दिवाळी अंक ‘आवाज’, जादुई खिडक्या, आणि मधुकर पाटकर ही मराठी साहित्यातील विशेषतः दिवाळी अंकातील अभेद्य त्रयी. गेली सत्तर वर्ष दिवाळीत दिवाळी अंक विकत घ्यायला गेलेला कोणताही वाचक ‘आवाज’ आहे का हे पहिल्यांदा विचारतो. मधुकर पाटकर यांसारखा कोणत्याही आर्थिक स्थैर्य किंवा मदत नसलेला एकटा माणूस जो स्वतः कवी, लेखक, चित्रकार नाही. अंक निर्मितीच्या वेळी प्रतिकूलता तर पाचवीलाच पुजलेली. त्या काळातही अनेक दिवाळी अंक निघत पण यश एकमेव ‘आवाज’ने चाखले.
– – –
मराठी दिवाळी अंकात नेहमीच सुप्रीमो ठरलेला ‘आवाज’ दिवाळी अंक गेली सत्तर वर्ष अत्यंत ताकदीने उभा आहे. अनेक दिवाळी अंक आले आणि काळाच्या ओघात वाहून गेले, पण ‘आवाज’ दिमाखाने निघतोच आहे. त्याचे श्रेय मराठीतील जेष्ठ संपादक मधुकर पाटकर यांना आहे. सगळे त्यांना भाऊ म्हणत. ‘आवाज’च्या माध्यमातून त्यांनी अनेक चित्रकार, व्यंगचित्रकार लेखक घडविले.
उच्च अभिरुची, बौद्धिक क्षमता लाभलेले आणि कष्टाला मागेपुढे न पाहणारे भाऊ… त्या काळी फारशी वाहने नव्हती, बराच वेळा पायपीट करावे लागे, पण ते सतत हसतमुख असायचे. पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी, ग. दि. माडगूळकर, आचार्य अत्रे, पु. भा. भावे, शंकर पाटील, गंगाधर गाडगीळ, बाळ सामंत, वसंत सबनीस आदी लेखकांची भक्कम फळी त्यांनी उभी केली होती. सुरुवातीला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अंकाची सजावट व कव्हर्स करीत. श्रीकांत ठाकरेही सजावट करीत. साल ५१/५२ असेल. ‘आवाज’ उभयतांनी काढावा असेही घाटत होते. पण बाळासाहेबांनी ‘मार्मिक’ काढला आणि ‘आवाज’ची जबाबदारी भाऊंवर आली. तब्येतीने तुंदिलतनु, गोरेपान, विरळ केस, निळे डोळे आणि मिस्कील हसू. सोनेरी झब्बा आणि सफेद पायजमा एवढाच पेहराव. नवनवे लेखक, व्यंगचित्रकार आणि त्यांचे टॅलेंट शोधण्यात नजर सतत अडकलेली. घरातला एखादा सुखवस्तू कर्ता पुरुष चार पाच पिशव्या घेऊन जसा मंडईत भाजीखरेदीला जातो, चिकित्सक नजरेने भाजीपाला निवडून घेतो, घासाघीस करतो; तद्वत भाऊ लेखक चित्रकार निवडून घेत. परिणामी अनेक लेखक-व्यंगचित्रकार घडले आणि ते अभिमानाने सांगत की ‘आम्ही ‘आवाज’पासून सुरुवात केली.’ बाळासाहेबांनंतर दीनानाथ दलाल ‘आवाज’च्या खिडक्या, कथाचित्रे, कव्हर करु लागले. त्यांच्या स्टुडिओत अनेक लेखकांची मैफिल भरे. ती मैफिल संपूर्णपणे ‘दिवाळी आवाज’मध्ये सापडायची.
