मूळ जमीन निर्वैर असेल, तर तिथे साप आणि मुंगूस यांच्यात वैर नसते, तिथे एकाच मुळीला वट, पिंपळ आणि औदुंबर येऊ शकतात, तसेच प्रशांतचे आहे. अत्यंत सुपीक आणि आत्मकेंद्रित नसलेल्या, निर्वैर असलेल्या प्रशांतच्या मनातून एक नाट्य चळवळ उभी राहिली आणि प्रायोगिक व व्यावसायिक अशी आंबेफणसांची सकस फळे एकाच वृक्षाला लागडण्याचा चमत्कार घडवून गेली. ‘ब्रेक के बाद’ या सदरातील पुरुषोत्तम बेर्डे यांचा हा अखेरचा लेख.
– – –
‘दळवी’ या आडनावाने नाटककार म्हणून पदार्पण केले, तेव्हा त्या आडनावाभोवती मूळत:च लेखक म्हणून एक वलय होतं. विविधांगी लेखन करून ‘दळवी’ हे आडनाव गाजले होते; नाटककार म्हणून, कथा कादंबरीकार म्हणून, विनोदी लेखक म्हणून आणि विशेष म्हणजे ‘ठणठणपाळ’ या टोपणनावाने साहित्यक्षेत्रात दबदबा निर्माण करणारे स्फुटलेखक म्हणून. ‘जयवंत दळवी’ या नावाने एक व्यासंगी साहित्यिक म्हणून नाव कमावले. त्यामुळे ‘दळवी’ असे लेखनकौशल्याचे वलय असलेले आडनाव आणखी कोणा लेखकाचे असू शकेल ही गोष्ट अविश्वसनीय वाटते. पण, याच आडनावाची, तितकीच तोलामोलाची कामगिरी करणारी दुसरी एक व्यक्ती मराठी नाट्यक्षेत्रात नाटककार म्हणून प्रवेश करती झाली, तेव्हा कोणालाच त्या आडनावाचे आश्चर्य वाटले नाही. कारण, हे लेखकही तितकेच व्यासंगी आणि अष्टपैलुत्व घेऊन आलेले. मात्र यांच्यात नाटककाराव्यतिरिक्त आणखी काही वेगळे पैलू पाहायला मिळतात. एक पैलू म्हणजे, एका प्रायोगिक नाट्यसंस्थेचा संस्थापक आणि फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड आणि दुसरा पैलू म्हणजे नाट्य-चित्रपट समीक्षक. त्याचे नाव ‘प्रशांत दळवी’.
तसे पाहायला गेले तर दोन्ही दळवींची तुलना करण्याचे काहीच कारण नाही. दोघेही स्वतंत्र वकुबाचे, भिन्न शैली असलेले लेखक. पण आपल्याला एक जन्मजात सवय असते, एकाच आडनावाचे दुसरे कोणी आले की सामान्यत: हा त्यांचा कोणीतरी असावा असा संशय येऊन विनाकारण उत्सुकता वाढत जाते. इथे तशी वाढली नाही कारण प्रशांत दळवी हे नाव नाट्यक्षेत्रात उदयाला आले तेच मुळात प्रायोगिक रंगभूमीची कास धरून, एका चळवळीतून. औरंगाबादसारख्या महाराष्ट्राच्या उदयोन्मुख शहरातून. त्या काळात मधमाश्यांचे पोळे फुटावे, तसे पुणे-मुंबई सोडून अचानक एकदम औरंगाबादसारख्या शहरातून नाट्य रंगकर्मींचे एक अत्यंत ‘क्रिएटिव्ह’ असे नाट्यरंग-मधाने भरलेले पोळे फुटले आणि रंगकर्मींचा एक ग्रूपच मुंबईला स्थलांतरित झाला. त्या ग्रूपचा पडद्याआडचा सूत्रधार होता नाटककार प्रशांत दळवी.
