शेजारच्या एका बंद असलेल्या बंगल्याचं सीसीटीव्ही फूटेज अचानक मिरजकरांच्या हाती आलं आणि त्यांच्या तपासाला वेगळी दिशा मिळाली. त्या दिवशी सकाळी लवकर बंगल्याकडे दोन नाही, एकच माणूस आलेला दिसत होता. त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. मात्र त्याच्या हातात असलेलं चांदीचं कडं चमकत होतं आणि त्यावरून मिरजकरांनी ताबडतोब त्या माणसाला ओळखलं. बंगल्यात घेतलेल्या ठशांचा रिपोर्टही त्याच दिवशी हातात आला आणि मिरजकरांच्या मनातली शंका खरी ठरली.
– – –
शहरातल्या मध्यवस्तीतल्या `आराम` बंगल्यावर खळबळ उडाली होती. बंगल्यात एकटेच असलेले प्रसिद्ध उद्योगपती श्रीरंग सरनाईक यांचा निर्घृण खून झाला होता. सगळ्यात विशेष म्हणजे ही घटना रात्री घडूनही दिवसभरात कुणालाही त्याची खबर लागली नव्हती. इन्स्पेक्टर मिरजकर यांनी बंगल्याला भेट दिली, तेव्हा त्यांना हीच गोष्ट फार विचित्र वाटली.
“सकाळपासून बंगल्याकडे कुणीच फिरकलं नाही? दूध, पेपर, घरातली नोकर माणसं?“ त्यांनी आश्चर्याने विचारलं.
“साहेब, सरनाईकांच्या घरी रविवारी कुणीच कामाला नसतं. सरनाईक आणि त्यांची बायको देविका असे दोघेच असतात रविवारी. दोनच नोकर आहेत, पण त्यांना ते रविवारी सुटी देतात आणि दिवसभर निवांत वेळ घालवतात,“ हवालदार सावंतांनी आसपासच्या माणसांकडून काढलेली माहिती सांगितली.
रविवारी पेपर, दूधवाले यांनाही बंगल्याच्या आत यायला परवानगी नव्हती. एकूणच हे प्रकरण जरा वेगळंच वाटत होतं.
देविकाबाई नेमक्या आज माहेरच्या मंडळींबरोबर कुठे फिरायला गेल्या होत्या. सहा दिवस भरपूर काम आणि रविवारी पूर्ण आराम, असा श्रीरंग सरनाईकांचा नेम होता. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी त्यांनी पहिल्यांदा फॅक्टरी सुरू केली आणि त्यानंतर प्रचंड मेहनतीने व्यवसायात भरभराट केली. कुणाचाही वरदहस्त नसताना केवळ मेहनतीच्या जोरावर केलेली ही प्रगती खरंच कौतुकास्पद होती, तशीच काहींच्या डोळ्यात खुपणारीही होती. सरनाईक व्यवहाराला चोख होते, प्रामाणिक होते, अशी भावना एकीकडे होती, तर त्यांच्या बाबतीत काहीच सांगता येत नाही, असं कुजबुजत्या स्वरात बोलणारीही काही मंडळी होती. व्यवसाय म्हटला की काही गोष्टी बेकायदेशीरपणे कराव्याच लागतात, असंही काहीजणांकडून कानावर आलं होतं. थोडक्यात, श्रीरंग सरनाईक हा माणूस पूर्णपणे कुणाला कळलाच नव्हता. आता रविवारी पूर्णपणे एकटं राहून कुणाच्याही संपर्कात न येण्याची त्यांची ही सवयसुद्धा जरा विचित्रच होती.
राजेश केसकर हा चाळिशीतला, उत्साही माणूस त्यांच्या कंपनीचा मॅनेजर होता. गेल्या काही वर्षांत सरनाईकांच्या व्यवसायाची मोठी प्रगती झाली होती. एका फॅक्टरीपासून सुरुवात करून आता त्यांच्या तीन फॅक्टरीज होत्या आणि त्यांचं व्यवस्थापन एकटा केसकर सांभाळत होता. तो सरनाईकांचा अतिशय विश्वासू होता.
“साहेबांचं तसं वैर कुणाशीच नव्हतं. व्यवहाराला साहेब एकदम परफेक्ट होते. दर महिन्याच्या पाच तारखेला पगार झालाच पाहिजे, असा त्यांचा आग्रह असायचा. त्याचबरोबर कामात टाळाटाळ केलेलीही त्यांना अजिबात आवडत नसे. शिस्तीच्या बाबतीत ते अतिशय कठोर होते,“ केसकरने माहिती पुरवली.
