उन्हाळा म्हणलं की ‘ठंडा ठंडा कूल कूल’ समर ड्रिंक्स सगळ्यांनाच हवी असतात. डायट करणार्या लोकांनाही अशी इच्छा नैसर्गिकरित्या होत असतेच, पण सहसा ही ड्रिंक्स असतात भरभरून साखरेनं लदबदलेली. बाहेरची विकतची सॉफ्टड्रिंक्स तर कुणासाठीही अतिशय वाईट असतात. सोडा, पाणी, भरपूर साखर आणि वेगवेगळे फ्लेवर्स याव्यतिरिक्त त्यात काहीच नसतं.
उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणं आवश्यक असतं. घामावाटे शरीरातून पाणी निघून जात असतं. क्षारही जात असतात. या काळात बाहेरची पेयं पिऊन हमखास आजारपणं ओढवून घेतली जातात. त्यातून बरं होण्यासाठीही व्यवस्थित पाणी पीत राहण्याची गरज असते.
उन्हाळ्यात पित्ताचा त्रास वाढतो. त्यामुळे शीत गुणांचे पदार्थ पोटात जाऊन शरीरातील उष्णता कमी होईल हे पाहणंही गरजेचं ठरतं. उन्हाळ्यात हेल्दी ड्रिंक्स नक्कीच घ्यायला हवीत. मॉर्निंग ड्रिंक्स आणि नाइट ड्रिंक्स हे नवीन प्रकार सध्या डायट जगात आले आहेत.
सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी गरम पाण्यात लिंबूरस/ कोमट पाण्यात मध/दालचिनीची पावडर/ तुळशीचे ड्रॉप्स घेणं हे सगळेच मॉर्निंग ड्रिंक्स असतात. या ड्रिंक्सनी पोट साफ होण्यास मदत होते. टवटवीत वाटायला लागतं. यानंतर तुम्ही नेहमीप्रमाणेच चहा/कॉफी घेऊ शकता.
रात्री झोपताना मनाला शांत करणारे वेगवेगळे चहाचे प्रकार घेतले जातात. हा आपला नेहमीचा दूध घातलेला भारतीय कडक चहा नाही. हे ग्रीन टी, जस्मिन टी, ब्लू टी, कॅमोमाईल टी असे चहाचे प्रकार असतात. कॅमोमाईल हे एक प्रकारचं हर्ब आहे, ज्याने ताण कमी होतो आणि झोप येण्यास मदत होते. त्यात अॅण्टीइन्फ्लॅमेटरी गुणही आहेत. हळदीचं दूध हे आपलं पारंपरिक भारतीय पेय नाइट ड्रिंक म्हणून सर्वात उत्तम असतं. झोप येण्यासाठी त्यातच थोडं जायफळ दुधात उगाळून घालणंही चांगलं असतं.
तर, परत एकदा उन्हाळ्यात करता येतील अशा ड्रिंक्सच्या वेगळ्या प्रकारांकडे येऊया. काही वेगळेच समाधान देणारे आणि पौष्टिक समर ड्रिंक्स करता येतील.
कोकोनट वॉटर आणि बेरी अॅपल स्मूदी
शहाळ्याचे पाणी अतिशय गुणकारी आणि थंड असते. उन्हाळ्यात नारळपाणी हे अमृततुल्य पेय असते. हे सहजी उपलब्ध असते. हायजिनीक असते. नारळ पाण्याचाच हा वेगळा पेय प्रकार आहे.
साहित्य : १. एका शहाळ्याचं पाणी
२. अर्धी वाटी मलबेरी
३. अर्धी वाटी स्ट्रॉबेरी
४. अर्धी वाटी सफरचंदाचे साल काढलेले तुकडे
५. सैंधव मीठ पाव टीस्पून
६. पुदिन्याची पानं दोन टेबलस्पून
७. बर्फ
कृती : १. पुदिन्याची दोन पानं सजावटीसाठी सोडून बाकी सर्व घटक पदार्थ मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
२. बर्फ घालून आणि पुदिन्याची दोन पानं सजवून ही हेल्दी स्मूदी वाढा.
३. शहाळ्याचं पाणी, बेरी आणि सफरचंदाचा नैसर्गिक गोडवा या स्मूदीला येतो, त्यामुळेच इथं साखरेची/स्टिव्हीआची/शुगरफ्रीची गरज नाही.
