सिनेमातले, सिरीयलीतले, रील्समधले सगळे लोक इतके देखणे, फिट कसे दिसतात? क्या है उनकी खूबसूरती का राज?
– रजनी भेलके, पंढरपूर
काहीजण पोटार्थी नट असतात, त्यामुळे ते पोटाची काळजी घेतात. काही जणांना माहीत असतं की अभिनय उपजत असावा लागतो. तो कमावता येत नाही… त्यामुळे ते ‘कमावण्यासाठी’ शरीर कमवतात..
अलीकडे मी खूप मल्याळी सिनेमे पाहतो. त्या सिनेमांना त्यांच्या मातीचा, संस्कृतीचा खासकरून खाद्यसंस्कृतीचा गंध आहे. त्यांच्या सिनेमात तिकडचं वैविध्यपूर्ण मांसाहारी खानपान सतत दिसत असतं? आपल्याकडे कधीच सिनेमात मिसळ, बटाटेवडा, तांबडा पांढरा रस्सा, मच्छी प्रâाय, वडा भात, भरीत भाकरी, अख्खा मसूर असं काहीच का दिसत नाही?
– सोपान डांगळे, विजापूर
डांगळे साहेब, तुमची जागा चुकतेय… तुम्हाला जे बघावंसं वाटतंय ते हॉटेलात किंवा धाब्यावर बघायला मिळेल… तुम्ही चित्रपटात व्हेज आणि नॉनव्हेज शोधता? नक्की कसली भूक भागवायला तुम्ही पिक्चर बघता? (मनोरंजनाची की पोटाची) तुमची भूक मल्याळी पिक्चरमधूनच भागेल (मनोरंजनाची). भाषा फक्त वेगळी असते, बाकी ‘सगळं’ सेम असतं (खाद्यसंस्कृतीचा, मातीचा गंध).
सगळ्या धर्माचे लोक लाऊडस्पीकरवरून धार्मिक प्रार्थना, संगीत का ऐकवत असतात? त्यांच्या देवाला मनातल्या मनात मनापासून उच्चारलेली प्रार्थना ऐकायला जात नाही का?
– निरंजन रोकडे, जालना
अहो मी काय लाऊडस्पीकरवाला आहे का? की लाऊडस्पीकरचं कंत्राट देण्याच्या बदल्यात त्यांनीही कुठला बॉंड विकत घ्यावा असं तुम्हाला वाटते? (मनातून केलेली भक्ती कुठल्याही धर्माच्या देवाला ऐकायला जाते. पण लाऊडस्पीकरवरून बोंब मारणार्यांच्या देवाची भक्ती करण्यासाठी ‘चंदा’ लागतो. त्यासाठी बोंब मारावी लागते आणि त्यासाठी लाऊडस्पीकर लागतोच. काय करणार… गंदा है पर धंदा है आणि धंदा है तो चंदा है। (असं काही नतद्रष्ट, लिब्रांडू, पुरोगामी म्हणतात… तुम्ही पण असंच म्हणा… म्हणजे तुमच्यावर लाऊडस्पीकरवाल्या देवाच्या भक्तांचा कोप होणार नाही.)
संतोषराव, एवढ्या सगळ्या भानगडी आणि उचापतींमधून आमच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला तुम्हाला वेळ तरी कसा मिळतो हो?
– संजय क्षीरसागर, प्रभातनगर, पिंपळे गुरव.
मी अठरा तास काम करतो. दोन तास झोपतो. उरलेल्या चार तासांत (तुमच्या म्हणण्याप्रमाणे) भानगडी आणि उचापत्या करतो. तुमच्या प्रश्नांच्या उत्तरासाठी मी बायको, मुलं आणि घरदार सोडलं आहे, असं तुम्हाला वाटेल… पण तसं यातलं काही नाहीये. खरं म्हणजे आपण कोणाचं फुकट खात नाही. त्यामुळे कोणाच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला भीत नाही… (तेवढाच टाईमपास होतो, इतर भानगडी आणि उचापत्यांमधून).
यंदाच्या होळीत आम्ही कोणाच्या नावाने बोंबा माराव्यात?
– शैलेश पोकळे, दिग्रस
तुम्हाला आर्थिक, शैक्षणिक, नोकरीधंद्यात, पदप्रतिष्ठेत ज्यांनी बांबू लावला असेल त्यांच्या नावानेच बोंबा मारा. या दिवशी ज्यांच्या नावाने बोंबा माराल तो वाईट वाटून घेत नाही (पण सध्या दिवस वेगळे आहेत असं म्हणतात). त्यामुळे कोणाचं नाव घेऊन बोंबा मारू नका… ज्याच्या नावाने बोंबा मारल्या त्याला आवडलं नाही तर तुम्हालाच बांबू लागेल आणि तो बांबू ‘पोकळ’ नसेल हे लक्षात ठेवा ‘पोकळे’ साहेब (होळीला अशाच भाषेत बोलतात. त्यामुळे तुम्ही माझ्या ‘या’ भाषेचं वाईट वाटून घेऊ नका… आणि मला बांबू लावू नका.)
मुंबईत लोकलला गर्दी तर मरणाची असते… या सगळ्यांचा पास किंवा तिकीट असेलच ना… मग रेल्वे कायम तोट्यात कशी?
– मोहन पाटील, घणसोली
रेल्वे फायद्यात आली तर माझा काय फायदा? म्हणून आम्ही नाही सांगणार. नाही तर लगेच तुम्ही रेल्वे फायद्यात आणाल आणि त्याचं क्रेडिट घ्याल. (तुमच्या प्रश्नाला… ‘उद्योगपतींची कर्ज माफ करणारा देश, स्वत: कर्जबाजारी कसा?’.. या प्रश्नाचा वास येतोय. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर देऊन मला माझा तोटा करून घ्यायचा नाहीये.)
बरीच वर्षे तंबाखू खाऊनही काहीजणांना काहीच होत नाही. दुसरीकडे तंबाखू न खाणार्यांना कॅन्सर झाल्याचं दिसतं. काय गौडबंगाल आहे?
– अशोक बगाडे, माळवाडी
तुम्हाला तंबाखू खायचा आहे का? प्लीज तंबाखू खाऊ नका… तंबाखू खाणार्यांना जास्त प्रमाणात कॅन्सर होतो… जे खात नाहीत त्यांना सहसा होत नाही. हे अर्धसत्य लक्षात घ्या… (तुम्हाला हवं तेवढच सत्य सांगू नका. उगाच तंबाखू न खाणार्या आमच्यासारख्यांना भीती वाटते).