सिनेमा कशामुळे चालतो असं विचारलं तर कथा, संवाद, अभिनय, दिग्दर्शन, अभिनेता, अभिनेत्री अशा मुख्य गोष्टी येतात; पण प्रेक्षकांना सिनेमाची पहिली ओळख करून देतं ते सिनेमाचं शीर्षक (टायटल). सिनेमात काय आहे हे आपल्याला शीर्षकावरून कळतं. उदा. ‘शोले’ हे नाव कानावर पडलं की आपल्याला या सिनेमात धगधगती अॅक्शन आणि मारधाड असेल हे कळतं. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हे शीर्षक ऐकल्यावर हा प्रेमपट आहे आणि नायक अखेर नायिकेला घेऊन जाणारच, हे या शीर्षकातून सूचित होतं.
बहुतांश प्रेक्षकांची एक आवड ठरलेली असते. रोमँटिक सिनेमा आवडणारा प्रेक्षक हॉरर सिनेमाला जात नाही. तसेच उत्कंठावर्धक सिनेमाची आवड असणारा रसिक संथ गतीने पुढे जाणारा सिनेमा पाहात नाही. म्हणूनच कोणता सिनेमा पाहायचा याचा निर्णय प्रेक्षक सिनेमाच्या नावावरून अंदाज लावून घेतात. काही दशकांपूर्वी सिनेमाचे ट्रेलर फक्त सिनेमागृहात दाखविले जायचे, तेव्हा सिनेमाचे नाव आणि सिनेमाचे पोस्टर हेच प्रेक्षकांसाठी बोलावणं असायचं. आज समाजमाध्यमांवर पोस्टर लॉन्च, टीझर, ट्रेलर आणि बरंच काही… असा फुल कोर्स मेन्यू असतो. पण जाहिरातीचे इतके पर्याय असूनही सिनेमाचं नाममाहात्म्य कायम आहे. प्रेक्षक नाव वाचून सिनेमाचा कोणत्या धरतीचा असेल याचा अंदाज घेतात, सोपं नाव आणि सोपा सिनेमा हे काँबिनेशन यशस्वी होतं. कठीण नाव दिलं असेल, तर प्रेक्षक त्या सिनेमाकडे पाठ फिरवतात. उदा. ‘आत्मपॅम्प्लेट’ या कठीण नावामुळे प्रेक्षक त्या सिनेमाकडे फिरकले नाहीत.
१९९३ साली ‘हॅपी बर्थडे’ नावाचे नाटक दिग्दर्शक सतीश पुळेकर यांनी रंगभूमीवर आणलं होतं. हे नाटक मुलांच्या पौगंडावस्थेतील अडचणींवर भाष्य करणारं एक गंभीर नाटक होतं. ‘हॅपी बर्थडे’ शीर्षक वाचून नावावरून हे बालनाट्य आहे असा समज करून एक पालक आठ दहा वर्षांच्या दोन लहान मुलांना घेऊन नाटकाला आले. नाटक संपल्यावर मुलं वडिलांना विचारत होती की बाबा नाटकात हॅपी बर्थडे झालाच नाही. आजूबाजूला एकच हशा पिकला, त्या दिवशी प्रयोग झाल्यावर टाळ्या घेतल्या त्या या लहानग्याच्या वाक्याने. नावामुळे अशा स्वरूपाचे गोंधळ अनेकदा होऊ शकतात. पण जर एखाद्या दिग्दर्शकाला नावातून संपूर्ण आशय उघड होऊ नये, असे वाटत असेल तर ते नावावरून उलगडा होणार नाही, अशा शीर्षकाची निवड करतात. आमीर खानचा ‘तारे जमीन पर’ हा सिनेमा त्याच्या नावातून निर्माण होणार्या कल्पनांपेक्षा वेगळी गोष्ट सांगून गेला. परंतु अशी रिस्क घेताना सिनेमातील गाणी, ट्रेलरची जंगी प्रसिद्धी करावी लागते, तसेच प्रेक्षकाला खिळवून ठेवण्याची ताकद त्या सिनेमात असावी लागते. तरच तो सिनेमा माऊथ पब्लिसिटीने सर्वदूर पोहचतो. ‘नो मीन्स नो’ या मेसेजचा ‘पिंक’ शीर्षकावरून अंदाज खचितच आला नसता. आंतरजातीय विवाहाचं कटू सत्य मांडणार्या ‘सैराट’चा अर्थ ‘स्वच्छंदी’ असा आहे. किंवा १९७१ साली प्रदर्शित झालेल्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ नावामुळे तो धार्मिक सिनेमा असावा अशी काही प्रेक्षकांची समजूत झाली होती. पण झीनत अमानच्या मादक अदा आणि ‘दम मारो दम’ या गाण्यामुळे या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सुबह-श्याम पैशांचा पाऊस पाडला होता. ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटाला जाताना ज्या अपेक्षेने आपण गेलो त्यापेक्षा कितीतरी पटीने जिनियस विचार तो सिनेमा देऊन गेला.
