जंगल पर्यटन म्हणजे केवळ वाघ किंवा प्राणी पाहणे नाही, निसर्गाविषयी तरुण पिढीत आत्मीयता निर्माण व्हावी, झाडे, पक्षी, प्राणी हेही आपल्या वसुंधरेचा भाग आहेत याची जाणीव निर्माण व्हावी यासाठी जंगल पर्यटन महत्त्वाचे आहे. आज शिरीष यांनी वयाची साठी क्रॉस केली असली तरी त्यांना भेटल्यावर त्यांचा उत्साह, कामाचा आवाका पाहता, ‘फिफ्टी इज न्यू फोर्टी’, असं न म्हणता, ‘सिक्स्टी इज न्यू थर्टी’ असं म्हणावंसं वाटतं…
– – –
मंत्रमुग्ध…! मेस्मराईज्ड!…
पहिल्यांदा व्याघ्रदर्शन झाल्यावर मला हेच वाटलं… तो अनुभव माझ्या आजतागायत स्मरणात आहे, पहिल्यांदा कुटुंबासोबत, मग तीन-चार वेळा एकट्याने जाऊन वाघांना भेटून आलो पण तरीही ते रूप पुन्हा पुन्हा बघावसं वाटत राहायचं… अगदी माझ्यामागे वाघ लागला होता असं म्हणालात तरी हरकत नाही… ज्या कुणाला माझ्या व्याघ्रपर्यटनाची कहाणी ऐकवली ते सगळेच आम्हालाही जंगलातला वाघ बघायचा आहे, तुला एवढा अनुभव आहे तर तू सोबत चल, असा आग्रह करत होते. पहिली व्यावसायिक सफारी आमचे फॅमिली डेंटिस्ट डॉ. अमित टिपणीस यांच्यासोबत २६ एप्रिल २०१५ साली झाली, जंगल सफारीत त्यांना सर्व फेरींमध्ये वाघ दिसला, हा अनुभव आणि फोटो त्यांनी त्यांच्या मित्रपरिवारात सांगितल्यावर तर अनेक लोकांकडून विचारणा होऊ लागली, तेव्हा वाटलं सेकंड इनिंगसाठी, वाइल्डलाइफ टुरिझम‘ हाच व्यवसाय का करू नये? या धंद्यात निसर्ग, भटकंती आणि व्यावसायिक समाधान या तिन्ही गरजा पूर्ण होत आहेत… शिरीष जोशी उत्साहाने मला त्यांच्या व्याघ्रपर्यटन व्यवसायाबद्दल सांगत होते, सेकंड इनिंग्ज म्हटल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल की हा त्यांचा मूळ व्यवसाय नाही, सिंडिकेट बँकेतील सरकारी नोकरी सांभाळून, शिरीष यांनी बर्याच क्षेत्रात मुशाफिरी केली आहे. नाटक, सिनेमा, मालिका यात काम करणं, व्यवस्थापन करणं आणि क्रिकेटमधील जागतिक खेळाडूंसोबत यांचा गोतावळा आहे. खरं तर त्यांच्या याच बिनधास्त मुशाफिरीमुळे आज ते या पॅशनेट व्यवसायात चांगले यश प्राप्त करू शकले आहेत.
