. जस्टिन ट्रुडो यांनी २०१५मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, कॅनडातील शीख अतिरेक्यांच्या स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीने जोर धरल्याचे म्हटले आते. ट्रुडो यांच्या लिबरल पक्षाला शीख अतिरेकी संघटनांचा उघड पाठिंबा आहे. स्वतंत्र खलिस्तान हवा की नको, या मुद्द्यावर बब्बर खालसा इंटरनॅशनल, दल खालसा, सिख्ज फॉर जस्टिस आणि इतर संघटना परदेशात वेळोवेळी सार्वमत घेत असतात. अशीच एक चाचणी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कॅनडातील टोरोंटोत करण्यात आली. तिला एक लाखाहून अधिक लोकांनी प्रतिसाद दिल्याचा दावा अतिरेक्यांतर्फे करण्यात आला.
हरदीप सिंह निज्जर
‘मोस्ट वाँटेड’ निज्जरची या वर्षी १८ जून रोजी ‘सरे’तील ब्रिटीश कोलंबिया येथील एका गुरुद्वाराच्या पार्किंगमध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली. निज्जर १९९७मध्ये पंजाबच्या जालंदरमधून कॅनडात गेला होता. नंतर तो तिथेच स्थायिक झाला. त्याच्याविरुद्ध इंटरपोलने २०१६मध्ये ‘रेड कॉर्नर’ नोटीस जारी केली होती. याचबरोबर २०१८मध्ये कॅनडा पोलिसांनी त्याला नजरकैदेत ठेवले होते. शिवाय भारतीय सुरक्षा यंत्रणा ‘एनआयए’ने त्याला फरारी घोषित केले होते.
खलिस्तानी अतिरेक्यांशी संबंधित ४३ गुन्हेगारांची यादी त्यांच्या छायाचित्रांसह एनआयएने नुकतीच जाहीर केली. यातले काहीजण पंजाबच्या तुरुंगात, काही तिहार जेलमध्ये, काही पाकिस्तानात तर काही कॅनडा व अन्य देशांत आहेत. हे सर्वजण संगनमताने काम करतात. यांत अतिरेकी हल्ले करण्यापासून खंडणी वसूल करण्यापर्यंत सर्व गुन्ह्यांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे या कामासाठी हवालामार्फत पैसे पुरवले जातात. गोल्डी ब्रार, अर्शदीपसिंग गिल, लखबीर सिंग, लॉरेन्स बिश्नोई अशा गुन्हेगारांचा एनआयएच्या यादीत समावेश आहे.
१९४७ साली देशाच्या फाळणीनंतर पश्चिम पंजाब पाकिस्तानमध्ये समाविष्ट झाला. नंतर चंदिगढ, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश यांची निर्मिती होऊन भारताकडील उर्वरित पंजाबचे आणखी विभाजन झाले. हीच सल मनात ठेऊन शीख अतिरेकी संघटनांनी स्वतंत्र खलिस्तानची मागणी सुरू केली. १९८२-१९८४ या काळात पंजाबमध्ये हिंदू विरुद्ध शीख अशी उघड दुफळी पडली. त्या काळी सुवर्णमंदिर हे शिखांचे, तर अमृतसरमधील दुर्गियाणा मंदिर हिंदूंचे अशी धारणा झाली होती. नंतर हळुहळू परिस्थिती पूर्ववत झाली. मात्र खलिस्तानी चळवळ सुरू झाल्यापासून अतिरेकी हल्ल्यांमध्ये शीख व हिंदूंसह जवळजवळ २२ हजार लोक मारले गेले. महत्वाची बाब म्हणजे त्यावेळी पंजाब पोलिसांमध्ये शीख अधिकारी बहुसंख्येत होते आणि त्यांनी परिस्थिती निष्पक्षपातीपणे हाताळली. याबाबत तत्कालीन पोलिस महासंचालक के.पी.एस. गिल यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनीही महासंचालकपदाचा कार्यभार सांभाळून परिस्थिती बरीच नियंत्रणात आणली होती.