याउलट ‘लगान’, ‘स्वदेस’, ‘मर्दानी’ या सिनेमांची नाव वाचून असं वाटतं की चित्रपटांसाठी याहून समर्पक शीर्षक असूच शकलं नसतं. या चित्रपटांच्या नावावरून, पोस्टरवरून रसिक त्याच्या गोष्टीचा कयास करू शकतात. उदा. अमिताभ-हेमा मालिनी यांचा ‘बागबान’, ‘शोले’, ‘अग्निपथ’, ‘फायर’. सिनेमाच्या नावांवर तेव्हाच्या परिस्थितीचा प्रभाव असतो, साधारण नव्वदीच्या आधी बर्याच सिनेमाच्या नावांत आग असे, आणि पोस्टरवर आगडोंब उसळलेला असे. वणव्यात रूपांतर होण्याआधी थांबवली ती यशराज फिल्म्सने. सिस्टमविरुद्ध लढणारी आणि खानदानी सुडातून बदला घेणारी शीर्षकं मागे पडून नात्यातल्या गुंतागुंतीवर आधारित शीर्षकं समोर येऊ लागली. ‘कभी कभी’, ‘सिलसिला’, ‘काला पत्थर’ अशी लहानखुरी नावे आली. ‘चांदनी’, ‘नुरी’, ‘विजय’, ‘डर’ अशा नावांनंतर पुन्हा एकदा लाट आली लांबलचक टायटलची. ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’, ‘दिल तो पागल है’, ‘हमारा दिल आपके पास है’, ‘हमको दिवाना कर गये’, ‘हम साथ साथ हैं’, ‘कहो ना प्यार है’ यांच्या भाऊगर्दीत, ‘क्या केहना’, ‘सोल्जर’, ‘गुप्त’ अशी नावे झाकोळून गेली. प्रत्येक चित्रपटाला मोठ्या टायटलची आवश्यकता नव्हती. पण ट्रेण्डमध्ये राहण्यासाठी चित्रपटांचं नाव लहान आणि त्याखाली सेकंड लाईन आली, ‘एक रिश्ता – द बॉण्ड ऑफ लव्ह’, ‘दाग – द फायर’, ‘आन – मेन अॅट वर्क’, ‘द ट्रेन – सेकंड लाईन शुड नॉट बी क्रॉस्ड’… अशी नावांची लांबच लांब रांग लागत असे.
नाव जरी दोन ओळींचं असलं तरी सिनेमा बहुधा पहिल्या ओळीतल्या नावाने ओळखला जाई. सलग ओळीने असे सिनेमे आल्यावर, आता टायटलमध्ये तिसर्या ओळीची फॅशन येते की काय अशी भीती वाटू लागली होती. पण बॉलिवुडने या मोठ्या नावांना वळसा देऊन पुन्हा लहान नावांकडे मोर्चा वळवला. करण जोहर आणि एकता कपूर यांनी टुम आणली होती ‘क’वरून सुरू होणार्या नावांची, आपल्या सिनेमाचं नाव जरी, मोठं असलं तरी त्याचा शॉर्टफॉर्म विकण्याची शक्कल करणं जोहरची, ‘के२एच२’ (कुछ कुछ होता है), ‘के३जी’ (कभी खुशी कभी गम), ‘केएएनके’ (कभी अलविदा ना केहना). हा केएएनके सडकून आपटल्यावर मात्र करणं जोहर पुन्हा ‘क’ नावाच्या फंदात पडला नाही. निर्माती एकता कपूरला ‘क’ आद्याक्षराने मालिका जगताची मल्लिका बनवलं. हेच ‘क’ अक्षर घेऊन एकताने २००१ साली सिने निर्मिती सुरू केली. पहिल्याच वर्षी ‘क्योंकि मैं झुठ नहीं बोलता’, ‘कुछ तो है’, ‘कृष्णा कॉटेज’ असे तीन अयशस्वी चित्रपट दिले. या अपयशातून बोध घेत एकताने एखाद दुसरा अपवाद वगळता सिने निर्मितीत ‘क’ नावाचा अट्टाहास सोडला.
