तो आणि सलमान दोन्ही एकाच वयाचे. सलमानच्या पहिल्या सिनेमात त्याचे नाव होते प्रेम. हे नाव सिनेमाचे निर्माते दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी ठेवले होते. याचे आईवडील मात्र जितेंद्रप्रेमी होते, कारण त्याचा सिनेमा पाहून ते दोघं प्रेमात पडले होते. अर्थातच मुलाचे नाव त्यांनी जितेंद्र ठेवले. वाचकांना थोडसं आठवत असेल तर उत्तमच, नाहीतर सांगून टाकतो इथेच. नायिकांची घुसळण करत त्यांना दमवून टाकत नाचणारा पहिला फिल्मी नायक म्हणजे जितेंद्र. तसा शम्मी कपूर त्याच्या आधीचा होता पण त्याची स्टाईल जरा संभाल के, नायिकेला खुलवत नेणारी.
सांगायची गोष्ट म्हणजे आपला जितेंद्र म्हणजे जितू बाळ मोठा झाला आणि त्याने सलमानचा ‘एमपीके’ पाहिला. तोच हो, ‘मैने प्यार किया’… पटवर्धनांच्या भाग्यश्रीवर भाळलेल्या सलमानचा. तेव्हा जितूची शाळा नुकती संपलेली होती. त्यांची शाळा फक्त मुलांचीच होती. त्यामुळे मुली दिसल्या की अन्य सार्या मुलांप्रमाणेच जितूची अवस्था होत असे. ही पण चांगली, ती पण चांगली. वर्गातल्यापेक्षा क्लासमधली जास्त चांगली. ग्राउंडवर बागडणारी एखादी दिसली तर तिच्या मागे मुलांचा घोळका लागलाच समजा. ९०ची ही पिढी, तिच्या म्हणून असलेल्या खास आठवणींना सध्या ऊत आलेला आहे. कारण सध्याची एकविसाव्या शतकातील पिढी एकमेकांना आईस्क्रीम किंवा वडापाव भरवत गळ्यात गळे घालून किंवा मिठ्यांचे सामूहिक प्रदर्शन करत कॉलेजसमोरच्या रस्त्यावर भटकायला कमी करत नाही. ते पाहून जितूच्या पिढीतल्या सगळ्यांना एफबीवरती शालेय आठवणींचे उमासेच्या उमासे येऊ लागतात. ती सध्या काय करते? हा गहन प्रश्न ते सोडवू पाहतात. सध्याच्या पिढीतल्या मुलांचा किंवा मुलींचा ‘एव्हरी ट्रायमास्टर ब्रेकअप’ होत असतो. हिचा बीएफ तिच्याबरोबर तर दोघातिघांची नजर एकीवरच असा प्रकार. त्यामुळे त्यांना एकच आलिया चांगली किंवा एकच रणवीरसारखा देखणा, असली काही भानगड राहिलेली नाही. विविध ढाब्यावरची मिसळ खात हिंडणारी ही पिढी मिसळ तर्रीबाज आहे का, नावासारखी श्रीमंत आहे ना, किंवा पाव मऊ आहे का ताजा आहे एवढेच बघते. काहींना सतत मिसळ फारच तिखट लागते. तर ते मॅगी वा पास्ताकडे वळतात. गुळगुळीत, लिबलिबीत न चावता गिळून टाकायचा.
