जागतिक व्यंगचित्रकार दिन ५ मे रोजी आहे. त्यानिमित्त बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक आयोजित कार्टूनिस्ट कंबाईन यांच्या सहकार्याने भव्य व्यंगचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथील संयुक्त महाराष्ट्र कला दालन येथे दिनांक ४ आणि ५ मे रोजी हे प्रदर्शन रसिकांना पाहायला मिळेल. त्या निमित्ताने कार्टूनिस्ट कंबाईन, कार्टूनिस्ट कॅफे क्लबचे अध्यक्ष संजय मिस्त्री यांनी ‘मार्मिक’साठी लिहिलेला, महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ व्यंगचित्रकार, हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील हा खास लेख.
– – –
मे महिन्याची सुट्टी पडली की आम्ही लहानपणी मामाच्या गावाला आजोळी जात असू. राजापूरला. क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे जन्मगाव. मुलीचं पहिलं बाळंतपण माहेरी करण्याची पद्धत असल्यामुळे माझी आई गरोदर असताना त्याच राजापूरला गेली होती. त्यामुळे माझाही जन्म राजापूरचा. आजूबाजूला शिवाजी महाराजांनी लुटलेली ब्रिटिशांची राजापूरची वखार, दुधासारखी पांढरी शुभ्र नदी, मस्त वनराई, शुद्ध हवा, प्रचंड सांस्कृतिक, कलात्मक वातावरण त्या गावात होतं. काही शहरं, गावं आपला पौराणिक, ऐतिहासिक वारसा जपून आहेत. राजापूर हे असंच ऐतिहासिक गाव. पहिली दुसरीत असताना रानावनात, आमराईत, डोंगरांवर, नदीवर फिरण्याचा मनसोक्त आनंद मिळत असे.
राजापूर शहरातील हायस्कूलमध्ये माझ्या आईचे वडील शिक्षक होते. हायस्कूलची मोठी लायब्ररी होती. शहरात शंभर वर्षांचे जुने वाचनालय, सिनेमागृह, नाट्यगृह अशी सांस्कृतिक, कलांची रेलचेल असायची.त्यावेळी सुट्टीत बाळ कोल्हटकर, चित्तरंजन कोल्हटकर, विद्याधर गोखले, प्रभाकर पणशीकर अशा नामवंत कलाकारांची नाटके होत. कुणीतरी त्या नाटकाची बस आल्याचे सांगे. मग आम्ही मुले त्या कलाकारांना बघायला जात असू. मला स्वाक्षरी गोळा करण्याचा छंद असल्यामुळे मी वही घेऊन जात असे. स्वाक्षरी घेत असे. त्यावेळचे कलाकार प्रेमाने, हसतमुखाने स्वागत करीत. विचारपूस करीत. त्यामुळे केवढीतरी ऊर्जा घेऊन बाहेर पडत असू.
त्यावेळी आजच्यासारखं डिजिटल, सोशल मीडियाचं युग नसल्यामुळे वाचन, संगीत, नाटक, चित्रपट, मनसोक्त गप्पा, डोंगरांवर, नद्यांवर, खाडीवर, समुद्रावर फिरणे, क्रिकेट, लगोर्या, विटीदांडू, पकडापकडी, लंगडी, व्हॉलीबॉल, आबाधुबी, लपालपी, चोरपोलीस हे खेळ खेळणे, रात्री जेवल्यावर अंगणात चांदण्याच्या प्रकाशात आजी, आजोबांकडून त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी ऐकणे, रामायण, महाभारतातील वेगवेगळ्या कथा ऐकणे हाच विरंगुळा असे. ऐकता ऐकता आपणही शूर व्हावे असे वाटू लागे. दुपारी जेवणानंतर बरका किंवा कापा फणस झाडावरून आणण्याचा आणि नंतर कापून खाण्याचा आनंद काही वेगळाच, घराच्या बाजूच्या परसवातून वैâर्या गोळा करणे, त्या कापून नंतर खाणे, काजू पाडणे, त्यांच्या बिया चुलीत भाजून फोडून खाणे यात केवढा तरी आनंद भरलेला असे. मुंबईला परतताना त्या बिया घेऊन येत असे.