सिनेमाचा व्यवसाय हा महागडा व्यवसाय आहे. बॉक्स ऑफिसवर यशस्वी होण्यासाठी निर्माता दिग्दर्शक अभिनेते काहीसे अंधश्रद्धाळू बनतात. या अंधश्रद्धेच्या रस्त्यावर दोघे तिघे आदळले की सिनेक्षेत्र पुन्हा ताळ्यावर येतं. ‘क’वरून नाव ठेवणं, प्रत्येक सिनेमात हीरोचं नाव तेच ठेवणं, सिनेमाच्या नावात अमुक इतकीच अक्षरं असणं, मोठीच्या मोठी नावे मिरवणं असो किंवा ‘मटरू की बिजली का मंडोला’ असं जगावेगळं नाव ठेवणं असो, शीर्षक हे कोणत्याही सिनेमाचा प्राण असल्यामुळे लक्षवेधी नावांना इथे खूप मागणी असते. त्यामुळे अनेक निर्माते तशा आशयाचा किंवा सिनेमा बनवत नसतील तरीही पैसे भरून अनेक लक्षवेधी शीर्षकाची नोंदणी करत असतात. एका निर्मात्याने ‘चलो’ हे शीर्षक गेली तीस वर्षे स्वत:कडे राखून ठेवलं आहे. अशाच पद्धतीनं अनेक निर्मात्यांनी पाचशेपेक्षा जास्त शीर्षकांची नोंदणी केलेली आहे. पण यामुळे सिनेमा बनवत असलेल्या निर्मात्यांना हवं ते शीर्षक मिळत नाही. यावर उपाय म्हणून जर एखाद्या निर्मात्याने शीर्षकाची नोंदणी केल्यावर जर तीन वर्षांत तो सिनेमा बनवला नाही तर ते शीर्षक दुसर्या निर्मात्याला देण्यात येईल असा नियम हल्लीच केला आहे. बॉक्स ऑफिसला चालना देऊ शकेल असं शीर्षक प्रत्येक निर्मात्याला हवंहवंसं वाटतं, पण एका वेळी एकच सिनेमाला ते वापरता येतं. तो सिनेमा सुपरहिट झाला तर त्या सिनेमाचे निर्माते ते शीर्षकाची ट्रेडमार्क कायद्याअंतर्गत नोंदणी करून घेतात. यामुळेच ‘शोले’, ‘मुगल-ए-आजम’, ‘हम आपके हैं कौन’, ‘गदर’ या ब्लॉकबस्टर सिनेमांच्या नावाचे इतर सिनेमे आले नाहीत. यावर उपाय म्हणून आपले जुगाडू निर्माते सुपरहिट सिनेमांच्या नावाशी मिळते जुळते शीर्षक निवडतात. ‘शोले’ सिनेमाच्या नावाशी साधर्म्य असणारे ‘रामगढ के शोले’, ‘डुप्लिकेट शोले’, ‘जंग के शोले’, ‘दो शोले’, ‘खुनी शोले’… असे अनेक चित्रपट आले.
काही निर्माते नावासोबतच सिनेमातील खलनायकाचे नाव देखील पळवतात. प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा याने गब्बर सिंगच्या भूमिकेत अमिताभ बच्चन यांना घेऊन ‘राम गोपाल वर्मा के शोले’ असा सिनेमा बनवला होता. या विरोधात सिप्पी कुटुंब कोर्टात गेले, शेवटी ‘रामगोपाल वर्मा की आग’ या नावाने हा सिनेमा पडद्यावर आला आणि या वादावर पडदा पडला. ‘आग’ या शीर्षकाला हिंदी सिनेमात खूप मागणी आहे. ‘आग और दाग’, ‘आग का गोला’, ‘दामन की आग’, ‘आग लग गयी’, ‘तन की आग’, ‘मिलन की आग’ तब्बल २५०पेक्षा जास्त सिनेमांची शीर्षके आगीशी खेळताना दिसतात.
