महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वाची सद्दी संपली. आता नव्या कर्णधारांची लाट आली आहे. यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये नव्या पिढीचे आठ भारतीय कर्णधार कशी कामगिरी बजावतात आणि संघाला कुठवर नेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. जूनमध्ये होणार्या ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर रोहित शर्मा या क्रिकेट प्रकारातील कर्णधारपद सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘आयपीएल’मध्ये भावी कर्णधाराचा शोध भारतीय क्रिकेट निश्चितपणे करू शकेल.
– – –
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या १७व्या अध्यायाचे रणशिंग फुंकले जाण्याच्या ४८ तास आधी सर्व १० संघांच्या कर्णधारांचे चषकासमवेत छायाचित्रण झाले. यात आठ संघांचे कर्णधार हे भारतीय असल्याचे निष्पन्न झाले. आणखी विश्लेषण करायचे झाल्यास महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कर्णधारपदाची सद्दी संपली आहे. शिखर धवन वगळता (पंजाब किंग्ज) ऋतुराज गायकवाड (चेन्नई सुपर किंग्ज), ऋषभ पंत (दिल्ली कॅपिटल्स), शुभमन गिल (गुजरात टायटन्स), श्रेयस अय्यर (कोलकाता नाइट रायडर्स), केएल राहुल (लखनौ सुपर जायंट्स), हार्दिक पंड्या (मुंबई इंडियन्स) आणि संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स) हे नव्या पिढीचे कर्णधार आहेत. म्हणजेच भारताच्या भावी कर्णधाराची चाचपणी हे यंदाच्या हंगामातील वैशिष्ट्य असेल.
भारतीय क्रिकेटने धोनी, रोहित आणि विराटच्या नेतृत्वाची अनुभूती घेतली आहे. धोनीने भारताला दोन विश्वचषक जिंकून देण्याची किमया साधली आहे. मग विराटने संघाला आक्रमकतेचा मूलमंत्र दिला. रोहितच्या कारकीर्दीत संघाने यशोशिखरावर कायम राहण्याची कर्तबगारी दाखवली. या तिघांनी आपल्या नेतृत्वाची अदाकारी ‘आयपीएल’च्या व्यासपीठावरही दाखवली. रोहित आणि धोनीने प्रत्येकी पाच वेळा आपल्या संघांना ‘आयपीएल’ जिंकून दिले. म्हणजेच १६ पैकी १० जेतेपदे ही मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोघांकडे आहेत. विराटने आपल्या एकापेक्षा एक सरस खेळींनी ‘आयपीएल’ गाजवली असली तरी तो संघाला विजेतेपद मिळवून देऊ शकला नाही. त्यामुळे त्याच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचे नेतृत्व फाफ ड्यू प्लेसिस करतो आहे. याचप्रमाणे सनरायजर्स हैदराबादने लिलावप्रक्रियेत २०.५० कोटी रुपयांची बोली लावत नेतृत्वाची धुरा विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्सकडे सोपवली आहे. भारतीय कर्णधारांपैकी पंजाब किंग्जच्या शिखर धवनने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली नसली तरी सध्या देशात इतके नवे पर्याय उपलब्ध झाले असल्याने निवड समिती त्याचा यापुढे विचार करील, अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.
‘सीएसके’ने २१ मार्चला केलेल्या घोषणेने त्यांची आगामी धोरणे स्पष्ट झाली आहेत. धोनीने आपले सिंहासन रिक्त करीत चेन्नईच्या कर्णधारपदाचा मुकुट महाराष्ट्राच्या ऋतुराजला परिधान केला आहे. त्यामुळे २७ वर्षीय ऋतुराज यंदाच्या हंगामात माहीकडून नेतृत्वाचे धडे गिरवताना दिसेल. याचाच अर्थ हा धोनीचा अखेरचा हंगाम असल्याचे संकेत दिले जात आहेत. नेतृत्वबदल करण्याचा प्रयोग २०२२मध्येही चेन्नईने केला होता. पण धोनीच्या नेतृत्वप्रभावाखाली वावरणार्या रवींद्र जडेजाला ते शिवधनुष्य पेलता आले नव्हते. मागील वर्षीही चेन्नईने बेन स्टोक्सला कर्णधारपदाचा उमेदवार म्हणून आजमावले. पण गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे स्टोक्स जेमतेम दोन सामने खेळू शकला होता. त्यामुळे ऋतुराज हा चेन्नईसाठी कर्णधारपदाचा तिसरा प्रयोग असला तरी तो अधिक सशक्तपणे न्याय देईल, अशी अपेक्षा आहे.