शिरीष जोशी यांचा जन्म १९६० सालातला, घर- ग. द. आंबेकर नगर परळ. शाहीर साबळे, शिवाजी साटम असे अनेक कलावंत कॉलनीत राहायचे, प्रत्येक सणाला सांस्कृतिक कार्यक्रम सादर व्हायचे, या सांस्कृतिक वातावरणात वाढलो. नाटक-सिनेमा पाहायची आवड तिथेच जोपासली गेली, शाळा- राजा शिवाजी विद्यालय, दादर. शाळेची आठवण सांगताना शिरीष म्हणाले, ‘मी अकरावीला असतानाची गोष्ट आहे, सव्वा दहाला घरून निघायचो, वाटेत शारदा टॉकीजला ‘शोले‘ लागला होता, साडेदहाला… मॅटिनी बघून मग थिएटरमध्येच आईने दिलेला डबा खायचा… दीड वाजता शोले सुरु व्हायचा… बरोब्बर पाच वाजता अमिताभ मरायचा, तेव्हाच शाळा सुटायची आणि मी घरी जायचो. असा मी तीस वेळा शोले पाहिला. शाळेत परीक्षेचा फॉर्म भरायची वेळ आली, बाईंनी आईला शाळेत बोलावलं. त्या दिवशी बाईंनी जी काही शाळा घेतली त्याने आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, तेव्हाच मी शपथ घेतली की आजपासून आईबाबांना वाईट वाटेल असं कृत्य करणार नाही. एफवायला रुईया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. शाळेपासूनच क्रिकेटची आवड होती. कॉलेजमध्ये सिनियर आणि ज्युनिअर अशा दोन टीम होत्या, सिनियर टीममधे दिलीप वेंगसरकर, राजू कुलकर्णी असे अनेक दिग्गज खेळाडू होते त्यामुळे तिथे माझा नंबर लागला नाही. ज्युनिअर टीममधे विनय येडेकर, लालचंद राजपूत, अजित तेंडुलकर होते, पण मी सिनियर असल्यामुळे इथेही माझा नंबर लागला नाही. क्रिकेट आणि क्रिकेटर्स यांची साथ मात्र कायम राहिली.
कॉलेज सुरू असतानाच मला सिंडिकेट बँकेत २७ मार्च १९८२ रोजी काळबादेवी ब्रँचमधे नोकरी लागली. रुईयाचा कट्टा सोडून मी शिवाजी पार्कच्या जिप्सी कट्ट्यावर जायला लागलो, तिथे वर्गमित्र समीर वसंत सबनीस, विनय येडेकर आणि अवि कदम यांच्याशी गट्टीr जमली. विनोद कांबळी तेव्हा कांजूरमार्गला राहायचा. तिथून रोज शिवाजी पार्कला प्रॅक्टिसला येणं त्रासदायक होतं, तेव्हा अवि कदमने वरळीच्या बीडीडी ३६ नंबर चाळीतील त्याच्या घरी विनोदला राहायला नेलं. तेव्हा सचिन तेंडुलकर जिप्सीसमोरच्या इंद्रवदन सोसायटीत आत्येकडे राहायचा. सचिनचा मोठा भाऊ अजित मित्र असल्यामुळे सचिन आणि विनोद कांबळी यांच्यासोबत आमची छान मैत्री झाली. आम्ही त्यांच्या मॅचेस पाहायला जायचो. त्या दोघांची भारतीय संघात निवड झाली. विनोदने माझी अनिल कुंबळेसोबत ओळख करून दिली. पहिल्याच भेटीत आमच्या छान गप्पा झाल्या. मॅच पाहायला गेलो की अनिल भेटायचा, मुंबईला आला की आवर्जून फोन करायचा. अनिलमुळे भारतीय संघातील इतर दक्षिणात्य खेळाडूंसोबत मैत्री जुळली. त्यांना व्हेज जेवण आवडायचं. वानखेडेवर सामना असेल तेव्हा मी काळबादेवी ब्रँचजवळच्या कामत हॉटेलमधून त्यांच्यासाठी नाश्ता, जेवण घेऊन जायचो.
एकदा रणजी मॅच खेळण्यासाठी अहमदाबादला जाताना अनिल, श्रीनाथ रात्री मुंबईत विमानतळावर उतरले. कनेक्टिंग फ्लाईट दुसर्या दिवशी सकाळी होती. रात्री झोपण्यासाठी महागड्या हॉटेलचं बिल भरण्यापेक्षा माझ्या घरी चला असं म्हणालो, तेही तयार झाले (त्या काळात क्रिकेट खेळाडूंना आजच्या एवढे पैसे मिळत नसत). त्या रात्री अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, वेंकटेश प्रसाद हे खेळाडू आमच्या पाचशे चौरस फुटांच्या घरात झोपले होते. जागतिक दर्जाचे हे खेळाडू माझे मित्र झाले याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्या मनाचा मोठेपणा. माझ्याकडे स्वतःची गाडी देखील नव्हती, तेव्हा ही मंडळी माझ्यासोबत काळीपिवळी टॅक्सीने मुंबई फिरायचे.
