‘माडगूळकर, ही लावणी काही जमली नाही बुवा’, थोडे आजारी असलेल्या बाबुरावांनी कॉटवर पडल्या पडल्या वाचूनच मत व्यक्त केलं. समोर बसलेले माडगूळकर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक द. स. ऊर्फ तात्या अंबपकर चमकलेच. गदिमांना प्रचंड संताप आला. पण ‘बाबुराव’ ही काय व्यक्ती आहे याची अनुभवाने घेतलेली पुरेपूर जाणीव असल्यामुळे त्यांनी संताप मनातल्या मनात गिळला. वास्तविक ‘रामजोशी’ या व्ही. शांताराम आणि बाबुराव पेंटर दिग्दर्शित, ‘राजकमल’ निर्मित चित्रपटातील सवाल-जवाब रसिकांनी उचलून धरले होते. माडगूळकरांचे नाव चित्रपट गीतकार म्हणून रसिकांच्या ओठी गाजत होतं. त्यामुळे ‘माडगूळकर, ही लावणी काही जमली नाही बुवा’ हे वाक्य त्यांना फारच झोंबलं असणार हे स्वाभाविकच होतं. पण राग मनातल्या मनात गिळून माडगूळकरांनी विचारलं, ‘लावणी कशी हवी?’ गडगडाटी हास्य करीत बाबुराव म्हणाले, ‘एक्स्ट्रा स्टाँग हवी.’
‘एक्स्ट्रा स्ट्राँग’ हा शब्द मनात घोळवतच माडगूळकर घरी परतले. दुसर्या दिवशी एक नवीन लावणी लिहिलेला कागद घेऊन माडगूळकर बाबुरावांकडे गेले. बाबुराव अजूनही पलंगावर पडूनच होते. त्यांनी माडगूळकरांना लावणी वाचून दाखवा असं सांगितलं. माडगूळकरांनी ती लावणी वाचून दाखवली आणि आजारी बाबुराव ताडकन उठून उभे राहिले आणि आनंदाने म्हणाले, ‘वा! माडगूळकर याला म्हणायचं एक्स्ट्रा स्ट्राँग लावणी.’ लावणीचे शब्द होते ‘माझ्या व्हटाचं डाळिंब फुटलं, सांगा राघू मी न्हाई कधी म्हटलं’.
मंगल पिक्चर्सच्या ‘जय मल्हार’ या चित्रपटातली ही लावणी भलतीच गाजली. फक्त ही लावणीच नाही, तर हा चित्रपटच तुफान गाजला. ‘काटेवाडी घोड्यावरनं, पुढ्यात घ्यावं मला, राजसा, जाऊ या जेजुरीला’ अशी एकापेक्षा एक सरस गाणी, चंद्रकांत, ललिता पवार, सुमती गुप्ते, ग. दि. माडगूळकर, विष्णुपंत जोग आणि कल्लू बेरड या भूमिकेत स्वत: बाबुराव पेंढारकर. ‘जय मल्हार’ चित्रपट बघताना आजही झोप उडते. त्यावेळची मर्दानी थाटाची, अस्सल ग्रामीण चित्रपटांची चित्तरकथा तर अजबच होती.
बाबुराव पेंढारकर! हे नाव उच्चारताच मूक चित्रपटापासून ते आजच्या रंगीत-संगीत चित्रपटसृष्टीचा जणू जिवंत जिता जागता इतिहासच डोळ्यांसमोर साकारतो. २२ जून १८९६ रोजी कलानगरी कोल्हापूर येथे दामोदर गोपाळ पेंढारकर यांचा जन्म झाला. वडील गोपाळराव पेंढारकर हे कोल्हापूर संस्थानात सहाय्यक शल्य चिकित्सक होते. आईचे नाव राधाबाई. पाळण्यातले नाव दामोदर हे मागे पडले आणि ‘बाबुराव पेंढारकर’ या नावानेच ते कलाक्षेत्रात गाजले. प्रसिद्ध ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक, शिवभक्त भालजी पेंढारकर हे बाबुरावांचे धाकटे बंधू. मास्टर विनायक हे सावत्र बंधू, तर चित्रपती व्ही. शांताराम हे मावसबंधू. या सर्वच भावंडांनी आपापल्या कर्तृत्त्वाने कलाक्षेत्रात आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटवली आहे. कृष्णराव मेस्त्री, आबालाल रहिमान, अल्लादिया खान, मंजीखां अशा त्या काळी कोल्हापुरात वास्तव्य असलेल्या महान कलाकारांची छाप बालवयातच बाबुरावांच्या जीवनावर पडली. कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या ‘सैरंध्री’ या मूकपटात विष्णूची भूमिका करून त्यांनी चित्रसृष्टीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर तयार झालेल्या ‘भक्त दामाजी’, ‘सुभद्रा हरण’, ‘कल्याण खजिना’ इत्यादी मूकपट निर्मितीत त्यांनी सहाय्य केले.