इंदिरा गांधींची हत्या
इंदिरा गांधींची सतवंत सिंग आणि बियांत सिंग या त्यांच्याच शीख सुरक्षारक्षकांनी ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी दिल्लीतील सफदरजंग येथील निवासस्थानी अगदी जवळून गोळ्या घालून हत्या केल्यानंतर देशभर हिंसाचाराचा आगडोंब उसळला आणि त्यांत हजारोंनी शीख लोक मारले गेले. दिल्लीत या हत्यांचे प्रमाण सर्वात जास्त होते आणि काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांवर घाऊक पद्धतीने शिखांची हत्या केल्याचा आरोप होता. त्यानंतर ठक्कर आयोग, नानावटी आयोगसह वेगवेगळ्या यंत्रणांनी शीखविरोधी दंग्यांची चौकशी केली. मात्र काही अपवाद वगळता एकाही मोठ्या नेत्यावर कारवाई झाली नाही. शीखविरोधी दंगे आणि गुरुद्वारा व शिखांची घरे जाळण्यास चिथावणी दल्यिाचा आरोप असलेले माजी खासदार सज्जनकुमार यांची दिल्ली कोर्टाने सबळ पुराव्याअभावी नुकतीच निर्दोष मुक्तता केली.
पंजाबमध्ये खलिस्तानी चळवळ आटोक्यात आली तरी १९८५ ते १९९१ या काळात पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश व देशाच्या इतर भागात अतिरेक्यांनी वैâक बॉम्बस्फोट घडवून आणले, ज्यांत शेकडो लोक मारले गेले. मूळ पंजाबमध्ये शिखांची लोकसंख्या ५८ टक्के असूनही स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीला त्या राज्यात पाठिंबा नाही. मात्र भारताबाहेरच्या काही शीख लोकांचे अतिरेक्यांना छुपे समर्थन आहे. कॅनडामध्ये ब्रेम्पटन, मिसिसौगा आणि ब्रिटिश कोलंबियातील सरे इथे खलिस्तानवाद्यांचा तळ आहे. शिखांची लोकसंख्या कॅनडात साधारणपणे सात लाख ७० हजार, ब्रिटनमध्ये सव्वा पाच लाख, ऑस्ट्रेलियात दोन लाख १० हजारांच्या आसपास आणि अमेरिकेत पाच लाखांच्या आसपास आहे.
अमृतपाल सिंग
जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्या पावलावर पाऊल ठेवून ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेमार्फत स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीसाठी उपदेशक अमृतपाल सिंग प्रक्षोभक भाषणे ठोकत पंजाबमध्ये काही महिन्यांपूर्वी फिरत होता. नंतर या वर्षी एप्रिलमध्ये अटक करण्यात येऊन त्याची रवानगी आसाममधील दिब्रुगढ तुरुंगात करण्यात आली.
आतापर्यंत मारले गेले अतिरकी
आतापर्यंत मारल्या गेलेल्या अतिरेक्यांची संख्या बरीच आहे. त्यात अवतार सिंग (खलिस्तान लिबरेशन फोर्स- ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर हल्ला केल्याचा आरोप), गुरूपतवंत सिंग पनून (खलिस्तान लिबरेशन फोर्स- अतिरेकी कारवायात सक्रीय सहभाग, अमेरिकेतील कॅलिफोर्नियात झालेल्या रस्ते अपघातात मृत्यू), रिपुदमन सिंग (जुलै २०२२मध्ये मारला गेला, १९८५ साली एयर इंडियाच्या टोरोंटो-नवी दिल्ली प्रवास करणार्या कनिष्क बोईंगमध्ये बाँब पेरल्याचा आरोप त्याच्यावर होता, यात ८२ लहान मुलांसह ३२९ प्रवासी मारले गेले, ज्यांत बहुसंख्य कॅनडाचे नागरिक होते). गेल्या वर्षी परमजितसिंग पंजवार (खलिस्तान कमांडो फोर्स) याची पाकिस्तानमध्ये गोळी घालून हत्या करण्यात आली.
अतिरेकी आपआपसातल्या वादापायीही मारले गेले आहेत. म्हणून खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंह निज्जर याची हत्या भारतीय सुरक्षा यंत्रणांनीच केली या कॅनडाच्या आरोपात फारसे तथ्य असेलच असे सांगता येत नाही. मात्र, त्याच्या चौकशीत सहकार्य करण्याची गरज आहे. कोणी कितीही प्रयत्न केले, तरी सद्यपरिस्थितीत स्वतंत्र खलिस्तानची निर्मिती अशक्यच आहे. चुकीची पावले उचलून खलिस्तानचे भूत पुन्हा भारताच्या मानगुटीवर बसवून घेणे उचित ठरणार नाही.
(लेखकाने १९८४ साली ऑपरेशन ब्लू स्टारनंतर पंजाबचा दौरा केला होता.)