आजोबांच्या घरी बर्यापैकी पुस्तक संग्रह होता. चांदोबा, मासिके, दिवाळी अंक येत. ते एकेका वर्षाचे बाईंडिंग करून ठेवलेली असत. असे गठ्ठा बांधलेले अंक एकत्रित बघणे, वाचणे खूपच आनंददायी असे. दुपारी जेवणानंतर वाचायला उड्या पडत. घरातली पुस्तके वाचून झाली की वाचनाची अपुरी राहिलेली भूक भागविण्यासाठी मी गावातल्या सार्वजनिक वाचनालयात जात असे. त्या वाचनालयात मुलांसाठी ‘बाल विभाग’ नावाची वाचनासाठी छोटी खोली होती. आता जशी मुलांसाठी कार्टून्सची वेगवेगळी टीव्ही चॅनेल्स असतात, तशी त्या काळी मुलांची अनेक दर्जेदार मासिके असत. यातला ‘दर्जेदार’ शब्द महत्त्वाचा. त्यामध्ये फुलबाग, मुलांचे मासिक, आनंद, बिरबल, क्रीडांगण… कितीतरी.
एकदा त्या ‘बाल विभाग’ वाचनालयात मुलांची पुस्तके वाचताना बाहेरच्या मोठ्या वाचकांच्या टेबलवर एक साप्ताहिक पाहायला गर्दी जमली होती. वाचकांच्या उड्या पडल्या होत्या. मी लहान असल्यामुळे त्या गर्दीच्या फटीतून घुसून पाहिले तर ते वाचक लाल आणि काळ्या या दोन रंगांतील एक साप्ताहिक वाचत होते. त्याचा मनसोक्त आस्वाद घेत होते. आत सेंटरस्प्रेडला भरपूर व्यंगचित्रांची दोन पानी ‘जत्रा’ होती. पानावर ‘रविवारची जत्रा’ लिहिलेलं होतं. वाचकांना वेड लावणार्या त्या साप्ताहिकाचं नाव निरखून पाहिलं. ते होतं ‘मार्मिक’- व्यंगचित्र साप्ताहिक. संपादक बाळ ठाकरे. किंमत ७० पैसे. मुखपृष्ठावर बाळासाहेब ठाकरे यांचं दणदणीत, बोलकं, प्रभावी, सुंदर व्यंगचित्र, आतमध्ये श्रीकांत अशी ओघवती सही असलेली श्रीकांतजी ठाकरे यांची दोन अर्धपानी व्यंगचित्रे आणि सेंटरस्प्रेड जत्रा, शेवटच्या पानावर श्रीकांतजी ‘शुद्धनिषाद’ या टोपण नावाने लिहीत. त्यात श्रीकांतजींनी हिरो-हिरॉईन्सची केलेली अप्रतिम अर्कचित्रे असत. ती व्यंगचित्रे आणि अर्कचित्रे श्रीकांतजी यांच्या ‘बन्याबापू’ या व्यंगचित्रसंग्रहात पाहायला मिळतील.
वाचकांना खिळवून ठेवणार्या व्यंगचित्र या चित्रप्रकाराने मला मोहून टाकलं. लगेच घरी आल्यावर कागद, पेन्सिल घेऊन रेखाटायला लागलो. मुंबईला आल्यावर वडिलांना दर आठवड्याला ‘मार्मिक’ आणायला सांगितले आणि व्यंगचित्रे काढून त्यावेळी असलेल्या साप्ताहिकांना पाठवू लागलो. त्यावेळी खूप साप्ताहिके होती. मनोहर, सोबत, दिनांक, लोकप्रभा, सकाळ, श्री, स्वराज्य, गावकरी… आणखी कितीतरी. त्यांना पाठवलेली व्यंगचित्रे ‘साभार परत’ येत. त्याने मी हिरमुसला होत असे.