“या कठोरपणामुळे कधी कुणाशी भांडण झालं नाही?“ मिरजकरांनी सवयीने प्रश्न विचारला.
“नाही साहेब, माझ्या तरी कानावर नाही,“ केसकरने लगेच उत्तर देऊन टाकलं.
फॅक्टरीतल्या इतर काही लोकांकडे चौकशी करताना मात्र मिरजकरांना वेगळीच माहिती हाताशी लागली. प्रताप भडसावळे नावाचा त्यांचा एक मेव्हणा शहरातच राहतो आणि अलीकडे कंपनीच्या कामातही तो लक्ष देऊ लागला होता. त्याचं आणि केसकरांचं अजिबात पटत नव्हतं. सरनाईकांनाही तो फारसा आवडत नव्हता. तरीही तो रोज कंपनीत येतो आणि सरनाईकांच्या समोरच त्याच्याशी वादही झाले होते, अशी माहिती काही कामगारांनी दिली, तेव्हा मात्र इन्स्पेक्टर मिरजकरांना हे प्रकरण वाटतं तेवढं साधं नसल्याचं लक्षात आलं.
“सावंत, हा प्रताप नेमका कसा आहे, याची माहिती काढा,“ अशी सूचना त्यांनी केली आणि पोस्टमार्टेम वगैरे इतर प्रक्रियांसाठीही आदेश दिले. सरनाईक दर रविवारी फक्त आराम करतात, नोकरचाकरांना सुटी देतात, कुणाला भेटत नाहीत, कामाचं काही बोलत नाहीत, हे तसं सगळ्यांनाच माहीत होतं. मात्र नेमक्या आजच्याच दिवशी देविकाबाई माहेरच्या माणसांबरोबर बाहेर जाव्यात, दिवसभर कुणीच बंगल्याकडे फिरकू नये, संध्याकाळपर्यंत कुणालाच काही खबर लागू नये, याचं मिरजकरांना राहून राहून आश्चर्य वाटत होतं. यात काहीतरी गडबड आहे, पण ती आपल्या लक्षात येत नाहीये, असंही त्यांना वाटून गेलं.
आपल्या माणसांवर विश्वास आहे, म्हणून सरनाईकांनी बंगल्यात कुठेही सीसीटीव्ही लावून घेतले नव्हते. आजूबाजूच्या सीसीटीव्हीमध्ये काही मिळतंय का, याची चौकशी करायचे आदेश मिरजकरांनी दिले होते, पण त्यातून फार काही हाती लागेल, याची शक्यता नव्हती. मुळात सरनाईक हा माणूस नेमका कसा होता, हे माहीत करून घेण्याची गरज त्यांना वाटत होती.
“चांगलेच होते सरनाईक साहेब. सगळ्यांना मदत करायचे.“
“गरजेला पैसे द्यायचे. कधी नाही म्हणायचे नाहीत.“
काही कामगारांनी सांगितलं. त्यांचं बोलणं सुरू असताना एक कामगार मात्र स्वतःशीच पुटपुटत बाजूला बसून होता. त्याला ही चर्चा अजिबात पटत नसावी, असं त्याच्या चेहर्यावरून दिसत होतं. मिरजकरांनी सावंतांना खूण करून त्याला बाजूला घ्यायला सांगितलं. बाकीच्यांना पिटाळून दिलं आणि त्याच्या समाचाराला समोर उभे राहिले.
“काय नाव तुझं?“ त्यांनी विचारलं.
“मनोज गंगावणे.“
“मनोज, मला सांग, तुला कसे वाटायचे तुझे साहेब?“
“कोण साहेब?“
त्याच्या या प्रश्नाने मिरजकर थोडे दचकले. हा माणूस असं का विचारत असेल? त्याला जरा विश्वासात घेऊन, चुचकारून माहिती काढणं त्यांना महत्त्वाचं वाटू लागलं. त्याच्याकडून जी माहिती मिळाली, त्याने पोलिसांची तपासाची दिशाच बदलणार होती. करारी, मेहनती, कष्टाळू अशी सरनाईकांची प्रतिमा असली, तरी ते नुसते कठोर नाही, निष्ठूरही होते. जो माणूस वाकड्यात शिरेल, त्याला आधी सांगून बघायचं, नाही जमलं तर त्याला कुठल्याही पद्धतीनं सरळ करायचं, असं त्यांचं धोरण होतं. पूर्वी एकदा त्यांच्या कंपनीतल्या जाचक नियमांबद्दल तक्रार करणार्या कामगाराला त्यांनी धडा शिकवला होता. त्याला त्या कंपनीतूनच नव्हे, शहरातून गाशा गुंडाळून दुसरीकडे पळून जावं लागलं होतं. आणखीही एक दोन कामगारांच्या बाबतीत असाच प्रकार घडला होता.