प्रशांत दळवीच्या नाटकांबद्दल जितके कुतूहल, आकर्षण वाटते आणि जेवढी त्यातली परिपक्वता जाणवते तितकेच ते व्यक्तिमत्वही अत्यंत परिपक्व आणि वयाच्या जवळजवळ पंधरा वीस वर्षे पुढचा काळ बघणारे, दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व वाटते. प्रशांतला आपण दोन फुटांवरून पाहिले तर अगदीच कुठच्यातरी बँकेत हेड ऑफ द डिपार्टमेंट वाटावा; आपण बरं, की आपलं काम बरं, कुणाच्या अध्यात ना मध्यात, असा तो दिसेल. शिवाय खांद्यावर झोळी आणि अंगात जाकीट असा प्रायोगिक लेखकांचा गणवेशही नाही. पण दोनच फुटांवर दिसणारी ही व्यक्ती एकूण साडेपाच फुटांपैकी साडेतीन फूट हिमनगासारखी खोलवर रुतलेली आहे. त्याच्या विचारांना खोली आहे आणि दृष्टीला प्रचंड लांबी आहे. चटकन कशालाही होकार न देणारी आणि विचारपूर्वक नकार देणारी व्यक्ती जर वाममार्गाला गेली, तर हिटलर किंवा दाऊदची वारसदार ठरू शकते; पण त्याच व्यक्तीकडे जर वैचारिक संस्कार उच्च पातळीवरचे असतील, समाजाकडे माणुसकीच्या भावनेने बघायची दृष्टी असेल आणि ती व्यक्ती मनाच्या आहारी न जाता बुद्धिप्रामाण्यावर निर्णय घेणारी असेल तर एक तटस्थ स्थितप्रज्ञ व्यक्ती म्हणून स्फटिकाइतका स्वच्छ पराक्रम गाजवू शकते… आणि हे सर्व मला प्रशांत दळवी या लेखकाकडे दिसले. कुठच्या गोष्टीचा प्रचंड आनंद नाही, कोणत्याही गोष्टीमुळे दु:खात बुडणे नाही. वाचाळता कमी आणि मुद्देसूद बोलणे, मोहक सल्ले आणि परखड प्रतिक्रिया, या अत्यंत कठीण गोष्टी सहज करता येणे स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणे आहेत आणि ती सर्व प्रशांतकडे आहेत. म्हणूनच तीसपस्तीस वर्षांपूर्वी औरंगाबादमध्ये स्थापन झालेली ‘जिगीषा’ ही संस्था प्रशांतने या अंगभूत गुणांनी वाढवली, मोठी केली आणि प्रायोगिक रंगभूमीवर प्रयोग करीत करीत ती व्यावसायिक रंगभूमीवर स्थिरस्थावर करून भरभराटीला आणली. आजवर अशा प्रकारे एक संस्था व त्यातले कलाकार हाताशी धरून पुण्या-मुंबईतल्या अनेक संस्था मोठ्या झाल्या. त्या संस्थांच्या नावाशी तितक्याच तोलामोलाची नावे जोडली गेली. रंगायन/विजया मेहता, आविष्कार/अरविंद देशपांडे, थिएटर युनिट/सत्यदेव दुबे, अनिकेत/ अमोल पालेकर, थिएटर अकादमी/ जब्बार पटेल, सतीश आळेकर, आंतरनाट्य/ राजीव नाईक अशा संस्था आणि त्याला जोडलेली सर्जनशील लेखक-दिग्दर्शकांची नावे. या संस्था आल्या, मोठ्या झाल्या, काही थंड झाल्या, काही बंद झाल्या. त्यांच्याबरोबर जोडलेली नावे मोठी झाली, दिग्गज झाली. मात्र आविष्कार आणि काकडे काका ही एकजीव झालेली संस्था काकडेकाकांइतकीच मुळं धरून राहिली आणि दुसरी ‘जिगीषा’. मात्र जिगीषा संस्थेचे नाव कोणा एकाशी जोडले न गेल्यामुळे ती संस्थाच राहिली आणि स्वयंचलित तत्वाच्या ध्यासाने आजवर कार्यरत राहिली. या संस्थेचा प्रायोगिक ते व्यावसायिक हा स्वच्छ आणि स्पष्ट प्रवास आजतागायत सुरू आहे तो केवळ प्रशांत दळवी या स्थितप्रज्ञ लेखकाच्या सडेतोड मार्गदर्शनामुळे.
