निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आणि त्याच दरम्यान महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राज्यातील शालेय शिक्षकांसाठी गणवेष संहिता लागू केली. ती बातमी टीव्हीवर पाहून माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या पोट धरून हसत हसत टीव्हीसमोर गडबडा लोळायला लागला. मी कारण विचारताच तो म्हणाला, इतकी विनोदी बातमी मी गेल्या अनेक वर्षांत पाहिलेली नाही आणि वाचलेलीही नाही. त्यावर मी म्हटलं, पोक्या, अशा सरकारी निर्णयाची टिंगलटवाळी करणं बरं नाही. विद्यार्थ्यांसारखीच शिक्षकांनाही शिस्त लावण्याच्या चांगल्या हेतूने घेतला असेल त्यांनी निर्णय. शिक्षकांनी त्याची अंमलबजावणी केली, तर काय बिघडलं? त्यावर पोक्या चवताळून माझ्या अंगावर वसकन ओरडला, कसली बोडक्याची शिस्त. यांना स्वत:ला शिस्त नाही आणि शिक्षकांना शिस्त लावायला निघालेत… मी म्हटलं, पोक्या, माझ्यापुढे अशी आगपाखड करण्यापेक्षा त्या केसरकरांना भेट आणि त्यांनाच काय ते प्रश्न विचार… तसा पोक्या तणतणतच केसरकरांची मुलाखत घेण्यासाठी तडक निघून गेला. तीच ही मुलाखत.
– नमस्कार केसरकरजी.
– नमस्कार. तू माझी मुलाखत घेण्यासाठी येणार हे मी माझ्यात असलेल्या अंतर्ज्ञानी शक्तीने जाणलं होतं. तू कोणते प्रश्न विचारणार हेही मला माहीताय. पण शांतपणाने विचार. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं माझ्याकडे उत्तर आहे.
– असा कसा हो तुम्ही शिक्षकांसाठी ड्रेसकोडचा हुकूम काढला? कोणतं पाप केलं होतं त्यांनी गेल्या जन्मात की त्यांच्यावर शिकवताना कोणते कपडे घालावेत हे तुम्हाला शिकवावं लागलं?
– शांत हो पोक्या शांत हो. माझ्या अंतर्मनाने एकदा का निर्णय दिला की मी माघार घेत नाही. अरे, आपली संस्कृती काय आणि कसले कपडे घालून येतात हे शिक्षक!
– कसले म्हणजे? ते काय अंगप्रदर्शन करणारे कपडे घालत नाहीत. शिक्षिका साडी, पंजाबी ड्रेस, फार तर सलवार कुडता याच ड्रेसमध्ये असतात. त्यांच्या शिकवण्याचा आणि कपड्यांचा काहीच संबंध नसतो.
– हे बघ पोक्या, हे तर काहीच नाही. आमच्या केंद्रीय नेतृत्त्वाच्या मनात सर्व भारतीय नागरिकांना एकच ड्रेस कोड लागू करण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे देशात कशी सुसूत्रता येईल. भेदभाव संपून जातील. पुरुषांना भगव्या रंगाचा सदरा, लेंगा आणि महिलांना भगव्या रंगाची सलवार, कुडता आणि ओढणी. ते दृष्यच किती देखणं आणि आपल्या देशाच्या एकात्मतेचं प्रतीक असेल. नुसती कल्पना करून बघ.
– हा कल्पनाविलास थांबवा आणि शिक्षकांच्या ड्रेस कोडबद्दल बोला.
– अरे, माझ्या मनात तर मर्हाटमोळी संस्कृती जपण्यासाठी प्रत्येक शिक्षकाला पांढरे शुभ्र धोतर आणि शिक्षिकांना पांढर्या रंगाची नऊवारी साडी नेसण्याची सक्ती करणारा सरकारी वटहुकूम काढण्याचा विचार होता. पण मी तो मनातल्या मनातच जिरवून टाकला.
– काय भयंकर बोलता तुम्ही हे…
– पुढची पिढी जर संस्कारी बनवायची असेल तर आधी शिक्षकांवर संस्कार करायला हवे. आता माझ्या डोळ्यांना डोळे भिडवून बघ. काय दिसतं तुला?