इंग्रजांनी आपल्यावर तीनशे वर्ष राज्य केलेलं असल्यामुळं आपल्यावर इंग्रजी भाषेचा प्रभाव आहे. यातूनच हिंदी भाषेतील सिनेमांची शीर्षके इंग्रजीत ठेवण्याची ओढ दिसते. ‘हाऊसफुल’, ‘नो एन्ट्री’, ‘काईटस्’, ‘फास्ट फॉरवर्ड’, ‘पार्टनर’, ‘डू नॉट डिस्टर्ब’, ‘वेक अप सिद’, ‘बूम’, ‘फायर’, ‘माय नेम इज खान’…
काही सिनेमांची भन्नाट नावं लक्ष वेधून घेतात जसं की, ‘धोती लोटा और चौपाटी’, ‘सलीम लंगडे पे मत रो’, ‘मुर्दे की जान खतरे में’, ‘राजारानी को चाहिये पसीना’, ‘अल्ला मेहरबान तो गधा पहलवान’, ‘दो लडके दोनों कडके’… अशा सिनेमांना अनेकदा प्रेक्षक फिरकत नाहीत. पण अशी नावं कानावर पडली की चेहर्यावर हास्याची लकेर उमटते हे मात्र खरे.
सिनेमांच्या नावावरून आठवलं, सिनेमा ज्यांच्या नावावर चालतो त्या हीरो-हीरोईनचे स्क्रीन नेम म्हणजे पडद्यासाठी घेतलेलं नाव सिनेमाच्या यशाच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. प्रेयसीची छेड काढणार्या दहा गुंडांना लोळवणारा हीरोचे नाव बुळचट असून चालणार नाही. तसेच जिच्या एका नजरेने प्रेक्षकांच्या काळजाचं पाणी पाणी होतं, त्या हीरोईनचं नाव ऐकायला सुमधुर हवं. खरं नाव बदलून सिनेमासाठी वेगळं नाव स्वीकारण्याची (स्क्रीन नेम) कारणं वेगवेगळी असू शकतात. ‘ज्वारभाटा’ सिनेमात काम देताना निर्मात्या देविका राणी यांनी एका मोहम्मद युसुफ खान या तरुण मुलाला दिलीप कुमार हे नाव घेण्याचं सुचवलं. कुमार हे आडनाव आलं की समजावं, की या हीरोने सिनेमासाठी घेतलेलं नाव आहे. आहे. याची सुरुवात कुमुदलाल गुंजीलाल गांगुली या तरुणाने जेव्हा अशोक कुमार हे नाव धारण केलं तेव्हापासून सुरू झाली असावी. कुलभूषण पंडित बनले राजकुमार, हरिभाई जरीवाला बनले संजीव कुमार, राजीव हरीओम भाटिया बनला अक्षय कुमार, आभास गांगुली बनला किशोर कुमार, हरिकृष्णा गिरी गोस्वामी बनला मनोज कुमार… अशाच अनेक प्रमुख कलाकारांनी सिनेमासाठी आपल्या नावात बदल केलेला आहे. विशाल देवगण (अजय देवगण), रवी कपूर (जितेंद्र), जतीन खन्ना (राजेश खन्ना), भानुरेखा गणेशन (रेखा), रिमा लांबा (मल्लिका शेरावत), बद्रुद्दिन जमालुद्दिन काझी (जॉनी वॉकर), आलिया अडवाणी (किआरा अडवाणी) कार्तिक तिवारी (कार्तिक आर्यन), अश्विनी शेट्टी (शिल्पा शेट्टी), जय किशन काकूभाई (जॅकी श्रॉफ), अजय सिंग देओल (सनी देओल) या कलाकारांनी फक्त सिनेमासाठी नाव बदललं असलं तरी यशस्वी झाल्यावर स्क्रीन नेमचा इतका बोलबाला होतो की काही वर्षांनी या कलाकारांना स्वत:चं खरं नाव आठवत असेल का अशी शंका यावी.
मराठी सिनेसृष्टीत शीर्षकावरून फार चढाओढ दिसत नसली तरी चालणार्या सिनेमाच्या लाटेवर स्वार होऊन तशाच धाटणीचे चित्रपट निर्मिती सुरू होते. ‘वहिनीच्या बांगड्या’ यशस्वी झाल्यावर ‘ताईच्या बांगड्या’ यायलाच हव्यात. मंगळसूत्र चालतंय म्हटल्यावर, मणी मंगळसूत्र, ‘ताईचं मंगळसूत्र’ आलं. ‘थोरली जाऊ’ चित्रपट आल्यावर ‘धाकटी जाऊ’ येणं अगदी स्वाभाविक होत. मग ‘आईचा आशीर्वाद’, ‘ताईची माया’, ‘ममता’ असं करत करत एका शीर्षकाने माया ममता एकत्र करून सगळ्या प्रेमाला एकाच नावात आणलं. पुढे ‘माहेरच्या साडी’नंतर पुन्हा एकदा साड्या आणि दागिन्यांच्या नावांची सद्दी सुरू झाली. महेश कोठारे यांच्या बर्याच चित्रपटांची नावे पंचाक्षरी असतील असा योग जुळवून आणला होता. ‘धुमधडाका’, ‘थरथराट’, ‘धांगडधिंगा’, ‘धडाकेबाज’, ‘पछाडलेला’, ‘खतरनाक’, ‘जबरदस्त’, ‘खबरदार’, ‘झपाटलेला’, ‘दे दणादण’ (अक्षरे ५), ‘माझा छकुला’, एवढच काय त्यांची निर्मिती असलेली सुप्रसिद्ध मराठी मालिका, ‘जय मल्हार’ हे नावदेखील पंचाक्षरी होतं.
