□ मुंबईत भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट. मुंबईत दोन वर्षात दीड लाख लोकांना कुत्रा चावला
■ तरीच काही लोक कुत्रा चावल्यासारखे शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या विरोधात बरळत फिरताना दिसतात…
□ पेट्रोल-डिझेलपेक्षा लिंबू झाले महाग! आयात घटल्याचा परिणाम
■ आता जेवणात वरणभातावर दोन थेंब पेट्रोल किंवा डिझेल सोडा चव यायला!
□ मोदीजी स्वत: सत्य बोलत नाहीत वा कुणालाही बोलू देत नाहीत. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणालाही जीव गमवावा लागला नाही हा खोटा दावा ते अजूनही करतात. सरकारच्या कारभारामुळे पाच लाख नव्हे, तर दहा लाख लोकांचा मृत्यू झाला- राहुल गांधी
■ मोदीजी धादांत खोटं बोलतात, हे त्यांच्या सगळ्या चाहत्यांना माहिती आहे… त्या खोटारड्यांचेच तर ते नेते आहेत.
□ मागील दहा वर्षांत भारतातील आत्यंतिक गरिबीचे प्रमाण १२.३ टक्क्यांनी घटले, जागतिक बँकेचा निष्कर्ष
■ तळाचे लोक आत्यंतिक गरिबीतून साध्या गरिबीत आले आहेत, मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय त्याच गरिबीत ढकलले गेले आहेत, त्याचे काय?
□ हिंदूंनो, चार मुले जन्माला घाला; दोन आरएसएसला द्या! सत्यदेवानंद आणि साध्वी ऋतंभरा यांचे विधान
■ जो खेळ आपण खेळत नाही, त्याचे नियम बनवायला जाऊ नये, हसू होते.
□ ब्राह्मण-ब्राह्मणेतरांमधील जातीयवादी विद्वानांच्या मुठीत सापडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना बाहेर काढावे लागेल -श्रीपाल सबनीस
■ आग्र्याहून सुटका सोपी होती, महाराजांची महती सोयीने फिरवून सांगणार्यांच्या तावडीतून सुटका अवघड आहे.
□ भाजपला `सुप्रीम’ झटका. लखीमपूर खेरीमधील शेतकरी हत्याकांडातील मुख्य आरोपी मंत्रीपुत्र आशीष मिश्राचा जामीन रद्द
■ अजून इथले सगळे न्यायाधीश मॅनेज झालेले दिसत नाहीत…
□ वाचनाने आम्ही वाचलो; तुम्हीही वाचा : नवी मुंबईत `जागर २०२२’मध्ये युवा व्याख्यात्यांचे आवाहन
■ वाचा आणि कृतीही करा.
□ जिभेचे चोचले पुरवणे आता कठीण. हॉटेलमधील पदार्थ २५ ते ३० टक्क्यांनी महागणार
■ ते घरी बनवणं तरी स्वस्त आहे की काय?
□ देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाय खोलातच : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही विकास दराचा अंदाज घटवला
■ भोंगा, हिजाब, व्यवसायबंदी, दंगली, मानापमान नाट्ये हे सगळं सुरू झालं की कशावरून लक्ष उडवण्यासाठी सुरू आहे, ते जनतेच्याही लक्षात येतं.
□ सदावर्तेंच्या घरात नोटा मोजण्याचे यंत्र.
■ म्हणजे काय! उलाढालच तेवढी आहे…
□ केंद्राकडून सुरक्षा पुरवणे हे राज्याच्या अधिकारावर आक्रमण- गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
■ त्यांना त्यांच्या पोपटांना त्यांच्याच पिंजर्यांमध्ये ठेवायचं असतं… त्यांच्यावर लक्ष ठेवणं सोपं जातं… ठेवू द्या की.
□ हिंदुस्थानातील सगळे एकाच बापाची औलाद : विरोधी पक्षनेते फडणवीस यांचे वक्तव्य
■ तिकडे दिल्लीत बुलडोझरच्या समोर उभे राहून सांगा हे.
□ केंद्राकडून कर वाढवून लूट -पृथ्वीराज चव्हाण
■ पुन्हा खापर फोडणार राज्य सरकारवर.
□ केंद्रीय मंत्री राणे म्हणतात, जूनमध्ये सरकार पडणार
■ त्यांना पगारच या कामाचा मिळतो.
□ सलूनचे दर ३० ते ५० टक्क्यांनी वाढणार
■ म्हणजे आता दाढीमिशाजटांची फॅशन येणार.
□ आधी मध्य प्रदेश, गुजरातमधील भोंगे हटवा, महाराष्ट्राकडे लक्ष न देण्याची प्रवीण तोगडिया यांची भाजपला सूचना
■ आपलं ठेवायचं झाकून…