एकदा मॅच संपल्यावर श्रीनाथ म्हणाला, मला माटुंग्याच्या ‘शंकर मठ’ येथे जायचंय. आम्ही दर्शन करून निघालो, तेव्हा श्रीनाथला खूप भूक लागली होती. त्याला सांगितलं इथे हायफाय नाही पण तुला आवडेल असं ‘उडिपी रामा नायक‘ हॉटेल आहे. काउंटरवर बसलेला अण्णा श्रीनाथला पाहून उडालाच. क्रिकेटचे ग्लॅमर बाजूला सारून श्रीनाथने त्या रात्री केळ्याच्या पानावर वाढलेल्या सांबार राईसवर असा काही ताव मारला की आजूबाजूची माणसं स्वतःच्या पानातील जेवण विसरून श्रीनाथकडे कौतुकानं पाहात होती.
एक दिवस आम्हा सर्व कुटुंबीयांना अनिल कुंबळेने त्याच्या घरी बंगलोरला राहायला बोलावल. तिथे अनिलचा मोठा भाऊ दिनेशने विचारलं, ‘शिरीष तुने जंगल देखा है क्या? तुझे असली जंगल दिखाता हूं।’ तो आम्हाला बंडीपूर अभयारण्यात घेऊन गेला. तिथे मी पहिल्यांदा पिंजर्यात नसलेला दिमाखदार वाघ पाहिला आणि मेस्मराइज्ड झालो. त्यानंतर वाघ मागे लागल्यासारखा मी देशभरातील अनेक व्याघ्रप्रकल्पांत वाघ पाहायला गेलो. रुडयार्ड किपलिंगला ‘जंगल बुक’ लिहिण्यासाठी प्रेरणा देणारं कान्हा अभयारण्य पाहिलं, वाघाबद्दल माहिती गोळा करताना अनेक नवीन गोष्टी कळू लागल्या. हळूहळू या जंगलाच्या राजाबद्दलचा आदर वाढू लागला.
मुंबईला आल्यावर पुन्हा पोटापाण्याच्या व्यवसायाला लागलो पण वाघ काही मनातून जात नव्हता. कालांतराने ‘वाईल्ड लाईफ टुरिझम‘ सुरु करण्याचा निर्णय घेतला. पण कोणतंही काम करण्याआधी त्यातील खाचाखोचा समजून घेण्याचा माझा स्वभाव आहे. त्यानुसार मी चार वेगवेगळ्या टूर्ससोबत जंगल सफारी केल्या, सगळे रिसॉर्ट्स फिरून पाहिले. तेथील अनेक ड्रायव्हर्स आणि गाइड्ससोबत बोललो, धंदा समजून घेतला आणि मग या व्यवसायात संपूर्ण तयारीनिशी उतरलो.
पहिल्या दिवसापासून ठरवलं होतं, व्यवसाय करताना खोटं बोलून पर्यटकांना फसविणार नाही. जर एसी इनोव्हा कार कोटेशनमधे लिहिली असेल, तर तीच जाईल, तिच्याऐवजी मारुतीची अर्टिगा जाणार नाही. रिसॉर्टमधे स्विमिंग पूल आहे हे लिहून आपली जबाबदारी संपत नाही, तर ग्राहक जाणार असतील त्या दिवशी तो सुरु असेल का हे पाहणंही गरजेचं असतं. या भागातील रिसॉर्ट्स अगदी जंगलात नसली तरी जंगलाच्या सभोवती बांधलेली असतात. सरपटणारे प्राणी रूममधे येऊ नयेत म्हणून रूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवा, अशा सूचना मी करत असतो. अनवाणी पायाने इथे कधी फिरू नये. इथून मोठी हॉस्पिटल्स दोन तासाच्या अंतरावर असतात. त्यामुळे लहान मुलांची, वृद्धांची विशेष काळजी घेणे आवश्यक असतं. पर्यटन वेळापत्रक बनवताना विमानतळ/ रेल्वे स्टेशन ते रिसॉर्ट यात किती अंतर आहे, सफारी गेट रिसॉर्टपासून किती अंतरावर आहे (हे अंतर एक तासाचंही असू शकतं) हे लक्षात घ्यावं लागतं; जेणेकरून जंगल सफारीचा एकही दिवस वाया जाऊ नये. एक जंगल सफारी ही साधारण चार तासांची असते. सकाळी पाचपासून दहापर्यंत असे पाच तास आणि संध्याकाळी तीन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अशा एका दिवसात दोन सफारी करू शकतो (दिवस लहान मोठा होतो त्यानुसार या वेळा बदलत असतात).