वैयक्तिक महत्वाकांक्षा जाग्या झाल्या की संस्था एकखांबी होतात आणि कालांतराने त्यांना तडे जातात. नेमकी हीच गोष्ट दूरदृष्टी असलेल्या प्रशांतने ओळखली असावी आणि स्वत: पडद्यामागे राहून, नाटक सादर करणे हे उद्दिष्ट ठेवून त्याने जिगीषातल्या अनेक कर्तृत्ववान कलावंतांना स्वतंत्र विश्वात भरार्या मारायला सोडून दिले आणि संध्याकाळ झाल्यावर जिगीषा नावाचे घरटे त्यांच्या स्वागतासाठी मोकळे ठेवले. अजित दळवी, चंद्रकांत कुलकर्णी, प्रतीक्षा लोणकर, प्रतिमा जोशी, अभय जोशी, मिलिंद जोशी, मिलिंद सफाई, श्रीपाद पद्माकर, जितेंद्र कुलकर्णी, दासू वैद्य आणि स्वत: प्रशांत दळवी अशी कितीतरी नावे जिगीषाशी जोडली आहेत आणि स्वतंत्र अस्तित्वाने मराठी प्रयोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर दीर्घकाळ कार्यरत आहेत. अगदी त्या संस्थेच्या वयाच्या पस्तीसाव्या वर्षीही. संस्थेचा हा प्रवास देदीप्यमान आहे. टपोर्या मोत्यांच्या माळेतल्या मोत्यांना एका सूत्रात धरून ठेवणारा धागा तितकाच बळकट असावा लागतो. स्वत:चे अस्तित्व दाखवण्याच्या फंदात न पडता ‘आपण आहोत’ ही भावना सतत व्यक्त करणारा संस्थेचा सूत्रधार सारासार विचार करणारा, परिपक्व विचारांचा आणि आत्मकेंद्रित नसलेलाच असावा लागतो; तो प्रशांत दळवीच्या रूपाने दिसतो.
प्रशांतची जवळ जवळ सर्वच नाटके चंद्रकांत कुलकर्णी या अत्यंत अभ्यासू आणि कर्तृत्ववान दिग्दर्शकाने केली. काय कारण असावे यामागे असा प्रश्न मला नेहमी पडत आला. या प्रश्नाचं उत्तर एकच, ‘ट्यूनिंग’… आणि ‘सहप्रवास’… वयाच्या एकविसाव्या वर्षी प्रशांतने पहिले दोन अंकी नाटक लिहिले आणि चंद्रकांत कुलकर्णीने त्याच्या वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ते दिग्दर्शित केले. तिथून लेखक आणि दिग्दर्शक म्हणून दोघांचा सहप्रवास सुरू झाला. त्यानंतरचे प्रशांतने लिहिलेले दुसरे दोन अंकी नाटकही चंदूनेच दिग्दर्शित केले आणि तिथेच बहुधा या लेखक-दिग्दर्शकांचे ट्यूनिंग झाले असावे. प्रशांत नाटक लिहून ते दिग्दर्शकाकडे सुपूर्द करून कधीच गप्प बसला नाही, तर चंद्रकांतबरोबर लिखाणाच्या प्रोसेसपासूनच चर्चा, वादविवाद, आणि पुनर्लेखन चालत असते. शिवाय पुढे तालमीतही लेखक म्हणून कुठेतरी बाजूला बसून, अनेक गोष्टी त्याला दिग्दर्शकाच्या नजरेतून पाहायला मिळते. चंदू दिग्दर्शन करताना संवादांचे स्वरवैविध्य नटांना ज्या पद्धतीने दाखवतो, त्यातून स्वत: लेखकाला, म्हणजे प्रशांतला खूप काही शिकायला मिळाले. तर संहितेतला रेखीवपणा, तिचा तोल, पहिल्या बिंदूपासूनचा नाटकाचा प्रवास प्रशांतमुळे दिग्दर्शक म्हणून चंदूने अनुभवला आणि त्यातून त्याचीही दृष्टी तयार झाली. लेखक-दिग्दर्शकांच्या ट्युनिंगचे हे एक उत्तम उदाहरण आहे आणि याच कारणांसाठी प्रशांत दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी यांची जोडी ही जोडी नसून ‘एकसंघ जुडीच आहे’ असे म्हटले पाहिजे, इतकी ती बांधिलकी घट्ट आहे. त्यामुळे प्रशांतची नाटके चंदूच का बसवतो हा प्रश्नच उरत नाही. त्याचे आणखी एक कारण पुन्हा मूळ तत्वाकडे जाते; ते म्हणजे, नाट्यकला ही सांघिक कला आहे या तत्वावर दोघांचाही ठाम विश्वास आहे.