कानेटकरांनी नाटके भरपूर लिहिली, पण एकांकिका फक्त आवाजकरिता लिहिल्या. वसंत सबनीस यांचे अनेक वग पहिल्यांदा ‘आवाज’मध्ये छापले गेले. ‘आवाज’ दिवाळी अंकाची जमवाजमव ते वर्षभर करीत असायचे किंवा आवाज हेच त्यांचे आयुष्य होते. अडीशे तीनशे पानाचा आवाज आणि त्याच्या साठ पासष्ट हजारपर्यंतच्या कॉपीज छापण्यासाठी हजारो टन कागद लागे आणि त्या काळात अनेकदा कागदाचे दुर्भिक्ष्य असे. अद्ययावत छपाईसाठी अनेक ठिकाणी वणवण करावी लागे. चार रंगी छपाईसाठी नागपूरच्या शिवराज प्रेसमध्ये जावे लागे. खिडकीचित्रे असल्याने अनेकदा काम जिकिरीचे ठरे. लेख निवडण्यापासून मजकुराची पाने तयार करण्यापर्यंत आणि पुढे पाने जुळवून पुन्हा बाईंडिंगसाठी प्रती तयार करणे, शंभराचे गठ्ठे बांधून ते अचूक आहेत की नाहीत हे ते केवळ नजरेने तपासत. अडीचशे ते तीनशे पानांच्या अंकाचे शुद्धलेखन ते स्वतः काळजीपूर्वक तपासत. लेखकांकडून- त्यांचा इगो न दुखावता- गोडीने लेख दुरुस्त करून घेणे त्यांनाच जमे. १९७०च्या अलीकडे पलीकडे मी त्यांच्याकडे जायला लागलो. गिरगावातल्या मुगभाट लेनमध्ये त्यांचे माडीवर दोन खोल्यांचे घर होते. छोटासा ट्रेडल प्रेस दूरच्या अल्लाना कंपाऊंडमध्ये होता. मुंबईत घमासान पाऊस झाला, पाणी साचले की प्रेस ‘आवाज’च्या पेपराची रिमे घेऊन पाण्यात बुडायला मोकळा. छोटे भाऊ कमलाकर तो प्रेस सांभाळीत.
भाऊंच्या पत्नी मालतीबाई दिसायला छान. नीटनेटक्या. चवीचा उत्तम स्वयंपाक करणार्या. घरात माणसे किती- चार मुले, एक मुलगी, भाऊ कमलाकर, त्यांची पत्नी सगळे गोळामेळ्याने राहात. रुचकर जेवण ही या घराची खासियत; गोडाचे असो किंवा मच्छीचे- ते मोठे चवदार असे. सारस्वताचेच घर ते, मग काय, त्या मिनी मिनी घरीच अनेक लेखकांचे-चित्रकारांचे येणे जाणे असे. कारण ऑफिसला जागाच नव्हती.
घरातल्या चीपर बाय दि डझन मंडळींचा मात्र दिवाळी अंकासाठी खूप उपयोग होई. भाऊंना मोठा हातभार लागे. अंदाजे ५१ सालापासून ‘आवाज’ दोन भाषांमध्ये निघे. गुजराती व मराठीत. अंकाची किंमत असे दोन ते अडीच रुपये. तरीही खप होत नसे. अत्यंत उत्तम निर्मिती असूनही ‘आवाज’ गोते खाऊ लागला. अंक बंद करण्यापर्यंत पाळी आली.
भाऊंची अक्कलकोटच्या एका स्वामींवर अपार श्रद्धा होती. अंक तयार झाले की भाऊ त्यांना दाखवायला पहिली प्रत घेऊन जात. एका दिवाळी आधी ते स्वामींकडे गेले व म्हणाले की ‘आता मला अंक काढणे अवघड झाले आहे. अंक खपत नाही, कर्ज वाढते आहे. अंक बंदच करतो आहे’! यावर स्वामींनी मूकपणे खुणावले की अंक आता माझ्या नावाने काढा. विमनस्क मन:स्थितीत भाऊ मुंबईला ज्येष्ठ अंकविक्रेते बागवेंकडे गेले. दोघे चांगले मित्र. भाऊंनी स्वामींचा निरोप सांगितला. बागवे म्हणाले, स्वामींची आज्ञा पाळा व पुढे व्हा. भाऊ म्हणाले, लेखकांना पत्र लिहायचीत, त्यासाठी पैसे नाहीत. बागवेंनी पाचशे रुपये पोस्टकार्डासाठी दिले. थोडे पुढे गेल्यावर एक जिवलग मित्र भेटला. भाऊंनी कथा सांगितली. त्याने पाच हजार रुपये उसने म्हणून दिले. सर्व काही मनासारखे जमत गेले व उत्तम अंक तयार झाला. त्यानंतर आजपर्यंत ‘आवाज’ने मागे वळून पाहिलेच नाही. फक्त भरभराट आणि भरभराट.