एक दिवस पाच व्यंगचित्रे रेखाटली. ‘मार्मिक’ उघडला. ‘रविवारची जत्रा’ची जी चौकट असे, त्याखाली बाळासाहेब ठाकरे शिवसेना भवनात केव्हा येणार आहेत, ते लिहिलेलं असे. ती तारीख नीट लक्षात ठेवली आणि जुन्या सेनाभवनात, पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये वेळेअगोदरच जाऊन बसलो. दिलीप घाटपांडे तेव्हा तिथे असत आणि मामा असत. शिवाजीच्या पुतळ्याला बाळासाहेब हार घालायला आले की मामा बाजूला राहून तो हार नीट करीत. दिलीप घाटपांडे, मामांनाही माझ्या पोरसवदा, उत्साही वयाचे कौतुक वाटले. त्यांनी मला बाळासाहेबांना भेटू दिलं. त्यावेळी नेते आतासारखे सुरक्षारक्षकांच्या गराड्यात किंवा सामान्यांपासून दूर राहात नसत. आपुलकीने भेटत. ते साल होतं १९७८. मी १४-१५ वर्षांचा होतो. त्यावेळी शिवसेनेचे खासदार नव्हते. काही नगरसेवक होते. त्यांच्याबरोबर मीटिंग झाल्यावर मी बाळासाहेबांजवळ गेलो. त्यांना माझी पाच व्यंगचित्रे दाखवली. त्यातली दोन बाळासाहेबांना आवडली. त्यातले एक व्यंगचित्र पाहून बाळासाहेब मनसोक्त हसले. बाजूला उभे असलेल्या प्रमोद नवलकरांना ते दाखवलं आणि मला म्हणाले, ‘मी मार्मिकचं काम पाहात नाही. तू श्रीला नेऊन दे.’ बाळासाहेब श्रीकांतजींना ‘श्री’ म्हणत असत.
‘मार्मिक’चा त्यावेळचा पत्ता माझ्या अजूनही तोंडपाठ आहे. ‘७७ ए, रानडे रोड, दादर पश्चिम, मुंबई’. त्या पत्त्यावर गेलो. दार राज ठाकरे यांच्या आईने उघडलं. त्यांच्या हातात पुस्तक होतं. त्या दुपारच्या वाचत बसल्या होत्या. माझं हसून त्यांनी स्वागत केलं. मागून श्रीकांतजी आले. श्रीकांतजी कडक आवाजात बोलत. पण मनाने मृदू होते. माझ्यावर अक्षरश: ओरडलेच. ‘काय रे, अभ्यास बिभ्यास नाही? काय उन्हातान्हातून फिरतोस?’ माझा चेहरा खाडकन पडला. तो त्यांच्या लक्षात आला. श्रीकांतजींनी मला घरात बोलावलं. त्यांच्या हॉलमध्ये शाळेत असतो तसा बेंच होता. त्यावर बसायला सांगितलं आणि त्यावर मला काही रेषा अशा काही दाखवल्या की ज्यातून बघता बघता जादूसारखं व्यंगचित्र तयार झालं. ते मी आजही विसरलो नाही. ती रेषांची जादू, रेषांचा चमत्कार होता. मला व्यंगचित्रांचे मार्गदर्शन केलं.
श्रीकांतजींनी बाळासाहेबांनी पसंत केलेली दोन्ही व्यंगचित्रे पाहिली. त्यावरची सही छोटी करायला सांगितली. बाळासाहेब नेहमी सांगत, व्यंगचित्रकार हा सहीपेक्षा रेषेवरून ओळखता यायला हवा. बाळासाहेब जे व्यंगचित्र पाहून हसले, ते कोणतं ते सांगतो. त्या व्यंगचित्रात मी एक आई दुपारची पाठमोरी झोपलीय आणि एक पंधरा वर्षांचा भाऊ ओणवा झाला आहे, असं दाखवलं होतं. त्याच्या पाठीवर त्याचा १० वर्षांचा भाऊ फळीवरचा लाडूचा डबा टाचा उंच करून काढण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याचा हात त्या लाडूच्या डब्यापर्यंत पोहोचत नाही. तेव्हा तो मान खाली वाकवून मोठ्या भावाला सांगतोय, ‘दादा, आपल्याला आणखी एक भाऊ हवा होता रे!‘ हे व्यंगचित्र पाहून बाळासाहेब मनसोक्त हसले होते.
त्यानंतर ‘मार्मिक’मध्ये लगेच श्रीकांतजींनी ते व्यंगचित्र छापलं. त्यामुळे मी उत्साहाने आणखीन व्यंगचित्रे प्रत्यक्ष घेऊन जात असे. त्यावेळी मला ते सांगत, ‘अरे, पहिली दिलेली तरी छापून होऊ देत.’ ‘मार्मिक’मध्ये व्यंगचित्रे छापून आल्यानंतर माझी व्यंगचित्रे जवळपास सगळ्याच नियतकालिकांत छापून येऊ लागली. बाळासाहेबांच्या त्या भेटीचा माझ्यावर प्रचंड प्रभाव पडला. त्यानंतर बाळासाहेब जिथे जिथे भाषणाला जात तिथे मी जात असे. एक तास अगोदरच… म्हणजे मला पहिल्या रांगेत बसायला जागा मिळत असे.