“हा प्रताप नेमका कसा माणूस आहे?“ मिरजकरांनी मोक्याचा प्रश्न विचारला. त्यावर मात्र तो कामगार जरासा दचकलेला वाटला.
“हे बघ, घाबरायचं काही कारण नाही. पोलिस तुझ्या पाठीशी आहेत. तुला काही त्रास होणार नाही,“ असं आश्वासन दिल्यावर मात्र त्याच भीड थोडी चेपली. त्यानं दिलेली माहिती धक्कादायक होती. प्रताप काही वर्षांपूर्वीच शहरात आला होता. आधी बर्याच ठिकाणी त्यानं नोकरी, व्यवसायाचा प्रयत्न केला होता, पण धरसोड वृत्तीमुळे कुठेच जम बसला नव्हता. देविकाबाईंचा लांबचा भाऊ म्हणून त्यांनीच त्याला कंपनीत घेण्याची गळ घातली. सरनाईकांनी नियमांविरुद्ध जाऊन त्याला नोकरी दिली, पण तो आता सगळ्याच गोष्टी स्वतःच्या अधिकारात घ्यायला बघत होता आणि सरनाईकांचा त्याला तीव्र विरोध होता. राजेश केसकर या मॅनेजरवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. त्याच्या हाताखाली काम करावं लागतं, म्हणून प्रतापही चिडलेला होता. मात्र, त्याच्या तक्रारींना सरनाईकांनी अजिबात भीक घातली नव्हती.
महिनाभरापूर्वी मात्र अशी एक घटना घडली होती, ज्यामुळे प्रताप आणि सरनाईक या दोघांमध्ये मोठी दरी पडली होती. प्रतापने सरनाईकांवर दबाव आणण्यासाठी कंपनीतल्या काही कामगारांना फितवून आपल्या बाजूने ओढायचा प्रयत्न केला होता. राजेशलाही त्याला मार्गातून हटवायचं होतं. ते सरळ मार्गाने शक्य होणार नाही, याची त्याला कल्पना होती. म्हणूनच त्याने कंपनीत संप घडवून आणायचा प्रयत्न चालवला होता. सरनाईकांना याची कुणकुण लागली आणि त्यांनी प्रतापचा सगळ्यांसमोर अपमान केला. त्यावेळी देविकाबाईंच्या मध्यस्थीचाही काही उपयोग झाला नाही.
प्रताप एवढा संतापला की चार दिवस शहरातून कुठेतरी निघून गेला होता. तसाही त्याला सरनाईकांनी घरी कधीच थारा दिला नव्हता. मात्र पुन्हा देविकाबाईंनाच मध्यस्थी करून त्याला परत घेण्यासाठी सरनाईकांकडे विनवणी करावी लागली. ही शेवटची संधी देतोय, असं बजावून सरनाईकांनी त्याला कंपनीत परत घेतलं होतं. मात्र, यापुढे कुठल्याही गोष्टीची तक्रार करायची नाही, सांगितलेलं काम करायचं आणि कुठलीही ज्यादाची मागणी करायची नाही, असंही बजावलं होतं.
“प्रताप गप्प बसणारा माणूस नाही, याची सरनाईक साहेबांनाही कल्पना होती. त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवायला एक माणूस नेमला होता. सरनाईक साहेब बधत नाहीत म्हटल्यावर प्रतापने राजेशला धमकावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा साहेब भडकले,“ मनोजने ही माहितीही मिरजकरांना दिली, तेव्हा त्यांचे डोळे चमकले.
“मग? त्यांनी पुन्हा त्याच्यावर कारवाई केली?“ त्यांनी उत्सुकतेनं विचारलं. मनोज जरा भेदरल्यासारखा वाटला. थोडा वेळ घेऊन, कुणी ऐकत नाही ना, याची खात्री करत तो म्हणाला, “साहेब, सरनाईक साहेबांनी यावेळी प्रतापला कायमचा धडा शिकवायचा निर्णय घेतला होता.“
“म्हणजे? नेमकं काय केलं त्यांनी?“ मिरजकरांनी आणखी खोदून विचारलं.
“एखादा माणूस हाताबाहेर गेला की त्याचा बंदोबस्त करायला साहेबांची खास माणसं होती. साहेबांनी त्यांना सांगून बाहेरून गुंड मागवून प्रतापवर हल्ला करायची सुपारी दिली होती,“ मनोजने ही माहिती दिल्यावर मिरजकर हादरलेच. सरनाईक या माणसाची दोन रूपं आहेत, याची त्यांना कल्पना होती, पण तो माणूस एवढ्या थराला जाऊ शकतो, याचा अजिबात अंदाज आला नव्हता.