अंकासाठी सर्व बिनीचे लेखक होते. नवनवे चित्रकार ‘आवाज’मध्ये चित्र छापून यावे म्हणून धडपडत असायचे. त्यांना सूचना देऊन भाऊ हवी तशी चित्रे करून घेत. दलालांच्या नंतर चंद्रशेखर पत्की चित्रे, मुखपृष्ठ, खिडक्या करू लागले, त्यांची चित्रे खूपच मादक असत, अश्लील नव्हे. दरवर्षी माझ्या चित्रमाला खूपच गाजत होत्या. पोलीस प्रदर्शन, ढगाला लागली कळं, राज तेरी त्तो गंगा मैली, इंदू जाल, चावट अल्फाबेट्स, त्यात कल्पकता जास्त असे.
दरवर्षी कागद कपात येई. भाऊंना टनाने कागद लागे. सरकारी कचेरीत खेपा घालाव्या लागत. आणि बरेच ऑफिसर्स दक्षिणी असत. आपले मराठी लोक साहेबांकडे बोट दाखवून नामानिराळे होत. एकदा भाऊंनी ऑफिसरला गाठले. समजावून सांगितले. अंकाची प्रत दिली. त्याला फारसं काही कळलं नाही, पण तो म्हणाला, ‘बाहेर जाऊन बसा.’ अंक उघडून तो चाळू लागला. भाऊंना त्याने आत बोलावून विचारले, ‘ते ‘देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा’चं तुमच्याच अंकात होतं का? माझी बायको मराठी आहे. तिने मला सांगितल्यावर मी खूप हसलो होतो. अंकातली कटआऊटची विंडोही मला आवडली. भाऊंनी त्याला दिलेल्या अंकातल्या खिडक्या उघडून दाखवल्या समजावून सांगितले. दोघांना काय समजले देव जाणे. त्याने असिस्टंटला बोलावून सांगितले की ह्या साहेबांचे रिक्वायरमेंट पेपर आण आणि साहेबांसाठी चहा मागव. हा किस्सा त्यांनीच मला सांगितला होता.
मी त्यांच्याकडे चित्रे घेऊन गेलो की ते मला अनेक दिग्गजांना भेटवीत. दीनानाथ दलाल, जयवंत दळवी, ग. दि. माडगूळकर, वसंत सबनीस आदींच्या भेटी अशाच घडल्या. भाऊंमुळे ते लोक मोकळेपणाने बोलत. भाऊ नाशिकला दरवर्षी येत माझी चित्रमाला व कानेटकर यांची एकांकिका घेण्यासाठी. ‘कुठलीही चित्रमाला मला दाखवल्याशिवाय तुम्ही इतरांना दाखवायची नाही,’ असा त्यांचा सज्जड दम असे. मी तयार केलेल्या आठदहा चित्रमाला त्यांना दाखवी. त्यातल्या हव्या त्या ते काढून घेत. पुणेकर व मुंबईकर संपादकांत फारसे सख्य नसे. त्याकाळी लेखकाचा वा चित्रकाराचा पत्ता कोणताही संपादक दुसर्याला सांगत नसे.
नाशिकला जेवणखाण माझ्याकडेच होई. त्यांचे आवडते पदार्थ पत्नी अनुराधा आवर्जून करून वाढत असे. अनुराधा, तुझे मसाले फार चटकदार असतात. जाताना मूठभर बांधून दे आणि मिश्रण लिहून दे, मालतीबाईंना बनवायला सांगतो, असे नेहमी म्हणत. ठरलेल्या शिल्पा लॉजमध्ये ते उतरत. भाडे ३० रुपये असे. त्या काळी उत्तम हॉटेल असा प्रकारच अस्तित्वात नव्हता. सकाळी दहाला त्यांना मी माझ्या लांबलचक लॅम्ब्रेटा स्कूटरवर कानेटकरांकडे घेऊन जाई. नव्या एकांकिकेवर त्यांची चर्चा होई. त्या काळी मौल्यवान साहित्याचा संपादकांना ध्यास असे. व्यंगचित्रमाला पारखून घेतल्या जात. त्यांचे उचित मानधन नक्कीच मिळे. आम्ही ४/२ चित्रकार महागडे होतो. त्याचा फायदा इतरांना मिळे. ‘आवाज’च्या चित्रांमुळे मी झपाट्याने महाराष्ट्रभर पोचलो. भाऊंनी फुकटात कुणाचेच- मग नवा असो वा जुना- मागितले नाही. हल्लीचे बरेच फुकटातच मागतात.