थोडी आत्मस्तुती करतो. ती आत्मप्रौढी समजू नका. मला त्यातून बाळासाहेबांच्या मनाचा मोठेपणा सांगायचा आहे. छोट्या छोट्या कलाकारांना बाळासाहेब कसे दाद देत ते सांगायचे आहे. अनेक वर्षांपूर्वी गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात सुप्रसिद्ध लेखक रमेश मंत्री आणि साहित्य संघ मंदिराचे घैसास यांनी एक विनोदी संमेलन भरवलं होतं. त्याला बाळासाहेब अध्यक्ष होते. मी ऐन तारुण्यात बावीस वर्षांचा होतो. परफॉर्मिंग आर्टची आवड असल्यामुळे गॉगल, रंगीबेरंगी शर्ट्स घालत असे. माझं ते व्यक्तिमत्व पाहून बाळासाहेब जाहीरपणे सगळ्यांसमक्ष म्हणाले, ‘संजय, तुझी पर्सनॅलिटी चांगली आहे. तू फिल्मलाईनमध्ये जा. उद्या येऊन मला बंगल्यावर भेट.’ या प्रसंगाच्या वेळी तिथे दाजी भाटवडेकर, प्रमोद नवलकर, माझे व्यंगचित्रकार मित्र विकास सबनीस, विवेक मेहेत्रेही होते. हे दोन व्यंगचित्रकार मित्र साहेबांच्या मला दाद देण्याच्या प्रसंगाला ‘साक्षी’ आहेत.
एकदा दादरला एक जाहीर कार्यक्रम होता. त्यावेळी मी दै. ‘लोकसत्ता’त व्यंगचित्रे काढत असे. अनेक वर्षे माझं सदर लोकप्रिय होतं. त्यामुळे आयोजकांनी मलाही बोलावलं होतं. बाळासाहेबांसमोर मला प्रात्यक्षिक दाखवण्याची संधी दिली. माझं भाषण ऐकून बाळासाहेब प्रभावित झाले आणि कार्यकर्त्यांकडे बघून मिश्किल हसत म्हणाले, ‘संजय छान बोललास. याला आपल्या पक्षात घ्या रे!’ त्यावेळी प्रचंड हंशा आणि टाळ्या आल्या. माझ्यासारख्या त्यावेळच्या नवख्या कलाकाराला दाद द्यायला त्यांचं मन तयार झालं होतं.
गिरगावातल्या एका कार्यक्रमात माझं व्यंगचित्र प्रात्यक्षिक झाल्यानंतर बाळासाहेब चर्चिलचा डेमो दाखवायला लागले. आयोजकांनी ठेवलेला मार्कर चालेना. तेव्हा साहेबांना मी माझा मार्कर पटकन दिला. तो घेऊन बाळासाहेबांनी चर्चिलचे अफलातून व्यंगचित्र रेखाटलं. तो मार्कर मी आजही जपून ठेवलाय. त्यावर स्टिकर लावून ठेवलाय, ‘मा. बाळासाहेब यांनी वापरलेला मार्कर.’
त्यावेळी आतासारखी कडक सुरक्षा नव्हती आणि मी बाळासाहेबांचा प्रचंड चाहता असल्यामुळे बाळासाहेबांची पत्रकार परिषद असली की मी पत्रकार नसलो तरी पहिल्या रांगेत निव्वळ बाळासाहेबांना पाहता, भेटता यावं म्हणून जात असे. बर्याच वेळा पाहिल्यामुळे बाळासाहेबांना मी पूर्ण परिचयाचा झालो होतो. त्यावेळी होतकरू व्यंगचित्रकार होतो. बाळासाहेब हॉलमध्ये आल्यावर पहिल्यांदा माझ्याकडेच बघत. कारण मी तशीच जागा पकडून बसलेला असे. आल्यानंतर बाकी व्यंगचित्रकारांची आवर्जून चौकशी करत, खास करून विकास सबनीस यांची. बाळासाहेब विचारत, `विकास कुठे आहे. त्याला घेऊन एकदा भेटायला ये.’