– मला असली घाणेरडी सवय नाही डोळ्यात डोळे घालून पाहायची. तुमच्या डोक्याबिक्यावर परिणाम झालाय का?
– हो. पण त्याला दुष्परिणाम नाही, सुपरिणाम म्हणतात. विद्यार्थ्यांचं पुढल्या शंभर वर्षातील उज्वल भवितव्य घडविण्यासाठी घातला जाणारा पाया आहे हा.
– आणखी एक आठवलं. शिक्षकांनी पायात बूट घालून नव्हे, तर चपला म्हणजे वहाणा घालूनच आलं पाहिजे ते का म्हणून?
– अरे वेड्या, बूट ही इंग्रजांची संस्कृती आहे. तिला हद्दपार करण्याची सुरुवात शिक्षकांपासूनच केली तर त्यात काय वाईट आहे?
– अहो, पण महाराष्ट्रातील दुर्गम, डोंगराळ भागात नदी, ओढ्याच्या पाण्यातून वाट काढत जाणार्या शिक्षकांना पायात जोडे घालणे कसे सोयीस्कर वाटेल?
– जोडे आपल्या कोल्हापूरच्या संस्कृतीची भूषण आहे. हे जोडे दुप्पट मजबूत बनवून देण्याचं कॉन्ट्रॅक्ट आम्ही आमच्या सरकारमधील ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटलांना देण्याचा विचार करतोय. ते पाहतील कोणती कंपनी स्वस्तात मजबूत जोडे बनवून देते.
– अशाने ते शिक्षक जोड्याने हाणतील.
– काय? काय बोललास तू?
– ऐकलं नाहीत ते बरं झालं. मी म्हणालो, अशा आदर्श उपक्रमाबद्दल शिक्षक पूजा करतील आपली… कशाने ते विचारू नका.
– काय, काय म्हणालास?
– साहेब, तुम्हाला अलीकडे ऐकायला कमी येतं का? हा सारखं गारंटी गारंटी ऐकण्याचा परिणाम आहे. गेल्या पंधरा दिवसांत देशातील असंख्य लोक बहिरे झाल्याचा रिपोर्ट वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलाय.
– काहीतरी थापा मारू नकोस.
– आणखी मला एक सांगा. ते ‘टी फॉर टीचर’ ही काय भानगड आहे? शिक्षकांना मोफत चहा आणि घरपोच चहा पावडर देण्याची योजना नाही आहे ना ती?
– तू अगदीच मूर्ख आहेस. अरे शिक्षकांनी नावामागे नेहमी ‘टी फॉर टीचर’ अशी उपाधी लावण्याची सक्ती आहे ती. त्यामुळे त्यांना सतत कर्तव्याची जाणीव होत राहील. नुसतं ‘टीआर’ लावलं तरी चालेल.
– आणखी कसले कसले उदात्त हेतूचे निर्णय घेतले आहेत तुम्ही?
– ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत शाळांना प्रार्थनेबरोबर लावलेच पाहिजे असा निर्णय घेतला आहे आम्ही.
– पण नुसतेच जय जय करण्यापेक्षा महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातेत चाललेत त्याचा बंदोबस्त करा आधी. नाहीतर उद्या ‘जय जय गुजरात’ म्हणण्याची पाळी येईल. मुंबई महापालिकेतील टेंडरच्या सूचना गुजरातीतून निघत असतील तर नुसतं महाराष्ट्र गीत गाऊन त्याचा काहीच उपयोग होणार नाही. महाराष्ट्राचा गुजरात कसा होणार नाही याकडे आधी लक्ष द्या आणि नंतरच महाराष्ट्र गीताचा उदो उदो करा. त्या ड्रेस कोडपेक्षा शिक्षकांच्या मुलभूत समस्यांकडे लक्ष द्या. त्यांची रिक्त पदं भरा, विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारची वाहतूक व्यवस्था, मुबलक प्रमाणात शिक्षण साहित्य, सकस आहार, वैद्यकीय सुविधा द्या. नंतर डांगोरा पिटा.