औरंगाबादमध्ये सुरू झालेला प्रशांतचा नाट्यप्रवास हे त्याच्यावर झालेल्या कौटुंबिक, शालेय आणि महाविद्यालयीन संस्कारांचे फलित आहे. वडील बाबा दळवी हे समाजवादी विचारसरणीचे लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि वर्तमानपत्राचे संपादक होते. त्यामुळे खूप मोठा वडिलोपार्जित ठेवा प्रशांतच्या वाट्याला आला. शिवाय ज्येष्ठ बंधू, लेखक अजित दळवी हेही त्याच विचारसरणीचे आणि युवक क्रांति दलात कार्यरत, त्यामुळे आपोआपच समाजवादी विचारसरणीची मूल्ये मनात रूजली आणि त्यांचे प्रतिबिंब प्रशांतच्या नाटकातून दिसू लागले.
बाबा दळवी यांचा मित्रपरिवार मोठा होता. त्यामुळे थोरामोठ्यांचा वावर घरात सातत्याने असे. मोठमोठे लेखक आणि कलाकार औरंगाबादला आले की बाबांना हमखास भेटत, त्यामुळे प्रशांतचाही अशा लोकांशी सातत्याने संपर्क आला. प्रशांत आणि त्याची मित्रमंडळी औरंगाबादमध्ये जिगीषा संस्थेच्या वतीने नाट्य चळवळीत विविध प्रकारची नाटके करीत होती. औरंगाबादमधील प्रायोगिक रंगभूमीसाठी नाटके करणार्या ज्या काही संस्था आणि रंगकर्मी होते, त्यांनी शेवटपर्यंत स्थानिक पातळीवरच कार्य केले. पण प्रशांतच्या दूरदृष्टीने जिगीषाला आलेले साचलेपण हेरले. स्थानिक पातळीवर जे जे प्रयोग करायचे होते ते करून बघितले आणि त्यानंतर त्याला जाणवले की आता आपल्या प्रयोगांच्या कार्यक्षेत्राच्या कक्षा रूंदावल्या पाहिजेत… आणि मग प्रशांतने निर्णय घेतला की कालांतराने पुढच्या पिढीला आपल्या पराक्रमाच्या गोष्टी सांगत बसण्यापेक्षा कार्यक्षेत्राचा व्यास वाढवावा. जिथे दिवसाला तीन तीन नाट्य प्रयोग होतात अशी व्यावसायिक रंगभूमी आहे, छबिलदास, तेजपाल, पृथ्वी थिएटर्ससारख्या प्रायोगिक संस्थांना वाव देणारी थिएटर्स आहेत, त्या मुंबईसारख्या शहरात जाऊन काही प्रयोग करता येतील का, हे पाहण्याची वेळ आली होती. हा विचार साधा नव्हता, त्यासाठी मोठ्या त्यागाची आवश्यकता होती. घरदार, नोकर्या सोडून मुंबईत जाऊन नव्याने सर्व मांडायचे होते आणि त्यासाठी खडतर कष्टांना सामोरे जायचे होते. घेतला वसा टाकणार नाही, ही त्यांची प्रेरणा होती. प्रशांतचे सर्वांच्या पालकांना भविष्यकाळाविषयी व्यवस्थित समजावून सांगितले आणि सर्व पालकांनी विश्वासही ठेवला, कारण प्रशांतचा एकूण वकुबच तसा होता आणि तो पुढे सार्थही ठरला. त्यावेळी जिगीषाच्या ज्या कलावंतांनी औरंगाबादहून मुंबईला स्थलांतर केले, ती सर्व मंडळी आज नाट्य-चित्रपट क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. त्यांचा उल्लेख वर केलेला आहे.
