कर्नाटकातील हंपी ही जागा पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. जागतिक वारसास्थळ म्हणून त्या ठिकाणाला मान्यता मिळालेली आहे, त्यामुळे तिथे नवीन बांधकाम करण्यावर बंधने आहेत. हॉटेलची संख्या त्या ठिकाणी मर्यादित आहे, त्यामुळे तिथे राहणार्या स्थानिक लोकांनी होम स्टेची सुविधा पर्यटकांच्या सोयीसाठी सुरू केल्या आहेत. जगभरातून इथे येणारे पर्यटक गावात येऊन रूम पाहून ती बुक करण्याची रिस्क घेत नाहीत. सर्वाधिक लोक संकेतस्थळाच्या माध्यमातून इथे रूम बुक करतात.
हंपीमध्ये कृष्णकुमार आणि वीरसेन हे दोन भाऊ राहत होते. वडील गेल्यामुळे त्यांनी आपल्या घराची वाटणी करून घेतली होती. त्यांचे घर मोठे, ऐसपैस, आजूबाजूला हिरवीगार झाडी, मोठ्या खोल्या, काही ठिकाणी केळीची, आंब्याची झाडे, घराच्या समोर मोठे अंगण, हे सारे तिथे येणार्या पर्यटकाला आकर्षित करायचे. त्यामुळे पर्यटकांचे एक आकर्षण केंद्र बनलेल्या या घराच्या ठिकाणी होम स्टेची सुविधा सुरू करण्याचे दोघा भावांनी ठरवले. दोघांनी आपापल्या जागेत ही सुविधा सुरू केली. दोघांचा व्यवसाय सुरळीत सुरू होता. पर्यटक येत होते, राहत होते, त्यामधून दोघांना चांगले पैसे मिळत होते.
कृष्णकुमारचा मुलगा विशाल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होता. त्याला कॉम्प्युटरमध्ये विशेष रस होता. शिक्षण पूर्ण झाले की आपण नोकरी करायची नाही तर व्यवसायच करायचा. सध्या घरी जो होम स्टे चा व्यवसाय सुरू आहे, तो पुढे नेण्यासाठी काय करता येऊ शकते, याचा विचार त्याच्या डोक्यात सुरू झाला होता. शिक्षण पूर्ण केल्यावर विशाल हंपीमधल्या आपल्या गावी आला होता तो कायमचाच.
आपल्या होम स्टेमध्ये कायम पर्यटकांची गर्दी राहावी, म्हणून विशालने माहिती-तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचे ठरवले. वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात त्याची जाहिरात सुरू करण्याचा सपाटा सुरू केला.
वेबसाईटवर जाहिरात करताना जाहिरात देणारे आणि वेबसाईटवर त्यासाठी जागा देणारे यांची एकमेकांना ओळख करून देण्यासाठी काही ऑटोमॅटिक प्लॅटफॉर्म तयार केलेले असतात, त्याचा या जाहिरात करणार्या मंडळींना चांगला फायदा होतो. विशालने त्याचा चांगला अभ्यास केला होता. त्यामुळे ग्राहकांपर्यत पोहोचण्यात तो कोणत्याही प्रकारे कमी पडत नव्हता. वर्तमानपत्र, मासिकांमधून जाहिरात केल्यावर मिळणार्या प्रतिसादापेक्षा त्याला वेबसाईटवरील जाहिरातीचा चांगलाच प्रतिसाद मिळत होता. वेबसाईटवर जाहिरात करताना प्रोग्रॅमेटिक अॅडव्हर्टीझिंगचा वापर करण्यात येतो. आपल्या जाहिरातीला भेट देणार्या व्यक्तीचे प्रोफाइल काय आहे, त्याचा डेटा गोळा करून तो डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध केला जातो. हंपीला येणार्या ग्राहकांपैकी ज्यांना होम स्टेची आवश्यकता आहे, त्यांना आपली जाहिरात दिसावी अशी ऑर्डर विशालने डिजिटल प्लॅटफॉर्मवर दिलेली होती. या सगळ्या उपक्रमामुळे तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचला होता. विशालच्या या प्रयत्नामुळे कृष्णकुमार यांच्या व्यवसायात चांगली वाढ झाली होती, तर दुसरीकडे वीरसेनचा होम स्टेचा व्यवसाय मंदावला होता. सगळी गर्दी कृष्णकुमार यांच्याकडेच होत असे. व्यवसाय कमी झाल्यामुळे वीरसेन चिंतेत होता.
