तर शेवटी भोंगा जो आहे तो वाजलेला आहे.
पूर्वी मुंबई नगरीत गिरणीचे भोंगे वाजायचे असं खूप वेळा ऐकलंय. प्रत्येक्ष ऐकला नाही. आमच्या सावंतवाडीत अजूनही सकाळी सहा दुपारी बारा आणि रात्री नऊला भोंगा वाजतो. सावंतवाडी संस्थान होतं एके काळी. असं टायमिंग कळलं की जगायला किती एकदम सोपं होवून जातं. म्हणजे सकाळी सहाला उठायचं.. आवरायचं.. मग दुपारी बाराला जेवायचं आणि रात्री नऊला जेवायचं.. संपला विषय. जेवल्यावर झोप येणारच. म्हणजे झोपेचा प्रश्न सुटला. आणि जर रात्रभर झोप लागली तर दिवसही चांगला जाणार! एकंदरीत आयुष्य सोपं होवून जातं हे खरं!
तर भोंग्यावरुन वातावरण वरणासारखं उकळायला लागलंय..! कढ यायला लागलेत. उकळता उकळता तळाचं वरण नष्ट होवून जाता नये याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे.. आणि हेच महत्वाचं आहे.
आता भोंगा मोठ्याने वाजता नये ही गोष्ट बरोबर.. लोकांना त्रास होतो. डेसिबल वाढतात. पण आवाज एकदमच कमी करता येणार नाही. हळू वाजला तर त्याला भोंगा तरी कसं म्हणणार? भुंगा म्हणावं लागेल. ऐकू तर जायला पाहिजे!
माझ्या मते दोन वेळा भोंगा वाजला तर चालू शकतो. एकदा सकाळी सहा किंवा सातला आणि रात्री नऊला! सहाला उठून दिवसभर राबून रात्री नऊ वाजता माणसं जेवून खावून झोपली तर कसलंच आजारपण येवू शकत नाही, हे मी गॅरेंटीवर सांगू शकते! दुपारी तीन तास झोपायचं नाही, हे फक्त सकाळी उठल्यापासून लक्षात ठेवायला पाहिजे.
आधीच सूर्य आग ओकतोय आणि त्यात एकाहून एक कडक विषय व्हाया न्यूज चॅनेल आपटायला लागले आहेत. ‘हे अशी झगाडतत म्हणान आमचो टीव्ही लय तापता,’ असं आमच्या शेजारची वैनी म्हणाली. ते अगदीच काय खोटं नाही.
एके दिवशी तर मी घरात असूनही प्रचंड बिझी होते. सकाळी उठले. गुळाचा चहा पिवून (तुम्ही म्हणाल हे काय नवीन फॅड काढलंय गुळाच्या चहाचं! पण हे फॅड नाही हे फक्त तुम्ही नीट लक्षात ठेवा.) केरवारे केले. पोहे करता करताच बातमी आली की नऊ वाजता पत्रकार परिषद आहे. मी झटपट पोहे केले, म्हटलं एकवेळ मीठ कमी असलं तरी चालेल, पण नाश्ता वेळेत झाला नाही तर घरात मुलांचा भोंगा वाजायला नको… आणि लगेचच पळत पळत पत्रकार परिषद अटेंड केली. हे एक वेगळच थ्रिल असतं. पोहे मस्त झाले होते… मऊ… चवदार… तिखट मीठ नेमकं लागलं होतं. पत्रकारांचे काही प्रश्न मात्र जरा फडफडीत होते. विलाज नाही. पोह्यांनी वेळ निभावून नेली.