पर्यटक आणि प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी जंगलाचे कोअर झोन आणि बफर झोन असे दोन भाग पाडलेले असतात. देवळातल्या गाभार्यात पुजार्याशिवाय कोणालाही प्रवेश नसतो व इतर भक्तगणांसाठी बाहेरील सभागृह मोकळं असतं, त्यातलाच हा प्रकार. प्रकल्पातल्या सगळ्यात आतल्या आणि महत्त्वाच्या भागात संतुलित वन आणि प्राण्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी असतात. याला ‘कोअर झोन’ म्हणतात. यातील काही भागात जंगल सफारीला परवानगी आहे. कोअर झोनच्या चौफेर पसरलेला भाग म्हणजे ‘बफर झोन’. केवळ सरकारी जिप्सीनेच पर्यटकांना जंगल सफारी करता येऊ शकते, त्यामुळे त्याचे पूर्वनियोजित बुकिंग केलेलं उत्तम, नाहीतर तात्काळ बुकिंगला अव्वाच्या सव्वा पैसे भरावे लागतात. उन्हाळा आणि हिवाळ्याचा काळ सफारींसाठी चांगला असतो. जंगलात अनेकविध पक्षी, रानमांजरे, रानकोंबड्या, हरणे, नीलगायी दिसतात. मात्र जंगलाचं मुख्य आकर्षण असलेल्या वाघाचे दर्शन पहिल्या सफारीत होईलच असं नाही. वाइल्ड लाइफ पाहायला येणार्या सर्व पर्यटकांना माझं हेच सांगणं असतं की वाघाला एकदा तरी जंगलात प्रत्यक्ष वावरताना पाहावं ही इच्छा असणं स्वाभाविक आहे, पण प्रत्येक वेळी वाघ दिसलाच पाहिजे हा अट्टहास नसावा. तुम्ही त्यांच्या इलाख्यात जाताय, तिथे प्राण्यांचा कायदा चालतो. तेव्हा प्राण्यांना उपद्रव होईल असं कृत्य आपल्याकडून होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. थोडाही निष्काळजीपणा जिवावर बेतू शकतो.
पर्यटकांना जंगलात नेणार्या गाडीचा ड्रायव्हर आणि प्राण्यांचा अभ्यास असणारा गाइड यांच्यावर माझा हा व्यवसाय संपूर्णपणे अवलंबून आहे. कठीण परिस्थितीला धीराने हाताळणारे निर्व्यसनी ड्रायव्हर्स मी पारखून निवडले आहेत. ताडोबामधील राजू ताजणे, कान्हामधील राजू खान, जवाईमधील नारायण मीना ही यातील काही प्रमुख नावं. जंगलात फिरताना माकडं, सांबर, कावळे सर्व जंगलाला कॉलिंग करून वाघ जवळ असल्याची पूर्वसूचना देताना दिसले की ड्रायव्हर वाघ दिसेल अशा वाटेवर जिप्सी नेऊन उभी करतात. त्यांचे अंदाज बहुतेक वेळा बरोबर ठरतात, पण काही वेळा अंदाज चुकू शकतो. कितीही मोठा फलंदाज असला तरी तो प्रत्येक मॅचमधे सेंचुरी ठोकू शकत नाही. आपण महागड्या रिसॉर्टमधे राहतोय, भरपूर पैसे खर्च करतोय तर वाघ दिसलाच पाहिजे, अशी काही पर्यटकांची अपेक्षा असते. पण ते आपल्याला पाहण्यासाठी किती पैसे खर्च करून आले आहेत हे काही वाघाला माहिती नसते. काहींना वाटतं की संपूर्ण अभयारण्यातले शंभर वाघ पिंजर्यात भरून ठेवलेले असतील आणि आमची जिप्सी आली की वाघांना समोर बदाबदा ओततील. अशा पर्यटकांना नशिबाने एकदोन वाघ दिसले तरी ते नाखूषच असतात. मला असले पर्यटक कधी लाभले नाहीत हे माझं नशीबच म्हणावं लागेल.
