एखाद्या व्यक्तीकडे एका वेळी किती गुणांचा समुच्चय असावा, याला काही मर्यादा असतात. उत्तम रेषांची ताकद ज्याला गवसते, त्याच्यापाशी अनेकदा शब्द तोकडे पडतात… ज्याच्यापाशी लिखित शब्दांचं सामर्थ्य असतं, त्याच्या घशाला चारचौघांत जाताच कोरड पडते… पण, नियती काही विभूतींना घडवताना जराही हात आखडता घेत नाही… हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे याचे एक उदाहरण… ते देशातले एक सर्वश्रेष्ठ व्यंगचित्रकार होतेच, पण रेषांप्रमाणे लिखित शब्दांवरही त्यांची अद्भुत पकड होती, जोडीला अमोघ आणि सहजस्फूर्त वक्तृत्व होते, असामान्य नेतृत्त्वगुण होते, माणसं जोडण्याची हातोटी होती… इथलं व्यंगचित्र पाहा… एक व्यंगचित्रकार म्हणून बाळासाहेब कशातून काय निर्माण करायचे, त्याचा हा एक अद्भुत नमुना आहे… या त्या काळात ‘मार्मिक’मध्ये छापून येणार्या खर्याखुर्या उत्पादनांच्या जाहिराती. त्यांच्याच रचनेला, चित्रांना आणि शब्दांना आपल्या पद्धतीने वळवून बाळासाहेबांनी तेव्हाच्या राजकीय परिस्थितीवर अचूक फटकारे ओढले आहेत… एकेका जाहिरातीची त्यांनी केलेली चित्ररचना आणि शब्दरचना हास्यस्फोटक आहे.