ती संपवून उठणार एवढ्यात पुढची पत्रकार परिषद जाहीर झाली. सगळ्याच अत्यंत महत्वाच्या आणि भयानक मनोरंजक! बरं ही सगळी मंडळी बोलतात ते आमच्याचसाठी आणि आपणच पाठ फिरवली तर बरं दिसणार नाही. ते रीतीला धरुन वाटणार नाही. हे पण तितकंच खरं! त्यात माझा स्वभाव पडला गोडा…
मग पत्रकार परिषदा सांभाळून मी आंघोळ, कपडे धुणे, स्वयंपाक उरकला. संध्याकाळी खूप थकल्यासारखं वाटायला लागलं. बहुतेक बौद्धिक थकवा आलेला असणार! साधारण पाच पत्रकार परिषदा आधी पाच मिनिटं उपस्थित राहून मी अटेंड केल्या. आता मी कोणाचीही बाजू घेऊन हवं तितकं बोलू शकत, एवढं प्रभुत्व माझ्याकडे आलंय.. आणि हे जाहीर करताना मला खूप आनंद होतोय…
तर… आजकाल जग हे अदृश्य भोंग्यांनी भरलेलं आहे असं वाटायला लागलंय… जे दृश्य आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठ्या संख्येने आणि तीव्र आवाजात खूप भोंगे रात्रंदिवस वाजताहेत… ते कधी दिसतायत कधी ऐकू येतायत… ते पर्यावरणाच्या चिरफळ्यांचे आहेत… ते नद्यांच्या रडगाण्यांचे आहेत… जातीय विषारांचे आहेत… ते ढोंगीपणाचे आहेत, कृत्रिम जीवनशैलीचे आहेत… मानसिक ताणतणावांचे आहेत… झाडापेडांच्या कत्तलीचे आहेत…
प्लॅस्टिकच्या थैमानाचे आहेत!
ते भोंगे सगळ्यांना बर्यापैकी जाणवताहेत.. पण काहीच कळत नसल्यासारखे सुखाने राहणे हेच जास्त सोयीचं आहे, हे लक्षात आल्यामुळे लोकं कॅरीबॅगेत आयुष्याचं ओझं टाकून धावत सुटली आहेत… या गोष्टीला विलाज नाही..कोणत्याही पॅथीत… हे लक्षामधे घ्यायला हवं!
कोणी कुणाला शहाणपणा शिकवायचा.. हा पण एक मोठा ज्वलंत प्रश्न आहे.
बाकी सर्व ठीक. आत्ताच टीव्हीवर साहेबांचं भाषण झालं. निमित्त होतं अ.भा.सा.सं.चं ! ते म्हणाले की आत्तापर्यंतच्या प्रदीर्घ काळात फक्त चार पाचच महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या. हे प्रमाण वाढायला हवं. दर पाचव्या वर्षी हे अध्यक्षपद महिलेला मिळायला हवं.. गरज वाटल्यास तशी घटनेत दुरुस्ती करुन घ्यावी.
मला पटलं हे.. आमच्या डोक्यात पोळपाट लाटणं, बेसन, मीठ, तिखट, पातेल्या, डबे, कढया, लसूण, कांदे, बटाटे हेच साहित्य जास्त असल्यामुळे वाङ्मयीन साहित्य आमच्यापासून दोन लाटणी लांबच राहिलं आहे. मनात कधीकधी चांगल्या कथाकवितेच्या कल्पना येतात.. पण काहीतरी भिजत टाकायच्या, भाजायच्या, शिजवायच्या, तळायच्या नादात त्या फुलवायच्या राहूनच जातात. त्यामुळे आमचं लेखन कमी असलं तरी ते अमूल्य आहे.. हे सबंधितांनी लक्षामधे ठेवण्याची गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे.. असं म्हटलं तर वावगं ठरु नये.
तुमचं काय मत?
हे सगळं लिहीता लिहीता आलं माझ्या मनात आलं की महिलांचं अ. भा. सा. संमेलन भरवायला काय हरकत आहे? किती सुंदर दिसेल आणि असेल हे रंगीबेरंगी संमेलन! आम्हीच अध्यक्ष, आम्हीच उदघाटक, आम्हीच परिसंवादातले वक्ते! तसे पुरुष येवू शकतात.. संमेलनाला! पण फक्त रसिक श्रोते म्हणून..! घरात जसं ते निमूटपणे ऐकतात तसंच त्यांनी संमेलनात राहिलं पाहिजे. फक्त मध्ये मध्ये वाहवा करायला हरकत नाही!