१९२४ ते १९२९ हा कालखंड मात्र त्यांचा कसोटीचा काळ होता. १९२२ साली घडलेल्या एका कटू प्रसंगामुळे त्यांना बाबुराव पेंटरांची कंपनी सोडावी लागली होती. भालजी पेंढारकर आणि पार्श्वनाथ आळतेकर यांच्यासह त्यांनी मुंबई येथे ‘वंदे मातरम फिल्म्स’ या संस्थेची स्थापना केली. ‘वंदे मातरम आश्रम’ हा चित्रपट निर्माण केला. दिग्दर्शक होते भालजी पेंढारकर. पण त्या काळच्या ब्रिटीश सरकारच्या सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील बर्याच भागावर निर्दयपणे कात्री चालवली आणि कसाबसा हा चित्रपट प्रदर्शित झाला.
‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ची स्थापना १ डिसेंबर १९१७ रोजी कोल्हापूर येथे झाली. बाबुराव पेंटर मालक आणि त्यांचे सहाय्यक होते दामले आणि फत्तेलाल. व्यवस्थापक म्हणून बाबुराव पेंढारकर काम करीत. चित्रपट प्रदर्शनासाठी बाबुराव हुबळीला गेले होते. तेथे त्यांचे मावसबंधू शांताराम वणकुद्रे राहात असत. चरितार्थासाठी किरकोळ स्वरुपाच्या नोकर्या करीत असत. बाबुरावांनी त्यांना विचारले, आमच्या कंपनीत येतोस का? शांताराम ‘हो’ म्हणाले आणि काही दिवसांनी कोल्हापूरला आले आणि १९२०मध्ये कामावर रुजू झाले. पुढील काळात व्ही. शांताराम या ख्यातनाम चित्रपतींना चित्रसृष्टीत आणण्याचे काम बाबुराव पेंढारकरांनी केले ही केवढी मोठी भाग्याची गोष्ट!
सोमवार १ जून १९२९ रोजी कोल्हापूर येथील मंगळवार पेठेत ‘प्रभात फिल्म कंपनी’ची स्थापना झाली. त्याचे पाच भागीदार होते. विष्णुपंत दामले, शेख फत्तेलाल, व्ही. शांताराम, केशवराव धायबर आणि सीतारामपंत कुलकर्णी. त्यांचे सहाय्यक म्हणून बाबुराव पेंढारकरही काम पाहू लागले. ‘प्रभात’चा पहिला मूक चित्रपट होता ‘गोपाळकृष्ण’. बाबुराव पेंढारकर मूक चित्रपटांपासूनच या चित्रसृष्टीत होते. आता ‘प्रभात’च्या मनात बोलपट निर्माण करण्याचे विचार सुरू झाले. या अनुषंगाने बोलपट निर्मितीचा ओझरता इतिहास आपण जाणून घेऊया.
वॉर्नर ब्रदर्सचा ‘जॅझ सिंगर’ हा जगातील पहिला बोलपट. तो ६ ऑक्टोबर १९२७ रोजी अमेरिकेत प्रदर्शित झाला. भारतामध्ये सर्वप्रथम युनिव्हर्सल पिक्चर्सचा ‘मेलडी ऑफ लव्ह’ हा बोलपट कलकत्ता येथे दाखविण्यात आला. आर्देशीर इराणींच्या इंपिरिअल फिल्म कंपनीचा ‘आलम आरा’ हा बोलपट १४ मार्च १९३१ रोजी मुंबईच्या मॅजेस्टिक सिनेमागृहात प्रदर्शित झाला. झुबेदा यांनी या बोलपटात भूमिका केली होती. पडद्यावरील पात्रे बोलतात, गातात याचे कौतुकमिश्रित आश्चर्य सर्वांना वाटले होते. भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रारंभ आणि बोलपटाची निर्मिती या दोन्हीचेही श्रेय महाराष्ट्राचेच आहे. १९३१ साली २३ हिंदी, ३ बंगाली, १ तमीळ, १ तेलुगू अशा अठ्ठावीस बोलपटांची निर्मिती झाली. त्याचप्रमाणे ३ मे १९१३ पासून भारतात तयार केलेल्या मूकपटांची संख्या होती १,२६८. १९३५ सालापासून मूकपट निर्मिती पूर्णपणे बंद झाली.