जितूला असं काही पसंत पडण्याचा तो काळ तर नव्हताच, पण तशी शक्यताही नव्हती. जितू कॉलेजात गेला आणि त्याला तिथे बॅडमिंटन खेळणारी एक स्मार्ट मुलगी दिसली वा सापडली. लगेच संध्याकाळी त्याने घरी जाऊन बॅडमिंटन खेळण्याची रॅकेट आणि स्पोर्टस् शूज विकत घेण्याकरता हट्ट धरला. त्याच्या मोठ्या बहिणीने त्याच्याकडे हे काय नवीन आणि बावळट? भलतीच मागणी करतोय तो? अशा नजरेने जितूकडे पाहिले. आईने ऐकून न ऐकून दुर्लक्ष केले. वडिलांनी हातातील पेपर बाजूलासुद्धा न करता या मागणीला न परवडणारे खूळ म्हणून मोडीत काढले. जितूला हे तसे सगळे अपेक्षित होतेच. पण ‘प्रयत्नांती परमेश्वर’ यावर त्याचा विश्वास होता. छान खेळणार्या, छान छान दिसणार्या मुलीचा खेळ कोर्टाच्या कडेला बसून बघणे आणि टाळ्या पिटणे याला तर कोणीच अटकाव करणार नव्हतं. अर्थातच जितूने तो उद्योग चिकाटीने सुरू केला. आईने धाकट्या मावशीला एकदा ‘जितेंद्रच्या सिनेमाची’ आवडलेली गोष्ट ऐकवली होती. ती त्याने पक्की मनात ठेवली होती. पाठलाग न सोडणारा तो जितेंद्र हे मनात ठसले होते.
आपल्या प्रत्येक शॉटला टाळ्या वाजवणारा हा मुलगा कोण, इतपत त्या मुलीचे जितूकडे लक्ष नक्कीच गेले होते. पण त्याला साधे स्माईल देण्याचेही ती कटाक्षाने टाळत होती. जितूच्या पायामध्ये शूजसुद्धा नसतात व साध्याशा जुनाट चपला अन ढगळ पॅन्ट घालून तो बसलेला असतो, हे तिने कधीच तिरक्या नजरेने शटल उचलताना टिपलेले होते.
तीन महिन्यांनी चिकाटी आणि जिद्द उपयोगी पडत नाही हे तसे उशिराच का होईना, पण जितूला उमजले आणि एके दिवशी रात्री बॅडमिंटनच्या तिच्या नाजूक हालचालींचे कढ काढत त्याने वही-पेन समोर ओढले. आईबाबा त्यांच्या खोलीत झोपले होते. बहिणीचे डोळे पेंगुळले होते. आणि त्या वेळेला प्रेमाचा प्रेमभंग झालेला ‘एमपीके’ सिनेमातला शॉट डोळ्यासमोर आणून जितू उर्फ जितेंद्रला पहिली प्रेमकविता झाली. महाराष्ट्राला एक ताजा कोमल मनाचा प्रेमकवी मिळणार हे त्याच क्षणी नक्की झाले. शालांत परीक्षेत बरे मार्क पडले म्हणून जितेंद्रने सगळे घेतात तसा सायन्सला प्रवेश घेतला होता. मात्र सायन्सला अभ्यास करायचा असतो हे त्याच्या गावीसुद्धा नव्हते. त्यातच हे असे तीन महिने बॅडमिंटनच्या कोर्टवर रतीबाच्या टाळ्या वाजवण्यात गेलेले. परिणाम नापासापेक्षा वेगळा होण्याची शक्यता नव्हतीच. जितूचे अकरावीच्या सहामाहीत सायन्सच्या तीनही विषयाखाली लाल रेघ लागली. त्याचा आईलाच प्रचंड धक्का बसला. कारण जेमतेम बीए होऊन सरकारी नोकरीत लागलेल्या माणसाशी तिने लग्न केले होते. ही कोणाला न सांगितलेली बोच तिच्या मनात होती. जितेंद्रचा सिनेमा पाहून केलेले प्रेम नंतर फारसे संसारात उपयोगी पडले नव्हते. बाबांना मात्र फारसा धक्का बसण्याचे कारण नव्हते. मुलाची कुवत त्यांना माहिती होती. पण बायकोचा हट्ट ऐकायचा नियम म्हणून त्यांनी त्याला सायन्सला जायल्ाा परवानगी दिली होती. चला, आता तरी काहीतरी रांगेला लागेल, म्हणून त्यांनी फक्त सुस्कारा सोडला होता.