फॉर्म्युलाच्या शोधात असलेल्या सिनेसृष्टीला कुठलाही फॉर्म्युला चालतो, वस्त्र-आभूषणे, नाती, मग तीर्थक्षेत्रांवर देवांच्या नावावर आधारीत सिनेमे येऊ लागले. ९० च्या दशकात ज्या टायटलने स्त्री प्रेक्षकांना तंबू थेटरमध्ये आणले ती नावे होती, ‘एकविरा देवीचा आशीर्वाद’, ‘काळूबाई पावली नवसाला’, ‘माय माऊली मनुदेवी’, ‘आदी माया आदी शक्ती’, ‘दुर्गा आली घरा’, ‘कानबाई माझी नवसाची’, शक्तिपीठांपैकी असलेल्या देवीच्या नावांच्या सिनेमांना हटकून गर्दी व्हायची. ‘माहेरची साडी’नंतर ‘माहेरची पाहुणी’, ‘माहेरचा आहेर’, ‘कुंकू लावते माहेरचं’, ‘माहेरवाशीण’ या हिट सिनेमांनी माहेर हा शब्द टायटलमध्ये काही काळासाठी कायम केला. माहेरचा तोचतोचपणा झाल्यावर टायटलमध्ये सासर आलं, ‘सासरचं धोतर’ (दादा कोंडके), ‘लेक चालली सासरला’, ‘सासरची साडी’, ‘सून लाडकी सासरची’ (ऐश्वर्या नारकर फेम), ‘सासर माझं दैवत’, ‘सासर माझं मंदिर’ या टायटलमुळे सासरही ट्रेण्ड झालं. चित्रपटांच्या नावाबाबत दादा कोंडके विशेष लक्ष द्यायचे. खरं तर दादांचे चित्रपट दादांच्या नावावर चालत असत, तरीही ‘अर्थ आणि द्वयर्थ’ निघणार्या नावांत त्यांचा हातखंडा होता. प्रेक्षकांचा कल बदलल्याने असेल किंवा इतरही कारणे असतील ज्यामुळे ती परंपरा पुढे राखली गेली नाही.
सचिन पिळगावकरांनी निरागस विनोदी आणि वेगळी नावे देण्यावर भर दिला. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘माझा पती करोडपती’, ‘नवरी मिळे नवर्याला’, ‘नवरा माझा नवसाचा’ या नावातूनच सिनेमात काहीतरी वेगळं असण्याची खात्री पटायची. सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांच्या सिनेमाची नावे, कथेला सिम्बॉलिक स्वरूपात दर्शवणारी असतात, उदा. ‘कासव’, ‘नितळ’, ‘देवराई’, ‘अस्तू’, ‘दिठी.’ सिनेमा बघितल्यावर ते नाव त्या सिनेमासाठी अर्थपूर्ण वाटतं. याव्यतिरिक्त साधारणपणे विनोदी हलकंफुलकं टायटल हवं, फार ऑफबीट किंवा बोजड नको, राजकीय नको, धार्मिक नको, सद्य:परिस्थितीवर भाष्य करणारं तर अजिबात नको असे साधारण आडाखे असतात. पण तरीही या फॉर्म्युला नावाच्या गर्दीतमधूनच एखादं असं नाव येतं, ज्याची कॉपी करणं शक्य होत नाही, त्या सिनेमाची कलाकृती होते आणि वर्षानुवर्षे संस्मरणीय होऊन जाते. ‘सामना’, ‘चौकट राजा’, ‘सरकारनामा’, ‘पिंजरा’, ‘उंबरठा’, ‘जैत रे जैत’, ‘सिंहासन’, ‘एक होता विदूषक’, ‘श्वास’, ‘कोर्ट’. प्रेक्षकांना आवडतं तेच आम्ही देतो, हे विकलं जातं म्हणून ही नावे देतो, अशा विधानांचा ही टायटल्स अचूक वेध घेतात. हिंदी सिनेमातही ‘प्यासा’ (गुरुदत्त), ‘अर्धसत्य’, ‘गांधी माय फादर’, ‘हजारो ख्वाईशें ऐसी’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘मेरा नाम जोकर’, ‘आनंद’, ‘अभिमान’, ‘बावर्ची’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘पिंजर’, ‘मकबूल’, ‘अंदाज अपना अपना’, ‘माचिस’, ‘स्वदेस’, ‘तारे जमीन पर’, ‘मदारी’ अशी कितीतरी नावे घेता येतील.