‘प्रभात’चा पहिला मराठी बोलपट म्हणजे ‘अयोध्येचा राजा’. १९३२ साली या चित्रपटाची निर्मिती झाली. ‘राजा हरिश्चंद्र’ या १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी निर्माण केलेल्या चित्रपटाचीच ही कथा होती, पण पात्रे बोलणार होती. गाणार होती. दिग्दर्शक होते व्ही. शांताराम. गोविंदराव टेंबे, दुर्गाबाई खोटे, मा. विनायक यांच्याबरोबर बाबुरावांना भूमिका मिळाली ‘गंगानाथ’ या सावकाराची. खलप्रवृत्तीचा हा गंगानाथ वरकरणी गोड गोड बोलणारा, पण आतून अत्यंत कपटी. ‘मधु तिळति जिव्हाग्रे, हृदयेतु हलाहलम’ या प्रवृत्तीचा नीच माणूस. त्याच्या नजरेतच विखार भरलेला आहे. त्याकाळचे आणि काही अपवाद वगळता आजचेही खलनायक मोठ्यांदा बोलणारे, हातवारे करणारे, पण बाबुरावांनी रंगवलेला हा खलनायक अत्यंत वेगळा. प्रेक्षक चित्रपटगृहातून बाहेर पडत ते गंगानाथाला शिव्यांची लाखोली वाहातच! बाबुरावांनी पुढे अनेक प्रकारच्या भूमिका केल्या. नायक, खलनायक, सहाय्यक अभिनेता, वृद्ध अशा कितीतरी. पण गंगानाथ तो गंगानाथच. या भूमिकेमुळे बाबुरावांनी प्रचंड नावलौकिक आणि शिव्याशापही मिळवले. सूक्ष्म अवलोकन, भूमिकेची समज आणि कॅमेर्याची ताकद या सर्व गोष्टींचा भरपूर अभ्यास हेच बाबुरावांच्या यशाचे इंगित आहे. गंगानाथ रंगवताना बाबुरावांनी प्रत्यक्ष बघितलेल्या, वास्तवातल्या दोन गोष्टींचा खुबीने वापर केला. त्यांच्या एका मित्राच्या पत्नीचे निधन झाले होते. अंत्यसंस्काराच्या वेळी कसलेही भाव चेहर्यावर नसणारा, कुत्सित हास्य करणारा भटजी त्यांनी हेरला होता. शिवाय दामले मामांची जानव्यावरून हात फिरवण्याची लकबही बाबुरावांनी उचलली आणि मिशांवरून हात फिरवणे हे दिग्दर्शक शांताराम बापूंनी सुचविले. झाला गंगानाथ महाराज तयार!
या चित्रपटाचे बाबुराव व्यवस्थापकही होते. एखाद्याच्या पोटात शिरून, गोड बोलून कार्यभाग कसा साधायचा हे शिकावं बाबुरावांकडूनच. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक होते प्रख्यात गायक, अभिनेते गोविंदराव टेंबे. शांताराम बापू गंधर्व नाटक मंडळीत कामाला होते. त्यावेळी गोविंदराव टेंबे कंपनीचे एक भागीदार होते. ‘अयोध्येचा राजा’ या बोलपटासाठी पात्रांची निवड झाली. राजा हरिश्चंद्राच्या भूमिकेसाठी गोविंदरावांच्याच सांगण्यावरून गोळे या तरुणाची निवड झाली, पण तालमीच्या वेळी तो बिचकत असे. त्यामुळे ती भूमिका दुसर्या कुणाकडून करून घ्यावी असा ‘बूट’ निघाला. गोविंदराव टेंबे त्यावेळी पन्नाशीचे होते, पण व्यक्तिमत्व एकदम देखणे, रुबाबदार. त्यांनाच हरिश्चंद्राची भूमिका करायला सांगायचे का? पण सांगणार कोण? मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? कारण साधा फोटोसुद्धा काढायचा नाही, अशी करारपत्रात नोंद होती. अखेर ही बिकट कामगिरी फत्ते करण्याचा विडा बाबुरावांनी उचलला.