निकाल, की खेळणारी कन्या?
कोरड्याठाक डोळ्यांनी, शून्य नजरेने जितू बराच वेळ समोरच्या रंग उडलेल्या भिंतीकडे पहात विचार करत होता. हातातील पेन एकदा कपाळाला चिकटवत तर एकदा कानात घालून कान टोकरत सुमारे अर्धा तास गेला. एक उसासा सोडत समोरचे कॉटवरील झोपलेल्या बहिणीने कुशी बदलली अन् दिव्याकडे पाठ करून ती घोरू लागली. तिच्या घोरण्याच्या लयीमध्ये जितूला प्रेमकवितेची पहिली ओळ सापडली.
प्रेम प्रेम प्रेम हे करायचे असते
बॅडमिंटनच्या कोर्टावर ते नसते
प्रेम खरं मोलाचं, नाही तोलायचं
शटल कसं अलगद जातं
प्रेमाचं अगदी तसंच असतं
या जेमतेम पाच ओळी संपता संपता त्याला खूप झोप येऊ लागली. पेनही तसं उघडंच राहिलं. आपसूक वहीवर मान टेकली गेली आणि तो गाढ झोपून गेला. रात्री एक वाजता गुरख्याच्या आरोळीने बहिणीला जाग आली. टेबलावर मान टेकलेला जितू व तसाच राहिलेला दिवा पाहून ती वैतागाने उठली. पण उघड्या वहीकडे नजर गेल्यावर भावाला उठवण्याऐवजी तिने पहिल्यांदा त्या पाच ओळी वाचल्या. भावाबद्दलचा राग मनातून जाऊन त्याच्याबद्दल खूप कणव दाटून आली. बिच्चारा कोणावर तरी प्रेम करतोय. इकडे तीन विषयात नापास झालाय आणि तिकडे प्रेम करतोय. आता आईबाबा काय करतील याचे? ही काळजी तिच्या मनात पहिल्यांदा आली. मग हलकेच पेन टोपण लावून बंद केले. वही मिटली व त्याला धरून मायेने कॉटवर झोपायला नेले. झोपेत आणि स्वप्नात जितू काय बघत होता देव जाणे. पण सकाळी जाग आल्यावर मात्र बंद वही, बंद पेन आणि खोलीत ताई नाही हे खोलीत आलेल्या लख्ख सूर्यप्रकाशासारखे त्याच्या डोक्यात शिरले. ताईने वाचले असेल का? तिला काय वाटले असेल? ती बाबांना सांगेल का? आपले प्रेम गुपित उघडे पडेल का? अशा विविध प्रश्नांचे जाळे डोक्यात भणभणू लागले. पण यातले काहीच घडले नाही. ताई कॉलेजला निघून गेली होती. बाबा ऑफिसची तयारी करत होते. आई स्वयंपाकात गढली होती. मात्र जितूची चाहूल लागल्यावर तिने त्याच्याकरता चहा ठेवला. ‘गरमगरम चहा पी बाळा’ हे शब्द ऐकून तो कावराबावरा झाला.
जितूची रवानगी कलाशाखेत
बाळाचा चहा पिऊन झाल्यावर आईने थेट विषय काढला. ‘जितू रोज कॉलेजात जातोस. अभ्यास करतानाही दिसतोस. मग विषय का राहिले रे बाळा? माझं तुझ्या बाबांशी बोलणं झालं आहे. बाबा आजच तुझ्या कॉलेजमध्ये जाऊन प्राचार्यांना भेटणार आहेत. सायन्स शाखेतून प्रवेश काढून घेऊन कला शाखेमध्ये घेऊयात. तुझी छान प्रगती होईल, असं बाबांनी मला सुचवलं. मलाही ते पटलं. ऐकशील ना तू? बघ मार्कही वाढतील. हातात पदवी आली की पुढे काय करायचं ते बघू आपण. स्पर्धा परीक्षा देऊन छान पद पण काढशील.’