गेल्या वर्षी येऊन गेलेल्या आणि गाजलेल्या ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाचं आधीचं नाव ‘मंगळागौर’ असं होतं. पण ‘बाईपण भारी देवा’ या गाण्याच्या शूटिंगनंतर त्याचं नाव बदलण्यात आलं. मंगळागौर या नावाने कदाचित सुरुवातीला विशिष्ट वयोगटातील महिला प्रेक्षक आल्या असत्या, पण कॅची नावामुळे जवळजवळ सर्वच प्रेक्षकांनी त्या सिनेमाचं टायटल सिनेमाइतकचं उचलून धरलं. वर्षाअखेरीस आलेल्या ‘डंकी’ सिनेमासाठी याहून उत्तम टायटल असू शकलं नसतं. ‘जब वी मेट’ सिनेमाचं पहिलं (वर्किंग) टायटल ‘ट्रेन’ किंवा ‘इश्क व्हाया भटिंडा’ असं होतं, तर ‘लव्ह आजकल’ सिनेमाचं वर्किंग टायटल होत ‘इलॅस्टिक’. ‘तमाशा’ सिनेमाचं वर्किंग टायटल होत ‘विंडो सीट’. ‘वीर झारा’साठी यश चोप्रांनी त्यांचं ड्रीम टायटल ‘ये कहां आ गये हम’ राखून ठेवल होतं, पण नंतर ते नायक नायिकेच्या नावावरून ‘वीर झारा’ करण्यात आलं. ‘जिंदगी ना मिलेगा दुबारा’ सिनेमासाठी टायटल चॉइस होती, ‘रनिंग बुल्स’. सिनेमातील शेवटच्या दृष्यावरून हे वर्किंग टायटल जवळ जवळ ठरलं होतं, पण टायटल फायनल करताना ‘झेडएनएमडी’ हेच अधिक सुटेबल वाटलं आणि ते शीर्षक यशस्वी ठरलं. वर्किंग टायटल योग्य वाटलं तर बर्याचदा कायम ठेवलं जातं. पण जर ‘जब वी मेट’ आणि इतर सिनेमे त्यांच्या वर्किंग टायटलनेच प्रदर्शित झाले असते तर गर्दी खेचू शकले असते का असा प्रश्न पडतो?
काहीवेळेस एखाद्या समुदायाच्या भावना दुखावल्याच्या कारणावरून निर्मात्याला सिनेमाचं शीर्षक बदलावं लागतं. ‘रामलीला’चा झाला ‘गोलियों की रासलीला राम-लीला’, ‘बिल्लू बार्बर’ झाला ‘बिल्लू’, ‘पद्मावती’ झाला ‘पद्मावत’. काही निर्माते सिनेमा चर्चेत आणण्यासाठी मुद्दामहून वादंग निर्माण करणारी बॅड पब्लिसिटी करतात, पण सगळेच निर्माते काही नावाला बट्टा लागणे पसंत करत नाहीत.
नावात काय आहे असं महान नाटककार शेक्सपियर म्हणाले असतील, सिनेसृष्टीत मात्र नावाला खूप महत्व आहे. यामुळेच सिनेमाच्या जगात शोले सिनेमातील जयने बसंतीचं नाव माहीत असूनही ‘तेरा नाम क्या है बसंती’ असं विचारलं होतं. सिनेमाच्या नावाच्या गमतीजमती सिनेमा असेपर्यंत सुरूच राहतील. सिनेमाचं नाव आवडलं तर प्रेक्षक सिनेमाला गर्दी करतात हे खरं आहे, पण जर त्या सिनेमात मनोरंजनाची मात्रा कमी पडली, तर तेच प्रेक्षक नावं ठेवायलाही कमी करत नाहीत.