वाघ मूळचा सायबेरियाच्या बर्फाळ परिसरातला. सुमारे अकरा-बारा हजार वर्षांपूर्वी वाघ तिथून भारतभूमीवर आला. कित्येक वर्षांपूर्वी बर्फाळ प्रदेशात राहाणार्या या प्राण्याने स्वतःला इतकं अॅडजस्ट करुन घेतलंय की आता तो भारतातील गरमागरम हवेतही तो राहू लागला आहे. वाघ हा तसा एकलकोंडा प्राणी आहे, तो सिंहाप्रमाणे कुटुंबकबिला सांभाळत बसत नाही. निसर्गाची अन्नसाखळी समजून घेताना वाघ समजून घ्यावा लागतोच, कारण तोच खर्या अर्थाने जंगलाचा तारणहार आहे. हरीण, नीलगाय, रानडुक्कर असे वनस्पतीभक्षी प्राणी वनस्पतींचे संतुलन व संवर्धन करण्यास कारणीभूत असतात. या प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचं काम वाघ, बिबटे, सिंह, लांडगे या प्राण्यांना करावं लागतं. या सर्व घटकांचं एकमेकांवरचं नियंत्रण संपलं तर निसर्गाची साखळी बिघडते. वाघ शिकारीसाठी आकाराने मोठ्या पण कमकुवत प्राण्यांची निवड करतो. त्यामुळे त्या प्रजातीचे सुदृढ प्राणी शिल्लक राहतात आणि त्यांची पुढची पिढी सुदृढ होण्यास मदत होते. म्हणजेच निसर्गाचं संतुलन राखण्यात वाघाचा मोलाचा वाटा असतो. कदाचित हे जाणूनच भारतीय संस्कृतीत वाघाला मानाचं स्थान देण्यात आलं आहे.
१९व्या शतकाच्या सुरवातीला भारतातील राजे-महाराजे आणि ब्रिटिशांनी जंगलाच्या राजाची मोठ्या प्रमाणावर शिकार केली. तेव्हा चाळीस हजारांच्या आसपास वाघ जंगलात होते पण पुढच्या अवघ्या पन्नास वर्षांमध्ये भारतात फक्त दोन हजार वाघ शिल्लक राहिल्याचे लक्षात आले. त्यामुळेच १९७३ साली भारत सरकारने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्रोजेक्ट टायगर’ हा उपक्रम सुरू केला. पहिल्या टप्प्यात नऊ राष्ट्रीय उद्यानांमध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पामुळे आता भारतात ५४ व्याघ्रसंरक्षण प्रकल्प आहेत. २०१०मध्ये १७०६ एवढी वाघसंख्या होती. २०१८-१९च्या गणनेनुसार भारतातील वाघांची संख्या २९६७ असल्याचे जाहीर करण्यात आलं. आता जंगल सफारीत, टायगर सायटिंग वाढलं आहे आणि यामुळेच आज टायगर सफारीला पसंती मिळत आहे.