एकदा मी विकास सबनीस आणि यशवंत सरदेसाई या व्यंगचित्रकारांबरोबर बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर गेलो होतो. त्यावेळी तिथे चित्रकार रवी परांजपेही बसले होते आणि अभिनेत्री हेमा मालिनीही बसली होती. बाळासाहेबांनी आमची तिच्याशी ओळख करून दिली. बाळासाहेब काय म्हणाले माहित आहे का? `हे माझे मराठी व्यंगचित्रकार आहेत.’ त्यावर हेमा मालिनी उत्स्फूर्तपणे उद्गारली `वॉव! कार्टूनिस्ट! वन्डरफुल!!’ आम्ही बाहेर पडलो, त्यावेळी बंगल्याबाहेर हेमा मालिनीशी एक मिनिटाचा संवाद झाला. ती म्हणाली, `मला कार्टून्स खूप आवडतात. माझ्याकडे शंकर या व्यंगचित्रकाराची स्वाक्षरी आहे, जी मी शाळेत असताना घेतली.’ त्यानंतर आम्ही रवी परांजपे यांच्या गाडीत बसून दादरला आलो. गाडीत आमचा विषय बाळासाहेबांच्या हा स्वच्छ पारदर्शी भव्य मनाचाच होता.
एकदा पुण्याचे शिवसेना नेते प्रकाश देवळे यांनी बाळासाहेबांना साठ वर्षे पूर्ण झाली म्हणून बालगंधर्व कला दालनात `बाळासाहेब’ या विषयावरील व्यंगचित्रांचे प्रदर्शन ठेवले होते. त्यावेळी मराठीत मोजकेच व्यंगचित्रकार होते. बाळासाहेबांच्या हस्ते शि. द. फडणीस, द. अ. बंडमंत्री, खलील खान, मी आणि विजय पराडकर यांचा सत्कार केला होता. त्यावेळची एक गंमत आहे. कार्यक्रम शिवसेनेचा असल्यामुळे हॉल पूर्णपणे शिवसैनिकांनी भरला होता. आम्हा व्यंगचित्रकारांना कुणी आत सोडेनात… मग काय करणार?… तेव्हा शि. द. फडणीस म्हणाले, थांबा… मी मागच्या दाराने जाऊन बाळासाहेबांना भेटतो. बघूया काय म्हणतात ते. त्याप्रमाणे शि. द. फडणीस सभागृहात गेले. बाळासाहेबांना भेटले आणि परत हसत म्हणाले, चला… या आत, बाळासाहेबांनी बोलावलंय. आम्ही पाच सहा व्यंगचित्रकार बालगंधर्वच्या व्यासपीठाजवळच्या दरवाजाजवळ आलो. तर पहिली रांग फुल्ल. बाळासाहेब स्वत: माईकवरून म्हणाले, `ही पहिली रांग रिकामी करा. हे व्यंगचित्रकार आहेत. यांना बसू द्या.’ विचार करा, बाळासाहेबांचे हृदय किती विशाल असेल.
विकास सबनीस आणि मी अगदी जिवश्चकंठश्च मित्र. आठवड्यातून पाच वेळा हमखास भेटत असू. चार-चार तास गप्पा मारत असू. सबनीसांची एक मोटार सायकल होती. ती ते चालवत. मागे मी बसलेला. आम्ही माहीमहून एका मैदानावरील हँडलूम प्रदर्शन पाहून येत होतो. कारण सबनीस यांना गळ्यातल्या आकर्षक पिशव्या घ्यायचा छंद होता. मला नको असली तरी माझ्याही गळ्यात मारत. आम्ही त्या प्रदर्शनाहून दादरला परतत होतो, तेव्हा बाळासाहेब सभेला चालले होते. विकास सबनीस खूप उंच. पटकन लक्षात येत. आम्हाला पाहून बाळासाहेबांनी क्षणभर गाडी थांबवली आणि आमच्याकडे बघून म्हणाले, `हे काय. लवकर गाडी घ्या. व्यंगचित्रकाराकडे गाडी असली पाहिजे.’