प्रशांतची आणि माझी पहिली भेट १९८७ साली शिवाजी मंदिरमध्ये ‘टुरटुर’च्या प्रयोगाच्या वेळी विनय आपटेने करून दिली. त्या काळात प्रशांत आणि चंद्रकांत शुक्रवारी रात्री औरंगाबादहून निघायचे आणि शनिवार-रविवारी पाच ते सहा नाटके बघून सोमवारी सकाळी औरंगाबादला पोहोचून आपापल्या नोकरीवर जायचे. त्याच लॉटमध्ये त्यांनी माझी ‘टुरटुर’ आणि ‘मुंबई मुंबई’ ही नाटके पाहिली. विनय आपटेने त्यांची ओळख करून दिली होती, तेव्हा त्यांचे ‘जिगीषा’ हे नाव कानी पडले होते; पण खरी ओळख झाली ती पुढे प्रशांत जेव्हा नाट्य आणि चित्रपट समीक्षक म्हणून लोकसत्तामध्ये लिहू लागला तेव्हा. लोकसत्ताचे संपादक माधव गडकरी यांनी प्रदीप भिडे यांच्यानंतर प्रशांतला नाटकांचे समीक्षण लिहायला सांगितले आणि प्रशांत ते अत्यंत संयत पद्धतीने, अत्यंत जबाबदारीने ते लिहीत होता. खरे तर एखाद्या महत्वाकांक्षी नाटककाराने नाट्यसमीक्षा लिहिणे म्हणजे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान..’ अशा प्रकारची टीकाही होण्याची शक्यता असते. ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर औरंगाबादला प्रशांतच्या घरी आले होते, तेव्हा त्यांनी प्रशांतला सल्ला दिला की तू इतर नाटकांवर समीक्षा लिहिलीस, तर तुला सर्व नाटके पाहावी लागतील, त्याचा परिणाम तुझ्या लिखाणावर होईल. इतकी छान नाटके लिहिणार्या लेखकाने समीक्षा करीत बसणे बरोबर नाही. पण प्रशांतने शांतपणे सल्ला ऐकला आणि त्याला हवे तेच केले. सहा वर्षे त्याने लोकसत्तामध्ये सलग नाट्यसमीक्षा आणि दोन वर्षे चित्रपट समीक्षा लिहिली आणि स्वत:ला हवी तशीच नाटके लिहिली. नाट्यसमीक्षा करताना प्रशांतला वर्षाला ४० ते ५० नाटके पहावी लागत, मात्र त्याने समीक्षा लिहिताना एक खबरदारी घेतली, ती म्हणजे, नाटक भरकटले, किंवा फसले, म्हणजे नेमकं काय, हे शेरेबाजी न करता लिहायचं; ते चांगलं असेल तर नक्की कसे याचे किमान दहा तरी मुद्दे मांडणे तो आवश्यक समजायचा आणि वाईट असेल तर तेही प्रांजळपणे का वाईट आहे, हे त्यातून समजावून सांगायचं. कारण प्रशांतला विधायक समीक्षा लिहिण्यात रस होता, न आवडलेल्या नाटकाची टिंगल-टवाळी करणे त्याने कटाक्षाने टाळले. त्यामुळे त्याच्यातला समीक्षकही परिपक्व होत गेला आणि नाटक लिहिताना त्याच्यातला नाट्यसमीक्षकही त्याच्याबरोबर बसू लागला. तीच गोष्ट सिनेमाच्या परीक्षणाची. मराठी चित्रपट त्या काळात सचिन, महेश कोठारे, दादा कोंडके आणि ‘माहेरची साडी’च्या प्रभावात होते. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये कमलाकर नाडकर्णी वाकडे पाऊल पडलेल्या मराठी चित्रपटांना झोडून काढीत होते, त्यात त्यांनी ‘माहेरची साडी’सारखे चित्रपटही सोडले नाहीत. त्यांच्या समीक्षेत टिंगलटवाळी जास्त असे, आणि एखादा सिनेमा किंवा नाटक आवडले तर ते इतके डोक्यावर घेत की ती समीक्षाही खोटी वाटे. या पार्श्वभूमीवर प्रशांतची संयत आणि विधायक समीक्षा लोकप्रिय होत गेली. त्या काळात त्याला अनेक हिंदी-मराठी चित्रपट नित्यनेमाने पाहायला मिळाले आणि त्यावर समीक्षा करायची संधी मिळाली, त्यातूनच लेखकाने सिनेमाच्या एडिटरबरोबर बसून ते माध्यम शिकावे या मतांवर प्रशांत ठाम झाला. पुढे सिनेमे लिहिताना त्याचा सिनेसमीक्षक म्हणून झालेला दोन वर्षांचा प्रवास त्याला खूप काही शिकवून गेला. त्यातूनच बिनधास्त, तुकाराम, भेट, आजचा दिवस माझा, निशाणी डावा अंगठा यांच्यासारख्या पुरस्कारविजेत्या पटकथा प्रशांतकडून लिहिल्या गेल्या.
‘निशाणी डावा अंगठा’ या कादंबरीवरुन चित्रपट करावा म्हणून मी निर्माता दिलीप जाधव याला त्या कादंबरीचे हक्क लेखक रमेश इंगळे उत्रादकर यांच्याकडून घ्यायला लावले. ही कादंबरी अस्सल ग्रामीण पण मराठी चित्रपटाला नवीन अशा खानदेशी भाषेतल्या उत्कृष्ट विनोदी आणि विडंबनात्मक, बोचर्या संवादांमध्ये होती. बुलडाण्यातल्या शाळेत घडलेल्या सरकारी भ्रष्टाचारावर पटकथा आणि संवाद लिहिणे यासाठी सिनेमाध्यमाचा जाणकार आणि त्याचबरोबर साहित्याचा आस्वादक असा पटकथाकार असावा असे मला वाटले. शिवाय त्या कादंबरीत मुळातच संवादांमध्ये एवढी धमाल होती की त्याचा नुसता चित्रपट होण्यापेक्षा तो चित्रभाषेतला ‘बोलपट’ झाला तरच त्याची मजा कायम राहील अशी माझी ठाम समजूत होती. त्यासाठी माझ्या डोळ्यासमोर तात्काळ प्रशांत दळवी हे नाव आले. मी त्याला त्यासंबंधात विचारले, तर तो आनंदाने तयारही झाला; पण माझ्याबरोबर अजित दळवी यांनाही घेतो, आम्ही दोघे मिळून पटकथा-संवाद लिहितो, म्हणजे सिनेमाच्या सर्व शक्यतांची चर्चा होऊनच संहिता तयार होईल, ही त्याची संकल्पना मला पटली आणि निशाणी डावा अंगठाचे पटकथा संवाद तयार झाले. त्याला शासनाचा पुरस्कारही मिळाला. आजही ‘निशाणी डावा अंगठा’ हा उत्कृष्ट संवादांनी भरलेला चित्रमय बोलपट मोठ्या प्रमाणात चॅनल्सवर आणि युट्यूबवर पाहिला जातो.