आईच्या या आश्वासक शब्दांनी रात्री अर्धवट झालेली झोप, मनातील अस्वस्थपणा खूप दूर झाला. तेवढ्यात बाबा परत आले. ऑफिसमध्ये कामाची व्यवस्था लावून त्यांनी आज सुट्टी घेतली होती. त्याच दिवशी भावी प्रेमकवी जितेंद्रची रवानागी प्राचार्यांमार्फत कला शाखेत झाली. संध्याकाळी शेवटच्या तासाला जितेंद्र कला शाखेच्या वर्गात शिरला आणि वर्गातील जेमतेम अशी इन मीन तीन मुले आणि ९७ मुली यांनी त्याचे टाळ्या वाजवून स्वागत केले. आधीची तीन मुले एका मागच्या बाकावर कडेला बसली होती. जितूला पाहून पहिल्या रांगेतील एका बाकावरची एक मुलगी उठून मागे गेली आणि उरलेल्या दोघींनी सरकून घेऊन जितेंद्रला बसायला जागा करून दिली. सार्या वर्गाकडे तीनदा नजर टाकूनसुद्धा रिकामी जागा न दिसल्याने जितेंद्रला तिथे बसण्याशिवाय पर्यायच राहिला नव्हता. जितेंद्र तिथे बसला आणि वर्गातल्या सार्या मुलींनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या. आता जितूची भीड थोडी चेपली गेली होती. त्याने हसूनच सगळ्यांना प्रतिसाद दिला. हा सगळा खेळ होईपर्यंत वर्गात मराठी काव्य विषय शिकवणार्या बाईंचे आगमन झाले होते. आपल्याला फक्त समोर पाहायलाच डोळे आहेत, पाठीला डोळे का नाहीत असा प्रश्न तो तासभर तरी जितेंद्रच्या मनात पुन्हा पुन्हा येत होता. तेवढ्यात तास संपल्याची घंटा वाजली.
मुळात मराठी वाचन आवडीने करणारा जितू पाहता पाहता कला शाखेमध्ये रमला आणि रंगला पण. विविध स्पर्धा असोत किंवा वाङ्मय मंडळासारख्या अवांतर गोष्टी यात त्याचा सहभाग सुरू झाला. कॅन्टीनमध्ये एकटा जितेंद्र आणि सभोवती पाच-सहा मुलींचा घोळका हे दृश्य आता नेहमीचे झाले होते. मात्र टपोरे हस्ताक्षर आणि अभ्यासपूर्ण काढलेल्या नोट्स यामुळे त्याच्या चाहत्या मैत्रिणींची संख्या वाढत होती हेही नाकारण्यात अर्थ नाही. तेवढ्यात जानेवारी महिन्यात कॉलेजचे गॅदरिंग आले. मराठी कलामंडळाने ‘कवी कट्टा’, नावाचा प्रकार यंदा आपण पहिल्यांदाच आयोजित करू यात असे गॅदरिंगच्या सेक्रेटरीकडे मागणी करून कळवले. पत्राचा आराखडा व त्याखाली प्रमुख सही होती जितेंद्रची. आजवर हा असा प्रकार कॉलेजमध्ये कधीच न झाल्यामुळे कोण कविता वाचणार अशा प्रश्नाचेही उत्तर त्यानेच देऊन टाकले. काव्यवाचनासाठी आमच्याकडे दहा कविता तयार आहेत. नऊ मुली व तो स्वतः हा तीस मिनिटांचा कार्यक्रम करतील. असे सांगितल्यावर त्याच्याबरोबरच्या मुलींचे च्ोहरे जरा आश्चर्यचकित झाले होते. कारण त्यांच्यापैकी कोणीच कविता केलेल्या नव्हत्या. परत येऊन नेहमीप्रमाणे कॅन्टीनमध्ये विराजमान झाल्यावर जितेंद्रने हातातील वहीचे खुणेचे पान काढले व समोर बसलेल्या एकेकीला तिने वाचण्याची पण स्वरचित कविता ऐकवायला सुरुवात