माधव गडकरी ‘लोकसत्ता’चे संपादक असतानाचा किस्सा. गोव्याचे त्यावेळचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्याशी गडकरींचा चांगला स्नेह होता. बांदोडकरांच्या निमंत्रणावरून भाऊंना घेऊन गडकरी गोव्याला गेले. अत्यंत इतमामाने दोघेजण भव्य अशा हॉलमध्ये जाऊन बसले. जराशाने एक वाघ तेथे डुलत डुलत आला. दोघांची पाचावर धारण बसली. घाम फुटला. अहो, साहेब अहो, साहेब त्यांनी बादोडकरांना आवाज दिला. आतून साहेब हसत बाहेर आले, म्हणाले, घाबरू नका तो काही करत नाही. साहेब, हे खरे असले तरी आमची बोबडी वळली त्याचे काय? चला आत बसू या. दोघे बर्यापैकी चपळाईने वाघाची नजर चुकवीत त्यांच्या मागोमाग गेले. जेवणाचा थाट काय विचारावा. सगळा रेखीव मासळी बाजार ताटांत मांडलेला. उत्तम जेवण, उत्तम मद्य आणि बांदोडकरांचा प्रेमळ आग्रह. जेवण करून बाहेर वाघ नाही ना याची खातरजमा करुन बंगलीच्या गार्डनमध्ये भाऊंनी शतपावली सुरु केली. भाऊंच्या लक्षात आले की, एक पोलीस अधिकारी त्यांच्या मागोमाग येजा करत होता. भाऊंना एकटे पाहून तो जवळ आला नमस्कार करुन म्हणाला, ‘आवाज’ या विनोदी अंकाचे संपादक आपणच ना? मघापासून मला तुमच्याशी बोलायचे आहे, पण संधी नाही मिळाली. मला एक शंका आहे विचारू… अवश्य विचारा, भाऊंनी हसत म्हटले. तुमच्या अंकात पोलीस प्रदर्शन चित्रमाला काढणारा चित्रकार पोलीस खात्यात कामाला आहे, हे खरे ना. कारण त्यातील बारकावे फक्त पोलीस खात्यातल्या लोकांनाच माहीत असतात. ‘नाही हो, तो बेसिकली अत्यंत भित्रा व पोलिसांना घाबरणारा माणूस आहे.’ भाऊंनी माझी अचूक माहिती सांगितली.
दिवाळी अंक आवाज, जादुई खिडक्या, आणि मधुकर पाटकर ही मराठी साहित्यातील विशेषतः दिवाळी अंकातील अभेद्य त्रयी. गेली सत्तर वर्ष दिवाळीत दिवाळी अंक विकत घ्यायला गेलेला कोणताही वाचक ‘आवाज’ आहे का, हे पहिल्यांदा विचारतो. मधुकर पाटकर यांसारखा कोणत्याही आर्थिक स्थैर्य किंवा मदत नसलेला एकटा माणूस जो स्वतः कवी, लेखक, चित्रकार नाही, त्याने हे उभे केले. अंक निर्मितीच्या वेळी प्रतिकूलता तर पाचवीलाच पुजलेली. आता जग खूप बदलले आहे, पण पन्नास वर्षापूर्वी शिवधनुष्य पेलणे हे एकट्याचे काम नसे. त्या काळातही अनेक दिवाळी अंक निघत, पण दणदणीत यश एकमेव ‘आवाज’ने चाखले.
त्यावेळीही सो कॉल्ड बुद्धिजीवी हाय प्रोफाइल संपादक असायचे. विनोदी अंकाला कसला आला साहित्यिक दजा, असा उपेक्षेचा दृष्टिकोन आढळत असे. व्यंगचित्रांचे तर इतके वावडे की ते मुद्दाम अॅबस्ट्रॅक्ट चित्रे टाकत. न कळणार्या कथा, न कळणारी चित्रे वा कविता, म्हणजे अभिरुचीपूर्ण व अर्थपूर्ण साहित्य असा एक समज होता. अर्थात अशा अंकांची विक्री २/५ हजारांच्या वर नसे. याला काही दर्जेदार अंकांचा अपवाद नक्कीच आहे. त्यांच्यासमोर मधुकर पाटकर यांचे कार्य ऐतिहासिक आहे. यश आणि कर्तृत्व अबाधित ठरले आहे. कारण ‘आवाज’ला टक्कर देणारा अंक अद्याप निघालाच नाही. कालप्रवाहात भाऊंच्या कुटुंबाची मोठी पडझड झाली. विवाहित मुलगी व सध्याचे संपादक भाऊचे चिरंजीव भारतभूषण मागे उरलेत. तेच अंक समर्थपणे काढतात. झाले बहु होतील बहु पण यासम हाच… मधुकर पाटकरांच्या दिगंत कीर्ती व कर्तृत्वाला सलाम!