प्रशांतच्या आयुष्यात आणखी एक महत्वाचं स्थान असलेली त्याची मैत्रीण आणि पत्नी प्रतीक्षा लोणकर ही तितकीच समर्थ अभिनेत्री आहे. १९९२ साली मी ‘एक फूल चार हाफ’ हा मराठी चित्रपट दिग्दर्शित करीत होतो. त्याचं कास्टिंग सुरू होतं. त्या चित्रपटात चार नायिका होत्या, ऑडिशन सुरू होत्या. एक दिवस अचानक एक अत्यंत देखणी मुलगी ऑडिशनला आली. ‘मी औरंगाबादहून आले, आमची तिथे जिगीषा ही नाट्यसंस्था आहे. आम्ही अनेक प्रायोगिक नाटके केली आहेत, पण मला चित्रपटातही संधी मिळाली तर आवडेल… माझं नाव प्रतीक्षा लोणकर’… तिने करून दिलेली ओळख हीच तिची ऑडिशन ठरली. तिचा आत्मविश्वास पाहून मला तिच्यात खूप मोठी अभिनेत्री असल्याचे जाणवले आणि एका भूमिकेसाठी तिला निवडले. त्या चित्रपटात नाच, गाणी आणि फायटिंगपर्यंत सर्व काही तिला करावे लागले, तिने ते सर्व १०० टक्के करून दाखवले. त्यातूनच पुढे संधी मिळताच तिने ‘भेट’सारख्या चित्रपटात अप्रतिम भूमिका केली. त्यावेळी मी शासनाच्या स्पर्धेला परीक्षक होतो आणि तीच प्रतीक्षा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या स्पर्धेत आम्ही नामांकित केली. या अभिनेत्रीचा नाटकातल्या भूमिकेचा प्रवासही तितकाच संघर्षपूर्ण आणि यशस्वी आहे, याचे कारण तिचाही फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड प्रशांत दळवीच आहे. शिवाय तो तिचा पती असून त्यांना ‘रुंजी’ हे काव्यात्मक नाव असलेली कन्याही आहे.
नाटकाकार म्हणून प्रशांतने ‘चारचौघी’सारखे कथानक नसलेले, पण अत्यंत प्रभावी अशा चार स्त्रियांचा संघर्ष आणि आक्रमक बाणेदारपणा मांडणारे नाटक प्रभावीपणे लिहिलंय. व्यावसायिक रंगभूमीवर अशा प्रकारचे लिखाण असलेले नाटक हजार प्रयोग करूनही थांबत नाही आणि प्रचंड व्यावसायिक यश मिळवते, ही व्यावसायिक रंगभूमी म्हणजे फक्त लोकानुनयी रंगभूमी असे म्हणणार्या वाचाळ पंडितांना चपराकच आहे. प्रशांतमध्ये नेहमीच तीन लेखक दिसले, एक प्रायोगिक नाटककार, दुसरा व्यावसायिक नाटककार आणि तिसरा पटकथाकार. मात्र या तिन्ही लेखकांचा मूळ पाया हा नाट्यलेखक प्रशांतच आहे, असे खुद्द प्रशांतचे म्हणणे आहे. ‘एक नाटक लिहून पूर्ण होण्याचा आनंद सर्वाधिक आहे, याचं कारण नाट्यविषयक प्रेम वगैरे तर आहेच, पण त्याहीपेक्षा, या तिन्ही माध्यमांची आव्हाने वेगवेगळी आहेत, त्यात नाटक लिहिणं मला जास्त आव्हानात्मक आणि अवघड वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे नाटकाचा आरंभबिंदू नाटककार असतो आणि सिनेमाचा आरंभबिंदू अनेकदा दिग्दर्शक असू शकतो. दिग्दर्शकाच्या नजरेतून त्याच्या अपेक्षेनुसार लिहिलेली कथा म्हणजे पटकथालेखन. त्या तुलनेत नाटकाचा लेखक त्या प्रक्रियेत अधिक एकटा असतो, त्यामुळे ती प्रक्रिया अधिक जबाबदारीची असते. मात्र माझं प्रत्येक नाटक लिहिताना चंदूची साथ असते. त्यातही ग्रूपबरोबर चर्चा, वादविवाद आणि पुनर्लेखन हा प्रकार असतोच. त्यातून माझे नाटक फुलत जाते.’