एके दिवशी गोविंदराव बाबुरावांना म्हणाले, ‘हरिश्चंद्राचे काम गोळ्यांना जमत नसेल तर शांताराम बापूंनी दुसरा एखादा नट बघावा.’ ही संधी साधून बाबुराव म्हणाले, ‘ते इतके सोपे आहे का? अहो, दुर्गाबाईंबरोबर काम करणारा नट कसा देखणा, रुबाबदार आणि अनुभवी असाच पाहिजे. तो कसा मिळणार? मला तर तुमच्याशिवाय दुसरा कुणी दिसतच नाही बुवा! मी म्हणतो तुम्हीच का करत नाही ती भूमिका? अहो, दुर्गाबाई आणि तुमची जोडी किती छान शोभेल? आणि तशी इच्छा दुर्गाबाईंनीच प्रगट केली आहे.’
दुर्गाबाईंनीच तशी इच्छा व्यक्त केली आहे हे वाक्य ऐकताच गोविंदरावांची कळी खुलली. ते तयार झाले आणि ‘अयोध्येचा राजा’मधला हरिश्चंद्र ‘प्रभात’ला गवसला. युद्धात आणि प्रेमात सारे अपराध क्षम्य असतात. एखाद्या खोटं बोलण्यातून कुणाचं भलं होणार असेल तर त्यासाठी ‘दिली ठोकून लोणकढी’ ही रीत बाबुरावांनी यशस्वीपणे उपयोगात आणली. याला म्हणतात, ‘जाणते व्यवस्थापन’.
आचार्य अत्रे यांच्या एका चिठ्ठीच्या मदतीने ग. दि. माडगूळकर यांनी ‘ब्रह्मचारी’ या मा. विनायक यांच्या चित्रपटातून चित्रसृष्टीत प्रवेश केला. तोंडाला रंग लावून आणि विविध पोषाख अंगावर चढवून कधी मॉबसीनमध्ये तर कधी डॉयलॉग म्हणत वेगवेगळ्या वीस भूमिका केल्या. पडेल ती कामं केली. पगार रुपये शून्य! नाश्ता, चहा, जेवण मात्र कंपनीकडून! दिवस-रात्रीची पर्वा केली नाही. पगाराचा दिवस उगवला. एकेक जण ऑफिसमध्ये जाऊन पगारपत्रकावर सही करून पगाराच्या नोटा म्ाोजत परत येत होता. गदिमांना तिकडे फिरकण्याचा प्रश्नच नव्हता. कारण ते बिनपगारी पण चोवीस तास कामगिरी असणारे. ते आपल्याच तंद्रीत कागदावर काहीतरी लिहित बसले होते. तोच त्यांच्या कानावर शब्द पडले, ‘तुम्हाला ऑफिसात बोलावले आहे.’ गदिमांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि ते पुन्हा लिहू लागले. काही वेळाने पुन्हा तोच निरोप आला. आता मात्र गदिमा सावरले. ऑफिसमधून बोलावणे आले आहे याचा अर्थ आपणाला आजपासून ‘निरोपाचा नारळ’ मिळणार या विचाराने त्यांनी धडधडत्या काळजाने ऑफिसात प्रवेश केला. ‘का हो, तुम्हाला पैसे नको झालेत का?’ टेबलामागच्या खुर्चीत बसलेला क्लार्क म्हणाला. या व्हाऊचरवर सही करा आणि हे पंधरा रुपये घ्या. पुढील महिन्यापासून पगारपत्रकावर तुमचे नाव असेल. गदिमांनी पैसे घेतले आणि व्हाऊचरवरचा, पैसे देण्याचा तपशील वाचला. त्या ठिकाणी लिहिले होते, ‘बाबुराव पेंढारकर यांच्या सांगण्यावरून’.
‘वाटेवरल्या सावल्या’ या आत्मकथनात गदिमांनी बाबुरावांच्या अनेक हृद्य आठवणी लिहिल्या आहेत. मजकूर लिहिण्यासाठी पेन नाही ऐकताच आपल्या कोटाच्या खिशातले भारी किमतीचे फाऊंटन पेन काढून गदिमांना देणारे, पावसात भिजत असताना आपल्या जवळची छत्री देणारे किंवा रात्रीच्या वेळी स्टुडिओ ते शाहूपुरी अंतर गदिमा पायी तुडवत जाणार आहेत हे समजताच ‘समोरच्या मोटारगाडीत जाऊन बसा’ असे सांगणारे बाबुराव! स्वत: बाबुराव गुणाढ्य होतेच, पण त्याचबरोबर गुणग्राहकही होते.