गेल्या वर्षी ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऋतुराजने नेतृत्व गुणांची चुणूक दाखवली होती. जून २०२३मध्ये आयर्लंड दौर्यावरील मालिकेत जसप्रित बुमरा कर्णधार होता, तर ऋतुराज उपकर्णधार. त्यानंतर हांगझो येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाचे कर्णधारपद त्याने यशस्वीपणे सांभाळले. भारताने एशियाडचे सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम दाखवला. ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधारपदाच्या पहिल्याच स्पर्धेत मोठे यश मिळवून देणारा तो धोनीनंतर दुसरा भारतीय कर्णधार ठरला. त्यानंतर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत ऋतुराज उपकर्णधार होता. या मालिकेतील पहिल्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. पण हे अपयश झुगारत दुसर्या सामन्यात त्याने ४३ सामन्यांत ५८ धावा कुटल्या, तर तिसर्या सामन्यात कारकीर्दीतील पहिलेवहिले आंतरराष्ट्रीय शतक (५७ चेंडूंत १२३ धावा) साकारले होते. त्यामुळेच ऋतुराज या भूमिकेला न्याय देऊ शकेल, अशी आशा वाटते.
पण भारतातील कर्णधारांपैकी सर्वाधिक चर्चा होते आहे, ती मुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची. ट्वेन्टी-२० क्रिकेटसाठी कर्णधार म्हणून गेल्या काही वर्षांत त्याच्याकडे पाहिले गेले. परंतु दुखापती आणि तंदुरुस्ती या कारणास्तव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला दीर्घकाळ पाहणे, हे दुर्मीळ मानले जाते. त्यामुळेच गेल्या वर्षभरात हार्दिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नेतृत्वाच्या शर्यतीत मागे पडला आहे. पण तरीही ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने १६ सामन्यांपैकी १० विजय भारताला मिळवून ाfदले आहेत. ‘आयपीएल’मध्ये दोन वर्षांपूर्वी मात्र हार्दिकने गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना त्यांना पहिल्याच प्रयत्नात विजेतेपद मिळवून दिले. त्याच्या नेतृत्वशैलीचे त्यावेळी बरेच कौतुक झाले. ‘आयपीएल’मध्ये कर्णधार म्हणून त्याने ३१ सामन्यांपैकी २२ सामने जिंकत आपली विजयाची टक्केवारी ७०.९७ अशी उत्तम राखली आहे. गुजरातकडे जाण्याआधी हार्दिक मुंबईच्याच संघात होता. पण यंदा खांदेपालट झाली आहे. रोहितकडून काढून घेत कर्णधारपद गुजरातच्या हार्दिककडे सोपवण्यात आले आहे. या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. कारण रोहितचे नेतृत्वपदी नसणे, हे वास्तव चाहत्यांना पचवणे जड गेले. या संघात सूर्यकुमार यादव हा आणखी एक तारांकित फलंदाज होता. गतवर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सूर्यकुमारने भारताला ४-१ असा विजय मिळवून दिला होता. या यशात सूर्याने एका शतकासह एकूण १४४ धावा केल्या होत्या. पण मुंबईचा भावी कर्णधार तयार होतो आहे, असे वाटत असतानाच सूर्यकुमारऐवजी हार्दिकला प्राधान्य देण्यात आले. आता हार्दिक मुंबईची कशी मोट बांधतो, ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
गुजरात टायटन्सचे नेतृत्व करणारा शुभमन गिल हा या सर्व कर्णधारांपैकी नवखा. पण या नव्या पर्यायाने एक फलंदाज म्हणून भारताच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले आहे. २०१८च्या युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषकविजेत्या भारतीय संघाचा गिल उपकर्णधार होता. इतकेच नव्हे, तर १२४च्या सरासरीने एकूण ३७२ धावा काढत त्याने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही पटकावला होता. पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने साकारलेल्या नाबाद १०२ धावांच्या खेळीचे राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली या दिग्गजांनीही कौतुक केले होते. गुजरात टायटन्सच्या यशात सिंहाचा वाटा असलेला हा सलामीवीर कर्णधारपदाला न्याय देऊ शकला, तर तो भविष्यात आदर्श कर्णधार म्हणून नाव कमावेल.