प्रशांत दळवीची प्रायोगिक नाटके बघण्याचा योग आला नाही, कारण त्यातली बरीचशी औरंगाबादमध्ये किंवा मुंबई-पुण्यात स्पर्धेच्या माध्यमातून झाली. नंतर आलेली ‘दगड का माती’, ‘पौगंड’ ही प्रायोगिक नाटके मुंबईत झाली, पण त्यावेळी मी नाटक-सिनेमात इतका व्यस्त होतो की मला ती पाहता आली नाहीत. पण ‘चारचौघी’ आणि त्यानंतरची, ‘ध्यानी मनी’, ‘चाहूल’, ‘सेलेब्रेशन’, ‘गेट वेल सून’ ही सर्व नाटके मी पाहिली आहेत आणि त्यातूनच माझ्या मनात प्रशांतबद्दल काही आडाखे निर्माण झाले आहेत, ते कित्येक वर्षांत बदलले नाहीत. प्रशांत समीक्षक असताना मी त्याच्या संपर्कात आलो तेव्हाही तो त्याच अत्यंत मोजक्या आणि मुलायम शब्दात बोलला. त्यानंतर त्याच्या नाटकांसंबंधीही कधी बोलणं झालं तर तेच स्पष्ट आणि परखड विचार. अलीकडे त्याचं नवीन नाटक ‘संज्या छाया’ आल. नेहमीप्रमाणे चंद्रकांत कुलकर्णीच त्याचा दिग्दर्शक, तीच जिगीषा आणि सोबत अष्टविनायक ही दिलीप जाधवची संस्था. मात्र त्यात एक नवीन बेरीज म्हणजे पार्श्वसंगीतकार म्हणून त्यांच्या ग्रूपमध्ये माझी वर्णी. वर्णी एवढ्याचसाठी की आपल्या नाट्यनिर्मितीच्या प्रक्रियेत एखाद्या नवीन कलाकारास विचारपूर्वक समाविष्ट करणारे हे दोघे आणि त्यांच्या निवडीला पात्र ठरलेला संगीतकार म्हणून ‘मी’ अशी ही निवड म्हणजे कोटा सिस्टिम असूनसुद्धा भारतीय क्रिकेट संघात एकाच राज्याचे दोन खेळाडू घेण्यासारखे आहे; कारण माझ्या जोडीला महान संगीतकार अशोक पत्कीही त्यात आहेत. ‘संज्या छाया’च्या निमित्ताने प्रशांत दळवी एक लेखक म्हणून आणखी जवळून पहाण्याचा योग आला.
गेल्या तीस-पस्तीस वर्षांमध्ये जितकी समृद्धी प्रशांतच्या लेखनात आली, तितकीच त्याच्या पडद्यामागील सूत्रधार असण्यात सुद्धा आली. माझे आध्यात्मिक गुरु, नगरचे श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी म्हटलेलंच आहे की मूळ जमीन निर्वैर असेल, तर तिथे साप आणि मुंगूस यांच्यात वैर नसते, तिथे एकाच मुळीला वट, पिंपळ आणि औदुंबर येऊ शकतात; तसेच प्रशांतचे आहे. अत्यंत सुपीक आणि आत्मकेंद्रित नसलेल्या, निर्वैर असलेल्या प्रशांतच्या मनातून एक नाट्य चळवळ उभी राहिली आणि प्रायोगिक आणि व्यावसायिक अशी आंबे-फणसांची सकस फळे एकाच वृक्षाला लागडण्याचा चमत्कार घडवून गेली. प्रशांत दळवीला मी ‘स्थितप्रज्ञ’ म्हणतो, त्याला एवढे एकच कारण पुरेसे आहे.