मनोज खरं बोलतोय की खोटं, याची तपासणी करणं महत्त्वाचं होतं. त्यांनी आणखी काही कामगारांना विश्वासात घेऊन माहिती काढली, तेव्हा मनोजच्या म्हणण्याला दुजोरा मिळाला. एकूणच हे प्रकरण गुंतागुंतीचं होत चाललं होतं. प्रतापचा बंदोबस्त करण्यासाठी सरनाईकांनी त्या माणसांना बंगल्यावर बोलावलं होतं. अशी कामं करायला रविवारी, घरी कुणी नसतानाच ते बोलावून घेत असत. त्या दिवशी त्यांच्यात काही बिनसलं आणि सरनाईकांवरच गेम पडला, असं तर झालं नाही ना, याचीही शंका होती.
शेजारच्या एका बंद असलेल्या बंगल्याचं सीसीटीव्ही फुटेज Dाचानक मिरजकरांच्या हाती आलं आणि तपासाला वेगळी दिशा मिळाली. त्या दिवशी सकाळी लवकर बंगल्याकडे दोन नाही, एकच माणूस आलेला दिसत होता. त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. मात्र त्याच्या हातातलं चांदीचं कडं चमकत होतं आणि त्यावरून मिरजकरांनी ताबडतोब त्या माणसाला ओळखलं. बंगल्यात घेतलेल्या ठशांचा रिपोर्टही त्याच दिवशी हातात आला आणि मिरजकरांच्या मनातली शंका खरी ठरली. त्यांनी त्याच संध्याकाळी बंगल्यावरच सगळ्या संबंधित लोकांना बोलावून घेतलं. त्यात सरनाईकांची पत्नी देविकाबाई, मॅनेजर राजेश, मेव्हणा प्रताप यांच्यासह कंपनीतली काही महत्त्वाची मंडळी होती.
“तुमच्यापैकी कुणी खुनाच्या दिवशी पहाटे बंगल्यावर आलं होतं का? आत्ताच सांगा. आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. एकदा आम्ही नाव घेतल्यावर नंतर बचावाची संधी मिळणार नाही,“ त्यांनी करड्या आवाजात बजावलं. कुणीच काही बोललं नाही, सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले.
गुन्हेगार शेवटपर्यंत पोलिसांच्या तावडीत न सापडण्याच्या पळवाटा शोधत राहणार, हे उघड होतं.
“राजेश साहेब, हा प्रताप तुम्हाला अधूनमधून त्रास देत होता, हे खरं आहे का?“ मिरजकरांनी राजेशकडे बघून प्रश्न विचारला, तसा राजेश आणखी गप्प झाला. “तुम्ही गप्प बसलात, तरी तुमचं उत्तर मला माहीत आहे. या माणसाचा कायमचा बंदोबस्त करायची योजना सरनाईकांनी आखली होती, हे मात्र कुणालाच माहीत नसेल,“ ते म्हणाले आणि सगळे दचकून पाहू लागले.
“बरोबर ना, प्रतापराव? हे कुणालाच माहीत नव्हतं. फक्त तुम्ही सोडून.“ असं मिरजकर म्हणाले आणि प्रतापला घाम फुटला.
“रविवारी आपण घरी येऊन सरनाईकांचा काटा काढला, तरी कुणालाही कळणार नाही, असं तुला वाटलं होतं. पण सीसीटीव्हीनं तुझा मुखवटा फाडून तुला पकडून दिलं. तुझे ठसेही मिळालेत घरात आणि तुझ्या स्वतःच्या घरात तू लपवून ठेवलेलं हत्यारही आम्ही जप्त केलंय,“ एवढं सांगितल्यावर मात्र प्रतापची बोबडी वळली.
प्रतापच्या विचित्र वागण्यावरून मिरजकरांना सुरुवातीपासून त्याच्याबद्दल शंका आली होती. प्रतापचाही सरनाईकांच्या सगळ्या व्यवसायावर डोळा होता. आपल्याला किंमत मिळत नाही, म्हटल्यावर तो चिडला. त्यातून सरनाईकच त्याचा काटा काढणार, हे लक्षात आल्यावर त्यांनाच वाटेतून दूर करावं, असं त्याला वाटू लागलं आणि त्यानं पहाटे घरी कुणी नसताना सरनाईकांकडे जाऊन आपली योजना अमलात आणली. कितीही शिताफीनं काम केलं, तरी पोलिसांच्या तावडीतून आपण सुटू शकत नाही, हे मात्र तो विसरून गेला होता.