शिरीष यांचा जीवन प्रवास नाटक, सिनेमा आणि क्रिकेट यांच्या अवतीभोवती झाला आहे. त्यांना पाहिल्यावर मला ‘थ्री इडियट’मधील रँचोची आठवण होते. शिरीष देखील ‘ग्यान बट रहा है’ असं कळलं की ते आत्मसात करायला वेळेची, पैशाची पर्वा न करता कुठेही जायला एका पायावर तयार असतात. सरकारी बँकेतील सुरक्षित नोकरी सोडून ते या जंगल पर्यटन व्यवसायात कसे आले? शिरीष सांगतात, ‘बँकेत नोकरी लागल्यानंतरही माझा कलाक्षेत्रातील संपर्क सुटला नव्हता. कॉलेजमध्ये विनय आपटे यांच्या दिग्दर्शनात एकांकिका स्पर्धेत स्वाती चिटणीस, अजय फणसेकर यांच्यासोबत काम करताना अनेक पारितोषिके मिळवली होती. विजया मेहतांनी ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकात परागचा रोल दिला. याच काळात वैशाली घाणेकर या मैत्रिणीने ‘एचएमटी ट्रॅक्टर‘ डॉक्युमेंट्रीसाठी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरचे काम करशील का हे विचारलं. सत्तर जणांचं युनिट घेऊन चाळीस दिवस हिमाचल प्रदेशात शूटिंग केलं. अनोळखी प्रदेशात काम करताना अनेक अडचणी आल्या. त्यातून मार्ग काढताना जे शिकलो, ते आज धंदा करताना उपयोगी पडतंय. बँकेची नोकरी सांभाळून आवडीचं जे काम करता येईल ते करत होतो. आतापर्यंत मी १०० डॉक्युमेंट्री आणि अॅड फिल्मस एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून केल्या आहेत. मी जी काही मुशाफिरी केली त्यात पैसा किती मिळतोय यापेक्षा शिकायला काय मिळतंय हे पाहिलं, निस्वार्थी मनाने संबंध जपले, हे सर्व संचित आज व्यवसाय करताना कामी येतंय.
बँकेत साचेबंद कामात मन लागत नव्हतं, नोकरी सोडण्याचे विचार मनात येत होते. अशातच २००८ साली एक सुवर्णसंधी समोर आली, बँकेचा राजीनामा देऊन मी स्टार टीव्हीच्या नवीन सुरु होणार्या मराठी वाहिनीसाठी ‘सिनियर प्रोग्रामिंग प्रोड्युसर‘ या पदावर, आयुष्याच्या एका नवीन पर्वाला सुरुवात केली. तिथे मी अनेक नॉनफिक्शन कार्यक्रम यशस्वी करून दाखवले. पण दैनंदिन मालिका (डेली सोप) हे प्रकरण मला अवघड जात होत. रोज ब्लडप्रेशर वाढवून तब्येत बिघडवण्यापेक्षा ती नोकरी सोडली आणि आता व्यवसाय करावा असं ठरवलं. या काळात नाट्यनिर्मिती केली, गाण्यांचे कार्यक्रम केले, लहान मुलांच्या टूर्स काढल्या. या व्यवसायात सुरुवातीला यश मिळालं, पण त्यात सातत्य नव्हतं. यशापयशाच्या हिंदोळ्यावर झुलणार्या त्या फेजमधे बायको ऋजुता देशमुख, मुलगी साजिरी आणि आईवडील माझ्यामागे खंबीरपणे उभे राहिले. ज्यात आनंद मिळेल ते कर, निव्वळ पैशाच्या पाठीमागे धावू नको, असं त्यांचं नेहमी सांगणं असतं. सुरुवातीला छंद म्हणून सुरु केलेला वाइल्ड लाइफ टुरिझमचा व्यवसाय हळूहळू वाढीस लागत होता. कोणतीही जाहिरात न करता माझ्याकडे चोखंदळ पर्यटकांचा ओघ वाढू लागला. याच काळात नागपूरला भारत वि. दक्षिण आप्रिâका संघात कसोटी सामना सुरू होत. पहिल्याच दिवशी बदाबदा विकेट्स पडल्या, मॅच तीन दिवसात संपेल अशी चिन्हे दिसू लागली. मी दुसर्या दिवशी फ्लाइट पकडून नागपूरला पोहोचलो. स्टेडियममधे जाऊन अनिलला भेटलो. त्याच्यासोबत शॉन पोलॉक कॉमेन्ट्री टीममधे होता. अनिलने शॉनला विचारलं, ‘तेरे को टायगर देखना है क्या? मेरा दोस्त शिरीष टायगर दिखाता है.‘ मी शॉनला हात जोडून हसत म्हणालो, ‘माझं काम जंगल फिरवणे आहे, टायगर हा काही माझा दोस्त नाही, तो त्याच्या मर्जीने जंगलात फिरतो.’ तिसर्या दिवशी सामना खरचं संपला. शॉन पोलॉक आणि दक्षिण आफ्रिकेच्या टीमला घेऊन मी पेंच येथील जंगलात फिरायला गेलो. मस्त सायटिंग झालं. त्यांच्यासोबत रात्री नागपूरला परतलो, तेव्हा अनिल म्हणाला, आपल्या संघातील के. एल. राहुल, मुरली विजय, वरूण एरॉन यांना उद्या ताडोबाला यायचं आहे. मग दुसर्या दिवशी पहाटे त्यांना जंगल सफारी दर्शन करून आणली. सीआयडी मालिकेतील शिवाजी साटम आमच्या कॉलनीत राहतात. त्यांच्यासोबत घरचे संबंध होते. त्यामुळे त्यांची फॅमिली, सुमीत राघवन, मराठी नाटक-सिनेमा क्षेत्रातील अनेक कलाकार, कॅम्लीनचे श्रीराम दांडेकर यांच्यासारखे नामवंत उद्योजक माझ्यासोबत जंगल सफारी करून आले आहेत.