केली. नवथर कवीच्या, नव्या नव्हाळीच्या त्या लोभस कविता ऐकताना सार्याजणी मोहरून गेल्या होत्या. एकेक जण जणू ही कविता आपल्यावरच केली आहे अशा स्वप्नात रंगली होती. जणू काही काव्यगायनाची ती रंगीत तालीमच झाली. कॉलेजमध्ये आलेल्या पहिल्या वर्षाच्या मुलींनी केलेला तो काव्यवाचनाचा कार्यक्रम सगळ्या सीनियर्सनी टाळ्यांच्या कडकडाटात संपन्न केला. जणू एकेक कॉलेज सुंदरीच एकामागून एक रॅम्पवर येत होत्या आणि आपले मनोगत व्यक्त करत होत्या. कल्याणच्या त्या कॉलेजमधील या छोट्याशा कार्यक्रमाची एक बातमी ‘कॉलेज वार्ता’ या सदराखाली मुंबईच्या प्रमुख दैनिकात छापून आली आणि प्राध्यापकांसकट सार्यांनाच आनंदाचे भरते आले. बातमीतील शेवटची ओळ सगळ्यात बोलकी होती, काव्यवाचनाचे संयोजन प्रेमकवी जितेंद्र यांनी केले होते.
मुंबई विद्यापीठ आवारात जितूचा प्रवेश
यथावकाश मराठी विषय घेऊन जितेंद्र बीए झाला. कल्याणहून मुंबईला रोजची जा-ये करण्याऐवजी त्याने विद्यापीठाच्या होस्टेलला एमएसाठी प्रवेश घेतला. तिथे मराठी विषयासाठी खास करून ग्रामीण भागातील मुलामुलींचा भरणा मोठा होता. शहरी बाळबोध मराठी भाषा असलेला जितेंद्र या बिचकलेल्या विद्यार्थ्यांचाही अनभिषिक्त लीडर बनला.
अभ्यासाची पुस्तके रूमवर ठेवलेली तर हातामध्ये एक खास वही कवितांची व झब्ब्याला दोन पेने लटकवलेली असा जितेंद्र विद्यापीठाच्या आवारात कुठूनही ओळखू येत असे. एव्हाना तीन-चार दिवाळी अंकांमध्ये त्याच्या प्रेमकविता प्रसिद्ध झाल्या होत्या. फिजिक्सच्या एका खडूस विद्यार्थ्याने चार मुलींदेखत त्याला प्रश्नही विचारला होता की ‘एका कवितेकरता किती पैसे दिलेस तू दिवाळी अंकाच्या संपादकाला?’ सोबतच्या मुलींनीच त्या खडूसाची परस्पर चांगली कान उघाडणी केली म्हणून जितेंद्रची झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली. पाहता पाहता एमएचे पहिले वर्ष संपले. तेही चांगले मार्क मिळवून.
मूळचा कल्याणचा असलेला जितेंद्र आता विविध गावच्या एमएच्या मित्रांमुळे त्या त्या गावच्या साहित्य मांदियाळीत सामील होऊ लागला. पहिले वर्ष संपल्यानंतर मे महिन्याच्या सुट्टीमध्ये त्यांने कोकणपट्टी व पश्चिम महाराष्ट्रातील सारी जिल्हा साहित्य संमेलने गाजवली. बीए करत असतानाच्या तीन वर्षातील दर आठवड्याच्या ‘पाडलेल्या कविता’ त्याला उपयोगी पडत होत्या. त्यांना त्या त्या गावातील भाषिक बाज देऊन गेय स्वरूपात सादर करण्यात तो आता माहीर झाला होता. दुसरे वर्ष सुरू होत असताना सर्व जिल्हा वृत्तपत्रात त्याचे फोटो झळकले होते. दुसर्या वर्षाच्या दिवाळीमध्ये तब्बल सदतीस अंकांमध्ये त्याची कविता छापून आल्याची बातमीही झळकली. सदतीस अंकाची नावे मात्र कोणालाच परिचित नव्हती.