बडीशेपेचं सरबत
बडीशेप थंड असते, पाचक असते. अपचन, मळमळ, श्वासदुर्गंधी, त्वचाविकार या सगळ्यांवर बडीशेप उपयोगी असते. उन्हाळ्यातील जळजळीवर बडीशेपेचं पाणी पितात. गुजरातमधे बडीशेपेचे सरबत करतात.
साहित्य : १. एक टेबलस्पून बडीशेप
२. एक वेलदोडा
२. एक/दोन मिरीचे दाणे
३. अर्धा टीस्पून सैंधव मीठ
४. अर्ध लिंबू
५. अर्धा टेबलस्पून खडीसाखर/ डायबेटिक असाल तर एक स्टिव्हीआ/शुगरफ्री टॅबलेट वापरावी.
कृती : १. बडीशेप, वेलची, मिरी, खडीसाखर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
२. पातेल्यात बडीशेपेची पूड, मीठ, लिंबूरस घालून एक ग्लास थंडगार पाणी घाला. सगळं नीट ढवळून घ्या.
३. हे बडीशेप सरबत नीट गाळून घेऊन काचेच्या ग्लासमधून वाढा.
सत्तूचं सरबत
सत्तू या पदार्थाचं प्रस्थ बिहारमधे खूप असतं. लिट्टी चोखा करतानाही सत्तू भरून बाटी करतात. या सत्तूचं गोड आणि खारट असं दोन प्रकारचं सरबतही करतात. सत्तू सरबत हे प्रोटिन रिच सरबत आहे. पण सत्तू म्हणजे नक्की काय हे शोधू लागले तर चकितच झाले. सत्तू म्हणजे आपल्या फुटाण्यांचं बारीक वाटून केलेलं पीठ. कधीकधी या सत्तूत थोडे गहूही भाजून पीठ करून घालतात. पण सत्तू म्हणजे प्रामुख्याने फुटाण्याचं पीठ असतं.
हरबर्याचेच फुटाणे करतात, त्यामुळे साहजिकच सत्तू प्रोटिन रिच असतं. ताकद देणारे असतं. भाजलेलं असल्याने पचायला हलकं असतं. उन्हाळ्यात कष्टाचं काम करणार्या माणसांना या सरबतानं ताकद मिळते. आपण सहज घरी करू शकतो ते इन्स्टंट सत्तू म्हणजे मिक्सरमधून साधे फुटाणे वाटून त्याचं केलेलं पीठ. सत्तूचं गोड आणि खारट सरबत करतात.
साहित्य : १. सत्तू : फुटाणे पीठ दोन टेबलस्पून
२. अर्धा लिंबू
३. सैंधव मीठ
४. जिरेपूड अर्धा टीस्पून
कृती : १. जिरेपूड सोडून सगळेच घटक ग्लासमधे घालून, थंड पाणी घालून घुसळून घ्यावेत.
२. वरून जिरेपूड घालून सत्तूचं खारट आंबट वाढावे.
जास्वंदीचं सरबत
जास्वंद हे भारतात सहज कुठेही आढळणारे झुडूप आहे. जास्वंदीची फुलं अतिशय गुणकारी असतात. केसांसाठी चांगली असतात. ब्लडप्रेशरवर जास्वंद उपयोगी आहे. जास्वंदीच्या चहाने/सरबताने हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. प्रेग्नंट असताना आणि किडनीचे विकार असतील तर मात्र हे पेय घेऊ नये.
साहित्य : १. चार लाल जास्वंदीची फुलं.
२. दोन कप पाणी
३. अर्ध लिंबूरस
कृती : १. पातेल्यात दोन कप पाणी उकळायला ठेवावे.
२. जास्वंदीची फुलं धुवून घ्यावीत. त्याच्या पाकळ्या खुडून अलग कराव्यात.
३. उकळी फुटलेल्या पाण्यात पाकळ्या घालाव्यात. तीन चार मिनिटांत पाण्याचा रंग बदलतो आणि गडद काळसर लाल रंग येतो.
४. पाकळ्या काढून पाणी काचेच्या ग्लासमधे गाळून घ्यावे. त्यात लिंबूरस घालावा. आता या पेयाला लगेचच सुंदर लालचुटुक रंग येईल. पेय गार झाल्यावर बर्फ घालून प्यावे.
५. एक वेगळीच चव या जास्वंद सरबताला लागते. हवं असल्यास यात साखर/ स्टिव्हीआ घालू शकता.