एक दिवस मला फोन आला, ‘हॅलो शिरीष, मी ब्रायन लारा बोलतोय. मला महाराष्ट्रातील ताडोबाच्या जंगलात वाघ बघायला यायचं आहे, अनिल कुंबळेने तुझा नंबर दिला. तो म्हणाला, भारतात वाइल्ड लाइफचा अनुभव घ्यायचा असेल तर या इंडस्ट्रीमधील शिरीष हा बेस्ट माणूस आहे.’ कसोटी क्रिकेटमधे ४०० धावा करणार्या फलंदाजाला जंगल पर्यटन घडवून आणायला कोण नाही म्हणेल? लाराने तीन दिवस खूप धमाल केली. त्याने जंगल सफारी तर केलीच, वर रिसॉर्टमधील किचनमधे स्वतःच्या हाताने फिश सूप बनवून आम्हा सर्वांना खिलवलं.’
देशभरातील प्रत्येक अभयारण्यांची निरनिराळी वैशिष्ट्ये आहेत, ताडोबा, रणथंबोर, जिम कॉर्बेट ही वाघांसाठी, काझीरंगा हे एकशिंगे गेंड्यासाठी, गीर हे सिंहासाठी, काबिनी हे हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. व्यवसायविस्तार करताना शिरीष आता देशातील अभयारण्यांसोबतच, परदेशातील श्रीलंका, केनिया, दक्षिण आफ्रिका येथील जंगलांची रोमांचकारी अद्भुत सफारी पर्यटकांना घडवून आणत आहेत.
अनेक मराठी मुले, कॉर्पोरेटमधील तरुणांसाठी गड-किल्ले ट्रेकिंग आयोजित करत असतात. याच सधन वर्गाला वाइल्डलाइफ टुरिझमसाठी प्रोत्साहित करून ते या व्यवसायात पदार्पण करू शकतात. पर्यटन ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे, जंगल सफारी करताना एका ग्राहकाला चांगली सर्व्हिस दिलीत तर तोच पर्यटक देश-विदेशातील विविध अभयारण्य फिरायला पुन्हा-पुन्हा तुमचीच निवड करेल. जंगल पर्यटन म्हणजे केवळ वाघ किंवा प्राणी पाहणे हे नाही, निसर्गाविषयी, पर्यावरणाविषयी तरुण पिढीत आत्मीयता निर्माण व्हावी, झाडे, पक्षी, प्राणी हेही आपल्या वसुंधरेचा भाग आहेत, त्यांचाही पृथ्वीवर आपल्याइतकाच हक्क आहे याची जाणीव निर्माण व्हावी यासाठी जंगल पर्यटन महत्त्वाचे आहे. आज शिरीष यांनी वयाची साठी क्रॉस केली असली तरी त्यांना भेटल्यावर त्यांचा उत्साह, कामाचा आवाका पाहता, ‘फिफ्टी इज न्यू फोर्टी’, असं न म्हणता, ‘सिक्स्टी इज न्यू थर्टी’ असं म्हणावंसं वाटतं… वाघांच्या सहवासात राहून तेही आता तडफदार टायगर दिसू लागले आहेत.