आपल्या कला कारकीर्दीत बाबुरावांनी जवळजवळ ६८ मराठी-हिंदी चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका रंगवल्या. पाच चित्रपटांचे दिग्दर्शन केले आणि दोन चित्रपटांची निर्मिती केली. विशेष म्हणजे ‘सीताकल्याणम’ या तमीळ भाषेतील चित्रपटाचे दिग्दर्शक होते बाबुराव पेंढारकर. हा चित्रपट अत्यंत यशस्वी ठरला आणि त्या काळच्या मद्रास प्रांतात बाबुरावांची ख्याती पसरली.
‘छाया’ या वि. स. खांडेकर यांच्या कथेवरील चित्रपट ‘हंस’ या संस्थेतर्फे निर्माण करण्यात आला. बाबुराव, मा. विनायक आणि छायाचित्रकार पांडुरंगराव नाईक यांनी ‘हंस’ कंपनीची स्थापना केली. ‘धर्मवीर’ आणि ‘प्रेमवीर’ हे आचार्य अत्रे यांच्या कथेवर आधारलेले दोन चित्रपट ‘हंस’ने केले. त्यानंतर ‘ज्वाला’ हा चित्रपट केला आणि तो पूर्णपणे कोसळला. त्या ज्वाळेमध्ये ‘हंस’ जळून जाणार की काय अशी बिकट अवस्था निर्माण झाली. अशावेळी न डगमगता ‘ब्रह्मचारी’, ‘ब्रॅण्डीची बाटली’ हे चित्रपट निर्माण करून त्यांनी संस्थेला पुन्हा एकवार ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. ‘देवता’, ‘सुखाचा शोध’ या चित्रपटांत बाबुराव नायकाच्या भूमिकेत होते, तर ‘अर्धांगी’ या चित्रपटात त्यांनी इरसाल खलनायक रंगवला. पुढे त्यांनी ‘नवयुग’ चित्रपट संस्थेची स्थापना केली. त्यानंतर ‘न्यू हंस’ संस्था सुरू करून ‘पहिला पाळणा’ हा चित्रपट तयार केला. या चित्रपटाचे पुढे ख्यातनाम झालेले विश्राम बेडेकर यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले होते. ‘भक्त दामाजी’, ‘पैसा बोलतो आहे’ असे काही चित्रपट केले. पण सहकारी पार्टनर लोकांशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी कंपनी सोडली आणि येथून पुढील काळात त्यांनी विविध चित्रपटांमधून भूमिका स्वीकारायचा निर्णय घेतला. बाबुरावांसारखा अनुभवी, व्यासंगी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा कलाकार सर्वांना हवाच होता. त्यानंंतरची कलाकार या नात्याने त्यांच्या यशाची कमान दिवसेंदिवस उंचावतच गेली.
आज ज्यांची वये अंदाजे ८०च्या पुढे आहेत त्या पिढीवर बाबुरावांच्या चित्रपटांचा दाट प्रभाव आहे. व्यक्तिगत माझ्यापुरते मत नोंदवायचे झाले तर बाबुरावांच्या ‘सिंहगड’, ‘जय मल्हार’, ‘जशास तसे’, ‘मानाचे पान’, ‘दो आंखें बारह हाथ’, ‘महात्मा फुले’, ‘पुनवेची रात’, ‘श्यामची आई’, ‘गाठ पडली ठका ठका’, ‘छत्रपती शिवाजी’, ‘मी दारू सोडली’ अशा अनेक बाबुरावांनी भूमिका केलेल्या चित्रपटांचा माझ्यावर अतिशय प्रभाव आहे.