के. एल. राहुल तिसर्या हंगामात लखनौचे कर्णधारपद सांभाळणार आहे. २०२१मध्ये राहुलकडे पंजाब किंग्जचे कर्णधारपद चालून आले. संघाच्या सर्वाधिक धावा जरी राहुलच्या खात्यावर असल्या तरी पंजाबला बाद फेरी गाठण्यात अपयश आले. २०२२च्या ‘आयपीएल’ हंगामाआधी राहुल पंजाबकडून नव्याकोर्या लखनौकडे स्थलांतरित झाला. राहुलचे नेतृत्व लखनौकडे गेल्यावर प्रत्ययास आले. या संघाने बाद फेरी गाठली, पण एलिमिनेटरमध्ये बंगळुरुने त्यांचा मार्ग रोखला. राहुलने दोन शतकांसह ५१.३३च्या सरासरीने ६१६ धावा काढल्या होत्या. २०२३च्या हंगामात राहुल पुन्हा कर्णधार म्हणून सज्ज झाला. पण दुर्दैवाने बंगळुरूविरुद्ध दुखापत झाल्यामुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. राहुलने ‘आयपीएल’मध्ये ५१ सामन्यांपैकी २५ जिंकत आपली विजयाची टक्केवारी ४७.०१ राखली आहे. यावेळी तो लखनौला पुन्हा एकदा लखनवी यश मिळवण्यासाठी तो उत्सुक आहे.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन हा मात्र सर्व खेळाडूंच्या तुलनेत दुर्दैवी किंवा शापित ठरला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आता भारताकडून खेळण्यासाठी यष्टीरक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध असताना सॅमसनला संघात स्थान मिळवणे जिथे कठीण झाले आहे, तिथे कर्णधारपदासाठी पर्याय म्हणून विचार करणे कठीण आहे. २०२१च्या ‘आयपीएल’मध्ये सॅमसनच्या गळ्यात राजस्थानच्या कर्णधारपदाची माळ घालण्यात आली. त्यावेळी त्यांना सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पण तरीही सॅमसनवर राजस्थानने विश्वास ठेवला. २०२२मध्ये सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थानने उपविजेतेपद पटकावले. सॅमसनने मागील हंगामापर्यंत ४५ सामन्यांपैकी २२ सामने जिंकून दिले आहेत.
कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर याच्यावर सध्या ‘बीसीसीआय’ नाराज आहे. त्यामुळेच ताज्या वार्षिक करारातून त्याची गच्छंती झाली आहे. पण देशांतर्गत क्रिकेट खेळत तो ‘बीसीसीआय’च्या अपेक्षांची पूर्तता करण्याच्या प्रयत्नात आहे. २०१८मध्ये गौतम गंभीरच्या जागी दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधारपदी श्रेयसची नियुक्ती झाली, तेव्हा त्याचे वय होते २३ वर्षे १४२ दिवस. कर्णधारपदाच्या पदार्पणातच त्याने सामना जिंकून देणारी ४० चेंडूंत १० चौकारांसह ९३ धावांची खेळी उभारली होती. त्यानंतर २०१९मध्ये दिल्ली कॅपिटल्स या नव्या नावासह उतरतानाही कर्णधारपद श्रेयसकडे कायम राखण्यात आले. यावेळी दिल्लीने बाद फेरीपर्यंत मुसंडी मारत सर्वांचे लक्ष वेधले. २०२०च्या हंगामात श्रेयसच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ अंतिम फेरीत पोहोचला. या सामन्यात श्रेयसने नाबाद ६५ धावा केल्या, पण मुंबई इंडियन्सला रोखण्यात ते अपयशी ठरल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२१च्या हंगामात दुखापतीमुळे त्याचे बरेच नुकसान झाले. २०२२च्या लिलावात श्रेयसला कोलकाताने आपल्या संघात स्थान देत कर्णधारपदही सोपवले. कोलकाताला तो तितके मोठे यश मिळवून देऊ शकला नाही. मागील हंगामात त्याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. यातून सावरत परतलेला श्रेयस कोलकाताला दिल्लीइतकेच मोठे यश मिळवून देऊ शकेल का, याचे उत्तर यंदाच्या हंगामाअंती मिळेल. ‘आयपीएल’मध्ये श्रेयसने ५५ सामन्यांपैकी २७ सामने जिंकत विजयाची टक्केवारी ४९.०९ इतकी राखली आहे.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या अपघातातून सावरणारा ऋषभ पंत ही पहिलीच पुनरागमनाची स्पर्धा खेळतोय. २०२१मध्ये नियमित कर्णधार श्रेयसने दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून माघार घेतल्याने दिल्लीचे नेतृत्व पंतकडे सोपवण्यात आले. २०२२मध्ये ते कायम ठेवण्यात आले. जून २०२२मध्ये दक्षिण आप्रिâकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतही त्याने कर्णधारपद सांभाळले होते. पण ३० डिसेंबर २०२२ या दिवशी झालेल्या अपघातामुळे पंतला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहावे लागले. आता दिल्ली कॅपिटल्सच्या जेतेपदाचा दुष्काळ तो संपवेल अशी आशा आहे. याचप्रमाणे दिमाखदार कामगिरी दाखवत तो आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी तो आपली दावेदारीही करू शकेल.
तूर्तास, यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये आठ भारतीय कर्णधार कशी कामगिरी बजावतात आणि संघाला कुठवर नेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर रोहित शर्मा या क्रिकेट प्रकारातील कर्णधारपद सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘आयपीएल’मध्ये या भावी कर्णधाराचा शोध भारतीय क्रिकेट निश्चितपणे करू शकेल.