कोणत्याही गोष्टीची सुरुवात आपण नेहमी ‘एकदा काय झालं…’ या वाक्यापासून करतो.. हे शब्द ऐकल्यावर नकळत आपण त्या गोष्टीत गुंग होऊन जातो आणि जोपर्यंत ती गोष्ट नक्की काय आहे हे कळल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. या सिनेमातील गोष्टीत नक्की काय झालं, ५ ऑगस्टला प्रदर्शित होणार्या या चित्रपटात अजून काय गमती जमती आहेत हे जाणून घ्यायला या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञांशी संवाद साधला.
डॉ. सलील कुलकर्णी यांनी या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार अशा तिन्ही बाजू समर्थपणे पेलल्या आहेत. योगायोग म्हणजे सलील यांच्या सांगीतिक कारकीर्दीला याच वर्षी पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. सलील म्हणाले, ही आई-मुलगा, वडील-मुलगा यांच्या नात्यांच्या संवादाची फिल्म आहे. ही नाती कधीच बदलत नाहीत. माँटेसरीत जाणारा शिशु असो की चाळिशी उलटलेला प्रौढ माणूस असो, त्याचं जरा जरी बिनसलं तरी ते आई-बाबांना कळतंच. मी गोष्टीतून सगळं सांगतो, चांगली गोष्ट कोणताही संदेश पोहचवू शकते, असं या सिनेमातील बाबांचं म्हणणं आहे. या सिनेमात खलनायक नाही, कटकारस्थान नाही, माणसांची सकारात्मकता दाखवणारा हा संवेदनशील सिनेमा आहे. गोष्टी आवडणार्या प्रत्येक मुलाला आणि पालकांना हा चित्रपट आवडेल याची मला खात्री आहे.
या सिनेमात चिंतन या मुलाचे बाबा साकारणारे अभिनेते सुमीत राघवन म्हणाले, लहानपणी ऐकलेल्या गोष्टी आपल्याला आयुष्यभर साथ देतात असं म्हणतात. चिंतन या लहान मुलाला गोष्टी सांगणार्या किरण या बाबाची ही कथा आहे. त्यांचं असं मत आहे की गोष्ट ही प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन असते. सिनेमात चिंतनाच्या मनात जेव्हा एक अनपेक्षित वादळ उठतं, तेव्हा त्याला गोष्टींमधून उत्तर सापडतं का, तो अडचणीतून मार्ग कसा काढतो, हे पाहण्यासारखे आहे. चिंतनसाठी त्याचा बाबा हा सुपरहिरो आहे. त्याला सेम टू सेम आपल्या बाबासारखं बनायचं आहे. तो कपडे पण सेम घालतो. बोलताना, चालताना, वागताना, बाबाचीच कॉपी करायचा त्याचा प्रयत्न असतो. हा सिनेमा बाबा आणि मुलाच्या नात्यावर नवा प्रकाश टाकणारा आहे.
उर्मिला कोठारे म्हणाल्या, या सिनेमात मी चिंतनची आई आहे, जी शिस्त लावणारी पण त्याच वेळी प्रेमळ देखील आहे. या भूमिकेसाठी निवड करताना दिग्दर्शक सलील कुलकर्णी म्हणाले होते, या सिनेमातील आईच्या डोळ्यात जे ममत्व दिसायला हवं, ते तुझ्याकडे ऑलरेडी आहे. मी खर्या आयुष्यात आई होण्याआधी पडद्यावर आईची भूमिका साकारली आहे. पण आता मला मुलगी (जिजा) झाल्यावर या सिनेमात आईची भूमिका अगदी सहज साकारली गेली, अभिनय करायची आवश्यकताच भासली नाही.
या चित्रपटासाठी प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, सुनिधी चौहान यांनी गाणी गायली आहेत. शुभंकर कुलकर्णी याचाही आवाज एका गाण्याला लाभला आहे. गीतकार संदीप खरे म्हणाले, मी आणि सलीलने जेव्हा जेव्हा नात्यांवर आधारित गाणी बनवली, तेव्हा ती खूप लोकप्रिय झाली. तुम्ही जितकं पर्सनल लिहाल तितकं ते वैश्विक होत जातं. लॉकडाऊनमध्ये लोक सोशल मीडियावर होते, नेटफिक्सवर सिनेमा वेबसीरिज पाहात होते, पण किती वेळ आपण आभासी दुनियेत जगणार? शेवटी माणसाने माणसाशी बोलणं यासारखं दुसरं सुख नाही. नात्यांचं महत्त्व अधोरेखित करणारा हा सिनेमा आहे. गीतकार समीर सामंत यांनी या चित्रपटात रामदास स्वामींच्या मारुती स्तोत्रापासून प्रेरणा घेऊन आजच्या काळाला अनुरूप असे ‘हुंकार करत ये हनुमंता’ हे गीत लिहिलं आहे. हे गाणे मूळ स्तोत्र आणि पौराणिक कथा यांना आजच्या काळाशी सुसंगत मूल्यांचे संदर्भ देत रचलेलं आहे…
सुमीत आणि उर्मिला यांच्याबरोबर बालकलाकार अर्जुन पूर्णपात्रे आणि मोहन आगाशे, सुहास जोशी, मुक्ता बर्वे, पुष्कर श्रोत्री, राजेश भोसले हे कलाकार या सिनेमात झळकत आहेत.