‘सिंहगड’ या चित्रपटात त्यांची ‘उदयभान’ची भूमिका कोण विसरू शकेल? ‘जय मल्हार’मधील ‘कल्लू बेरड’, रानडुकरासारखी मुसंडी मारणारा, भल्या अंत:करणाचा, पण बापाच्या खुनाचा सूड घेण्यासाठी गावच्या पाटलाबरोबर हाडवैर घेतलेला रानदांडगा कल्लू बेरड! ‘मानाचे पान’मधील कुस्तीगीर दौलू वस्ताद! आपल्या चेल्याने कुस्तीचा फड जिंकावा म्हणून जिवाचं रान करणारा, त्याला ‘बाई’च्या नादातून सोडवण्यासाठी जिवाचा आटापिटा करणारा वस्ताद! त्यातील बाबुराव आणि चंद्रकांत यांची मैदानातील सरावाची लढत पाहावीच. दोघेही मर्द गडी, कुस्तीत किती तरबेज आहेत हे जिवंत दृष्यांमधून जाणवते. ‘जशास तसे’मधील धूर्त, कपटी, स्त्रीलंपट आणि बलात्कारी, ढोंगी आणि पाताळयंत्री बाबुराव वेलचीकर. ‘दो आंखें बारह हाथ’मधील वरून अत्यंत कठोर आणि अंत:करणाने कोमल असणारा जेलर, ‘श्यामची आई’मधील श्यामच्या आईचे वडील आणि ‘महात्मा फुले’मधील प्रत्यक्ष ज्योतिबांच्या भूमिकेतील बाबुराव पेंढारकर! अभिनय, सूक्ष्म निरीक्षण, अभ्यास, व्यासंग आणि कलेवरील निष्ठा म्हणजे बाबुराव पेंढारकर!
बाबुरावांनी ज्या प्रकारे चित्रपटसृष्टी आपल्या समर्थ कारकीर्दीने समृद्ध केली तशी रंगभूमीही गाजवली आहे. व्ही. शांताराम आणि बाबुराव पेंढारकर यांनी मिळून ‘रंगमंदिर’ या नाट्यसंस्थेची स्थापना केली आणि इतिहास संशोधक, कवी, नाटककार वासुदेवशास्त्री खरे यांचे ‘शिवसंभव’ हे नाटक रंगमंचावर आणले. नाटकाचे दिग्दर्शक होते केशवराव दाते. १९६०मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या शुभदिनी १ मे १९६० रोजी शिवनेरी गडावर ‘शिवसंभव’ या नाटकाचा प्रयोग लाखो रसिकांसमोर सादर करून नाट्य इतिहासात एका सोनेरी पानाची भर घातली.
‘बेबंदशाही’ (संभाजी), ‘भावबंधन’ (घनश्याम), ‘एकच प्याला’ (सुधाकर), ‘सीमेवरून परत जा’ (राजा अंभी) अशा अनेक भूमिका बाबुरावांनी अत्यंत यशस्वीपणे साकारल्या. ‘झुंझारराव’ नाटकाचे दिग्दर्शन चिंतामणराव कोल्हटकरांनी केले होते. स्नेहप्रभा प्रधान, राजा परांजपे, मंगला पितळे, बाळ कोल्हटकर असा संच होता. ‘झुंझारराव’ची भूमिका बाबुराव अतिशय प्रभावीपणे करीत.
‘चित्र आणि चरित्र’ (आत्मकथन) आणि ‘मन:शांतीची कबुतरे’ ही दोन पुस्तके बाबुरावांनी लिहिली. ‘चित्र आणि चरित्र’ या पुस्तकाला उत्कृष्ट वाड्.मयाचा पुरस्कारही लाभला आहे.
मा. विनायक, भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम यांना जोडणारा भावनिक दुवा म्हणून बाबुरावांचा लौकिक आहे. ४५ वर्षांच्या कारकीर्दीमध्ये आर्थिक पाठबळ नसताना, प्रतिकूल परिस्थितीत, चित्रपट निर्मितीसारख्या अत्यंत आगळ्या वेगळ्या व्यवसायात खंबीरपणे पाय रोवून उभे राहणारे आणि यशश्री जिंकून आणणारे बाबुराव पेंढारकरांसारखे कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, व्यवस्थापक आणि सबकुछ बाबुराव दुर्मिळच! आजचा चित्रपट व्यवसाय आज दिमाखदार आणि वैभवशाली काळ उपभोगतो आहे तो बाबुराव पेंढारकरांसारख्या ‘तपस्वी’ व्यक्तीमुळेच!
(या लेखासाठी संदर्भग्रंथ म्हणून ‘मराठी विश्वकोश’, ‘वाटेवरल्या सावल्या’, ‘किस्से प्रभातच्या चित्रपटांचे’, ‘गदिमा आणि बाबुजी एक अद्वैत’ या पुस्तकांचा उपयोग केला आहे.)