पुण्याच्या सरस्वती लायब्ररीचे वैâलास भिंगारे दरवर्षी व्यंगचित्रकारांचे संमेलन घेत. ते माझे खास मित्र असल्यामुळे त्यांची आमंत्रणे द्यायला मी सोबत असे. एका संमेलनाचे आमंत्रण द्यायला आम्ही दोघे मातोश्रीवर गेलो होतो. जुन्या मातोश्रीवर तेव्हा बाळासाहेबांकडे परदेशांतील काही माणसे आली होती. बाळासाहेब त्यांच्याशी बोलत होते. आम्ही गप्प बसून होतो. मी सोबत कागद, पेन नेलं होतं. अशासाठी की बाळासाहेबांचे लाइव्ह कॅरिकेचर करायची संधी मिळाली तर करायचं. बाळासाहेब. त्या परदेशी पाहुण्यांशी बोलत असताना मी कागदावर बाळासाहेबांचे अर्कचित्र करायला घेतलं. पण नीट होत नव्हतं. पेनचा आवाज आला की बाळासाहेब डिस्टर्ब होत. म्हणून मी ते अर्कचित्र काढणं थांबवलं. बाळासाहेबांच्या ते लक्षात आलं. म्हणाले, `थांबू नको. बघतो कसं काढतोस ते?’ अर्कचित्रं नीट येत नव्हती. म्हणून एकापाठोपाठ एक चार पाच केली. एक रिअलॅस्टिक केलं. म्हटलं, चार-पाच केली तर एक तरी बरोबर येईल. त्यांनी ती सगळी अर्कचित्रे पाहिली. त्यातल्या चुका काढल्या. एक अर्कचित्र पाहून म्हणाले. `हे जमलंय. पण, हा नुसता चेहरा काढलास. खाली काहीतरी दाखव ना!’ म्हणून मी वाघ दाखवला. त्यावर बाळासाहेबांची स्वाक्षरी घेतली. बाळासाहेब म्हणाले, `मला एक कॉपी दे.’ ते अर्कचित्र असंच कसं देणार? म्हटलं चांगली फोटोफ्रेम करून देऊ.` म्हणून शिवसेना भवनाच्या खाली असलेल्या फोटो फ्रेमवाल्याकडून छान फोटोफ्रेम बनवून घेतली आणि म्हटलं, बाळासाहेबांना देऊ. पण त्यानंतर बाळासाहेबांची वाढलेली सिक्युरिटी, वाढता देशव्यापी राजकारणाचा व्याप, सभा, त्यांची ढासळती तब्येत यामुळे मातोश्रीवर अनेकवेळा फोन करून भेट मिळेना. म्हणून मीही निराश होऊन थांबलो. एका दिवशी त्र्यंबक शमी नावाच्या व्यंगचित्रकर मित्राचा फोन आला, `संजय, मी बाळासाहेबांना जीवनगौरव पुरस्कार देतोय. तुम्ही या. `त्यावेळी मी, प्रशांत कुलकर्णी, प्रभाकर वाईरकर, विवेक मेहेत्रे, विन्स असे निवडक व्यंगचित्रकार आमंत्रित होतो. त्यावेळी बाळासाहेब खूप थकलेले दिसत होते. उद्धवसाहेब त्यांची खूप काळजी घेत होते. ते स्पष्ट दिसत होतं. बाजूलाच बसले होते. साहेब अनईझी झाले की उद्धवसाहेब, साहेबांचा हात धरून उशी नीट करीत. एकदा तर आतून आणखी एक उशी आणावी लागली. इतके साहेब अस्वस्थ दिसत होते. त्यामुळे मी ती अर्कचित्राची फोटोफ्रेम न देण्याचा निर्णय घेतला. त्यांना त्रास देणं योग्य वाटलं नाही. पण माझ्या बाजूला विन्स हा जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार बसला होता. तो म्हणाला, `संजय आताच दे ही फोटोफ्रेम.’ पण मला थकलेले बाळासाहेब पाहून धाडस होईना. म्हणून फक्त म्हणालो, साहेब… साहेबांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं. मग खुर्च्यांतून वाट काढत मी ते चित्र बाळासाहेबांच्या हाती दिलं. बाळासाहेबांनी त्यातली प्रत्येक रेषा, व्यंगचित्रकाराच्या नजरेतून पाहिली.