गोकर्णीचं सरबत/ब्लू टी/पर्पल टी
गोकर्णला संस्कृतमधे अपराजिता म्हणतात. गायीच्या कानासारखा आकार असणारी ही देखणी फुलं म्हणून गोकर्ण. हे झुडूप कुठेही, कुंडीतही येतं. सहसा निळ्या रंगाची गोकर्ण जास्त दिसते. अपराजिता नाव असण्याचं कारण म्हणजे अनेक रोगांवर या वनस्पतीचा वापर होतो. सर्दी, खोकला, ताप, दमा, स्त्रियांचे विकार यावर उपयोगी आहे. स्मरणशक्ती वाढवणारी शंखपुष्पी हीच गोकर्ण आहे. हिंदीत याचं नाव आहे ‘मांगल्य कुसुमा’, जिचं दर्शनही मंगल मानलं जातं असं फूल.
साहित्य : १. गोकर्णीची तीन ते चार फुलं.
२. दोन कप पाणी
३. अर्धा लिंबूरस
४. साखर/ स्टिव्हीआ/ शुगर फ्री हे सगळं ऑप्शनल आहे.
कृती : १. पातेल्यात पाणी उकळायला ठेवा.
२. उकळी फुटल्यावर देठ काढलेली तीन/चार गोकर्ण फुलं त्यात टाका. लगेच रंग सुटू लागेल.
३ . चार पाच मिनिटांनी आच बंद करा.
४. ग्लासमधे पाणी गाळून घ्या.
५. सुंदर निळया रंगाचा गोकर्ण चहा/ ब्लू टी तयार आहे.
६. यात अर्धा लिंबाचा रस पिळल्यास लगेच सुंदर जांभळा रंग येईल.
७. गार झाल्यावर यात बर्फ टाका आणि तसंच प्या. हवं तर चवीनुसार साखर घाला. डायबेटिक असाल तर स्टिव्हीआ किंवा शुगर फ्री घालूनही हे पेय पिता येईल.
सब्जा लिंबूरस सरबत
फालुदा खाताना आपण सगळ्यांनीच सब्जा खाल्लेला असतो. सब्जा म्हणजे स्वीट बेसिल. गोड तुळशीचं बी असतं. प्राचीन काळापासून तुळशीचं बी शरीरातील गरमी, कडकी कमी करण्यासाठी वापरतात. वजन कमी करण्यासाठी सब्जा बी उपयोगी असतं. सब्जा बी/तुळस बी अॅण्टीऑक्सिडेंट्सने भरपूर असतं. यात फायबर भरपूर असतं. त्यामुळे बद्धकोष्ठ आणि तोंड येण्याच्या विकारांवर आवर्जून घ्यावे. सब्जा बी थोडंसं भिजवलं तरी भरपूर फुगतं.त्यामुळे एक टीस्पून सब्जा बी भिजवलं तरी ते भरपूर होतं.
सब्जा बीचं सरबत: नेहमी कुणीच फालूदा खाऊ शकत नाही आणि तसा तो खाऊही नये. पण सब्जा बी वेगवेगळ्या सरबतांमधे घालून वापरता येईल.
साहित्य : १. एक टीस्पून भिजवलेलं सब्जा बी
२. एका लिंबाचा रस
३. साखर/ स्टिव्हीआ/ शुगर फ्री टॅबलेट
४. सैंधव मीठ
५. आलं किसून अर्धा टीस्पून
कृती : सगळे घटक पदार्थ एकत्र करून थंडगार पाण्यात घुसळून घ्यावेत.
सब्जा लिंबू सरबत तयार आहे. याच प्रकारे अनेक सरबतांमधे सब्जा बी/तुळस बी वापरता येईल.
सब्जा बी चांगलं असलं तरी ते घेण्याचा अतिरेक करू नये. उलटी/अतिसाराच्या विकारात खाऊ नये.
या सगळ्या ड्रिंक्समधे साखरेचं प्रमाण कमी आहे किंवा नाहीच. या ड्रिंक्सनी उन्हाळा नक्कीच सुसह्य होईल.
(टीप : लेखिका आहारतज्ज्ञ नाहीत. लेखातील मते आंतरजालावरील माहितीवर व वैयक्तिक अनुभवांवर आधारित असून बहुतांश पाककृती पारंपरिक आहेत.)