प्रेमा तुझे रंग किती?
पाडगावकरांचे प्रेम, सलील आणि संदीप यांचे बोलकवितांमधले प्रेम, बालकवींचे निसर्गप्रेम, महानोरांचे रानावरील प्रेम, साने गुरुजींचे आईवरचे प्रेम, ग्रेसचे अबोध प्रेम आणि गुलजारची तनहाई या सार्यांचे सध्याच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘मॅश-अप’ करण्यात जितेंद्र प्रचंड यशस्वी झाला होता. प्रेमाचा जांगडगुत्ता करून झाला आणि एमए संपल्यानंतर आईवडिलांच्या इच्छेनुसार स्पर्धापरीक्षांचा रस्ता न धरता किंवा सरकारी नोकरीच्या मागे न लागता शहापूरसारख्या आडगावी मिळेल ती मराठी लेक्चररची नोकरी त्याने पत्करली. रोज वर्गावर गेल्यावर त्याला एक प्रकारची मानसिक शांतता मिळे. समोरच्या उत्सुक तरुणींचे चेहरे बघताना आपल्याच कॉलेजजीवनाची आठवण येत असे.
दरवर्षी जुन्या कॉलेजनी डच्चू दिल्यावर नवीन ठिकाणी दाखल व्हायचे अशी त्याची भ्रमंती सुमारे बारा वर्षे चालू होती. खोपोली, लासलगाव, तळेगाव, पनवेल, अंबरनाथ, इगतपुरी, उल्हासनगर, कर्जत अशा सार्या गावचे पाणी पिऊन झाल्यावर आणि गावोगावच्या हजारो मुलींना शिकवून झाल्यावर त्याच्या प्रेमात पडलेल्या एकीशी म्हणजेच त्याच्या प्रेमात पडलेल्या शिष्येशी त्याचे रीतसर लग्नही झाले. ती जुनी परंपराही त्याने पुढे चालवली.
एव्हाना आता विविध तालुका आणि जिल्हा साहित्य संमेलनांना अध्यक्ष म्हणूनही त्याची वर्णी लागायला सुरुवात झाली होती. जितेंद्रच्या पायाला लागलेल्या भिंगरीला आईवडील कंटाळले होते. त्यांची इच्छा अखेर सफल झाली. अखेर कल्याणच्या एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून जितेंद्रची नेमणूक झाली. मराठीचा प्राध्यापक, प्रेमकवितांचा मायाळू, कायम गोड बोलणारा, सहृदय, अत्यंत लोकप्रिय कवी, अनेक समारंभांचा हक्काचा अध्यक्ष अशी आता प्रा. जितेंद्रची ओळख आहे. मात्र जितू त्याची शिष्या कम प्रेयसी कम पत्नी, कम लाडक्या दोन मुलींच्या आईशी कधीतरी हळवा होऊन मनातील सल व्यक्त करतो. ती अशी असते. रामदास फुटाणे, अशोक नायगावकर, विठ्ठल वाघ, गुरू ठाकूर अशांना जो मान आणि धन उभ्या महाराष्ट्रात मिळतो, तो मला अजून का मिळत नाही? मी पण पाडगावकरांसारखे गावोगावी प्रेम वाटले. पण ते माझ्याकडे परतले नाही. यावेळी त्यांच्या प्रिय धम&पत्नीकडेही सांत्वनाला शब्द नसतात.
तात्पर्य : कविता एखाद्यालाच प्रसन्न होते व त्याच्याकडे चालत जाते. त्याच्या लेखणीतून झरझर कागदावर उतरते. कवीचा आत्मा असे कागदावरचे शब्द. ते कवीच्या मुखातून ऐकण्यासाठी अजूनच वेगळे नशीब लागते.