एकदा बाळासाहेबांकडे मी आणि विकास सबनीस गेलो असताना सबनीस सहजपणे म्हणाले, `साहेब, संजयच्या हातात जादू आहे. जादूही चांगली करतो.’ बाळासाहेब लगेच म्हणाले, `उद्या सकाळी नऊ वाजता ये.’ दुसर्या दिवशी गेलो. त्यावेळी बाळासाहेबांनी नातवंडांना माझे जादूचे प्रयोग बघायला बोलावलं होतं आणि मी साहेबांच्याच खोलीत छोटे छोटे जादूचे प्रयोग दाखवले. बाळासाहेबांच्या घराचा सुसंस्कृतपणा म्हणजे त्यातील एक नातू मी निघताना मला बंगल्याच्या गेटपर्यंत सोडायला आला.
मी `मार्मिक’मध्ये अनेक वर्षे काम करत होतो. पंढरीनाथ सावंत आणि वसंत सोपारकर त्यावेळी `मार्मिक’चं काम बघत. मी आणि विकास सबनीस व्यंगचित्रे पाहात असू. आमची छान टीम जमली होती. पंढरीनाथ सावंत हे प्रबोधनकारांचे लेखनिक म्हणून काम करीत. त्यामुळे त्यांच्याकडे बाळासाहेबांच्या दुर्मिळ आठवणींचा खजिना आणि मी बाळासाहेबांचा प्रचंड चाहता आणि सावंत हे मिश्किल हजरजबाबी. त्यामुळे `मार्मिक’मध्ये कायम खेळीमेळीचं व्यंगचित्र साप्ताहिकाला साजेसं वातावरण असायचे. सावंतांना मी बाळासाहेबांबद्दल विचारून भंडावत असे.
एका वर्षी राज ठाकरे यांची जुन्या सेनाभवनाच्या गच्चीवर झेंडावंदनाचा कार्यक्रम १५ ऑगस्ट रात्री बारा वाजता ठेवला होता. बाळासाहेब पावणेबारा वाजता आले. आमचं `मार्मिक’चं ऑफिस लिफ्टला लागूनच होतं. बाळासाहेब प्रथम `मार्मिक’मध्ये आले. त्यांनी पूर्ण ऑफिस पाहिलं. `मार्मिक’ला लागूनच भारतीय कामगार सेनेचं कार्यालय होतं. तिथल्या पदाधिकार्यांना बोलावून ‘मार्मिक’चे कार्यालय नव्याने बनवायला सांगितलं.
ऑफिस बनल्यानंतर एका वर्षी बाळासाहेब सेनाभवनात आले आणि त्यांनी पंढरीनाथ सावंत यांच्याकडे पाहात विचारलं, ‘पंढरी, काय खूष ना आता!’
बाळासाहेबांचं पंढरीनाथ सावंत यांच्यावर खास प्रेम होतं हे मी जवळून पाहिलंय. सावंत आणि सोपारकर या दोघा संपादकांच्या वेगवेगळ्या केबिनच्या बरोबर मध्यावर जुन्या सेनाभवनात मी बसत असे. दोघेही जुने मित्र, प्रतिभावंत. त्यामुळे ‘मार्मिक’मध्ये आम्ही धमाल करत असू. खेळीमेळीचं वातावरण असे. हेमा काटकर पत्रकार म्हणून होती. मोहन आणि सुरेशही बाकीचं काम बघत. सुरेश दर गुरुवारी सकाळी मातोश्रीवर ‘मार्मिक’चा पहिला अंक घेऊन जात असे. कारण बाळासाहेबांना गुरुवारी तो टेबलावर लागे.
‘मार्मिक’चा वर्धापनदिन षण्मुखानंद हॉलमध्ये दरवर्षी व्हायचा. आम्ही घरचेच असल्यामुळे विकास सबनीस आणि मला बाळासाहेबांना जवळून भेटता येत असे. एवढ्या मोठमोठ्या नेत्यांच्या गर्दीतही, राजकीय वातावरणातही आम्हा ‘मार्मिक’ परिवाराची बाळासाहेब दखल घेत, ही न विसरता येण्यासारखी गोष्ट आहे.
बाळासाहेब हे व्यंगचित्रकलेचं विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठातून अनेक विद्यार्थी बाहेर पडले. त्यातलाच मी एक कमी मार्काने पास झालेला बाळासाहेबांचा विद्यार्थी.