दरम्यान, वाराणसीमध्ये राहणारा धवलकुमार चार मित्रांच्याबरोबर हंपीमध्ये आला होता. त्याने कृष्णकुमारचा होम स्टे चांगला आहे, असे ऐकले होते. वेबसाईटवर देखील त्याची जाहिरात पाहिली होती. त्यामुळे धवलकुमारला तिथेच राहायचे होते. त्याने विशालला फोन करून आपल्याला जागा मिळेल का, काही करता येईल का त्यासाठी, अशी विचारणा केलीr. पण त्या संवादात काहीतरी गडबड झाली, वाद झाला. धवल कुमारने वीरसेनच्या होम स्टेमध्ये जागा बुक केली होती.
धवलकुमार आणि वीरसेन यांच्या गप्पांमध्ये असा विषय झाला की कृष्णकुमारचा व्यवसाय वेबसाईटच्या जाहिरातीमुळे चांगला चालला आहे. माझ्याकडे तितके पैसे नसल्यामुळे माझा व्यवसाय चांगला चालू नाही, असे वीरसेनने धवलकुमार याला सांगितले होते.
धवलकुमार हंपीची ट्रिप करून घरी परतला आणि कृष्णकुमारचा व्यवसाय हळूहळू कमी होऊ लागला होता. पुढल्या महिन्यात विशालचा जाहिरातीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत गेला. पण खर्च वाढला होता, त्या प्रमाणात ग्राहक मात्र येत नव्हते. दुसरीकडे वीरसेनचा व्यवसाय पुन्हा चांगला चालू लागला होता. हे कशामुळे होत आहे, हे विशालला समजत नव्हते. त्याचा संशय वीरसेनवर होता. पण, त्याला निश्चित प्रकार समजत नव्हता. हा सगळा प्रकार नेमका कशामुळे होत आहे, याचा शोध घेण्याचे विशालने ठरवले, हे कोडे सोडवण्यासाठी त्याने सायबर फॉरेन्सिकमध्ये काम करणार्या व्यक्तीची मदत घेण्याचे ठरवले.
जाहिरातीचा खर्च कशामुळे वाढला आहे आणि तरीही आपल्याकडे ग्राहक का येत नाहीत, याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली, तेव्हा क्लिक प्रâॉडसारखा एक नवीन प्रकार सुरु झाला असल्याचे समजले. विशालने वेबसाईटवर जाहिरात दिली होती, त्यावर बॉटच्या मदतीने नुसते क्लिक करण्यात येत होते. प्रत्यक्षात ती जाहिरात कुणीच पाहत नव्हते. जाहिरातीचे बिल वाढीव मात्र दर महिन्याला विशालच्या बँक खात्यामधून वळते करून घेतले जात होते. हा सगळा प्रकार हा प्रोग्रामेटिक अॅडमध्ये असणार्या सॉफ्टवेअरच्या साह्याने होत होता. त्यात मानवी हस्तक्षेपाला काहीच वाव नव्हता.
त्यात कृष्णकुमारच्या होम स्टेमध्ये रूम मोकळ्या असताना देखील त्या सगळ्या भरलेल्या आहेत, असेच दिसत होते. तसेच कृष्णकुमारच्या हॉटेलची जाहिरात योग्य व्यक्तींपर्यंत पोहचत नव्हती. दरम्यान, एका रविवारी वीरसेनला धवलकुमारचा फोन आला, तो विशालबद्दल त्याच्याकडे चौकशी करत होता, त्याचा व्यवसाय थांबला आहे काय, गर्दी आहे काय, अशी विचारणा त्याने केली. त्यावर वीरसेनने त्याला त्याची सगळी परिस्थिती सांगितली, तेव्हा त्याला अद्दल घडवण्यासाठी आपण एक कारनामा केला, त्यामुळे त्याला हा फटका बसल्याचे त्याने सांगितले. विशालला मोठा आर्थिक फटका बसला होता, त्यामुळे त्याने वेबसाईटवरील जाहिरात बंद केली आणि जुन्या पद्धतीने काम सुरू केले.
हे लक्षात ठेवा
– वेबसाइटवर आपली जाहिरात दिसत असेल तर त्यावर आपण लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
– अलीकडच्या काळात तंत्रज्ञान खूपच पुढे गेलेले आहे, त्यामुळे एखादी गोष्ट करताना आपण त्यात कितीही पारंगत असलो तरी त्यामध्ये आपली फसवणूक होऊ शकते, याचा कायम विचार करून सावधपणे पुढे जाण्याची आवश्यकता आहे, हे आपण विसरून चालणार नाही.
– जाहिरातीच्या बाबतीत काही संशय आला तर त्याचा शोध घ्या, त्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घ्या.